बायजा भाग ५ : जळतं इंगळ

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-5-jalata-ingal-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

आधीपासूनच एकटेपणाची सवय असलेल्या बायजाईला एकटं वाटू नये, म्हणून राम मनापासून कष्टत होता. शाळेत तो एक एक यत्ता चांगल्या गुणांनी पास होत होता. घरीही अभ्यास सांभाळून बाळूचं सगळं करण्यात पुढाकार घेत होता.

बायजाचा नवरा गेल्यानंतर तिची सवत कायमची माहेरी निघून गेली होती. त्यालाही आता बराच काळ लोटला होता. तेव्हापासून तिची सासू गावातल्या घरी एकटीच राहत होती. तिच्या कजाग स्वभावामुळं तिचे कोणतेच नातेवाईक तिच्या वाऱ्यालाही फिरकत नसत. सतत गाऱ्हाणी करणं, कान भरवून देणं, भांडणं लावणं ही तिची ठळक वैशिष्ट्यं असल्यानं आळीतले शेजारीपाजारीसुद्धा तिला लांबूनच नमस्कार करीत.

मळ्यातली कामं होत नसल्यानं आता तिनं तंबाखू विकण्याचा धंदा सुरू केला होता. त्यातही चाराण्या-आठाण्यावरून तिची अगणित गिऱ्हाईकांशी भांडणं होती. तंबाखूच्या सवयीचे गुलाम असल्यामुळंच फक्त ती गिऱ्हाईकं पुन्हा पुन्हा तिच्या दुकानाची पायरी अतीव नाईलाजानं चढत. त्यात जे काही चार पैसे मिळत, ते तिच्या एकटीपुरते रग्गड होत. त्यामुळं म्हातारी झाली तरी तिचा ताठा कायम होता. बायजा दुरून का होईना पण तिला हवं नको बघत असे, तरीही ती मळ्यातल्या कित्येक बाबींवरून तिच्याशी तंटाबखेडा करत असे. बायजाच्या आख्ख्या आयुष्याचा इस्कोट करूनही सासूमध्ये पश्चात्ताप असा काही नव्हताच.

दिवस झपाट्यानं बदलत चालले होते. जात्यावर दळण्याऐवजी झटपट पीठ करून देणाऱ्या पट्ट्याच्या गिरण्या आल्या होत्या. पण सासू मात्र हट्टानं जात्यावरच दळण करी. तिच्या तिच्या वाट्याची कोरभर भाकरी तिला कशीही पुरत असे. पुढं पुढं तेही जमेनासं झाल्यावर तिनं एका आंधळ्या पण धडधाकट म्हातारीकडून तंबाखूच्या बदल्यात दळण दळून घेणं, लुगडं धुवून घेणं यासारखी कामं करवून घ्यायला सुरूवात केली होती. पण तिच्या विचित्र स्वभावामुळं तेही फार दिवस चाललं नाही. आता जातं ओढण्यासाठी लागणारं बळ तिला पुरं पडत नव्हतं. तरीही स्वतःचा हेका सोडायला म्हातारी तयार नव्हती. कधी दळायला जमलंच तर त्या दिवशी भाकर आणि इतर दिवशी नुसत्याच घुगऱ्या शिजवून खाई. तोंडातल्या दातांनीही असहकार पुकारल्यानं घुगऱ्या तिला पचत नसत. मग ढाळ-वांत्यांनी ती बेजार होऊन जाई. 

कशीबशी गावठी औषधं घेऊन नीट झाली की, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! इतर बायका जातं फिरवतांना गोड ओव्या म्हणत आणि हिच्या मुखी कायम बायजाच्या नावच्या शिव्या असत. बायजाही हे जाणून होती. पण म्हातारं माणूस… तिची अक्कल तिच्यापाशी. ‘आपण आपलं काम करावं आन् वाटेवर ठिवावं’ हे तिला पक्कं ठावूक होतं.

एक दिवस म्हातारीची तब्येत जास्तच बिघडली होती. तंबाखू घ्यायला गेलेल्या गिऱ्हाईकांकरवी ती बातमी बायजाला पोहोचली. मुळात, सहृदयी असलेल्या बायजानं रामला पीठाचं भलंमोठं बोचकं घेऊन सासूकडे पाठवलं.

पिठाचं बोचकं घेऊन गेलेल्या रामकडं रागारागानं बघत म्हातारी कडाडली,
“तुझ्या आईला सांग. अजून माझं हात मोडलं नाईत. ज्या हातानी त्या यड्या पोराचं हागमूत काढीती, त्याच हातानं निसलेल्या धान्याचं पीठ मला पाठवती काय ती अवदसा? माझं हातपाय थकलं म्हनून माझ्यावर उपकार करती काय? पाहू ना किती दिवस उड्या मारती. येक दिवस ती बी म्हातारी व्हनारच ना? ती काय अमरपट्टा घेऊन आली नाई. तुझ्या नावचा खड्डा खांडून ठिवला असन बघ द्येवानं.”
राम तिच्या या अवताराकडं बघतच राहीला. थोडासा घाबरलाही. पिठाचं बोचकं तिथंच ठेवून त्यानं आल्या पावली माघार घेतली.

मात्र जसजसे दिवस जाऊ लागले, तसतशी म्हातारीनं आपली भूमिका सोयिस्करपणे बदलली. हळूहळू मग मळ्यातलं धान्य, वाळवंणं, लोणची हे सगळंच तिला बायजाच्या हातचं चालू लागलं. शेळीचं दूध तर रोजच येत होतं. पण खाऊनही तिनं बायजाला त्या करण्याचं समाधान मिळू दिलं नाही. हे सगळं शेलकं खाणं म्हातारीपर्यंत पोहोचवायला रामला जावं लागत असे आणि तिचे कडूजहर बोलही त्यालाच ऐकावे लागत.
“तुझ्या आईला सांग, जर का मला काही भानामतीचं करून खायला घातलं तर ते तुझ्यावरच उलटन. ह्ये बघ, मी तिच्या नावचा लिंबू उतरून ठेवलाय बघ.”
तिच्या पडक्या घरातल्या दक्षिण कोपऱ्यात काळी बाहूली, कवड्या, टोचलेली लिंबं, गूलाल, कुंकू हे असलं काय काय भेसूरपणे पसरलेलं असे. रामला ते पाहून धडकीच भरायची. त्यामुळं, आजीचा राग राग येत असूनही तो गप्पच बसून सामान देई आणि बाहेरच्या बाहेरूनच पोबारा करे. खरं सांगायचं तर, म्हातारीचा तोल सूटत चालला होता. 

सतत ‘यडं पोर, यडं पोर’ म्हणून तिनं हिणवत आलेल्या बाळूला जणू काही निसर्गच न्याय देत होता. म्हातारी डोक्यानं हल्लक होत चालली होती. आजुबाजुची लोकं तिला ‘यडी म्हातारी’ म्हणून संबोधू लागली होती. तिची जीभ जहरी होत चालली होती. राम तिचं जहर ऐकूनही गप्पच रहात होता. पण हे कुठपर्यंत?

एक दिवस पुन्हा म्हातारीची तब्येत बिघडली. ढाळ-वांत्यांनी ती बेजार झाली. तिची गावठी औषधंही तिच्या शरीराला साथ देत नव्हती. जरा उठबस केली की म्हातारीला गरगरायला होई. तंबाखू देता देता म्हातारी चक्कर येऊन सपशेल पडलीच. शेजारीपाजारी लोक लज्जेस्तव धावून आले. कुणी कांदा हुंगायला देत होतं, कुणी तळपाय चोळत होतं तर कुणी तोंडावर सपसपा पाणी मारत होतं. असं सगळं केल्यानंतर म्हातारी जरा भानावर आली. कोणीतरी कोरा चहा आणि लिंबू दिलं, तेव्हा कुठं तिला तरतरी आली.  खरंतर तिला आता दवाखान्यात आणण्याची गरज होती, पण म्हातारी दवाखान्यात चलायला ढीम्म दाद देईना. 
“मला हितंच मरू द्या. मला दवाखान्यात यायचं नाई. मला सुई टोचून टोचून मारत्याल. मला यायचं नाई.”
“अगं रखमाबाई, सोत्ताचंच खरं किती दिवस करनार तू? जरा तरी दुसऱ्याचं ऐकायला शीक की कवा तरी. दवाखान्यात सुई मारतील. दोन-चार सलाईनाच्या बाटल्या चढवल्या का टुमटूमीत व्हशील तू. कशाला अंगावर दुखनं काढीती माये?”
“मरू दे, कवा तरी मरायचंच हाये. आज मेले काय आन् उद्या मेले काय? कोन सूतक धरनारे का माझं? मी काय कोन्या झाडाचा पाला आन् औशीदावारीच गेला.”
म्हातारी कडवट बोलणं काही सोडत नव्हती. तिच्याशी डोकं लावता लावता शेजारीही कंटाळून गेले. 
“म्हातारे, तुला जर मरायचंच हाये तर जा मंग आत्ताच मसनात जाऊन रहा. आमचा तरी काय विलाज हाये? अशी आडगी म्हातारी कवा बघितली नव्हथी ब्वॉ.”

मनाशीच काहीबाही पुटपुटत मदतीला धावलेली माणसं निघून गेली. म्हातारी अंथरुणावरच पडून राहीली. त्या गडबडीत कुणीतरी बायजाला निरोप दिला.
“म्हातारीचं काई खरं दिसत नाई. असशील तशी ये गावात.” 
बायजा काळजीनं आलीही ताबडतोब. तोवर म्हातारीचं अंथरूण घाण होऊन गेलं होतं. कुठल्याच नैसर्गिक विधीसाठी तिला उठवलं जात नव्हतं. घशातून घरघर आवाज येत होता. बायजानं रामच्या आणि शेजारच्यांच्या मदतीनं शुद्धी-बेशूद्धीच्या सीमारेषेवर असणाऱ्या म्हातारीला दवाखान्यात भर्ती केलं. म्हातारीनं डोळे उघडल्यावर तिच्या जिवात जीव आला. दवाखान्याच्या लाकडी व्हरांड्यात येऊन तिनं डोळ्याला पदर लावला. शेजारच्या एक-दोन आयाबाया तिच्या पाठीवर हात फिरवत होत्या.
“या अशा सासूला आपल्यासारखीनं तर बघितलंच नसतं. तशीच मरू दिली असती. तुझं पाय धुवून पानी प्यायला पाह्यजे बायजा.”

शेजीबाईची अडाणी काळजी बायजाशी बोलत होती. बायजानं डोळे पुसत एक मोठा सुस्कारा सोडला.
“माझंच मागल्या जल्माचं पाप सासू होवून डसतंय माझ्या आविष्याला. जळतं इंगळ पदरात बांधन्यापलीकडं मला उपाव नाई.

ती मौन झाली. कुणी त्या क्षणी तिच्या डोळ्यात बघितलं असतं तर त्यात तिच्या मायबापाच्या समाधानी सावल्या नक्कीच दिसल्या असत्या.

(क्रमशः)

*

वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता


Medical Professional | + posts

डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :