महाडचे दिवस ६१: खातू वाघीण

Mahadche-divas-chapter-61-deepak-parkhi-marathi-kadambari-pratilipi-mrutyunjay

दोन दिवसात कोंझरमधलं अर्धवट काम संपवलं. आता पारध्यांसारखं पुढच्या गावी पालवं टाकायला निघालो. मनात येत होतं की साहेब माझं बूड एका ठिकाणी का बसू देत नाहीत. आपलं विरोध न करणं नडतंय का? मी स्वतःला समजावत म्हटलं, ‘हे आपल्या पथ्यावर पडतंय. वेगळी माणसं, वेगळी जागा अनुभवणं आपल्याला समृद्ध करतंय. याचा विषाद नको मानायला.’ कोंझरमधून काही स्वयंपाकाची भांडी पोत्यात भरून एसटीनं वाड्याला उतरलो. ताईंनी ते बघितलं आणि म्हणाल्या,
“भाऊ, ह्याची काय गरज होती? माझ्याकडं मोप भांडी पडलीत. यापुढं काही लागत असलं तर मला आधी सांगायचं. भरलं घर आहे हे.”

संध्याकाळी शिळोप्याच्या ताईंबरोबर गप्पा मारत बसलो. गप्पातून ताई उलगडत गेल्या. त्या सांगत होत्या,
“आम्ही खातू मंडळी. किराणा दुकान चालवणं, हे आमच्या खानदानात. आता दुकान म्हटलं की गल्ला आला. त्यात मी दोन लेकरांना घेऊन राहणारी एकटी बाई. एकदा मध्यरात्री दारावर दगड पडले. पोरं घाबरून मला चिकटली. मी घाबरतोय होय. झोपताना सैल पडलेला काष्टा घट केला, अंबाबाईला नमस्कार केला आणि बंदूक घेऊन बाहेर आलो. बाहेर रुमालात तोंड झाकलेलं, काठ्या घेतलेलं चार गडी. मी विचारलं, ‘मरतुकड्यांनो दुकान लुटायला आलाय. जरा नीट चौकशी तरी करायची आत कोण राहतंय? शेळी राहतीया का वाघीण?’ मी आवाज टाकताच दोन पावलं मागं सरले. पदराआडची बंदूक त्यांना दाखवली आणि या वाघिणीपुढं त्यांचं ससं झालं. याला तीन वर्षं झाली म्हणा. माझा ह्यो पराक्रम पेपरात छापून आला. आमचे हे म्हणाले की, आपण गावात रहायला जाऊ. मी शाप सांगितलं, मी खातू नाव सांगणारी बाई आहे. इथंच राहीन आणि इथंच दुकान पण चालवून दाखवीन. त्या दिवसापासून गिऱ्हाईकदेखील वाढलं.”

दोन दिवसांनी ताई म्हणाल्या,
“आज आमच्याकडंच जेवायला या. खूप दिवसांनी गोडाचं जेवण बनवणार आहे. आज पाच दिवसांनी आमचं शेठ मुक्कामाला आहेत. शेठ म्हणजे माझं कुकू. ते आलं की त्यांना जेवायला गोड लागतं आणि आम्हाला बी अन्न गोड लागतं. रोज त्यांना कँटीन नाहीतर मुक्कामाच्या गावात मिळेल ते खावं लागतं ना.”

संध्याकाळी खातू शेठ आले. अगदी ताईंच्या विरुद्ध. त्यांचं आणि ताईंचं काट्यावर वजन सारखं, पण आजूबाजूच्या लोकांमध्ये ताईंचं वजन जास्त. स्वतःहून ते बोलत नव्हते. सारखं प्रश्न विचारल्यावर बोलणाऱ्या माणसांचा कंटाळा येतो. यांना बोलतं कसं करावं, हा प्रश्न मला पडला. बोलायचं म्हणून बोलताना मी उगाच विचारलं,
“शेठ, तुम्ही पूर्वी महाड डेपोला होता तर त्या श्रीकांत बापटांना ओळखता का?”
ते ताठ बसले आणि छातीशी हात जोडत म्हणाले,
“तुम्ही देव माणसाचं नाव घेतलंत. परोपकारी माणूस. ओळख असो नसो, नडलेल्याला आणि अडलेल्याला मदत करायला अर्ध्या रात्री तयार. आमच्या एसटीमधल्या लोकात काम करताना चुका होतात. काही चुका मुद्दाम केलेल्या, तर काही सरळ वागण्यातून झालेल्या. हा माणूस त्याची वकिली करणार आणि त्याला बाहेर काढणार. पुन्हा अपेक्षा काही नाही.”
ज्याच्यावर आपला जीव आहे त्याचं त्याच्या माघारी कौतुक ऐकलं, की आपलंच मास वाढतं.
“तुम्ही आता मुद्दाम केलेल्या चुका म्हणालात. मुद्दाम म्हणजे?” मी विचारलं.
ते म्हणाले, “आमच्याकडं एक कंडक्टर होता. आमचा तिकिटांचा ट्रे ट्रिपच्या वेळी सोपवताना प्रत्येक किमतीच्या तिकिटांचे सुरवातीचे नंबर नोंदवले जातात आणि ट्रीप किंवा ड्युटी संपली की परत घेताना पुन्हा नंबर नोंदवले जातात. वजाबाकी करून फाडलेल्या तिकीटाची रक्कम जमा केली जाते. यात खोट आली तर पैसे भरावे लागतात. जास्तीचे पैसे असले तर त्याचा खुलासा द्यावा लागतो. एकाकडून जमा करून घेतलेला ट्रे नंतर दुसऱ्याला याच पद्धतीनं सोपवला जातो. या कंडक्टरकडून जमा झालेला ट्रे एखाद्यानं घेतला की त्याला हमखास खोट आल्यानं पैसे भरायला लागायचे. असं का होतंय याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की, हा कंडक्टर तिकिटं फाडताना एखादं गठ्ठ्यातलं मधलंच तिकीट फाडायचा. त्यामुळं याच्या हिशेबात ते तिकीट नाही पण नंतरच्या कंडक्टरच्या हिशेबात ते यायचं. ज्याचे पैसे त्या बिचाऱ्याला भरावे लागायचे. पुन्हा त्याला दारूचा नाद. गेली त्याची नोकरी.”

सकाळ झाली. बाहेरच्या अंगणात कातकरी बसलेले. जवळपास सगळेच एकसारखे दिसणारे. यातले बरेच जण दुकानातून काहीतरी घ्यायला आलेले, तर चार पाच-जण सर्व्हेच्या कामासाठी लेबर म्हणून आलेले. मी ताईंना म्हटलं,
“या लोकातले माझ्याबरोबर येणारे कोण, हेच समजत नाही. त्यांना गणवेश दिला पाहिजे.”
त्यावर ताई आणि लेबर हसत बसले. ताई त्यांना म्हणाल्या,
“रामा, उद्याधरनं धोतराची लंगोटी नाय लावाची. आमच्या मायाच्या फ्रॉकवानी हिरवी, गुलाबी नाही तर देवळाच्या कळसावर असतीया तशी केशरी लावाची. जमलं का?”
लेबर हसत राहिले आणि एकजण ताडकन उठला. काल गव्हाचं पीठ दळून आणलेली पिशवी खिळ्याला अडकवली होती. त्या पिशवीकडं धावला. पिशवीचं तोंड आवळत ओरडला,
“उंदीर घावला.”

पिशवीतील पीठ खाण्यासाठी उंदीर आत शिरला होता. त्यांनं तसंच तोंड दाबून धरून दगडावर पिशवी तीन-चार वेळा आपटली. आजूबाजूला फिरून वाळलेल्या काटक्या गोळा केल्या आणि पेटवल्या. त्यावर तो मेलेला उंदीर भाजला. त्याची जळालेली कातडी सोलून काढली. ताईंकडून मीठ मागून घेत त्या लगद्यावर फिस्कारलं आणि एकचित्तानं खात बसला. त्याचं खाणं संपल्यावर ताई म्हणाल्या,
“आता हे पीठ कामाचं नाय राहिलं. आता तुझं सायेब उपाशी रहाणार आन् तू ढेकरा काढणार. भाऊ, याची आजची हजेरी मांडू नका. दुपारी त्याच्या खोपटात भात जेवा.”

दिवसभर तो माझ्या नजरेला नजर देत नव्हता आणि माझी नजर त्याच्या चिकटलेल्या पाठ आणि पोट यांची  एकत्रित जाडी मोजत होती.

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :