एका वर्षी असाच एक पावसाळा होता. दर वर्षी कोरड्या दुष्काळाला घाबरणारा बळीराजा यावर्षी नियमानं हजेरी लावणाऱ्या पावसानं हरखला होता. शेतीची कामं जोरात सुरू झाली. पण एकही नक्षत्र कोरडं न जाऊ देणारा पाऊस ओला दुष्काळ बनून शेतीचा घास घेतो की काय, अशी आपदा दिसू लागली.
खोपटाच्या व्हरांड्यात काळ्या, करड्या पाठीच्या गोगलगायी फिरत होत्या. सततच्या ओलीमुळं वळवळणाऱ्या शिदीडांचा बुजबुजाट झाला होता. ओलसर झालेलं सरपण धुराचा धुरळा उडवल्याशिवाय पेटायला राजी नव्हतं. सततच्या गारव्यामुळं बाळूचे कपडे वारंवार बदलावे लागत. त्याला जराही ओल सहन होत नसे. जोवर बायजा येऊन त्याला स्वच्छ करत नाही तोवर तो एकसारखा ओरडत राही.
एका अशाच पावसाळी दिवशी बाहेर सततच्या विजा चमकत होत्या. बायजा घरात चुलीपाशी खटपट करत होती. बिना आधणाची जरी चूल पेटत ठेवली तरी घरात ऊब आणि उजेड राही.
असे वादळी पावसाचे दिवस आले की ती अस्वस्थ व्हायची. तशीच आजही तिची तगमग होत होती. काळजात जाळ उठला होता. बाळू जोरजोरात ओरडत होता. विजा चमकल्यावर त्यालाही तेच आठवत असेल का? असं तिला वाटलं. ती चूल पेटवल्यानंतर घाईनं त्याच्यापाशी गेली. त्याच्या डोक्यावर थोपटत सायमाखल्या आवाजात म्हणाली,
“काई नाई बरं, हे राखस आभाळ हाये. निसतंच भेव दाखवतंय. गप पड. गप पड. आता सगळं होऊन चुकलं. आता कशाचं भेव?”
तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ते पाणी बाळूला दिसू नये म्हणून ती म्हणाली,
“बाहेर आपली शेळी आरडतीये. तिला बी विजांचा, पावसाचा धाक पडला असंल. तिचा बी जीव हाय. तिला सोडवून आत आनते आन् व्हरांड्यात बांधते. तू तवर गप पड हिथं. आलेच मी लगेच.”
बायजानं बाळूच्या खुरट्या केसांतून हात फिरवला आणि ती बाहेर आली. खालच्या वावरात भुईमूग काढणाऱ्या गड्याला अन् त्याच्या बायकोला तिनं आवाज दिला.
“पाऊस सुरू व्हईल आता. पटकनी घरात जा. भाईर नका थांबू.”
घरासमोरच्या पेरूच्या झाडावर टाकलेली बाळूची गोधडी, प्रेतवत थंड पडलेली वाकळ, तिचं लुगडं असं तिनं घाईवाई घरात आणलं. बाहेर फोडून ठेवलेली सरपणाची मोळी आणून व्हरांड्याच्या भिंतीला उभी करून ठेवली. बाहेरच्या भिंतीला थापलेल्या गोवऱ्या घरात आणल्या. संध्याकाळच्या स्वयंपाकाला म्हणून चार-दोन अळूची पानं खुडून आणली आणि नंतर शेळी सोडवायला गेली.
पोटुशी असलेली शेळी दोरीला हिसके देत होती. तिच्यातही पहिल्यांदा रुजलेल्या आईपणानं मोठंच बळ आणलं होतं. ती बायजाला जुमानत नव्हती. ती देत असलेल्या जोरदार हिसक्यानं तिच्या मनगटावरच्या दोन बांगड्या कच्चकन टिचल्या. मनगटातून रक्ताचा ओघळ गेला. बायजानं तशीच दुखऱ्या हातानं शेळी व्हरांड्यात बांधली.
जखमेवर हळद लावण्याच्या विचारानं ती घराकडं वळली आणि उंबऱ्यातच थबकली.
कंदीलाच्या थरथरत्या उजेडात दिसलेल्या त्या दृश्यानं तिची बोबडी वळली. बाळूच्या अंथरूणाच्या दोन-तीन हातावर चकाकणाऱ्या खवल्यांच्या कातडीचं, सापाचं जुळण एकमेकांशी झटाझोंब्या घेत होतं.
तिनं आरडाओरडा केला. गडी धावत आला. त्यानं सराईतपणे त्या सापांची विल्हेवाट लावली. घरात ठेवलेलं शिंगाड जाळून धूर केला.
“माये, आता काय घाबरू नको बघ. शिंगाडाच्या वासानं कोनतंच किडूक इकडं भटकायचं बी नाई. आता निसूर झोप.”
पण तरीही बायजाला निसूर झोप काही लागली नाही. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नव्हता.
तिला सतत जराही आरडाओरडा न करता थंड डोळ्यांनी सापाच्या जुळणीकडे बघत असणारी बाळूची नजर आठवत होती.
आषाढ लागला होता. अशोकाचा, कडूलिंबाचा डेरा हिरवागार झाला होता. त्यांच्या पिकून खाली पडलेल्या फळांना पाखरं झोंबत होती. सिताफळी, लिंबं फळांनी लगडली होती.
ओल्या दुष्काळाचं संकट थोडक्यात हुलकावणी देऊन गेलं होतं. पेरण्या झाल्या होत्या. आता लवकरच धान्याचे अंकूर तर्रारून वर येणार होतं. आषाढाची अगदी शेवटी खुरपणी करावी लागणार होती. तोवर माणसं निवांत होती.
बाळूचा जन्म आषाढातला त्यामुळं आषाढात तीन वेळा तरी काही तरी गोडाधोडाचं आणि तळण करून कूलदैवताला नैवेद्य वहावा लागे.
आज बायजानं तळणाचं काढलं होतं. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पावसाच्या त्या एकतान ठेक्यावर बायजाच्या गळ्याला सूर सापडला होता.
“भाऊ घेतो चोळी भावजय तिथं गेली
रूपयाचा खण पावली कमी केली
भाऊ घेतो चोळी भावजय मारी हाका
रूपयाचा खण पावली देऊ नका”
बायजा आज तिच्या तिच्या नादात तिच्या आता अस्तित्वात नसलेल्या माहेराची गाणी म्हणत आखाड तळत होती. आज ती विशेष खुश होती. पंधरा पैशाच्या पिवळ्या कार्डावर आलेलं लक्ष्मणाचं पत्र हे तिच्या आनंदाचं कारण होतं.
कार्डावर लक्ष्मणानं खुशाली पाठवली होती. चौथी पास असलेल्या गड्यानं एक एक अक्षर लावत तिला पत्र वाचून दाखवलं. तिला कळालं की लक्ष्मण कुठली तरी मोठी परीक्षा पास झालाय आणि तो खूप मोठ्ठा साह्येब होणार आहे. तिचं काळीज आनंदानं भरून पावलं होतं.
घडलेल्या त्या अघटितानंतर गावी पाऊल ठेवण्याचं धैर्य जमा व्हायला लक्ष्मणाला काही वर्ष लागली. पण आता तो स्वतः पेढे घेऊन बायजाईला भेटायला येणार, असं त्यानं पत्रात आवर्जून सांगितलं होतं.
त्या खुशीतच तिनं भज्यांसाठी ओव्याची पानं खुडली. ओव्याच्या भज्यांचा आणि कुरडईचा घमघमाट सुटला होता. बाळू घशातून आवाज काढत होता. तळणाच्या वासानं त्याचीही भूक चाळवली गेली होती.
“जरा दम काढ लेकरा. तुला भजी आवडत्यात मला माहितीये. पन निवद तर वाहू दे. दम जरा.”
तिनं लगबगीनं नैवेद्य वाहिला आणि बाळूला खाणं भरवलं. त्याचं तोंड स्वच्छ निपटून पुसल्यावर तिनं पुन्हा काही भज्यांचा गरम गरम घाणा काढला. गावात म्हातारीला देण्यासाठी सगळं निगुतीनं एका फडक्यात भरलं आणि गड्याला आवाज देऊन तेवढं जेवण म्हातारीपर्यंत नेण्याची व्यवस्था केली. त्या तळलेल्या जेवणावर रस्त्यानं जातांना कसली बाधा होऊ नये म्हणून त्यावर तुळशीचं पान ठेवायला ती विसरली नाही.
पुन्हा एकदा सगळं एका मोठ्या थाळ्यात भरलं आणि बाळूला म्हणाली,
“मी आलेच ह्ये ताट शेजारी देऊन. तवर तू ह्या खाटंवर गप पड.”
अंथरूणापाशी सापाचं जुळण दिसल्यानंतर तिनं गड्याकरवी जमिनीपासून उंच अशी खाट बाळूसाठी खास बनवून घेतली होती.
“आलेच रं इतक्यात. तवर गप झोप द्येवाचं नाव घेत. लय गरबड करू नको. खाटंचं लाकूड कच्चं हाय.”
बाळूनं जोरात नाराजीचा हुंकार दिला.
“नको वैतागू गोईंद्या. अश्शी जाते आन् अश्शी येते बघ.”
तिनं ओच्याला खोचलेला पदर काढला. त्याच्या टोकानं चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि गड्याच्या घरी गेली.
“सुरखे, अगं हायेस का घरात? काय करतीस गं?”
तिनं गड्याच्या बायकोला आवाज दिला. जडावलेली सुरखी हसऱ्या चेहऱ्यानं म्हणाली,
“ये ना माये! पडले होते उलशीक.”
“हालचाल करत ऱ्हायची सुरखे, म्हंजे बाळंतपनात तरास नाई व्हत.”
“मस हालते गं माये पन दोन दिसापासून लय खुबा दुखतोय. सारखाच बोंब मारतोय. पार चालायला बी जमंना मला.”
“व्हतंय काईकाईंना असं. बारा खोडीची बारा पोरं असत्यात.”
“हा माये, बाईचा जल्मच वाईट.”
“असं कशाला म्हंती? डोहळ्याचं सुख हाये का गडीमानसाला? प्वार छातीशी प्यायला घेतलं का जलम पावन झाल्यावानी वाटतय. त्ये गडीमानसाला कळल का कदी?”
सुरखी हसत राहिली.
“बरं त्ये जाऊदे. ह्ये बघ मी उलसंक वाढून आनलंय. घे गरम गरम खाऊन,” असं म्हणून तिनं ताट पुढं केलं. सुरखीच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव आणि डोळ्यात आलेली चमक बायजाच्या नजरेतून सुटली नाही. बायजा तिच्याकडं मायेनं बघत होती. तिच्या मनात आलं,
‘पहिली पोर वाचली असती तर सुरखीच्याच आगंमागंची असती. माझ्या जिवाभावाला झाली असती.’
“माये, तू बी खाय ना. मला तर येवढी भूक लागंती जनू काय पोटात राखस शिरलाय,” असं म्हणून सुरखी खुदुखुदु हसू लागली.
तिला लडीवाळ हसताना पाहून बायजाच्या पापणीच्या सांदीत आलेली सूखाची ओल बायजानं
तिला दिसू दिली नाही.
—-
(क्रमशः)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.