महाडचे दिवस ६०: चला वाड्यावर

बुडीत क्षेत्रातील चेनेज अकराशेपर्यंत मी सर्व्हे करत आलो होतो. तेव्हा सगळे लेबर काम सोडून एका दिशेकडं बोटं दाखवून तोंडानं न ऐकलेले आवाज काढायला लागले. मला ते काम सोडून भलतंच काहीतरी करतायत, हे पाहून राग यायला लागला. चिडून मी एकाला बोलावलं तेव्हा तो सांगायला लागला,

“सायबानू, भेकर गावतय.” 

मला तो काय म्हणतोय तेच समजेना. मला कसं सांगावं ते त्याला कळेना. तरी तो म्हणाला,

“करवंदाच्या जाळीत भेकर हाय. भेकर म्हंजी धाकला हरीन. लै चलाख जनावर. घावलं तर चांदी.”

मी पण काम सोडून त्या भेकराला बघायला उतावीळ झालो. माझ्या नजरेची तपश्चर्या पंधरा मिनिटांनी फळाला आली. दीड फूट उंचीचं आणि तेवढ्याच लांबीचं गोजिरवाणं जनावर माणसाच्या नजरेपासून लांब जायचा प्रयत्न करत उशी घेत सैरावैरा धावत होतं. त्याचा मागोवा घेत सगळेजण कमालीच्या शिस्तीनं त्याच्या मागं धावत होते. आजचा माझा सर्व्हे तिथंच थांबला. भेकर पाहिल्यावर मी लेबरवर चिडणं विसरून गेलो. सर्व्हे थांबला होता आणि भेकर थांबत नव्हतं. अर्ध्या-पाऊण तासानं धापा टाकत रिकाम्या हातानं नदीपात्राशी सगळे जमा झाले. दमून सगळ्यांचं पाणी पिणं बघून मला वाटायला लागलं की आता नदी आटणार.

खोलीवर परत येताना एकजण सांगत होता,

“इथं ससं लै घावत्यात पर भेकर कदीमदीच. रातच्याला आमी शिकार कराया जातू. ससं म्हनू नगा, भेकर म्हनू नगा, रानडुक्कर बी घावतं. धमाल असतीया. तुमास्नी शिकारीला यावं वाटत असलं तर सांगा. बेत करू.”

मी मनाशी स्वप्न रचायला लागलो. आपल्या कमरेला फक्त लंगोटी, गळ्यात ताईत, डोकं तेलाविना केसांनी  सजलेलं, कमरेला कोयती आणि तोंडानं आवाज… लहाहा लहाहा कुर्रर्र…  

खोलीवर माझ्याशिवाय कुणीच नाही. रस्त्याकडं पाहिलं तर आमचीच सरकारी जीप. साहेब आम्हाला शोधायला क्रॉससेक्शनच्या जंगलात फिरतायेत. माझ्या डोक्यात भेकर आणि साहेबांच्या डोक्यात भलतंच! मला आलेलं पाहून त्यांना हायसं वाटलं. रस्त्यावर येऊन त्यांनी हाक दिली,

“मेहता अहो मेहता”

मेहता चोरासारखा आत आला. त्यानं केस कमी केले होते आणि नजरेतला बेमुर्वतखोरपणा गायब. साहेब म्हणाले,

“मेहतांना पुन्हा तुम्हाला जॉईन व्हायला आणलंय. तुम्हाला म्हणजे तुमच्या गॅंगला. वैयक्तिक तुम्हाला मी पुन्हा हलवतोय. तुमचा मुक्काम आता आणखी पुढं म्हणजे ‘वाडा’ गावाला. आठ किलोमीटरवर आहे. तिथं तुमच्या जोडीला चव्हाण येतील बोरजेहून. झालंय कसं एकाचवेळी साखर-बोरज, कोंझर, कोंझर पिकअप वेअर, वाडा आणि शिवथर इतकी प्रॉजेक्ट हॅन्डल करायचीत त्यामुळं सारखी हलवाहलव करायला लागतीय.”

साहेबांनी टोपोशीट समोर ठेवून बोलायला सुरवात केली,

“कोंझर धरणरेषेपासून खालच्या अंगाला (डाऊन स्ट्रीम) लगेच भिजक्षेत्र (कमांड एरिया) नाही. त्यामुळं धरणरेषेपासून लगेच डावा आणि उजवा कॅनॉल काढणं, व्यवहारी नाही. मात्र हे भिजक्षेत्र आठ-दहा किलोमीटर वाडा गावापासून सुरु होतंय म्हणून वाडा गावाजवळ एक छोटा पिकअप वेअर घ्यायचा आणि तिथून कॅनॉल सुरु करायचा. हे कसं आहे, मोठ्या पातेल्यात कालवण केलंय आणि पंक्तीत वाढायचंय. तेव्हा आपण काय करतो, हे कालवण छोट्या चौपाळ्यात घेतो वाढायला का तर सोयीचं व्हावं म्हणून. तसंच हे आहे. पंधरा टीएमसी कपॅसिटीचं कोंझर धरण आणि दोन टीएमसी कपॅसिटीचा वाडा पिकअप वेअर. धरणरेषा ठरविण्यासाठी आपण ब्लॉक कॉंटूर सर्व्हे करतो तसाच थोडक्या क्षेत्रासाठी वाडा गावाजवळ सर्व्हे करायचा. ब्लॉक कॉंटूर सर्व्हे झाला की तिथून पुढं महाडच्या दिशेनं कॅनॉल सर्व्हे करायचा. मध्ये तुम्हाला नाते, नांदगाव अशी गावं लागतील पण तो फार पुढचा भाग झाला. तूर्त तुम्ही वाडा गावच्या पिकअप वेअरवर लक्ष केंद्रित करा. येताना मी तुमचं काम सोपं करून आलोय. वाडा गावामध्ये रस्त्याला लागून एक घर आणि त्यातच किराणा दुकान आहे. त्या घराच्या मालकीण बाईंशी बोलून आलोय. तुम्ही त्यांच्याच घरातील एका खोलीत राहू शकता. काही अडचण किंवा शंका असतील तर आपण जीपमध्ये बसून बोलूया. चला, आपण वाड्यावर जाऊ या.”

चार पाच वळणं घेऊन जीप थांबली.

“इथं आपल्याला सर्व्हे करायचा आहे. नदीपात्राच्या या बाजूला हे सागाचं झाड आणि पलीकडचं खैराचं झाड जोडून आपली पिकअप वेअर रेषा आखा आणि काम सुरु करा. पात्राच्या दोन्ही बाजूला तूर्त साडेतीनशे मीटरचा ब्लॉक तयार करा. आता इथं डोह दिसतोय कदाचित पुढच्या काही दिवसात पाणी आटेल. आता तुमच्या मुक्कामाच्या जागी जाऊया.”

एकच घर. आत शिरलो तर भुसार धान्याची पोती आणि शेल्फात किराणा माल. त्याच्या मागं घर. घराला ओलांडून गेलो तेव्हा परसदारातून पाणवठ्याकडं झेपावलेली पाऊलवाट. स्वयंपाक घरात एक बारा-तेरा वर्षाची मुलगी. आम्हाला पहाताच ती पुढं आली आणि म्हणाली,

“आई नात्याला गेलीये. नातं गाव नदीच्या पलीकडं आहे. तिला यायला किती टाईम लागेल माहिती नाही. भाऊ इकडं ये तुला तुझी खोली दाखवते.”

बोळकंडीसारखी दोघे-तिघे झोपतील इतकीच जागा. त्यात एक मोरी आणि चूल.

“भाऊ आईनं एक गडी पाहिलाय तुमचं जेवण बनवणारा. आम्ही ओशट खात नाही तेव्हा तुम्हीपण…” पहिली सूचना मिळाली आणि ती चहा करायला आत गेली.

चहा आला. कपाची कड तुटलेली आणि आत कोरा चहा. तो जास्त चहा पावडर घातलेला आणि खूप उकळलेला काळा चहा मी कसाबसा पीत होतो तेव्हा परसदाराच्या पाऊलवाटेनं तिची आई आली. कपातील काळा चहा बघताच त्या म्हणाल्या,

“मायाबाई पाव्हण्यांना काळा चहा पाजतीस होय. जरा थोडं थांबावं की नाही. हे बघ मी दूध घेऊन आलोय. साहेब राहू दे तो कप. मी चांगला चहा करून आणतो.”

बाईमाणसाच्या तोंडून मी आलो, करतो अशी भाषा मी प्रथमच ऐकत होतो.

“साहेब, मी जेवण कराया माणूस बघून ठेवलाय आणि मोजणीला काय पाच-सात गडी लागतील ते बी सांगून आलोय. इथं मी, ही पोरगी आणि माझा पोरगा असतो. आमचं साहेब यष्टीत कंडक्टर आहेत त्यामुळं ड्युटीप्रमाणं त्यांचा इथं घरात मुक्काम असतो. आम्हाला बी सोबत होईल या लोकांची आणि भाऊ मी एकली दोन पोरांना घेऊन राहतोय  पण घाबरायचं काम नाही; माझ्याकडं बंदूक आहे.”

बापरे. माझ्या कानात ठो आवाज शिरला. बाई बोलायला आणि वागायला बिनधास्त दिसतायत. चला, आणखी एक वेगळं व्यक्तिमत्व बघायला मिळणार. साहेबानी मला कोंझरला सोडलं . मेहता छातीच्या फासळ्या दाखवत कोनाड्यातले  पत्ते  घेऊन पेशन्स डाव लावत बसला होता.

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके:
१) आजच्या नंतर उद्याच्या आधी
२) बिन सावलीचं झाड
३) पोरकी रात्र भागीले दोन
४)सी मोअर...
५)शिदोरी स्व विकासाची
६) एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :