बाळूला लागून आठ दिवस व्हायला आले. त्याचे ओले टाके पाहून बायजाचे डोळे सारखे भरून येत.
“त्या दिवशी मी शेजारी गेल्ये नसत्ये तर ह्ये सगळं टळलं असतं का? बाळूला एवढं सहन करावा नस्तं लागलं.”
अशी अपराधीपणाची जाणीव तिचं काळीज कसर लागल्यागत कुरतडत होती. कितीही वाटलं तरीही ती बाहेर पडणं टाळत होती. बाळू सतत नजरेसमोरच राहील याची काळजी घेत होती.
बाळूला लागलं त्याच दिवशी रात्री सुरखी बाळंत झाली होती. तिला छान, स्वस्थ मुलगा झाला होता. अपराधीभावानं ग्रासल्यामुळं बायजा मनात असूनही बाळाला बघायला गेली नाही. सव्वा महिना असणारा बाळंतपणाचा विटाळ मला चालत नाही, या सबबीखाली तिनं जायचं टाळलं होतं.
सुरखी आणि संपतही बाळाला बघायला येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांमध्ये व्यस्त होते. सुरखीची आईही गावावरून तिच्या बाळंतपणासाठी म्हणून खास आली होती. बायजावरचं त्यांचं अवलंबित्व कमी झालं होतं. बायजालाही या आवर्तातून स्थिरावण्यासाठी उसंत हवीच होती.
संपत जमेल तसं तिच्याकडं जाऊन हवं नको ते विचारी आणि बाळूच्या तब्येतीचीही चौकशी करे. बायजा शक्य तिथं हसून नकार देई, पण गावातल्या घराची भिंत पडली तेव्हा मात्र तिला संपतचाच आधार झाला होता.
म्हातारी म्हणाली,
“हा, आता पडली भित. म्हातारी भितीखाली गाडली तर बरंच हाये तिला, पन माझ्या आविष्याची दोरी लय बळकट हाय म्हना. माझा लक्षूमन मला मनीआड्डर पाठवितोय. तुझ्या दमड्यांची काई गरज नाई म्हनावं.”
हे असलं काय काय ती कायमच बडबडत राही. अर्थात तिची ही मुक्ताफळं ऐकायला कोणी जिवंत माणूस नव्हतंच समोर. त्या फोटोपुढं ती सगळं गरळ ओके. तिच्या दोन खोल्यांच्या घरात आता एकच खोली शिल्लक राहिली. मुंढरीवरून सतत पडत राहणाऱ्या पाण्यानं आणि दुरूस्तीचं काम न करू देण्याच्या म्हातारीच्या आडगेपणानं भिंतीचा घास घेतला होता. भलं मोठं भगदाड पडलं होतं. ती खोली ओकीबोकी दिसू लागली. बायजानं संपतकरवी तात्पुरती डागडूजी करून घेतली होती, पण एकंदरीत कशातच तिला रस राहिला नाही. त्या दिवशी हरवलेली बाळूच्या डोळ्यातली ओळख पुन्हा परतून आली नाही. त्याच्या घशातून निघणारे आर्जवी, चिडके, प्रेमळ असे वेगवेगळ्या छटा दाखवणारे आवाज त्याच्या स्वरयंत्राच्या कृष्णविवरात लूप्त होत गेले. हे सगळं अचानक पडल्याच्या भीतीतून झालं की कुठं अंतर्गत मार लागल्यामुळं? याचा उलगडा कधी झाला नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून तो उलगडा करण्याइतकी परिस्थिती नव्हती आणि सगळं होऊन चुकल्यावर तशी आवश्यकताही…
पूर्वी शब्दांवाचून होणारा तो मायलेकरांमधला पुसटसा संवादही या अनपेक्षित घटनेनं तूटत गेला. बायजासाठी हे खूप वेदनादायी होतं. तिच्या आईपणाची कुठली परीक्षा दैव घेत होतं, कोण जाणे? ती त्याला म्हणत रहायची,
“बाळा, बघ रं भाईर किती पाऊस आलाय”
पूर्वी त्याच्या डोळ्यात पाऱ्यासारखे तरल भाव तरळत, आता तेही हरवलं होतं. तिच्या घरातले सगळे संवाद आता तिची स्वगतं बनून राहिली होती.
आता बाळूकडं सतत लक्ष ठेवावं लागे. त्याची तब्येत खालावत चालली होती. त्यामुळे अन्न भरविण्यासाठी नळी टाकण्यात आली होती. त्यात पातळ काहीतरी बनवून त्याला जगवण्यापुरतं जेवण भरवावं लागे. आधी किडामुंगी त्याच्या जवळ आले तरी घशातल्या हुंकारांनी बायजाला सावध करी. पण आता बायजा आंघोळीसाठी काही वेळ गेली तरीही तो आख्खा मुंग्यांनी भरला होता. सगळ्या अंगावर लाल चट्टे उठलेले. त्याच्या एका डोळ्यात पाणी तरळल्याचा बायजाला भास झाला. त्याच्या जिवंतपणाची तेवढी खूण तिला अप्रुपाची वाटली. तिनं घाईनं भरल्या डोळ्यांनी एक एक मुंगी निपटून काढली.
तेव्हा पहिल्यांदा तिनं बाळूसाठी मरण मागितलं…
नंतरही वेळोवेळी कित्येकदा कोण जाणे मागत गेली. त्याच्या डोक्यावरचे टाके सुकले, काढले गेले. त्या टाक्यांच्या आजुबाजूचे खुरटे केस कालौघात सफेद होत गेले, पण दोघंही आपले कर्मभोग भोगतच होती.
कित्येकदा बायजाला वाटे की थोडंसं विष आणून बाळूला घालावं आणि स्वतःही घ्यावं, पण ज्या हातांनी पातळ कुस्करा करून बाळूला खाऊ घातला त्या हातांमधली माया कधी आटली नाही आणि हाताच्या रेषांना दया फुटली नाही. कधीच…
गावातल्या घरी म्हातारी खंगत चालली होती. मनाच्या राज्यात दिशाहीन पांगत चालली होती. लक्ष्मण वेळोवेळी आपली फर्राटेदार मोटार घेऊन तिला व बायजाला भेटायला येत होता. कधी कधी बायकोला व पोरालाही आणत होता. संपत आणि सुरखीचा संसार लोखंडी कांबीसारख्या मजबूत पोरांनी आणि तुळशीसारख्या पोरीनी फुलला होता. बायजाचा मळा कष्टपुर्वक पिकवत त्यांनी पक्क्या घराच्या बांधकामापुरती दोन-एक गुंठे जमीन खरेदी करून त्यावर टुमदार घरही बांधलं होतं. गावाच्या जवळ असणारं ते घर त्याच्या तीनही मुलांना शाळेत जाण्याच्या सोयीचं होतं. ते सगळे तिकडं रहात असले तरी मळ्यातल्या कामाधामाच्या निमित्तानं संपतचं येणं खोपटाकडं होई. बायजाला, बाळूला हवं नको ते तो जातीनं बघे. सगळी दुनिया त्यांच्या त्यांच्या गतीनं पुढं निघून गेली होती. बायजा आणि बाळू आहे तिथंच थांबून गेले होते. त्यांच्या चाकोरीत कैक वर्षांपासून बदल झालेला नव्हता.
अधूनमधून गावातली शेजारीणही बायजाच्या सुखादुःखाला येई. बाळूकडं पाहून चुकचुके.
“कंच्या जल्माचे भोग ह्ये? द्येवानं आता सुटका करावी. तुझी बी आन् त्याची बी. आता तुमचे हाल बघवत नाई गडने.”
तिच्या संघर्षाचे साक्षीदार असणाऱ्या सर्वांनाच हे कित्येक वर्षांपासून वाटत होतं. पण शेजारणीची अनघट माया कुठली भीडभाड न ठेवता हे उघड बोलून दाखवे एवढंच.
लक्ष्मण महिन्याच्या महिन्याला जास्तीचे पैसे पाठवत असे. पण दवाखान्याचा खर्च एवढा होता की ते पैसे दवाखान्यातच बरेचसे खर्च होऊन जात. साठीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बायजालाही आता तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. पण बाळूला पाठूंगळी टाकून दवाखान्याच्या वाऱ्या मात्र तिच्या चुकत नव्हत्या. एकीकडं त्याच्यासाठी धावत पळत दवाखाना गाठणारी बायजा दुसरीकडं त्याच्यासाठी रोज मरण मागत होती.
त्या दिवशीही ती देवासमोर भरल्या डोळ्यांनी बसली होती. देवाशी उरात घुसलेलं एक एक सल काढून ठेवत ठेवत होती.
“द्येवा पांडुरंगा, ह्या जल्मात त्याचे सगळे भोग चुकते करून घे आन् त्याला लवकर पुढल्या जल्माला जाऊ दे. त्याची सगळी हौसमौज व्हऊ दे. कुनाच्या आधाराशिवाय जग दुनिया बघू दे. आन्… अजून येक मागनं हाये द्येवा. मला त्याच्या आधी मरू देऊ नकं. मी मेले तर कोन करील त्याचं? मी कवाच सोत्तासाठी काई मागितलं नाई, पण आता येवढं माप माझ्या पदरात घाल पांडुरंगा.”
तिचे डोळे नेहमीप्रमाणे भरून आले होते. हे असलं जगावेगळं दान मागताना तिच्या काळजाला हजारो विंचू डसत होते.
तिनं निरांजनाच्या ज्योतीवरून दोन्ही हात फिरवले. आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवले. लगोलग डोळेही पुसले आणि चेहऱ्यावर हसू आणत ती बाळूकडे वळली. ती त्याच्याकडं निश्चल पहात राहिली. बाळूच्या छातीचा पिंजरा धपापायचा बंद झाला होता. त्याला उलटी झालेली होती. त्याच्या अन्न भरविण्यासाठीची नळी उलटीच्या अवशेषांनी भरली होती. आणि या सगळ्याचा अनैसर्गिक दाब त्याच्या श्वसनलिकेवर येऊन श्वास बंद पडला होता. निरांजन लावून प्रार्थना करेपर्यंतच्या वेळातच हे घडून गेलं होतं. बायजाचे डोळे भरून आले. ती बाळूच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.
“जा लेकरा! शांततेनी जा. काई कमी-जास्त झालं तर तुझ्या अडानी आईला माफी कर. द्येवाच्या राज्यात तरी तुझ्या जिवाला इसावा भेटू दे…”
(क्रमश:)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.