महाडचे दिवस ५९ : खोली चेंज

साहेब डीजेला कोंझरला सोडून जाताना म्हणाले,

“आता तुमच्या जोडीला डीजेला घेऊन आलोय. नदीच्या खालच्या अंगाचे पंधराशे चेनेज तुम्ही केलेत. त्यापुढचे  चेनेज डीजे करतील. तुम्ही वरच्या अंगाला बुडीत क्षेत्रातील चेनेज करायला घ्या कारण ह्या भागातील सर्व्हे मला अचूक हवाय. महत्वाचं म्हणजे हा डाटा मला गाव नकाशावर साथोसाथ ट्रान्स्फर करून हवाय. मोकाशीसाहेबांना तो तातडीनं दाखवायचाय.”

मी आणि डीजे बाहेर पडलो तेव्हा तो म्हणाला,

“जोशी, मेहता तुझ्यावर जाम चिडलंय. तू साहेबांच्या कानाला लागून त्याच्याबद्दल काहीबाही सांगितलंस आणि त्यामुळं साहेबांनी त्याला इथून काढून घेतलं, अशी त्याची खात्री झालीये. नक्की काय झालंय?” मी त्याला खुलासेवार सगळं सांगितलं. कॉलिमेशन प्लेन मेथड वापरल्यानं किती गोंधळ होऊ शकतो, हे मी त्याला समजावून सांगूनही त्यानं त्याचाच हेका चालवला आणि ते साहेबांच्या लक्षात आलं. त्याचप्रमाणं लेव्हल्स न घेता तो कसा मॅन्युप्लेट करत होता, ते सांगितलं. मुळात मी यातलं काहीच स्वतःहून साहेबांना सांगितलं नव्हतं पण साहेबांच्या ते कसं लक्षात आलं माहीत नाही. त्यावर डीजे म्हणाला,

“बरं झालं तुझ्याशी बोललो नाहीतर मेहताच्या एका बाजूच्या सांगण्यावरून मीदेखील तुला व्हीलन ठरवलं असतं. आपल्यात मात्र असलं काही राखून ठेवायचं नाही. चूक असेल तर लगेच दाखवायची. तू म्हणतोस की तू साहेबांना  मेहताबद्दल सांगितलं नव्हतंस. मी तुझ्याजागी असतो तर शत प्रतिशत सांगितलं असतं.”

माझा मराठवाड्यातील प्रामाणिकपणावर विश्वास होता.

बुडीत क्षेत्रातील चेनेजचे क्रॉससेक्शन गडगे रचायला मी लेबर लोकांना सांगितलं. हे सांगताना स्वतःचं डोकं चालवलं. नदीच्या डाव्या बाजूला खडा डोंगर होता तर उजव्या बाजूला बऱ्यापैकी सपाटी. मी लेबर लोकांना बेसलाईनपासून डावीकडं तीनशे मीटर आणि उजवीकडं सातशे मीटर क्रॉससेक्शन टाकायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी रचून झालेल्या गडग्यांच्या लेव्हल घेत होतो. नव्वद चेनेजला उजवीकडं सातशे मीटरऐवजी साडेतीनशे मीटरपर्यंतच गडगे रचलेले. मला वाटलं की पुढचे गडगे टाकायचे राहून गेलेले दिसताय. उरलेले गडगे टाका म्हणून सांगितलं तर कुणी हलायला तयार नाही. मी थोडासा चिडतोय हे पाहून एकजण म्हणाला,

“साहेबानू आमी म्होरं नाय लाईन खेचणार. म्हातोबाबाबाची समाधी हाय तिथं. ती पाण्यात डुबती व्हाया नगं.”

मी त्यांना म्हटलं,

“अरे बाबांनो, ही फक्त मोजणी आहे. पाणी पसरताना अंतराप्रमाणं नाही पसरत. जमिनीच्या उंची खोलीप्रमाणं पसरतं. ते किती पसरणार हे धरणाच्या बांधाच्या उंचीवर अवलंबून असतं. ती तर अजुन ठरायचीये.”

त्यांचं समाधान झालं नाही म्हणून मग मी चेनेज ऐशी आणि चेनेज शंभर यांच्या लेव्हल पाहून चेनेज नव्वदच्या लेव्हल लिहून टाकल्या. या न घेतलेल्या लेव्हल लिहिताना मेहताचा रागावलेला चेहरा दिसायला लागला.

दहा बारा दिवसात बुडीत क्षेत्रातील बावीसशे चेनेजचा सर्व्हे मी संपवला. फिल्डबुकं, गाव नकाशा घेऊन मी महाडला ऑफिसला आलो. साहेबाना सगळं दाखवलं. ते काहीच बोलले नाहीत. मी जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली आलो तेव्हा लक्षात आलं की माझी शबनम बॅग मी वरच विसरलोय. ती आणायला म्हणून वर जात असताना ऐकलं साहेब शेवाळेंना सांगत होते,

“जोशी कामाचा आहे. डिप्लोमा करताना तो का सारखा नापास होत होता कळत नाही.”

खाली शहापूरकर दिसला. मी म्हटलं, “हे काय, तू इथं? साईटवर नाही गेलास?”

तो गोड हसला आणि म्हणाला,

“तारीख ठरलीये. वहिनीनं पुढच्या गोष्टी बोलायला ‘हिच्या’ लोकांना बोलावलंय आणि जमलं तर तुही ये म्हणाल्या. माझी फार इच्छा आहे की तू माझ्याबरोबर सोलापूरला यावंसं पण मी नाही म्हणू शकत तसं तुला. नुकतीच आजी गेल्यानं मोठी रजा झालीये तुझी.”

शहापूरकरच्या डोळ्यातील तळमळ पाहून मला सोलापूरला जाऊन आल्यासारखं वाटलं.

दुपारी बर्वेकाकुंच्याकडं जेवायला जाताना मंडईतून थोडीशी भाजी घेऊन गेलो. काकूंना म्हटलं,

“न कळवता आलोय. घोटाळा तर नाही ना झाला.”

त्या काहीच बोलल्या नाहीत. स्वयंपाकघरात झाकलेली भांडी दिसत नव्हती. म्हणजे आज मला कोकणे किंवा गोकुळला जावं लागणार होतं. स्टुलाच्या कडेला भाजी ठेवत मी एकदा काका आणि काकूंच्याकडं पाहिलं. दोघंही चिंतेत दिसले. कारण विचारू की नको, असं झालं. मी परत जाण्यासाठी वळलो तेव्हा काकू म्हणाल्या,

“आज काहीच केलेलं नाही. जोशीकाका, तुम्ही घरच्यासारखे म्हणून सांगते. मी आणि ह्यांनी आमच्या जयंताला माझ्या भावाला मुलासारखं आईबापाच्या माघारी वाढवलं. पाच वर्षांमागे त्याला क्षयाची बाधा झाली होती. ते दुखणं काढलं. रेवदंड्याला कामासाठी गेला तेव्हा तुमच्यासारख्या जेवायला येणाऱ्यांमध्ये जयंताला पहात होतो. आज अचानक तो कळवतोय की, मी लग्न केलं. आम्हाला थोडीदेखील कल्पना न देता. केलं ते केलं पण कुणाशी? एका भंडारी पोरीशी. काही सुचत नाहीये सकाळपासून. काका, तुम्ही सांगा उद्या तुम्ही असं वागलात तर तुमच्या घरच्यांना काय वाटेल? ह्यांनी तर आज अंघोळपण केली नाही. देवपूजा तर लांबच राहिली. मी म्हणाले अंघोळ करून घ्या तर त्यावर म्हणाले की करतो जयंताच्या नावानं. आता असा या वयात त्रागा करून जयंता लग्न मोडून परत येणार आहे का?”

मी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला.

काही वेळापूर्वी शहापूरकरचा लग्न जवळ आलं म्हणून उमललेला चेहरा आणि बर्वे दांपत्याचा जयंतानं झटक्यात लग्न केलं म्हणून काळवंडलेला चेहरा. कोण तो जयंता मी पाहिलापण नव्हता. त्याच्या वागण्यात चूक होती का? त्यानं अगोदर सांगितलं असतं तर यांनी हसतमुखानं ‘हो’ म्हटलं असतं का?

बाजारपेठेत फिरत असताना श्रीकांतच्या खोलीकडं लक्ष गेलं. नेहमी बापट खोलीवर आहेत का नाही, हे सांगणाऱ्या मावशी दिसल्या. त्या म्हणाल्या,

“मित्र इथं आता रहात नाही म्हणून आमच्याशी बोलायचं नाही वाटतं?”

मी उदासवाणं हसत म्हटलं,

“छे छे! असं काही नाही. काय म्हणताय?”

बरंच काही म्हणायचं म्हणूनच थांबलीये. तुमच्या हापिसातला तो गोरागोमटा मुसलमान. कालच्याला बाजारपेठेत फिरत होता. एका मुलीशी लाळघोटेपणा करत होता. आता ही मुलगी कोण तर वकीलसाहेबांची. तिनं बघितलं बघितलं आणि त्याला चांगला कानफटवला. त्याला पळता भुई थोडी झाली. ब्राम्हणाच्या पोरीची छेड काढतोय मेला.”

मावशींना नेमका राग कशाचा आला होता? त्यानं मुलीची छेड काढली याचा की मुसलमानानं ब्राम्हणाच्या मुलीशी तिला गृहीत धरून धशचोटपणे वागला याचा? मी चालत पानसरे सायकल दुकानाशी आलो. मागच्या चाळीत डोकावलं. शहापूरकर आरश्यात बघून मिशी कातरत होता. मी म्हटलं,

“तुझी तारीख?”

तो म्हणाला, “आहेत अजुनी दीड-दोन महिने.”

“तू लग्न झाल्यावर याच खोलीत राहणार आहेस?”

“नाही नाही मागं ती गवळ आळीतली जागा पाहिली होती ना ती रिकामीच आहे. ती घेणार पण असं का विचारतोयेस?”

मी मोहल्ल्यातली जागा सोडायचं ठरवलंय. तोवर तुझ्याबरोबर इथं राहावं, असा विचार करतोय. लग्न होऊन तू गवळ आळीतल्या सासरी गेलास तरी ही खोली कंटिन्यू करीन.”

“का? कुरेशीनं आणखी दिवे लावले का?” मी त्याला मावशींनी काय सांगितलं त्यातलं अवाक्षरदेखील बोललो नाही. सामान हलवताना कुरेशीशीसुद्धा ब्र काढला नाही.

कोंझरला पोचलो तेव्हा डीजेला खोली बदलली आणि शहापूरकर बरोबर राहतोय, हे सांगितलं. डीजे पटकन म्हणाला,

“शहापूरकर हलला की मी तुझा रुम पार्टनर. तू कुरेशीपासून बाहेर पडतोयस तसं मलाही बीएसपासून सुटायचंय. कुरेशी आणि बीएस दोघ जुळी भावंडंच ना.”

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके:
१) आजच्या नंतर उद्याच्या आधी
२) बिन सावलीचं झाड
३) पोरकी रात्र भागीले दोन
४)सी मोअर...
५)शिदोरी स्व विकासाची
६) एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :