सवतीनं दारवंटा ओलांडला आणि बायजाच्या हेटाळणीला सुरूवात झाली. बायजानं नशिबाचे भोग म्हणून कुठंतरी सगळं आधीच स्विकारलं होतं. नव्या नवलाईची, सकवार सवत पाहून तिला काहीच वाटत नसेल का? दोन बिगा जमीनीसोबत आलेल्या नव्या बायकोच्या आगंमागं फिरणारा आपला दादला बघून तिचं काळीज फाटत नसेल का? पण ती जणू बधीर होऊन गेली होती. सवतीचा तोरा पाहून जळतही नव्हती आणि बाळू बिचारा पाहून विझतही नव्हती.
दोन दोन बायका काखेत घेऊन फिरणारा माणूस म्हणून बायजाच्या नवऱ्याचा भाव जोडीदारांमध्ये चांगलाच वाढला होता आणि सोबतच त्याचं पिणंखाणंही. सगळं हातातून निसटतंय असं वाटतानाच सवत धार्जिणी झाली आणि तब्बल तीन वर्षांनी बायजाची पाळी चुकली. तीन वर्षं दर महिन्याला टोमणे खाणाऱ्या बायजाला सवत उरावर बसल्यावर लगेच का दिवस जावे, ही मोठी अवघड खेळी होती नशिबाची. पण बायजा नशिबासोबत तंडली नाही. पुढच्याच महिन्यात जेव्हा सवतही बाजूला बसली नाही तेव्हा मात्र तिला हसायलाच आलं. दोघी पोटूशा, पण लाडाची सवत पहिलटकरीण. तिच्या डोहाळ्यांना पुरवता पुरवता सासू आणि नवरा थकत नव्हते. बायजाच्या नशिबी मात्र हालअपेष्टा आणि उपेक्षाच होती.
यथावकाश दोघी बाळंत झाल्या. सुदैवानं दोघींनाही चांगले, सशक्त मुलगे झाले होते. सवत लाडाकोडाच्या माहेरातली, खारीकखोबरं खाऊन तजेलदार दिसु लागली. बायजा मात्र बाळूचं आणि तान्ह्याचं करता करता थकून जाई. पोटाला चांगला, गोरागोमटा मुलगा आल्यानं तिच्या त्रासाची धार काहीशी बोथट झाली होती. नवरा दोन्ही मुलगे झाल्यापासून उत्साहात कामं करू लागला होता.
“माझ्या राम-लक्ष्मणासाठी रातध्याड कष्ट कराया लागतील तरी चालंल,” असं तो मोठ्या फुशारकीनं म्हणायचा. त्याच्या लेखी मतिमंद, गतिमंद बाळूला स्थानच नव्हतं.
बाळू फक्त बायजाचा होता. फक्त त्याच्या आईचा, बायजाईचा…
बायजाचा राम आणि सवतीचा लक्ष्मण एकत्रच खात, खेळत. वरकरणी जखमांवरती खपल्या धरल्यासारख्या भासत असल्या तरीही सवतीत आणि तिच्यात एक अदृश्य अंतर कायम होतं. ते अंतर दोघींनाही सोयीचं होतं. खरंतर म्हणूनच ते इतकी वर्षं अबाधित राहिलं होतं. पण एक दिवस तो अंतराच्या रूपानं असलेला दुवाही क्षुल्लक कारणानं निखळला आणि दोघींच्या चुली कायमच्या वेगळ्या झाल्या. रामापासून लक्ष्मण कायमचा दुरावला.
गावातल्यांना तमाशा नको म्हणून बायजा बाळू आणि रामला घेऊन मळ्यातल्या खोपटात रहायला आली. नवरा कपाळावरच्या कुंकवाइतकाच उरला आणि सुरू झाला तिच्या एकटीचाच संसार…
वावटळ आली की, खोपटाच्या झावळ्या आकाशात झेप घेऊ बघत. ती मेढी हातानं थांबून धरे. विजा लवू लागल्या की, घाबरणाऱ्या लेकरांना एखाद्या पक्षिणीसारखी पंखांखाली घेई. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नसे. कुडामेढीचं तिचं खोपट अंगावर पडतंय की काय अशी तिला भीती वाटे. कधी कधी बाळूच्या तोंडून विचित्र, मोठमोठ्यानं आवाज निघत. ती धावत बघायला जाई तर त्याच्या उशाशेजारी काळ्या पाठीच्या विंचवाचं बिऱ्हाड आलेलं असे. कधी कधी सापाचं जुळण दिसे. सळसळत जाणाऱ्या आणि अंगाला लागल्या की जळजळणाऱ्या गोमी तर नेहमीच्याच. यातलं काहीच झालं नाही तर खोपटात पाणी शिरून भुई ओली होऊन चिखल होणं तर नित्याचंच. खोपटातल्या चांदण्यांतून पडणारं टिपटिप पाणी साठवायला तिच्याकडं पुरेशी गाडगी मडकीही नव्हती. कष्ट करून घेतलेल्या दोन-चार शेळ्याही पावसात तिला घरात आणाव्या लागत. त्यांची करडं बांधे-बांधेपर्यंत पुर्ण खोपटात हैदोस घालत. सगळं करता करता तिचा जीव वैतागून जाई. पावसाचा तिला राग राग येई.
पण पाऊस नाही पडला तर शेती पडीक पडेल हेही तितकंच खरं होतं. असून अडचण आणि नसून खोळंबा, अशी पावसाची गत होती. प्रत्येक ऋतूची वेगळी आव्हानं. थंडी तिच्या चंद्रमौळी खोपटात एखाद्या उन्मत्त महाराणीसारखी, बेमुर्वतपणे शिरे. गोणपाटं, वाकळा, गोधड्या काही काही पुरं पडत नसे. ते मुळातच पुरेसं नसे. जे होतं ते दोन्ही पोरांना अंगावर टाकून ती चुलीच्या उबेपाशी बसून राही.
उन्हाळा आला की, कामानं घामाच्या धारा निघत. बाळूला घामानं पुरळ येई. त्याला सारखं या कुशीवरून त्या कुशीवर करावं लागे. कधीतरी त्यात कसूर झाली तर मोठ्या जखमा होत. अंथरूण पुवानं भरे. बाळू घशातून भेसूर आवाज काढत राही. लहानगा राम घाबरून जाई. बायजा हवालदिल होई.
आभाळ फाटलेलं असतांना ते शिवण्याची हिंमत तिला करावी लागत होती. नवरा कधीतरी मुसळाला मोड फुटल्यासारखा वागे. क्वचित एखादं धान्याचं गोणपाट, रामसाठी नवीन विजार, सदरा असलं काहीबाही घेऊन येई. गड्यासारखी हिंमत धरलेल्या बायजाला अचंब्यानं बघत राही. तिनं त्याच्या पुरूषार्थाला कुरवाळत शरण यावं, असं तर त्याला वाटत नसावं ना?
घरच्या अडचणी हळूहळू तिच्या अंगवळणी पडत गेल्या. तळव्यावरच्या कुरूपांसारख्या तिच्या वाटचालीशी सलत सलत का होईना पण एकरूप झाल्या. राम आता बराच शहाणासुरता झाला होता. त्याच्या इवल्या इवल्या हातांनी तो तिच्यामागं हिंडत त्याच्याजोगी कामं करे. ती तरातरा वावरात निघाली की, अनवाणी पावलांनीच तिच्यामागं निघे. तिच्या वेगाशी स्पर्धा करतांना त्याची इवलीशी पावलं मागं पडत. त्याच्याच उंचीच्या ढेकळांमध्ये तो हरवून जाई. त्याला वाट सापडेनाशी होई. मग मोठ्यानं रडवेल्या आवाजानं तो ‘आये’ म्हणे आणि इतका वेळ त्याची गंमत बघणारी बायजाई खुदकन हसे. तिचं ते हसू काट्याच्या झाडावर नुकत्याच उगवलेल्या फुलासारखं टवटवीत भासे. रामाच्या बोलाचं कौतूक करत असतांनाच तिचं चित्त बाहेर खांबळी रोवून तयार केलेल्या मचाणावर असे. त्यावर तिचा काळजाचा तुकडा बाळू झोपलेला असे. तिची नजर घारीसारखी त्याच्याभोवती भिरभिरत असे. मळ्यातल्या कामांना बरीच मजूर टोळ्यांमधली बाया-माणसं येत. बायजा त्या सगळ्या मजुरांकडून गोड बोलून, कधी दडपून कामं करवून घेण्यात तरबेज झाली होती. क्वचित त्यातल्या एखाद्याची नजर जेमतेम तेविशीत असणाऱ्या बायजाच्या शरीरावर रेंगाळत राही. तिच्या कंबरेला अडकवलेल्या खुरप्याचं धारदार पातं चमकलं की, त्या नजरेला कंबरेखाली जायची हिंमत होत नसे. मजूरबायाही तिच्या सरळवळणी असण्याला जाणून होत्या. बायजाच्या नकळत त्या परस्परच त्या गड्याला समज देऊन टाकत. त्यातल्या काहीजणी तिच्या खोपटात शेळीच्या दुधाचा चहा पिण्यासाठी हक्कानं येत. घरभर नाचणाऱ्या छोट्याशा रामला मांडीवर बसवून त्याची अलबला घेत. त्याच्या हुशारीचं कौतूक करीत. मधूनच एखादी पटकूरावर ठेवलेल्या दिनवाण्या बाळूकडं बघत उसासे टाकी आणि रानवट मायेपोटी म्हणे,
“कशाला सांबाळती या बाळूला? जिवाला किती तरास तुझ्या? त्यो नवरा म्हननारा काय बघत नाई तुझ्याकडं. तू एकटी कुठं कुठं पुरी पडनार? याला आता किती बी सांबाळलं, तरी त्यो काय सुधारनार हाय? सोन्यासारख्या लेकराच्या तोंडातला घास काढून त्याच्या तोंडात घालावा लागतोय. याला एखांद्या आश्रमात तरी ठिवून दे. तुझ्या जिवाचा काच तरी थांबल.”
बायजाचे डोळे भरून येत. तिला तिच्या अडाणी गडणींचा राग येत नसे.
ती क्षीण आवाजात म्हणे,
“देवादिकांना चुकलं नाई दुःख, मग मी कोन? जे असंल नशीबात तसं व्हैल. ज्यानी चोच दिली, तो चारा बी देईलच.”
सगळं ऐकणाऱ्या बाळूच्या एका डोळ्यातून पाणी वाहू लागे. गायीच्या डोळ्यांतल्यासारखे अमाप कारूण्य त्याच्या डोळ्यात साकळून येई. आजुबाजुला खेळणारा राम मोठमोठ्या डोळ्यांनी त्यांच्या बोलण्याकडं, बायजाच्या डोळ्यातल्या पाण्याकडं बघत राही.
(क्रमशः)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
अप्रतिम!!! क्षमाताई, लिहित रहा प्लीज