माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर
उमटणारे तुझे शब्द
बॅकग्राऊंड म्युझिकसारखे अविरत
स्त्रवत असतात माझ्या मनात
त्या शब्दांचे नितळ अर्थ
मी सेव्ह करते पापण्यांच्या फाईलमध्ये
‘हाय कशी आहेस?’
‘मूड नाही? बॉस रागावला?’
मला न पाहता सगळं कळतं तुला
चॅटींगच्या पटलावर फुलू पाहणारं
आपलं नातं… मी डिलीट का करावं?
तुला चेहरा नाही म्हणून?
माझ्या बिनचेहऱ्याच्या प्रियकरा,
तू जगात कुठं आहेस मला माहित नाही
पहायचं नाही मला तुला
तुझं कपाळ, तुझे केस, तुझे डोळे
याही पलीकडे तू हवा आहेस मला..
फेसबुकवर तुझ्या चेहऱ्याच्या जागी असणारा एक टपोरा थेंब पावसाचा
तू काही सुचवू पाहतो आहेस का?
चेहरा म्हणजे माणूस?
शरीराचे उत्सव म्हणजे प्रेम?
माझ्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असलेल्या
माझ्या बिनचेहऱ्याच्या प्रियकरा,
तू इथंच आहेस
माझ्या जगण्याच्या अनिवार इच्छेच्या धुनीजवळ…
*
वाचा
डॉ. प्रिया दंडगे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कवयित्री प्रिया दंडगे या डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसायाबरोबरच वृत्तपत्रं, नियतकालिकांमधून नियमितपणे लेखन करतात. विविध कथा स्पर्धांमधून त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत. त्याचबरोबर 'स्वयंसिद्धा' या संस्थेच्या वतीनं त्या आरोग्य शिक्षणाचं कामसुद्धा करतात.