kas-pathar-platue-chitrakshare-goshta-creations-season-visiting-month-satara-tourism-shreekant-dange-valley-of-flowers-marathi-lekh-bhatakanti

सातारा जिल्ह्यातलं जैववैविध्यानं नटलेलं ठिकाण म्हणजे ‘कास पठार.’ सह्य़ाद्रीतलं ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरलं आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारं कास पुष्प पठार हे पश्चिम घाटासह ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतंच समाविष्ट करण्यात आलं आहे. कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं जुलै २०१२ मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील ३९ ठिकाणांपैकी एक आहे. २१ देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचं नामांकन मिळालं आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेलं ठिकाण आहे.

कास पठार हे कातळ खडकांचं कमी प्रमाणात माती असलेलं पुष्प पठार आहे. इथं सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचादेखील समावेश आहे. ‘रेड डाटा बुक’मधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. त्याचबरोबर, गावातला कास तलाव व एकूणच सारा परिसर नयनरम्य आहे. त्यामध्ये, वजराई धबधबा, कुमुदिनी तलाव, कास तलाव आणि डाक बंगला, बामणोली बोट क्लबलाही भेट देता येते. कास पठारापासून कोयना अभयारण्याची हद्द वीस किमीच्या अंतरावर आहे.

कास पुष्प पठारावरील फुलांमुळं आणि वनस्पतीमुळं इथलं वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरी शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगछटांची फुलं पर्यटकांच्या डोळयांची पारणी फेडतात. फुलांवर पसरणाऱ्या इंद्रधनुष्याच्या छटा पाहताना जणू एखाद्या स्वप्नसृष्टीत गेल्यासारखंच वाटतं. कास पुष्प पठाराला डोळयांचं पारणं फिटावं अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरलेलं आहे. या पठारावरचा बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला कायम सज्ज असतो. पावसाच्या हलक्या सरी, गर्द धुकं आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतींमुळं आणि नयनरम्य फुलांमुळं कास पुष्प पठार परिसर धरतीवरचा जणू स्वर्गच असल्याचा भास इथं येणाऱ्या प्रत्येकाला करून देतो. या पठारावर क्षणात इंद्रधनुष्याच्या छटा, तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुकं, तर कधी रिमझिम पावसाच्या सरी.. असे वातावरणातील हे बदल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. इथलं निसर्गसौंदर्य अक्षरक्ष: मोहात पाडतं आणि इथल्या धुक्यात जणू न्हाऊन जावं, अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणानं होते.

कास पठारावर पावसाळा संपता संपता ‘ऑगस्ट ते ऑक्टोबर’ या महिन्यांत रानफुलं येतात. ही रानफुलं विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वाऱ्याची झुळुक आली की डोलणारी, नानाविध रंगाची फुलं अक्षरश: मन मोहून टाकतात. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळफुलं संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी ही कमळाची फुलं, अलगद कॅमेऱ्यात एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवायला प्रत्येकालाच भाग पाडतात. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्यं निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’नं महाराष्ट्रातूनही ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र’ कार्यक्रमाद्वारे सात आश्चर्यं निवडली; त्यात ‘कास पठार’ आहे.

*

वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता


आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :