बायजा २: येडी माया

marathi-kadambari-bayja-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

नवऱ्याच्या अघोरी प्रयोगांच्या दुष्परिणामांमुळं की काय, अपत्याच्या रूपात तिला मिळालं ते फक्त श्वास घेतंय म्हणून जिवंत म्हणावं असं लुळ्या पडलेल्या हातापायांचं मरतुकडं गाठोडं. आता तिच्या संघर्षानं अजून तीव्र स्वरूप धारण केलं होतं. मात्र तिच्यातली आईदेखील तेवढ्याच धारदारपणे उगवून आली होती.

खरं तर आईपण कसं असतं? कसं पार पाडायचं असतं? याची कुठलीच व्याख्या तिला कुणी सांगितली नव्हती. तिची माय बाप गेल्यावर भ्रमिष्ट झाली होती. सासूत आईपण शोधण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नव्हता. तिच्या आजुबाजुला असणाऱ्या बहूसंख्य बायका बाईपण वागवणाऱ्याच भेटत गेल्या. वांझोटीची सावली नको म्हणून लेकरांना तिच्यापासून दडवत गेल्या. त्यामुळे आता तिला सापडलेलं तिच्यातलं आईपण अगदी निखळ, कच्चं, सच्चं आणि प्राकृतिक होतं. सत्वशील आणि तेवढंच आक्रमकही होतं. तिचं ते बदललेलं रूप पाहून नवरा जरा चपापलाच. ‘या किडीच्या रताळूला अफू देऊन देऊन मारून टाका’ असं म्हणणारी सासूही वरमली.

बायजानं पोराचं नाव ‘बाळू’ ठेवलं होतं. आयूष्यभर तो बाळच राहणार होता आणि तिच्या आईपणाची सत्वपरीक्षा पाहणार होता, हे तिनं नकळतपणे अधोरेखित करून टाकलं. बाळूच्या बरोबरीची पोरं पावलंही टाकू लागली पण बाळू मात्र नुसताच निपचित आढ्याकडं बघत बसलेला असायचा. तोंडातून लाळ गळत असायची. त्यावर माशा भणभणायच्या. पण बायजा कामातून मोकळी झाल्याशिवाय त्या कुणी वारतही नव्हतं. बाळू भूक लागली की चिरक्या आवाजात रडायचा. तेव्हा मात्र बायजा सगळी कामधामं सोडून ‘आले रं आले’ म्हणत त्याच्याकडं धाव घेई. काम खोळंबतं म्हणून सासू करवादायची. ‘म्हशीसारखी निस्तीच पोर घेऊन बसती’ असं म्हणायची. क्वचित नवराही एखादी लाथ तिच्या पाठीत घाले. पण ती जीवाच्या करारानं बाळूचं पोट भरेपर्यंत त्याला पाजत बसूनच राही. पुढं पुढं दूध पूरं पडेना म्हणून पीठात पाणी घालून त्यात पदराचं टोक भिजवून ते पाणी त्याच्या तोंडात पिळे. तिच्या जगात फक्त ती आणि तिचं बाळ एवढी दोनच माणसं राहिली होती.

इकडं घराबाहेरच्या खाटेवर बसलेला नवरा ‘आपल्यात असं काय कमी आहे म्हणून आपल्याला एखादं धडधाकट पोरगं होत नाही?’ असा विचार करून करून विषण्ण होई. तो सगळा गुस्सा तो बायजावर काढे. या सगळ्या आडव्यातिडव्या नशिबाच्या फाश्यांनी बायजा सुकत चालली होती. वाकत नव्हती मात्र!

बायजाच्या नवऱ्याचा मेंदू विचार करून करून पोखरायला लागला होता आणि कान पोखरण्यासाठी सासू सज्ज होतीच.

“हिच्यातच कायतरी खोट असलं गोईंद्या. ऐक माझं, ही काय तुझा वंस वाढवायजोगी दिसत नाई. तुझा वंसबूड व्हैल. तुला शोभतबी नाई ते झुरळ. तिची आई यडी झाली. प्वॉर बी यडंच जलमलं. कशावरून पुढं यड्यांचीच जत्रा तुझ्या वंसाला यायची नाई?”

“बायको म्हनून कवडीचं सूख तिनं दिलं नाई तुला. येऊन जाऊन फक्त त्या शेनाच्या प्वहावानी पडलेल्या पोराभवती भिरभिरत रहाती. तिला काम सुचत नाई, तिला धंदा सुचत नाई, तिला नवऱ्याचं शुभाशूभ नाई, तिला सासूचं शुभाशूभ नाई. एवढा दांडगा तू पन तुझ्या वाऱ्यालासुदीक ती उभी रहात नाई. तुझ्यात कमी तरी काय हाये? तू काय म्हातारा झाला नाई, तू कामधंदा करीत नाई असं बी नाई. कवामवा दारू पितो पन ती आजकाल कोन पीत नाई? हिला कमी तरी काय हाये? दोन टायमाचं खायला मिळतंय. फाटकं का होईना, पन ल्यायला मिळतंय. अजून काय पाहिजे? पन नाई. कायमच तिचं त्वांड सुकलेलं. बाई, यवढा पुरूषासारखा पुरूष माझा ल्योक. बापामागं मी मोठा केला, त्ये काय त्याच्या आविष्याचं असं पोतेरं झालेलं बघायला का?

पहीली बी अवदसा लगीन झाल्या झाल्या पोटूशी राह्यली आन् बाळंतपनात गेली मरून. प्वॉर बी मेलं. हौसंनी या बायजीला करून आनलं. तिला ना बापाचा आधार, ना भावाचा आधार. यडी आई पन म्हनलं गरीबाचं हाये, दाबून-दडपून नांदल तर ती फना काढलेल्या नागिनीवानी खुशाल त्वाँड वर करून चरचरा बोलू लागली बया. द्येवानं हे आसं दाखवायला मला जिती तरी कशाला ठिवलं?”

असं म्हणून तिनं डोळ्याला पदर लावला. हे इतकं काय काय नमनाला घडाभर बोलल्यानंतर लेक हवालदिल झालाय, हळवा झालाय हे त्या इरसाल म्हातारीच्या लक्षात आलं. जरा वेळ गळा काढण्याचं नाटक केल्यानंतर योग्य वेळ आलीये, असं वाटून तिनं हळूच खडा टाकला.

“गोईंद्या, माझ्या बघन्यात माझ्या माहेरची एक चांगली तरनीबांड पोर हाये बघ. तिला निस्ता हळदीचा डाग लागलेला हाय. नवरा मानसात नव्हता म्हनून सोडचिठ्ठी करून आनली आन् तिच्या बापानं बी हिकमतीनं फसवनूक केली म्हनून तिच्या सासरच्याकडून बिगा-दोन बिगा वावर हिच्या नावावर करून घेतलंय. नवरा मानसात नव्ता म्हनल्यावर पोर अगदी कोरी करकरीत हाये बघ. अजून बी ईचार कर. तुझं वय काय गेलं नाई अजून. तरनीताठी, धडधाकट बायकू भेटली तर कितीक बी पोरं व्हतील तुला. शिवाय, तिच्या नावचं वावर बी भेटल. सोन्याहून पिवळं व्हैल बघ तुझं.”

बायजाचा नवरा आधी आधी कोऱ्या चेहऱ्यानं आणि अपराधी मनानं ऐकत होता खरा पण सगळी कहाणी ऐकल्यानंतर त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं. मनाची तयारी झाल्यागत त्यानं म्हातारीला शेवटचा प्रश्न केला,

“पन बायजा काय म्हनल?”

“नाव नको काढू त्या शिप्ताराचं. तू थोडीच तिला काढून द्यायला निघालाय? काढून दिली बी तरी तिला आसरा द्यायला हायेच कोन? तिची यडी आई, यडं प्वॉर मिळून भीक का मागना तिकडं. आपल्याला काय करायचंय तरी? तू कशाला येवढा ईचार करतो तरी?”

“अगं आये, तसं नाई. तिनं पंच बोलवले तर अवघड व्हैल. आता कायदे बायांना धार्जिने हायेत.”

म्हातारी डोळे बारीक करत, भित्तीकडं पाहत हळूच म्हनली,

“हे बघ गोईंद्या, आता माझ्या आविष्यात काय व्हायचंय तरी? ती लैच आडवी पडली तर तिला आन् तिच्या यड्या पोराला दोघांना बी हिरीत ढकलून देईन आन् मी जेलात जाईन. शेवटी तुझा संसार नीटनेटका व्हत असलं तर माझी ती बी तयारी हाये. पन आता तू शेपूट घालू नको. तुला तीच बायको करून आनीन तर नावाची रखमा नाई.”

म्हाताऱ्या सासूनं तिसरी सून आणायचा चंग बांधला होता. अडाणी आई आणि तिचा अडाणीच लेक. दोघांच्या अडाणी स्वप्नांना उधाण आलं होतं. जिच्या स्वप्नांना मूठमाती देऊन त्यांच्या स्वप्नांचे इमले रचले जात होते. ती बिचारी त्यांच्या शेतातलं तण काढून ते निर्मळ करायच्या मागं लागली होती. पाठीवर बांधलेल्या बाळूला तिच्या यड्या-वाकड्या भाषेत पाळणा म्हणत होती.
“बाळू लेक माझा तालवाराच्या घरचा
जू बाळा जू रे जू जू
बारशाला ह्याच्या घुगऱ्यापुरीचं जेवन
जू बाळा जू रे जू”

(क्रमशः

*

वाचा
बायजा – पहिल्यापासून

महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता


Medical Professional | + posts

डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :