गडी त्याच्या सायकलला जेवणाचं गाठोडं बांधून गावातल्या घरी गेला. गल्लीच्या टोकाशी वळताच तिचं घराच्या ओसरीत थाटलेलं तंबाखूचं दुकान दृष्टिपथात येई.
म्हातारी तिथंच बसलेली होती. हातवारे करून अंमळ मोठ्यानंच बोलत होती. जवळ गेल्यानंतर गड्यानं पाहिलं की तिच्या आसपास कुणी माणूस नव्हतं. ती समोर ठेवलेल्या एका मोडक्या लाकडी फ्रेममधल्या पिवळ्या पडलेल्या फोटोशी बोलत होती. त्यानं झुकून पाहिलं. त्या काळ्यापांढऱ्या फोटोत अनोळखी अशी दोन-चार बायामाणसं होती. तिचे हे सगेसोयरे तिला एकटीला जगण्याच्या व्यापातापात सोडून अनंताच्या प्रवासाला पुढं निघून गेलेले होते. म्हातारीनं थरथरत्या बोटांनी त्यातल्या चेहऱ्यांना गंध लावलेलं होतं. गंधाचे ओघळ त्या तुटक्या फ्रेमच्या लाकडात साकळून कडक झालेले.
गडी हे सगळं बघत चुळबूळत उभा राहिला, पण म्हातारीचं त्याच्याकडं लक्षच नव्हतं. तिचे हातवारे आणि बोलणं सुरूच होतं. कुणाच्या तरी प्रश्नांना उत्तरं दिल्यासारखं ती बोलत होती.
“… पन मी काय घाबरते का? मी चांगली वळखून हाये त्या आवदसाला. येकटी म्हातारी बघून मानसं पाठवती काय. म्हनं घरदुरूस्तीला पाठवली.. पन त्यांचा काय भरूसा? दिवसा पाळत ठिवतील आन् रातचं फोडतील माझं घर. माझा जीव मुंगीयेवढा. कवाच मारतील आन् माझं डाग घेतील काढून.”
….
“अगं व्हय. मी बी तेच म्हनतेय. तिचीच फूस हाय सगळ्यांना. तिनं भुलवलंय सगळ्यांना.”
…..
“हाव ना. त्येच केलं. त्यांना शाफ सांगितलं. भीत पडली तरी चालंल. पन परत माझ्या दारात पाय ठिवायचा नाई.”
…..
“काय म्हनता? मी बी काय साधीसुरती नाई. तिला चावून खाईन आन् ढेकर बी द्यायची नाई.”
….
“कडीकोयंडा? मंग, लाविते तर. निस्ता कडीकोयंडा नाई, दोन कुलपं घालिते दोन. चार वेळा ओढून बघते रोज. आन् डागाचं गठूडं उशालाच घेऊन झोपते…”
त्यानं दाराकडं पाहिलं. त्याच्या कडीकोयंड्याचंच त्याला ओझं व्हावं, अशी त्याची अवस्था होती. त्यातल्या लाकडात नक्षी म्हणून लावलेली पितळी फूलं काळी, निस्तेज पडली होती. चौकट खालून झिजली होती. उंबऱ्यात आणि दारात दंडाच्या जाडीचा साप सहज शिरू शकेल, अशी जवळपास वीतभराची फट पडली होती.
या घरात कोण यायचं घरफोडीला? असा विचार करून गड्याला हसायलाच आलं.
लाखेवर सोन्याचा मुलामा दिलेले तिचे दागिने आता कवडीमोल भावानंसुद्धा विकले जाणार नव्हते. पण ते डाग आणि अशाच काही वस्तू म्हणजे तिची संपत्ती होती. त्याचं गाठोडं ती रोज आठवणीनं उशाला घेऊन झोपत असे. काय म्हणून नव्हतं त्या गाठोड्यात? मशेरीची डबी, एक मेणाची चेपलेली चपटी डबी. तिचं की तिच्या आईचं जरीकाठाचं विरलेलं लुगडं, सतरा जागी खिळे मारलेल्या, कामातून गेलेल्या मोटेच्या जुन्या चामड्यापासून बनवलेल्या वहाणा, आणि एक छोटीशी बुक्क्याची डबी.. तिच्या झाकणावरच्या गोल आरशाला तडा गेलेला होता. त्या आरशात पाहिलं की म्हातारीचं कपाळ भंगलेलं दिसे…
गडी जरा मोठ्यानंच खाकरला. तिनं दचकून विचारलं,
“कोन, कोन हाय?”
“म्या हाय. तुमचा गडी. संपत.”
तिनं कपाळावर आडवा हात धरत मिचमिच्या डोळ्यांनी त्याच्याकडं निरखून पाहिलं. दोन्ही डोळ्यातल्या मोतीबिंदूमुळं धूरकट झालेल्या तिच्या नजरेत जीव एकवटला होता. जरा वेळ बघत राहिल्यानंतर तिला हा गडीच आहे, अशी खात्री पटली. तिनं तिच्या बिनादाताच्या हिरड्यांवर जीभ फिरवत प्रश्न केला,
“कशाला आलायेस हिथं? तुझी मळ्यातली मालकीन कुडं तरफडली? तिला इचारायचं सगळं. ती रांड हाये ना आयत्या पिठावर रेघूट्या वढायला. जा तिकडंच. हितं माझ्यापशी काय कामये? खोड सोडायचं आन् फांदीला लोमकळायचं. लोमकाळता लोमकाळता आपटशील, तवा येशील माझ्या दारात. बराब्बर भुलवलंय तिनं सगळ्यांना…”
“ए म्हातारे! काय उगीच नको ती बडबड करतीस? मायनं जेवन पाठवलंय तुला. ते द्यायला आलोय म्या. खानारे का? नको खाऊ. नायतर भुलशीन तू बी.”
गडी हसत हसत तिरकं बोलला. म्हातारीनं ते खाण्याचं पुडकं खूप दिवसांची उपाशी असल्यागत ओढून घेतलं. गड्याकडं खालीवर बघत ती म्हणाली,
“मी बरी भूलंन. हितं पाहीलं का?”
दक्षिणेच्या कोपऱ्यात पडलेल्या वाळक्या लिंबू मिरच्यांकडं, बिब्यांकडं तिनं हात केला. तिथं बरंच हळद-कुंकू उधळल्यासारखं सांडलेलं होतं. हे सगळं पाहून गड्याला शिसारी आली. त्यानं झटकन सायकलला टांग मारली. म्हातारी मागं भेसूर हसत राहिली… हसतच राहिली.
बायजा जमेल तसे सुरखीचे डोहाळे पुरवत होती. लेकीशी बोलण्याची तहान सुरखीशी बोलून भागवत होती. काही गरम गरम रांधलं की तिला नेऊन देत होती. फक्त बाळूभोवती फिरणारं तिचं जग तिच्याही नकळत विस्तारू पाहत होतं. मायेच्या धाग्यांमध्ये गुरफटलं जात होतं. बाईपणाच्या नाळेनं दोघी जोडल्या जात होत्या. काळजाच्या अगदी आत लपलेले, खूपलेले आणि नकळत जपलेले कित्येक व्रणांचे क्षण दोघी एकमेकींसमोर उकलून दाखवत होत्या.
बायजाचाही त्या दोघांमध्ये जीव अडकू लागला होता. क्वचित सुरखीला जास्त थकल्यासारखं झालं तर बायजा पटकन दोघांसाठी झुणकाभाकरी करून खाऊ घाली. घरात वडील माणूस असल्यासारखा त्यांनाही बायजाचा आधार होत होता. सुरखीचे दिवस भरत आले होते, तरीही बायजावर विसंबून संपत कामाधामाला पळे. कधी मजुरीची माणसं बघायला जाई तर कधी रात्ररात्र मळ्यात बारे द्यायला उभा राही. कधी आठवडेबाजारला बाजारच्या गावी जाई तर कधी दुसऱ्याच्या शेतात रोजानं ट्रॅक्टरवर जाई. चार पैसे जोडत जोडत त्यांचा संसार नावारूपाला येत होता. त्यांच्या पालवीसारख्या ताज्या, तजेलदार संसारातच बायजा सुख शोधत होती. दोन्ही घरांमधलं अंतर नावापुरतंच उरलं होतं.
हे सगळं बाळूच्या अर्धकळत्या नजरेत येत होतं. बायजाई आपल्यापासून दूर जातेय, अशी असुरक्षितता त्याच्या मनात घर करू लागली होती. तिची शेजारी जायची लगबग दिसली की तो चिडचिड करू लागला होता. खायला नकार देणं, घास तोंडातच धरून ठेवणं, सतत आवाज करत रहाणं हे असलं काही तरी त्यानं सुरू केलं होतं.
बायजाच्या हे लक्षात येतही होतं पण जिवाभावाच्या शब्दांची सोबत तिला मोहवत होती. बाळूचं करण्यात ती कसर ठेवत नव्हती पण त्याचबरोबरीनं सुरखीकडंही तिचं लक्ष असायचं. गावात म्हातारीकडं चीजवस्तू पोहोचवायला संपतचा मोठा वाटा होता. तो गेला की सुरखीकडं चक्कर मारणं नित्याचं झालं होतं.
बाळूनं चिडचिड केली की ती त्याला समजावून सांगे,
“बाळ, जडावलेली हाये पोर. तुझा जलम व्हतांना माझ्याजवळ कोनी नवतं. मंग बघ बरं तुझं किती नुसकान व्हऊन बसलं. कोनी माझ्याजवळ असतं तर आज माझा बाळू हिंडताफिरता असता. माझ्या नशीबाला आलं ते तिच्या नशीबाला नको यायला ना बाळा म्हनून काळजी घेत्ये रं. येकदा तिची सुटका झाली का अजिबात जायची नाई हं मी माझ्या बाळाला सोडून. तवर जरा समजून घे बाळा. बोलता जरी येत नाई तरी मनातल्या मनात द्येवाचं नाव घ्यावं. तोच निवारन करतोय आपल्या सगळ्या अडचनींचं बरं.”
(क्रमश:)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.