“तुझी सावतार आई आली असती तर नव्हती काळजी.”
म्हातारी ओसरीत बसल्याबसल्या मिचमिच्या डोळ्यांनी रामशी बोलत होती. मधूनच मशेरीची पिंक दारातून बाहेर टाकत होती. अर्धे शिंतोडे रंग उडालेल्या, झिजलेल्या लाकडी दाराच्या फळकूटांवर पडत होते. जुन्या-नव्या शिंतोड्यांची मिळून एक वेगळीच नक्षी तिथं तयार झाली होती. रामचं लक्ष क्षणभरच त्या नक्षीकडं गेलं. तशी म्हातारी खेकसली,
“राम्या, ऐकतो का? ध्यान कुडं हाय तुझं?”
“हा, हा… तू बोल गं आज्जे, काय म्हंतीस?”
“बरं आईक.. तुझी सावतार आई काय संगं येनार नाई. तिला बी काय नेमकं काम उपाटलं ऐन टायमाला, कोन जानं? लक्षूमन येकटाच येतोय. शेहरगावचा पोरगा.. त्याला काय घराकडं यायचा रस्ता सुधरायचा नाई. तू श्टँडवर त्याला घ्यायाला जाय. आन् नीटनेटका घरला घेऊन ये. जमंल ना?”
“न जमायला काय झालं आज्जे? मी जाईन घ्यायला त्याला.”
“जाशील का यरवाळी? नाईतर रहाशीन झोपून. सकाळच्या पाहारी लवकर येतीये यश्टी.”
“व्हय गं आज्जे.”
रामनं उत्साहानं जबाबदारी घेतली आणि मळ्यातल्या घरी जायला निघाला. त्याचं पाऊल दरवाजातून बाहेर पडतं न पडतं तोच म्हातारीनं पुन्हा एकदा हाळी घातली,
“राम्या आईक.”
म्हातारी कमरेला खोवलेल्या बटव्यातून दोन रूपयाची, मळलेली, चुरगळलेली गुलाबी नोट काढत म्हणाली,
“ह्ये पैसं घ्ये, आन् उद्या लक्षूमनाला आनाया जाशील तवा श्टँडवरच्या ममताईच्या टपरीवरून आठान्याची भेळ घेऊन ये. बाकीचं पैसं आठवनीनं परत दे. नाईतर घालशीन खिशात,” म्हातारीनं दम भरला आणि स्वतःशीच पुटपूटल्यासारखं बोलत राहिली.
“लक्षूमनाला आल्या आल्या न्याहारी तरी करता येईल. लांबून यायचाय तो. मी कदी चूल पेटवायची? सरपन बी वल्लं झालंय. इश्टो हाये, पन् माझ्या डोळ्याच्या झाल्यात खाचा. पीन मारायला बी दिसत नाई. उलीशी भेळ आनली म्हंजे त्याला आल्या आल्या काईतरी खायला तरी देता येईल. तू बी लागलं तर दोन घास खा, पन त्याचं होऊंद्ये पह्यलं. उरली तर खा.”
जेवता जेवता दाताखाली कचकन खडा लागावा असं रामला झालं. पण अपमान गिळून तो पुढं म्हणाला,
“आज्जे, भेळबिळ काई नको आनायला. मी मळ्यातल्या घरी जेवायला घेऊन जाईन लक्ष्मनाला. तू काय नको करत बसू हितं.”
म्हातारीचा जीव भांड्यात पडला. तिनं घाईगडबडीनं थोड्यावेळापुर्वी काढलेले दोन रुपये परत आपल्या बटव्यात ठेवून दिले.
“तुझ्या आईला सांग, जास्तीचं गोडंतेल आनून ठिव. पुरी-गुळवनी कर, भजाची आमटी कर, वडं-पापड तळ. आनि आमटी जास्ती तिखटजाळ करू नको म्हना. शेहरचं पोरगं हाये, त्याला जास्ती तिखट सोसायचं नाई. आनिक येक सांग, त्या यड्या पोराला साफसूफ केल्यावर आंघूळ कर आन् मंग सैपाकाला लाग म्हनावा.”
“हा, हा. आम्हाला मस कळतंय आज्जे. तू नको लय रगात आटवू. येवढासा जीव राह्यलाय तुझा, तो सुखात घालवायचं बघ की,” राम वैतागानं म्हणत घरी निघाला.
त्याला आता उद्याचे वेध लागले होते. त्याच्या शाळेचा पांढरा सदरा विहीरीचं पाणी स्वतः शेंदून, रिठ्याचा भरपूर फेस करून त्यानं धुतला. तरीही त्याच्यावरचे शेणामुताचे डाग गेल्यासारखे त्याला वाटेना. त्यामुळं काही पैशाची साबणाची वडीही त्यानं आणली. नंतर पितळंच्या तांब्यात चुलीतले कोळसे टाकून इस्त्री केला. इतके सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर आपला सदरा त्याला चक्क पांढरपेशा वाटू लागला. हे सगळं होईपर्यंत सूर्यातळीचं आकाश नारंगी होत गेलं. पक्षी घरट्याकडं परतू लागले. पण राम त्याच्याच नादात होता. आज बाळूकडंही त्याचं लक्ष नव्हतं. बायजा त्याचा सगळा उत्साह डोळ्यांनी टिपत होती. त्याच्या आयुष्यात लक्ष्मणाच्या येण्यानं इतका आनंद व्हावा, यानं अचंबित झाली होती. आणि शंकितही…
रात्रभर रामच्या डोळ्याला डोळा नव्हता. लवकर आवरायची त्याला घाई झाली होती. घरातल्या कामांमध्येही त्याचं फार लक्ष नव्हतं.
बाळूची खराब झालेली अंथरूणं-पांघरूणं धुवायला टाकणं, त्याला उचलायला मदत करणं, शिवाय चुलीवर पाण्याचं आधण ठेवणं, मग दोघांनी मिळून बाळूला स्वच्छ करणं ही त्याची नेहमीची कामं होती. सगळ्या कामांत उठल्यापासूनचा प्रहरभर सहज निघून जाई. कितीही वेळ लागला तरी तो ही कामं मनापासून खळखळ न करता करे. बाळूवरची त्याची माया त्याच्या प्रत्येक कृतीतून सौम्यपणे झळकत असे. पण आज नकळत का होईना पण त्याची घाई चालली होती.
बायजा त्याचं मूक निरीक्षण करीत होती. त्याच्या हळव्या मनाला कुठं ठेच लागू नये, म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करत होती. रामनं उजाडायच्या आतच बाळूची सगळी कामं पटपट आवरली आणि लगबगीनं निघाला.
“आरं राम्या, कायतरी खाऊन तरी जा रं.”
“मी आल्यावर खाईन लक्ष्मनाबरूबरच.”
असं बोलून तो मागे न वळून पाहताच गेला. बायजाच्या हातात रात्रीच्या भाकरीचा गूळ-तेल घालून केलेला मलिदा तसाच राहीला. तिलाही फार विचार करायला उसंत नव्हतीच. स्वयंपाकाला लागतांना रामची अधीरता तिच्यातही नकळत उतरली होती. पाट्यावर वरवंट्यानं मसाला वाटतांना तिच्या बांगड्या लयीत हलत होत्या. बऱ्याच काळानंतर या घरात काही उत्साहानं रांधू जात होतं. मसाल्याचा खमंग वास खोपटाच्या बाहेरच्या वाटेवर दरवळला होता.
त्याच वाटेवरून रमतगमत निघालेला राम एसटीस्टँडच्या जवळ वेगानं पोहोचत होता. आदल्या दिवशी आदबून निदबून धुतलेला सदरा त्यानं घातला होता. शाळेत असतांना वाढत्या अंगाचा म्हणून घेतलेला तो ढगळ सदरा आता जेमतेम कमरेच्या थोडाफार खाली पोहोचत होता. तसा आखूडच झाला होता म्हणायचं. पांढऱ्याधोप रंगाचा तो सदरा ‘आपल्यासारख्या साध्यासुध्या लोकांसाठी नाई’ असं बायजाई म्हणायची. त्यामुळं, तो बरेच दिवस घालण्यातच आला नव्हता. ‘तेवढ्या टायमात आपण असे यड्या बाभळीसारखे थोराड कसे वाढलो हे कळलंच नाई..’ असं त्याला वाटत राहीलं. पण आज त्याच्या उल्हासित मनाला कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं.
एसटी यायच्या बराच आधी तो जाऊन पोहोचला होता. स्टँडवर असणारी चार-दोन दुकानं नुकतीच उघडू लागली होती. दुकानावरची कामगार पोरं खराटा घेऊन दुकानासमोरची जागा झाडून घेण्यात व्यस्त होती. दूर कुठंतरी पाऊस झाला होता. त्याचा ओला ओला सुगंध वाऱ्यासोबत दरवळत होता. दुकानासमोरच्या जागेत सडा टाकल्यानं तो सुवास अजूनच ताजा झाला होता. पूर्वेला असणाऱ्या दूरवरच्या टेकडीवर असणारं देऊळ मागून येणाऱ्या सूर्यकिरणांनी दैवी प्रकाशत होतं. रामला खूप प्रसन्न वाटत होतं. एसटीची वाट पाहणं कंटाळवाणं वाटत नव्हतं.
मोठ्या डांबरी सडकेपासून फुटणाऱ्या फाट्यावरचा गावाकडं येणारा साधा मातीचा रस्ता. डांबरीकडून एसटीचं धूड गावाकडं वळताना ढीगभर फुफाटा उठला. त्या धूळीचा ढगानंच एसटी गावाजवळ आलीये, याची वर्दी दिली. एसटीला लावलेली ताडपत्रीची आच्छादनं फडफड करत वाऱ्यावर उडत होती. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घायपाताच्या टोकदार पानांमधून डाळींबी रंगाचं सूर्यबिंब डोकावत होतं. त्या बिंबाला आच्छादत एसटी पुढं पुढं येत होती. त्या एसटीनं पुढं जाणारे लोक पिशव्या सावरत उभे राहिले.
इतक्या वेळच्या प्रसन्न शांततेचा भंग करणारे अनेक प्रकारचे कर्कश आवाज करत एसटीनं गपकन् ब्रेक दाबले. धुळीचा मोठ्ठा ढग उठला. त्या ढगात उतरणारी, चढणारी तुरळक माणसं जरा वेळासाठी हरवून गेली.
“राम्या कोन यायचंय रं?” टपरीवरच्या दुकानदारानं विचारलं.
“भाऊ… भाऊ यायचाय माझा,” राम आनंद लपवू शकत नव्हता.
लक्ष्मण खाली उतरला. त्या सगळ्या कामकरी मळक्या गर्दीत तो टवटवीत फुलासारखा भासत होता. त्याच्या अंगावरच्या कॉलरच्या पांढऱ्या सदऱ्यापुढं रामच्या अंगातला सदरा जीव खाऊन धुतलेला असूनही केविलवाणा दिसत होता. हे पाहिल्यावर रामला पटकन तिथून पळून जावंसं वाटलं. लक्ष्मण समोरून आला, पण रामची जीभ मात्र टाळ्याला चिकटल्यासारखी झाली होती. लक्ष्मण हसत समोरून आला आणि रामच्या पाठीवर प्रेमानं थाप मारून म्हणाला,
“कसा आहेस भावा?”
“……”
“अरे, असा भूत बघितल्यासारखा काय बघतोयेस? ओळखलंस ना मला?”
“हा, वळखलं ना.”
रामच्या कुठल्या बोलण्याची वाट न पाहता लक्ष्मणानं त्याला एक घट्ट मिठी मारली. रामचं अवघडलेपण त्याच्या मिठीत विरत विरत गेलं. त्याच्या चेहऱ्यावर सहज हसू उमटलं. दोन्ही सदऱ्यांचा रंग आता एकसारखाच वाटू लागला.
(क्रमशः)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.