चव्हाणची अजुनही बोरजहून सुटका झाली नव्हती. पण माझी याबद्दल कुठलीच तक्रार नव्हती. काम करत असताना मी पूर्ण गँगमध्ये फक्त कातकरी असणाऱ्या लेबरकडून समृद्ध होत होतो. घरी असलो की दुकानात सतत राबता असलेल्या कातकरी गिऱ्हाईकांशी संवाद साधताना मजा लुटत होतो. एरवी मी खोलीवर आलो असा उल्लेख करायचो पण इथं मात्र आपोआपच घरी आलो, असं म्हणायला लागलो. ताई बोलताना, ‘मी आलो-गेलो’ असं म्हणायच्या. पण माया मात्र ‘मी येते-जाते’ असं म्हणायची. मला याचीदेखील गंमत वाटत होती.
मी ताईंना म्हटलं,
“ताई, गिऱ्हाइकांना माल देताना वजन करून देण्याचं काम मी हौसेनं केलं तर चालेल का? मी इंजिनियर आहे. त्यामुळं मापात पाप करणार नाही.”
ताई माझं हे वाक्य ऐकून हसत राहिल्या आणि म्हणाल्या,
“आमची गिऱ्हाइकं जिन्नस घेताना किलोमध्ये घेत नाहीत. त्यांना पन्नास ग्रॅम चहापत्ती आणि शे-दीडशे ग्रॅम साखर हवी असते. ती तोलून द्यायला तुम्हाला जमंल का? नाहीतर मापात पाप नको म्हणून वेळ घालवाल आणि त्या बिचाऱ्याची गाडी चुकायची.”
कातकरी अडाणी असल्यानं सर्व्हे करताना काय करायचं आणि कसं करायचं हे समजावून देताना बरीच मेहनत घ्यावी लागेल, असं वाटत होतं; पण प्रत्यक्षात ते काम सोपं झालं. त्यांचा बुद्ध्यांक इतका चांगला होता की त्यांना कॉलेजमध्ये घातलं असतं तर मी वाया घालवलेली वर्षं त्यांनी भरून काढली असती.
नदीतल्या डोहाच्या बाजूनं क्रॉससेक्शन लाईन जात होत्या. पाण्यामध्ये जिरलेल्या गडग्यांची लेव्हल मी अंदाजानं लिहिणार होतो, पण हे पठ्ठे टेप आणि स्टाफ घेऊन त्या निळाईत शिरले. सर्व्हेच्या अचूकतेचं भान माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त होतं. दहा वाजले होते. अजुनही उन्ह अंगावर घेत काम करायला त्रास होत नव्हता. क्रॉससेक्शनची साठ मीटरची लेव्हल घेताना दुर्बिणीपुढं फांद्या येत होत्या. मी एकाची कोयती घेऊन फांदी छाटायचा प्रयत्न केला. दुर्बिणीला नडणारी फांदी सोडून भलतीच तोडली, तीही खूप वेळ घालवून. हार पत्करत मी कोयती त्याला परत केली. माझी फजिती ते सगळे पंधरा मिनिटं आठवून आठवून हसत होते. मीही ओशाळवाणं हसत राहिलो.
अचानक रायगडाच्या बाजूनं गलका ऐकू आला. ताशासारखा डबे बडवल्याचा आवाज आणि तोंडानं काढलेला ‘हा हा हा’ आवाज. कोंझरचा अनुभव लक्षात घेऊन मी विचारलं,
“भेकर का?”
तो म्हणाला,
“नाय जी, डुक्कार उठवलं हाय.”
“तू कसं ओळखलंस?”
मी चमकून विचारलं. त्यावर तो म्हणाला,
“कोण जनावर हाय ते बघून हाकारं घालत्यात. ह्यो हाकारा डुक्कराचा हाय.”
एकीकडं आम्ही काम करत होतो आणि गलका जवळ येत चालला. तो अगदी कर्कश झाला आणि तो ओरडला,
“सायबानू मशीन सोड, झाडामागं दड.” मी पळालो.
डोंगर उतरणीवरून जीवाच्या करारानं धूड धावत आलं. त्यानं डंपी लेव्हल पाडली. मी वेळीच पळालो म्हणून वाचलो. सगळीकडून घेरलेलं ते जनावर कुठं वाट दिसेना म्हणून सैरभैर झालं. काहीच न सुचून त्यानं डोहात उडी घेतली. गलका आणखी तीव्र झाला. पाण्यात दोन चार भाले पडले. डुकराचं चित्कारणं आकाशापर्यंत गेलं. मघाच निळं पाणी रंग बदलून लाल लाल होत गेलं. पाण्यात बराचवेळ चाललेली खळबळ हळूहळू शांत झाली. लोक पाण्यात शिरले. दोन वाश्यांना दोरीनं डुकराचे पाय बांधले गेले. निथळता वासा बाहेर आला तेव्हा पाणी कमी पण रक्त जास्त ठिबकत होतं. मघाची रणवाद्य शांत झाली होती पण त्याची लपलप करणारी जीभ धुगधुगी दाखवत होती.
शिव म्हणाला,
“आता याचं वाटं केले जातील. गावात घराघरात पोचवलं जातील. रातीला हर एक चुलाण्यावर एकच वास असतोया.”
माझ्या डोळ्यापुढून त्या डुकराची अखेरची धडपड जात नव्हती. त्याचे बाहेर येऊ घातलेले डोळे आणि बाहेर पडलेली जीभ… खूप उदास वाटत होतं. माझी अवस्था ताईंनी जाणून घेतली. गप्पामध्ये विनोदी बोलणं त्यांनी टाळलं.
आज कालच्याच जागी जाताना पाण्यात डोकावून पाहिलं . पाणी लाल राहिलं नव्हतं. आज उन्हं बरंच होतं. दुपारचे साडेबारा झाले होते. शिवला म्हटलं जरा पाणी बघू. त्यानं थुंबा (कातकऱ्यांची वैशिष्ट्यपूर्ण सुरईच्या आकाराची वॉटर बॅग) उलटा करून दाखवला. तसंच रेटून काम करत राहिलो पण तहान स्वस्थ बसू देईना. पूर्वेला दोन घरं दिसली. मी शिवला म्हटलं तिथून थुंबा भरून आण. तो हलायला तयार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगूनही त्याच्यात फरक पडला नाही. मी वैतागलोय हे पाहून म्हणाला,
“सायबानू, तथलं पाणी नगं.”
मी का विचारलं तेव्हा म्हणाला,
“ती वस्ती आपल्या माणसाची न्हाई. आमी तिथलं पाणी पीत न्हाई. तू बी नगं पिऊ.”
मी पिसाळलो. तरातरा त्या घराकडं गेलो. कुणीही माझ्या मागून आलं नाही. त्यांना पाणी मागितलं. नऊवारी लुगडं आणि नाकात नथ घातलेली एक आजी पुढं आली. तिनं लोटाभर पाणी दिलं. ‘अजुन हवं का?’ विचारलं. मी हो म्हणताच आत जाता जाता म्हणाली,
“चार दिस बघतीये. कसली मोजणी म्हणायची, रस्त्याची की धरणाची?”
मी म्हटलं, “कालव्याची. तुमची जमीन भिजायला हवी ना म्हणून.”
तिनं माझ्यावरून हात ओवाळून स्वतःच्या कानशीलाशी बोटं मोडली आणि म्हणाली,
“पुण्याचं काम करताय बाबांनो. थोडा च्या देऊ?”
मी तिचं मन मोडलं नाही.
आमची गॅंग माझ्याबद्दल बोलत होती. कुडाच्या खोपट्यात राहणारी, एरवी लंगोटीवर दिवस दिवस काढणारी ही लोकं विटांच्या घरात राहणाऱ्या आणि अंगभर कपडे ल्यायलेल्या ‘त्या’ लोकांचं पाणी पीत नव्हती. मी काम बंद करून परत येत होतो. मी यांच्याशी काही बोलत नाही हे पाहून अस्वस्थ झालेला शिव म्हणाला,
“सायबानू, हे तू बराबर नाय केला. आणखी कुणाला सांगू नगं, आमी बी सांगत न्हाई.”
मी वाईट कशाकशाचं वाटून घेऊ. रानडुकरांच्याच घरात घुसून त्याला मारून खाणाऱ्या माणसाच्या वागण्याचं की पाणी पिण्यासारखी सुंदर गोष्ट पिढ्यानपिढ्यांच्या संस्कारातून ‘त्या’ कारणांनी नाकारणाऱ्या कातकऱ्यांच्या वागण्याचं?
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)