लॉकडाऊन : एका भयाण वास्तवाचं चित्रण

lockdown-dnyaneshwar-jadhavar-rajya-shasan-puraskar-prapta-marathi-kadambari-samikshan-parikshan-lakh-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य साथीच्या आजारानं जी परिस्थिती निर्माण झाली, त्या सर्व परिस्थितीचा सखोलपणे आढावा या कादंबरीत घेतलेला पाहायला मिळतो. हे जे कथानक पुस्तकात रेखाटलं आहे, ते त्या वेळेतलं खूप भयानक वास्तव होतं. जसं जसं पुढे वाचत जात होतो तशी माझी उत्सुकता वाढायची, की नेमक पुढं काय होणार? पण आज सगळं डोळयासमोर आलं.

हे सर्व ज्ञानेश्वर जाधवर लिखित व न्य़ू एरा पब्लीशिंग हाऊस पुणे प्रकाशित ‘लॉकडाऊन’ कादंबरीमध्ये चित्रीत केलं आहे. माणसांचा जन्म, जगणं आणि मरणं हे अनादी काळापासून सुरू आहे. निसर्गाच्या चक्रानुसार जन्म–मृत्यू झाला तर पाठीमागं राहिलेल्या नातेवाईक व आप्तेष्टांना  तेवढ्या वेदना होत नाहीत. हा, जर एखादी व्यक्ती अचानक आपल्यातून निघून गेली तर मग प्रचंड वेदना होतात. असंच जर संपूर्ण जगाबरोबर घडू लागलं तर सर्व मानवी समूहच हादरून जातो. तेच अगदी कोरोनाच्या साथीनं झालं आहे. कोरोना आला, त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी लॉकडाऊन केलं पण नियंत्रणात किती आला, हे काही कळलं नाही. अनेक माणसांना लागण झाली. काहीचा मृत्यू झाला, तर सामान्य कुटूंबातील कर्ती व्यक्ती गेल्यानंतर बाकीच्या व्यक्तींचे जगण्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. 

गावाकडच्या एका गरीब कुटुंबातून आलेला तरुण इंजिनियर. पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी करून आपला गाडा हाकत असतो. अचानक लॉकडाऊनची घोषणा होते आणि त्या आकांतभयानं तो आपल्या गावाला जाण्यासाठी कुटुंबाला घेऊन दुचाकीवर  निघतो. इथून या कादंबरीचा प्रवास सुरु होतो आणि पुढे काय काय त्रास सहन करावा लागतो, याचं अगदी हृदयस्पर्शी वर्णन या पुस्तकात सखोल केलेलं आढळतं. त्यातला एक एक प्रसंग लेखकानं खूपच गमतीशीर आणि हुबेहूब लिहिला आहे. त्यामुळं मला वाटतं की, प्रत्येक वाचक स्वतःलाच तो नायक आहे, असं समजूनच वाचत असेल. कारण लिखाणच तेवढं भिडणारं आहे. गावी जात असताना चेकपोस्टवर नायकाला अडवून जेव्हा पुण्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. तेव्हा त्याच्या मनाची झालेली घालमेल, तिथे त्याला प्रशासकीय अडचणीला समोर जावं लागलेला त्रास, तिथलं वातावरण आणि एकूणच सगळ्याच गोष्टींचा त्रास त्या नायकाला सहन करावा लागत होता. तो सहजासहजी पचनी पडणारा नव्हता. त्यामुळं ती खूपच वाईट वेळ होती, याची क्षणा क्षणाला प्रचिती येत जाते. नायकाचं आपल्या  कुटुंबावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर त्याने सोसलेले हाल, हे खूपच मनाला चटका लावणारे आहेत. तिथल्या डॉक्टरांनी केलेलं त्यांचं काउंसिलिंग, त्यातून त्यांना मिळालेला नि:श्वास, त्यातून त्यांनी जगण्याची बांधलेली नवी उमेद, तसेच हॉस्पिटल मधल्या इतर रुग्णांचे अतरंगी किस्सेही गमतीशीर पद्धतीने रेखाटलेले दिसतात. सोबतच त्यातुन घडणारा विनोद, प्रत्येक व्यक्तिरेखेचं केलेलं अचूक कथन या सगळ्यांमुळे कादंबरी जरी भावनिक आणि हृदयस्पर्शी जरी असली तरी तिला बाकीच्या कथानकामुळे पूर्णत्व प्राप्त झालेलं दिसून येतं.

एक एक प्रसंग अगदी मलासुद्धा माझ्या लहानपणी घेऊन गेला आणि विचार करायला भाग पाडलं. खरी मजा तेव्हा येत असते, जेव्हा नायकाचा त्याच्यातल्याच दुसऱ्या नायकाशी जेव्हा संवाद होत असतो. काही प्रसंग हे खूपच भावुक करून जातात आणि केव्हा डोळे पाणावतात, हेच कळत नाही. एक प्रसंग तर इतका जिव्हारी लागून जातो की, तो वाचल्यानंतर मला पुढे वाचनच करू नये असं वाटलं. तो प्रसंग म्हणजे त्या नायकाच्या पत्नीचा कोरोनानं झालेला मृत्यू.

खूपच भयानक परिस्थिती होती तेव्हाची. ते सगळं आता जरी आठवलं तरी अंगावर काटा येतो. पण वास्तव नाकारता येत नाही. प्रशासकीय यंत्रणेतले दोष प्रकर्षाने दाखून दिले आहेत, ते खूपच आवडलं आणि ते खरंच आहे. आज आपण महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहोत पण लॉकडाऊनच्या काळात जे जे होताना पाहायला मिळालं, ते बघून असं वाटत की आपण कधीच महासत्ता होऊ शकत नाही. कारण, आजही कित्येक जण असे आहेत की त्यांनी या परिस्थितीचा फायदा आपली पोळी भाजून घेण्यासाठी केला. ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी’ खाण्याचं काम काही विकृत लोकांनी केलं आहे. त्यामध्ये जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच अनेक डॉक्टर्स, नर्स, तिथला छोटा मोठा स्टाफ यांच्यासहित तळागाळातला छोटा कर्मचारीसुद्धा सहभागी होता. हा सगळा काळाबाजार या कादंबरीमध्ये वेगळं वळण देऊन समोर ठेवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला दिसून येतो. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या काही पोकळ घोषणा, त्यामध्ये थाळीवादन आणि दिवे लावण्याचा कार्यक्रम हा किती लाभदायक ठरला आणि किती नाही, याचंही चर्चासत्र इतर व्यक्तिरेखेंच्या तोंडून झालेलं पाहायला मिळतं. तितकच ते गमतीशीरसुद्धा घडलेलं दिसतं.   

हे पुस्तक एक वैयक्तिक कौटुंबिक कथानक वाटतं. परंतु, त्यामध्ये कोरोना काळातील सत्याच दर्शन झाल्यामुळं हे पुस्तक कौटुंबिक हद्दीच्या पार जाऊन एका व्यापक दृष्टिकोनातून जर वाचलं तर त्याचा परीघ चोखंदळ वाचकाला नक्कीच जाणवतो. त्यामुळं सर्वच बाजूंनी हे पुस्तक एका उत्कृष्ट साहित्याची निर्मिती नक्कीच वाटते.

माणसाच्या विकृत प्रवृत्तीने बरबटलेल्या या समाजाला आणि सरकारच्या अपयशाला एक प्रकारचं बाळकडूच यातून पाजलेलं आहे. आता तरी सरकारनं प्रशासकीय यंत्रणेत आवश्यक ते बदल करून त्याची कटाक्षानं अंमलबजावणी करावी. माणसाचं माणूस म्हणून जगणं मान्य कराव, असं मला वाटतं.

***

शीर्षक: लॉकडाऊन
साहित्यप्रकार: कादंबरी
लेखक: ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
प्रकाशन: न्यू एरा पब्लिकेशन
संपर्क: +९१ ९०७५४९६९७७

*

वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Avatar
संतोष जाधव

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :