माझा सर्व्हे एक हजार मीटरपर्यंत पोहचला, तेव्हा बारा वाजून गेले होते. मी वामनला विचारलं,
“गडगे किती चेनेजपर्यंत रचून झालेत?”
तेव्हा त्यानं बेस लाईनचे गडगे बाराशे पन्नास झालेत, पण क्रॉस सेक्शनचे मात्र बोरज साईडचे अकराशेपर्यंत झालेत म्हणून सांगितलं. याचा अर्थ मला पुरेशी चाल नव्हती. वामन म्हणाला,
“असं करा ना साहेब, तुम्ही आता थांबा आणि परत जा. आम्ही साखर साईडचे गडगे हाणतो, म्हणजे उद्याचाला तुम्हाला पुढची चाल मिळेल.”
मी खोलीवर परत आलो. झालेल्या कामाची फिल्डबूकं पूर्ण करत बसलो. थोड्याच वेळात बीएस आणि ट्रायल पीट घेणारा ठेकेदार आले. बीएस आणि ठेकेदार वही टेप घेऊन मापं काढण्यासाठी निघाले होते. त्यांच्या बोलण्यातून एक रनिंग बील करायचं चाललं होतं. मला उत्सुकता होती म्हणून म्हटलं,
“बीएस, मी पण येतो बरोबर.”
मला ठेकेदाराची नाराजी स्पष्ट जाणवली. बीएसनं मात्र फारशी नाराजी दाखवली नाही. आम्ही तिघं गेलो.
पाच मीटर बाय पाच मीटरचा खड्डा. त्याच्या मध्यावर अदमासे एकमीटर लांबी रुंदीचा ढिंबा सोडलेला. खोली अंदाजे सहा मीटर असेल. चार कोपरे आणि मधला ढिंबा अशा पाच ठिकाणी खोली मोजली. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी लागलेल्या स्ट्राटाप्रमाणं त्यांनी मापं घेतली. उदाहरणार्थ, एकूण खोली ५.२० मीटर – केवळ माती ०.७५ मीटर, साधा मुरूम ०.८० मीटर, कडक मुरूम ३.२५ मीटर आणि मऊ खडक ०.४० मीटर. अशा बारा खड्ड्यांची मापं घेतली. ही मापं पाच ठिकाणी घेतली असल्यानं सरासरी काढून वहीत चित्र काढून नोंदवली. त्याच्याकडं चार रंगांचे रिफीलवाले पेन होते. मातीची खोली निळ्या रंगात, मुरुमाची काळ्या, मऊ खडकाची लाल वगैरे रंगात त्यानं वहीवर रेखाटली. परंतु, खोली मोजलेली मापं पेन्सिलनं लिहिली. मी त्याला पेन्सिलनं मापं का लिहिली म्हणून सहजपणे विचारलं. त्यानं वही फटदिशी बंद केली.
संध्याकाळी तो ठेकेदार पुन्हा आला आणि बीएसला म्हणाला,
“रावसाहेब, बिलावर सही करायला केव्हा येऊ?”
बीएस त्याला बोलत बोलत विठ्ठल मंदिराच्या दिशेनं घेऊन गेला. बीएस परत आला तेव्हा ठेकेदार निघून गेला होता, पण बीएसच्या हातात व्हिस्कीची बाटली होती.
आमची सगळ्यांची रात्री मटण पार्टी झाली.
दुसऱ्या दिवशी मोजमाप पुस्तकात तो मापं लिहीत होता, तेव्हा वहीतली पेन्सिलनं लिहिलेली मापं व्यवस्थित शाईनं लिहिलेली होती.
आज मी सर्व्हेला सुट्टी घेतली, कारण मशीननं काढलेली खडकांची कोअर मोजमाप पुस्तकात लिहायची होती. मस्टरच्या तिसऱ्या भागात मशीननं केलेल्या कामाचा ताळेबंद मांडायचा होता. बीएसनं ट्रायल पीटची मापं कशी देखणी नोंदवली होती. आपणही तसंच नोंदवायला हवं. दादांना म्हटलं,
“ही कोअर बघितली की वरवंट्याची आठवण येते. काही कशी तुटलेली फुटा-दीडफुटाची, तर काही सलग सहा-सात फुटाची.”
दादा म्हणाले,
“खडकाचाही स्वभाव असतो. तुटकी कोअर म्हणजे त्यावर धरणाचा बोजा पडला की कुरकुरणार आणि लांबलचक कोअर म्हणजे काय यायचं ते लोड येऊ द्या.. आपले खांदे मजबूत आहेत मगदूम दादासारखे, असं म्हणणारी.”
दुसऱ्या मशिनकडं बघतो तर दादांचं एकच मशीन चालू. दादा म्हणाले,
“साहेब, दुसरं मशीन सिक पडलंय. त्याला दवाखान्यात भरती करावं लागणार. उद्या ते मशीन दापोडीला धाडणार आहे.” परत येताना दुसरं घेऊन येणार आहे, हे ऐकून माझ्या स्वभावाप्रमाणं मी नाराज व्हायला हवं होतं. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी म्हटलं,
“दादा, हे मशीन पोहचवलं की दुसरं लगेच लोड करणार का?”
“होय तर, तशी व्यवस्था केलीये.” दादा आत्मविश्वासानं म्हणाले.
मी म्हटलं, “मशीनबरोबर कोण असणार आहे?”
दादा म्हणाले, “ट्रक ड्रायव्हर आणि आपला सदू ऑपरेटर. माझ्या ध्यानात येतंय तुम्ही का विचारताय. योग चांगला जुळून येतोय. आज गुरुवार. उद्या शुक्रवारी निघालं की शनिवारी मशीन पोहचंल. रविवारी दुसरं लोड होईल आणि सोमवारच्याला ते येईल बोरजेत. येईल, येईल तुम्हाला जाता येईल आन् मायला भेटता येईल.”
शुक्रवारी नादुरुस्त मशीन ट्रकमध्ये लोड होऊन बोरजेतून निघायला चार वाजून गेले. आंबेनळी घाट, महाबळेश्वर, वाई, कात्रज घाट ओलांडून पुण्यात पोहचलो तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. बाजीराव रोडनं आप्पा बळवंत चौकात मी उतरलो. चालत लकडीपुलाच्या दिशेनं जाताना मला पुणं वेगळंच वाटायला लागलं. आता अकरा वाजता रस्त्यावर इतका शुकशुकाट? बोळकांडीसारखा केळकर रस्ता जंगली महाराज रस्त्यासारखा भव्य वाटायला लागला. त्या रिकाम्या रस्त्यावरून चालताना दडपण आल्यासारखं वाटायला लागलं. तेवढ्यात मागून सायरन वाजवत पोलिसांची गाडी माझ्यापाशी आली. माझ्या हातातल्या बॅगकडं पाहून एका पोलिसांनी जरबेत विचारलं,
“कुठून आलाय?”
मी म्हटलं, “महाडहून.”
“कसे आलाय?”
“ट्रकमधून”
“ट्रक कुठाय?”
“तो गेलाय दापोडीला.”
“तुम्ही कुठं चाललाय?”
“हे काय इथंच, टकले हवेलीशेजारच्या वाडयात. माझं नाव विनय जोशी. मी इरिगेशनमध्ये इंजिनियर आहे. आमच्या साईटवरचा ट्रक दापोडीला जाणार होता म्हणून त्यातून आलो. मी इथलाच रहाणारा आहे.”
एका शब्दाचे प्रश्न आणि एकाच शब्दाचं उत्तर मला त्रासदायक व्हायला लागलं होतं, म्हणून न विचारलेल्या पण विचारणार असलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. मला वाटलं आता माझी सुटका झाली. पण एक शिपाई माझ्याबरोबर चालत राहिला. मी वाड्यात शिरलो. वाडा झोपलेला, जणू रात्रीचे दोन वाजलेत. मी दाराची कडी वाजवली. आतून नेहमीसारखं पटकन दार उघडलं गेलं नाही. पुन्हा वाजवली. अहं… आता तो शिपाई संशयानं पहायला लागला. मी जोरात हाक मारली. आईनं दार उघडलं. मला पाहून ती भेदरली, कारण बरोबर पोलीस, हातात बॅग आणि चेहऱ्यावर काळजी. शिपायानं विचारलं,
“ओळखता तुम्ही यांना?”
आई म्हणाली, “हो, मुलगा आहे माझा.”
शिपाई निघून गेला. मी घरात आलो. घरातील सगळी अंथरुणं जागी झाली. मी आल्याच्या कौतुकापेक्षा आश्चर्य आणि भीती जास्त होती.
माझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देण्याआधी आईनं चहा करून आणला. गॅसवर कुकर चढवला. दादांनी विचारलं,
“ही कुठली भलती वेळ काढलीस येण्याची? यावेळी पुण्यात चिडीचूप असतं. गौरे, तू लिहिलं होतस ना पत्रात..? तरी हा मूर्खासारखं आलाय यावेळी.”
दादा मूळ वळणावर चाललेले पाहून आजीमध्ये पडली,
“बाळा, पत्र वाचलं होतंस ना गौरीनं पाठवलेलं?
मी म्हटलं,
“मला पत्र मिळालेलं नाही, कारण ते महाडच्या पत्त्यावर गेलं असणार. मी आलोय बोरजहून.
“अरे, पण पेपर तरी वाचतोस की नाही?” दादांचं करवदन चालूच होतं.
“मी पेपर वाचत नाही, कारण बोरज या ठार खेड्यात तो येत नाही.” माझाही संयम सुटून मी म्हटलं.
आता गौरीनं माझा ताबा घेत पुण्यात काय घडतंय, हे सांगायला सुरवात केली.
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके:
१) आजच्या नंतर उद्याच्या आधी
२) बिन सावलीचं झाड
३) पोरकी रात्र भागीले दोन
४)सी मोअर...
५)शिदोरी स्व विकासाची
६) एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)