एक दिवस सुरखीच्या पोटात अंमळ दुखत होतं. बायजानं नेहमीप्रमाणं बाळूची समजूत काढली. घरात केलेल्या भोपळघाऱ्या सुरखीसाठी म्हणून घेऊन गेली. थोड्या घाऱ्या घेऊन संपतला म्हातारीकडं पाठवलं.
अधूनमधून बाळूकडं चकरा मारत मारत ती सुरखीची पाठ चेप, कंबर चेप असं करत होती. त्यानंही बरं वाटेना म्हणून बायजानं लोखंडाचा तवा गरम केला. पोत्यात गु़ंडाळून त्या तव्यानं तिची पाठ सोसवेल अशी शेकवत बसली. तेवढ्यात गावातून जाऊन संपतही आला.
“माये, तू कशाला करती त्या म्हातारीसाठी इतकं?”
वैतागलेला संपत बायजाला म्हणाला.
“का रं बाळा? आता काय म्हन्ली तुला?”
सुरखीही दुखणं विसरून टाकारटुकूर डोळ्यांनी दोघांचं बोलणं ऐकत बसली.
“मंग काय तर? त्या म्हातारीनं तुझ्या आख्ख्या आविष्याचा खेळ मांडला, तरी बी तू किती करीती तिच्यासाठी? पन तिला हाये का काई त्याचं? नाव ना उपकार. काई बी बोलंती तुला. माझ्याच्यानी ऐकवत नाई”
“खरंय माये, येल वाळतो पन बोल नाई वाळत,” सुरखीही बोलली.
“हा माये, तिच्या पार घशापतवर घातलं ना तरी बी तुझा हात कोरडाच निघनारे. आता आजचीच गंमत बघ. म्या ग्येलो. तिला घाऱ्या दिल्या बर्का, तेवढ्या घाई घाई घेतल्या. आन म्हंती कशी? तुझ्या मालकिनीला सांग, तू किती बी ढोंगं केली तरी गावातलं घर मी लक्षुमनालाच देनार हाये. तुला मुतायलासुद्धा जागा देनार नाई इथं. ही काय पद्धत झाली बोलायची? काय तू धरू बी नको आन् करू बी नको त्या म्हातारीसाठी. घराची दुरूस्ती बी करू नको. पडू दे भीत पडली तर.”
बायजा शांततेनं ऐकत होती. संपतची सगळी फिणफिण ऐकल्यावर सावकाशीनं, मंद हसून ती म्हणाली,
“नको लय इचार करू बाळ, मेलेल्या झाडाला किती बी पानी घातलं तरी त्याला पालवी फुटंल का? तसंच म्हातारी बी आता या वयात काय बदलनार नाई. आन् माझ्यासारखीचं तर बाकीच्या बायांसारखंच.. येकदा लगीन झालं का कंच्याबी बाईचं रगात सासरच्याच गल्लीतून वाहत जातंय. आसं सगळं सोडता नाईच येत तिला कदी. सगळं चांगलं तर देवादिकांना बी भेटलं नाई. शीतामाई येवढी राजाची रानी पन वनवासात राह्यली.. दुरपदीवर घरच्यांनीच हात टाकला.. तिथं आमच्यासारख्या बायांचं काय घिऊन बसला? काई काई मानसं असत्यातच वायबारी. गोचिडासारखी, जळूसारखी चिकटत्यात अंगाला. पन त्यांना काढून फेकायचं म्हंजे आपलीच कातडी आपूनच खापलून काढावी, असं असतंय बघ. बाईचा जलम निभवायला बारा हत्तीचं बळ लागतंय. कानातून रगात येईस्तवर टोमने ऐकावे लागत्यात. मला आता सवय झाली सगळ्याची. आता तुमचा, लक्ष्मनाचा संसार येली जातांना पाह्यला म्हंजे झालं.”
तिच्या या बोलण्यावर संपत आणि सुरखी दोघंही चुळबूळत गप्प राहिली. दोघं ताज्या रक्ताची, गरम भेजाची.. त्यांना बायजाचा समजूतदारपणा अनाठायी वाटावा, यात त्यांची चूक नव्हती.
विषय बदलायचा म्हणून बायजा लगबगीनं म्हणाली,
“सुरखे, तवा गार झाला असंन. उलसा गरम करते आन् जाते आता. काई वाटलं तर आवाज द्ये. संपत, जास्ती दुखाया लागलं तर अंजाबाई सुईनीला निरोप द्यावा लागंन. गरबडून जाऊ नका दोघं बी.”
बायजानं तवा गरम व्हायला ठेवला आणि हळूच सुरखीला म्हणाली,
“लुगडं वलं व्हऊ लागलं तर गच बसू नको. मला बोलीव लगेच.”
गरम झालेला तवा तिच्या पाठीखाली सरकवतांना बाया-बायांच्याच खास अशा बऱ्याच नादान कानगोष्टी ती सुरखीला सांगत राहिली. संपतलाही वेगवेगळ्या सूचना देऊन ती निघणार एवढ्यात तिच्या खोपटातून काही तरी धपकन पडल्याचा तिला आवाज आला.
धस्स होऊन ती आणि संपत त्वरेनं खोपटाकडं पळाले.
बाळू खाटेच्या खाली अस्ताव्यस्त पडला होता. खाटेचा एक पाय मुडपला होता आणि खाट तिरकी होऊन बाळू घरंगळत जाऊन खाटेजवळ असलेल्या जात्याच्या दगडी पाळीवर आदळला होता. डाव्या कानशीलाच्या वरती डोक्याला मोठी खोक पडली होती. रक्त भळभळ वाहत होतं.
बायजानं पळत जाऊन त्याचं डोकं मांडीवर घेतलं. पदराचा बोळा जखमेवर दाबून धरला. संपतनं त्याच्या घरून पळत जाऊन हळद आणली.
सुरखी ‘काय झालं? अवो सांगा की काय झालं?’ म्हणत राहिली, पण संपतनं तिला उत्तर देण्यात वेळ दवडला नाही. त्यानं घाईघाई बाळूच्या जखमेवर हळद थापली. चांगली लिंबाएवढी हळद थापूनही रक्त थांबायचं नाव घेत नव्हतं.
सगळ्या धावपळीचा आवाज ऐकून आपल्या वाढत चाललेल्या वेदना दाबत सुरखी उठली. दमादमानं श्वास घेत भिंतीचा आधार घेत ती बायजाच्या घराकडं निघाली. उभी राहिल्यावर ओटीपोटात वेदनेचा आगडोंब उसळला. वेदना सळसळत्या नागिणीसारखी मांड्यांतून धावत होती. पोटऱ्या थरथर कापत होत्या. पण काय झालं या भीतीनं वेदनेनं जड झालेले पाय घेऊन ती खोपटाकडं निघाली. भादव्याचं ऊन चटचट करत होतं. तिला घाम फुटला. बायजाच्या दरवाजाच्या तीन कड्यांच्या साखळीत बोटं गुंतवत ती चौकटीला धरून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट उमटली होती.
पण बायजा आणि संपतनं बाळूच्या नादात ती आलेली बघितलीच नाही. बायजाच्या मांडीभोवती बाळूच्या रक्ताचं थारोळं तयार झालं होतं. आता बाळूचे डोळे अर्धवट मिटू लागले होते. बायजा हवालदिल झाली होती. तिला काही सूचत नव्हतं. ती बाळूच्या गालावर जोरजोरात थोपटत होती.
“बाळा, काय झालं रं राजा? कस्काय पडला? किती लागलंय लेकराला. आता काय करू द्येवा…”
बाळू तिच्याकडं बघत होता पण त्याच्या डोळ्यातली ओळख हरवत चालली होती. संपत सर्व परिस्थिती ओळखून म्हणाला,
“माये, डाक्टरकडं जावा लागातंय जनू”
बायजानं स्वतःचं भान कसोशीनं जागेवर आणत त्याच्याकडे पाहिलं.
सुरखीनं धसकून विचारलं,
“काय झालं?”
पण तिचा आवाज खोल गेला होता.
“माये, काय झालं?”
तिनं जमेल तितका आवाज वाढवून विचारलं. बायजानं तिच्याकडं पाहिलं तर सुरखीचं लुगडं ओलं होऊन टाचेपर्यंत गेलेला ओघळ तिला दिसला. तिनं एका नजरेत सगळी परिस्थिती ओळखून निश्चयी आणि घाईघाईच्या आवाजात संपतला सांगितलं,
“संपत, बाळूला डाक्टरकडं मी घेऊन जात्ये. तू सुरखीकडं बघ. अंजाबाईला बोलवायची येळ झाली. तिची वेवस्था बघ.”
“अगं पन माये, तू कस्काय घेऊन जाशीन त्याला?”
“पाठंगुळी टाकीत्ये. चाल उरक लवकर,” बायजानं निक्षून सांगितलं.
लुगडं फाडून तिची चिंधी बाळूच्या जखमेवर बांधून संपतच्या मदतीची वाट न पाहता तिनं जिवाच्या करारानं बाळूला उचललं आणि त्याला पुढं कित्येक वर्षं जगवण्यासाठी ती निघाली.
इकडं सुरखी तटतटल्या, कळभरल्या पोटानं बेजार झाली होती. आई नावाची मासोळी इकडंही तडफडत होती आणि तिकडंही…
सगळ्या गावानं पाठीवर घेतलेल्या बाळूला घेऊन चालतांना बायजाला बघितलं. त्याला घेऊन ती किती काळ चालली याचा हिशोब तिनंही कधी केला नाही.
कधी कुणी मदतीचा हात पुढं केला, कधी कुणी विस्मित होऊन बघत राहिलं, कधी कुणी दया दाखवली तर कुणी नुसतीच कोरडी सहानुभूती दिली. तिची सासू पडक्या घराच्या दारातून विचकट हसत म्हणत राहिली,
“ही अशीच पैल्यापासून हुलबावरी, वानदवडी.”
बायजाला काही ऐकायला येत नव्हतं. बाळू सोडून दुसरं काही दिसतही नव्हतं. बाळूला बरं वाटावं म्हणून ती काट्याकुट्यांची, खाचखळग्यांची, टक्क्याटोणप्यांची वाट चालतच राहिली.
भादव्याचा पाऊस बरसू लागला. बाळूचं रक्त पावसाच्या पाण्यात मिसळून बायजाची चोळी भिजवू लागला. लांबून पाहणाऱ्यांना असं वाटावं की तिच्या काळजातूनच रगात वाहातंय जणू…
(क्रमश:)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.