बायकांकडे भांडार आहे
भेदांच्या गोष्टींचं
दुय्यमत्वाच्या गोष्टींचं
लेकीबाळी चालत राहतात
अशी दुखरी मनं घेऊन
सांधत राहतात घरांना
जिथून येतात
आणि जिथं जातात
त्यांना पण नकोयेत या गोष्टी
तिच्या आपल्यांना
निभवावंच लागतं
चलता है थोडाबहुत तो
म्हणत ते ढकलतात तिला
ये थोडाबहुत
खूपच साचत राहतं
बोललं तर उद्धट
चूप राहीलं तर घुमी
आतल्या गाठीची
या गाठी कधी कधी ‘नासूर’ बनतात
मग बायका जमतात कट्ट्यावर
भडाभडा बोलतात
प्रत्येकीला असते घाई
ऐकायला कोणीच नाही
मग त्या
तुझं काहीच नाही..
माझं तर..
नको तू ऐकूच शकणार नाही..
म्हणत
गोष्टींचं चऱ्हाट
गुऱ्हाळ सुरूच
अगंबाई!
तुझं-माझं
हिचं-तिचं
किती वेगळं
पण सल सारखंच
मग त्या ऐकतात जीव लावून
फुंकर घालतात
दुःखावर एकमेकींच्या
सांभाळ गं स्वतःला म्हणत
निघून जातात
नव्या ताकदीनं
किंवा कौशल्यानं सहन करायला
शिकतात खरं बोलायला
गोष्टी संपूच नये
त्यांनी येत रहावं
रडत रहावं
करमणूक हवीच ना!
बाजार भरवायचं टाळतात तरी त्या गोष्टींचा
नाहीतर साहित्यात महापूर येईल
घरंदारं वाहून जातील या पुरात
मोडकी-तोडकी कुटुंब व्यवस्था
टिकून राहावी म्हणून
त्या या गोष्टी फक्त सिक्रेट कट्ट्यावरच करतात
घरं आनंदानं नाचतात
खुलतात
अशा कित्येक पुरलेल्या गोष्टींवर…
*
वाचा
कविता
चित्रकथा
बायजा – कादंबरी
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा