त्या गप्पांच्या नादात झरझर अंधारून आलेलं आभाळ त्यांच्या ध्यानीही नव्हतं. जवळच कुठंतरी पाऊस फुटला होता. वारा गारेगार, बोचरा झाला होता. त्या गारव्यानं दोघांनाही एकदमच भुकेची जाणीव झाली. रामनं लक्ष्मणाच्या काळजीपोटी विचारलं,
“घरी जायचं का? भूक लागली असंल ना तुला? आईचा रातचा सैपाक लवकरच व्हतोय. यदाळून झाला बी असंल.”
“नाही रे, इतकी पण भूक नाही लागली. अजून जरा वेळ फिरू आणि मग जाऊया घरी.”
“थांब, येक काम करू आपून. खालच्या बांधाला लागून आमराई हाये. तिथं लय कैऱ्या पाडी लागल्या असतील. लय गुळमट कैरी ती. पार खोबऱ्यावानी लागतीय चवीला. जायचं का?”
इतक्या आग्रही अप्रूपाच्या प्रस्तावाला नाही म्हणणं लक्ष्मणाला शक्यच नव्हतं. दोघंही चिखलात उड्या मारत वावराच्या सऱ्यांमधून चालली व्हती.
आता पाऊस चांगलाच गरजत होता. वारा तर अंगात आल्यासारखा घुमत होता. ओट्यावर जोंधळा उफणताना बणग्या गावभर झाल्या, तेव्हाच वाऱ्याचं बदललेलं चळीतार बायजाच्या लक्षात आलं होतं. पोरांची वाट पाहता पाहता ती चिंतागती झाली होती. बाळू घशातून जोरजोरात आवाज काढत होता.
“व्हय रं बाळबा, मला बी तीच काळजी पडलीये. राम्याला कळाया नको का? आपल्याला सवय हाये, पर तो लक्ष्मण भिजला आन् भिजल्यामुळं आजारीबिजारी पडला तर पंचाईत व्हायची. जाऊ दे तू नको काळजी करू. येतील पोरं.”
आता कुठं बाळू जरा शांत झाला. त्यानं थोडंसं चिंतामुक्त व्हावं म्हणून ती पुन्हा एकदा गाणी म्हणू लागली,
“तुळस मायबाये
तुझा हिरवा पसारा गं सईबाई
हिरवा पसारा
पसारा पसारा…
पसारा…
तुझ्या गं सावलीला
खेळू दे ना माझा हिरा
बाई हिरा गं हिरा…
बाई हिरा…”
त्या आवाजात जीव मात्र नव्हता.
“चांदनं टिपरू हाये पुनवबाईचं गं सईबाईss
पुनवबाईचं बाईचं…
बाईचं बाईचंss…
बाईचंss…
घर दिसं शोभिवंत
तीन लेकांच्या आईचंsss
आईचं आईचं…
आईचंss…”
बायजा खुळ्यागत तेच तेच जोंधळे पुन्हा पुन्हा खालीवर करत होती. बाळू चिंतावू नये, म्हणून गाणी म्हणत होती. तिच्या गाण्यातलं टिपूर चांदणं मात्र काही कुठं दिसत नव्हतं. चोहीकडे काळाभंगार अंधार पसरला होता. पावसाला जोर जरी नव्हता तरी आभाळाचा एकूण रागरंग बघता कुठल्याही क्षणी मुसळधार थेंबाट पडायला सुरूवात होईल, असं वाटत होतं.
विजा कडकडत होत्या. अंधाराचा पडदा चिरत होत्या आणि बायजाचं काळीजही. तिचा जीव थाऱ्यावर राहीना.
“बाळा, मी जाऊन येते रं. पोरांना बघून येते. आलेच इतक्यात.”
बाळूनं जोरदार हुंकार दिला. त्यालाही काळजी वाटत होतीच. बोलून दाखवता येत नव्हतं इतकंच.
बायजानं घाईवाई गोणपाट पांघरून घेतलं. कंदीलाची वात जराशी मोठी केली. हातात काठी घेतली आणि ती चिखल तुडवीत निघाली. चिखलाच्या चिकट्यानं तिचे पाय मणामणाचे झाले होते, पण त्याहून जास्त ओझं तिच्या काळजावर होतं.
ती वेड्यासारखी रामा, लक्ष्मणा अशी हाका मारत सुटली. ती अविरत हाका मारत होती, पण प्रतिसाद येत नव्हता. ‘असतील कुडंतरी आडोशाला बसलेली. वीजांच्या पावसाच्या आवाजात ऐकाया जात नसल’ अशी ती स्वतःची समजूत घालून घेत होती.
विहीरीजवळच्या चिखलात तिला लक्ष्मणाचं पायताण दिसलं. पण पोरांचा कुठंच पत्ता नव्हता. ती विहीरीजवळच्या पांदीतून तशीच पुढं निघाली.
विहीरीजवळचं ते लक्ष्मणाचं पायताण तिला वाकूल्या दाखवीत होतं. ‘पोरं इहीरीत पवायला तर उतरली नसतीन ना?’ अशी शंका तिच्या मनात चमकली. त्यासरशी तिचं काळीज कापत गेलं. पांदीतून काही पावलं पुढं गेलेली ती ठेचकाळत, घसरत मागं फिरली. धडधडत्या काळजानं तिनं रहाटाचा आधार घेत विहीरीत वाकून पाहीलं. विहीरीतला काळा, मठ्ठ अंधार भेदायला तिच्या हातातला कंदील कमी पडत होता. तो अंधार तिचा जीव घेईल असंच वाटलं तिला. तिनं कापऱ्या आवाजात हाक मारली,
“राम्याss ए पोरा…”
सुदैवानं, तिला ओ देणारं तिथं कुणी नव्हतं हे तिला लखलखत्या विजेच्या प्रकाशात स्पष्ट दिसलं. तिचा जीव भांड्यात पडला. डोळे भरून आले.
“द्येवा पांडुरंगा, माझी लेकरं सुखरूप असुदेत. तुला नारळ वाहीन द्येवा. मला काई दाखवू नको. आता सोसायची ताकद नाई.”
ती भरल्या डोळ्यांनी एकटीच बडबडत होती. काठीचा आधार घेत घेत पुढं जात होती. दूर वादळा-पावसात फडफडणारी धनगरांची पालं दिसत होती. मेंढ्यांना वळून आणणारी दोन धनगरं पालाच्या आडोशात बिडी शिलगावतांना तिला दिसली. उग्र, राकट दिसणारी ती माणसं पाहून तिला भीती वाटली नाही. खंडोबाच द्येवाचं रूप घेऊन मदतीला आलाय, असंच तिला वाटत राहीलं.
ती लगबगीनं त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी पावलं उचलू लागली. तिचे पाय आता हरणीचे झाले होते.
—
इकडे… किती तरी युगांनंतर लक्ष्मणच्या स्मृती जाग्या होत होत्या. डोळे उघडायचा क्षीण प्रयत्न अयशस्वी होत होता. डोळे किलकिले करू पाहताच जणू कुठलीतरी अजस्र ताकद आपल्या पोलादी हातांनी त्याच्या नाजूक पापण्या निष्ठूरपणे बंद करत होती. धुक्यानं वेढलेल्या सभोवतालात शरीर अधांतरी तरंगत आहे, असं वाटत होतं. त्याच्या शरीरावर त्याची सत्ता चालत नव्हती. नाईलाजानं डोळे मिटून पडून राहणं त्याला क्रमप्राप्त होतं.
शांत असलेल्या पाण्याच्या प्रतलावर हळूच बुडबुडे येत रहावे क्षणभंगुर, तसं त्याच्या स्मृतींचं होत होतं. यथावकाश त्यात थोडीफार सुसंगती येत गेली. त्याला आठवू लागलं.. त्याच्या तळपायात भसकन घुसलेला बाभळीचा तीक्ष्ण काटा… भळभळ वाहणारं रक्त…
भूक लागली होती. आमराईकडं जातांना अवचित काटा भरला. रामनं हलक्या हातानं काटा काढून टाकत अंगठ्यानं जखम दाबून धरली. रक्त वाहायचं बंद झाल्यावर जखमेवर वावरातली गार माती लावली. तो हसत हसत सांगत होता,
“ही माती लय गुनाची. कंचं बी दुःख असू दे, माती लावली का सगळं बरं व्हतंय. ही माती, उन्हाळीचा, निरगुडीचा पाला ही आमची गावठी औषधं बरं लक्ष्मण. जखमेवर जरासा पाला वरबाडून पोटीस बांधलं का रात्रीतून सूज वसरलीच पाह्यजे. हाय का तुमच्या शेहरातल्या डाक्टरकडं असं औषध?” पाय ठसठसत असूनही लक्ष्मणाला हसू आलं.
आमराईत शिरल्या शिरल्या रामनं धावत जाऊन खोबऱ्या आंब्यावर चढाई केली आणि टप्पोऱ्या, हिरव्यागार कैऱ्या पाडल्या. भुकेच्या सपाट्यात दोघांनीही चवीनं भरपूर कैऱ्या खाल्ल्या.
तोवर चांगलंच अंधारून आलं होतं. विजांना जोर आला होता. लक्ष्मण म्हणाला,
“राम, घरी जाऊया चल.”
“आरं, तुझ्या दुखऱ्या पायानी तुला लय जोरात चालता नाई येनार. वजं वजं चालावं लागंल. पाऊस कवा बी सुरू होईल. तू भिजला तर आजारी पडशील. आई मला लय आरडल. जरा वेळ आडोशाला थांबू. हा वळवाचा पाऊस हाये. वरून काळं आभाळ दिसतंय आन् खालून निळंगार. आस्सं डब्बल आभाळ आलं का मेंढरं येका कुशीवर बसत्यात. मग समजायचं का वळवाचा पाऊस येनार. हा पाऊस काय सारखा लागून रहानार नाई. एखादी-दुसरी पहाळी आली का कमी पडंल, मंग जाऊ घरी. तवर तुझ्या पायाची ठसठस बी जरा कमी व्हईल.”
राम इतकं बोलेस्तोवर बुळबूळ पावसाला सुरूवात झाली. कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल, अशी लक्षणं दिसत होती. दोघंही आमराईतल्या आंब्याखाली निवाऱ्याला उभी राहिली. संध्याकाळ आवेगानं पृथवीमायला लपेटून घेत होती. अंधार गडद गडद होत होता. दोघंही थंडीनं कुडकुडत होती पण काहीच इलाज नव्हता.
“लक्ष्मन, तू इथंच थांब या झाडाखाली.”
“अरे, पण तू कुठे चाललास?”
“मी खोबऱ्याच्या अजून कैऱ्या घेऊन येतो. आईला बी लय आवडत्यात.”
असं म्हणून राम झटदिशी खोबऱ्यापर्यंत पोहोचलाही. लक्ष्मण दुखऱ्या पायामुळं त्याच्या मागं जाऊ शकला नाही.
राम तिथं गेला. वाकवल्यावर हाताशी येईल अशी डहाळी त्यानं हातात धरली. त्या डहाळीवरच्या दोन-चार कैऱ्या लक्ष्मणाला आनंदानं उंचावून दाखवू लागला.
तितक्यात लखलखीत प्रकाशानं लक्ष्मणाचे डोळे दिपवून टाकले. त्यानं डोळे गच्च बंद केले. कानठळ्या बसवणारा जोरदार आवाज झाला.
जवळच्या वस्तीवर जिवाच्या आकांतानं आपापल्या मेंढ्या सुरक्षित जागी नेण्याची धावपळ करत असलेल्या धनगरांना पावसाच्या सरींच्या पडद्याआडून आमराईतलं खोबऱ्या आंब्याचं पेटलेलं झाड स्पष्ट दिसत होतं.
मूळं जमिनीत घट्ट रूतलेली होती म्हणून फक्त ते झाड पडलं नाही, पण जागच्या जागी जळून गेलं. वठून गेलं कायमचं… त्याला आता कधीच पालवी फुटणार नव्हती.
परत कधीच त्या खोबऱ्या आंब्याला बहर आला नाही.
त्या दिवशी लक्ष्मणानं डोळे उघडले तेव्हा त्याला समोर दिसला होता करपलेला कैरीचा घोस हातात घेतलेला आणि जळून काळाठिक्कर पडलेला रामचा निष्प्राण देह…
आता लक्ष्मणाच्या काळजाला कुठलीही माती लावली तरी त्याची जखम भरून येणार नव्हती.
(क्रमशः)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.