बायजा १०: मौन आक्रोश

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-10-maun-akrosh-dr-kshama-shelar-govardhane-marathi-kadambari-vacha-online-1

तब्बल तीन दिवसांनतर लक्ष्मण शुद्धीवर आला.
त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. झोपेच्या गोळ्या देऊन त्याला कसंबसं काबूत ठेवलं होतं. बायजाची सवतही आली होती. तिच्यातली आईही लक्ष्मणाची अवस्था पाहून विकल झाली होती.

रामचे दिवस घालेपर्यंत सासूही मळ्यातच थांबली होती. एवढ्याशा खोपटात माणसं मावत नव्हती. गावातले शेजारी, नातेवाईक, बायजानं आपल्या प्रेमळ स्वभावानं जोडलेली माणसं, रामचे मित्र, त्यांच्या आया अशी कितीतरी गर्दी बायजाच्या खोपटात दिवसभर बसून राही. कुणी पिठलं भाकरी रांधे तर रामचे मित्र जमेल तशी बाळूची व्यवस्था बघत आणि बायजा या सगळ्यात असून नसल्यासारखी. तिचं जग उलटंपालटं झालं होतं. रामचा सदरा हातात घेऊन ती दिवसभर भकास डोळ्यांनी बसून राही. तिचे अश्रू, शब्द, भावना सगळं जणू आटल्यासारखं झालं होतं. घरी जमा झालेल्या आयाबाया तिच्या पाठीवर हात फिरवून तिला मोठ्यानं रडण्यासाठी विनवत होत्या.
“बयो, तू रड मोठ्यांदा… अशी आतल्या आत झूरनी लागू नको गं साळायेss… कंच्या जल्माचं पाप भवलं बाईss, सोन्यासारख्या लेकराचा घास घेतला नशिबानं.”

बायजा काहीच बोलत नव्हती. आसवं गोठून गेलेली असली तरीही आठवं प्रवाही होती. कितीतरी आठवणी…
लहानग्या रामचं ढेकळात हरवणं, रोज चूल पेटवताना धुरानं लाल होणारे त्याचे टप्पोर डोळे…
“आये, दादा वाट पाहत असंल घरी,” असं म्हणून लवकर घरी जाण्यासाठी तगादा लावणारी त्याची बाळूबद्दलची वत्सल काळजी…
लक्ष्मण येण्याआधीची त्याची लगबग…
काय काय म्हणून आठवावं?
आणि किती, कसं विसरावं?

सगळं भान हरपलेली ती जणू रामसोबतच मेली होती आणि राम प्रतीक्षण तिच्यासोबत जगत होता. तिचा हा मौन आक्रोश संपावा, तिच्या तोंडून शब्द फुटावा म्हणून आयाबाया प्रयत्न करत, पण ती स्वतःभोवती कित्येक भिंती बांधून बसली होती. त्यातून कुणाचाच आवाज तिच्यापर्यंत पोहचत नव्हता; बाळूचाही नाही.

सवत अंतरावरूनच बायजाकडं बघत होती. इतक्या वर्षांच्या दुराव्याच्या काळात आलेली तिची समज बायजाच्या वेदना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती.
“रामच्या जागी लक्ष्मण असता तर…?”
या विचारानं तिचाही थरकाप होत होता. त्यामुळंच बायजाचं दुःख कदाचित सर्वांपेक्षा तिला जास्त पोहचत होतं. तिच्या डोळ्याला खळ नव्हता.

लक्ष्मणाची अवस्था वातावरण बदलल्याशिवाय सुधारणार नव्हती. चार-पाच दिवसांनी लक्ष्मणाला घेऊन निघताना सवतीनं बायजाच्या हातात काही रक्कम ठेवली. बायजानं अविश्वासानं तिच्याकडं पाहिलं आणि राम गेल्यापासून पहिल्यांदाच तिचे डोळे खळकन भरून आले आणि सवतीच्या गळा पडून ती मोठ्यांदा आक्रोश करू लागली.
“तुळशीसंगं लगीन लावलं पोराचं आन् या माझ्या हातांनी पुरलं गं मी लेकरालाsss”
आता तिचा आक्रोश ऐकवत नव्हता.
हे असं अघटित झालेलं बाळूला कळून चुकलं होतं. बायजाचा आक्रोश पाहून तो जास्त अस्वस्थ झाला. त्याच्या घशातून निघणारं ते भेसूर रूदन वातावरण भयाण करत होतं.
इतक्यात बायजाची सासू तरतरा उठली आणि बाळूला कच्चून शिव्याशाप देऊ लागली. 
“तू कशाला जगला रं मुडद्या? अपशकूनी मेला. द्येवानं तरी अशी खेळी का केली बया? चांगलं प्वॉर घेऊन गेला आन् ह्ये यडं ठेवलंय जन्माजोगीला,” असं म्हणून विलाप करू लागली.

बायजाच्या मेंदूपर्यंत सासूचे डागण्या देणारे शब्द पोहोचायला अंमळ वेळ लागला पण ज्या क्षणी तिच्या मेंदूनं त्याची नोंद घेतली त्याच क्षणी तिच्यातली करारी आई पुन्हा जागी झाली. ती चवताळून उठली. अश्रू न थांबवता बोलू लागली,
“आत्याबाई, हे असं काय बोलताय? जे झालं त्यात या अश्राप लेकराचा काय गुन्हा? तोच बिचारा कंच्या पापाची फेड करतोय कोन जानं? मानसाच्या जल्माला येऊन बी मानसासारखं वागता येत नाई आन् त्याला कुनी मानसासारखं वागवीत नाई, तर का तुमी त्याच्या जिवाला डागन्या देऊ राह्यल्या? त्याला का कोनीच नाई? त्याला त्याची आई हाये. बाळू माझा हाये, आन् माझा राम बी आता हाच हाये.”
रडत रडत बोलताना तिचा आवाज चिरफाटत गेला.. 

तिचं सासूला इतकं बोलणही सर्वांना अनपेक्षित होतं. सासूही चमकून गप्प बसली होती पण तिच्या जहाल शब्दांनी का होईना पण बायजा भानावर आली होती. बाळूसाठी जगलंच पाहिजे; सावरलंच पाहिजे, हे तिला ठळकपणे कळालं.

आभाळाएवढ्या दुःखाला कुलूपबंद करून बायजा पुन्हा एकदा जगण्याची परीक्षा द्यायला सिद्ध झाली. थोडा वेळासाठी घरात डोकावलेल्या सुखाला हद्दपार करून दुःख तिच्या खोपटात कायमचं वस्तीला आलं होतं.

बायजा आणि बाळूच्या रामशिवायच्या आयुष्याला सुरूवात झाली. सुरूवातीचे काही दिवस सकाळी उठल्या उठल्या बायजा चूल पेटवण्यासाठी नकळत रामला आवाज देई,
“राम्या, आरं चूल पेटव बरं पटकनी”
मग अचानक बोलता बोलता थबके आणि मग रात्री चुलीतल्या राखेत पुरून ठेवलेला निखारा काढून चूल पेटवण्याच्या तयारीला लागे. वर वर थंड पडलेली राख असली तरीही पुरून ठेवलेल्या निखाऱ्याची आणि काळजाची धग मात्र तेवढीच असे. चुलीत धूर नाही झाला तरीही डोळे गळू लागत.

हळूहळू आठवांचे आणि आसवांचे डोह आटत गेले. बाळू आणि त्याचा दिनक्रम एवढंच तिचं आयुष्य बनून गेलं. मळ्यात कष्ट करून सोनं पिकवण्याची तिची जिद्द आणि उर्जा केव्हाच गंजून गेली होती. फक्त घराजवळचा तुकडा स्वतःला कसण्यासाठी ठेवून बाकीचं वावर अर्धेलीनं देऊन टाकलं.

गडी म्हणून आणलेली नवरा-बायकोची जोडी लांबच्या गावची. गावी भरपूर असूनही पाणी नसल्यानं पडीक पडून असलेली जमीन सोडून दोघंही नशीब काढण्यासाठी गाव सोडून आलेली. बायजानं त्यांना आसरा दिला. खोपटाच्या जवळच चारी बाजूंनी पत्रे ठोकून त्यांनी आपली चूल मांडली होती. दोघंही कमी वयातली होती. अनुभव कमी होता, पण आशा उदंड. कष्टाळूही होते. त्यामुळं थोड्याच अवधीत त्यांनी मळा चांगल्यापैकी पिकवायला सुरुवात केली. बायजालाही त्यांचा आधार होऊ लागला.

बायजाचं आयुष्य त्याच्या गतीनं आणि पद्धतीनं पुढं जात राहीलं, तरीही बाळूनं हे बदल स्विकारले नाहीत. राम गेल्याच्या क्षणाचा तुकडा त्याच्या काळजात कायमचा रूतून बसला होता. त्याचे पडसाद त्याच्या शारीरिक पातळीवरही दिसू लागले. पूर्वी सगळं काही पचू शकणाऱ्या बाळूला आता खाण्यापाण्यातले, वातावरणातले थोडेही बदल सोसवेनासे झाले. घरगुती उपायांनीही त्याला बरं वाटेना झालं. दवाखाना कायमचा मागं लागला.

इतर गोष्टीत गडी आणि त्याच्या बायकोची मदत होत असली तरीही बाळूच्या कुठल्याही बाबतीत मात्र ती असाह्य होती. तिची सासू बाळूवर विचित्र पद्धतीनं ओरडल्यापासून तो तिऱ्हाईत माणसाबाबत जणू एक प्रकारची भीती बाळगू लागला होता. बळजोरीनं त्याची मदत करण्याचा प्रयत्न केलाच तर तो आवरेनासा होऊन जोरजोरात ओरडत असे. त्यामुळं कुणीही त्याला हात लावायला धजावत नव्हतं.

त्या विशिष्ट वयातले बदलही बाळूत दिसून येत होते. त्याचं एकटक बघणं, घशातून विचित्र आवाज काढणं हे नेहमीसारखं न राहता त्यात चमत्कारिक बदल दिसत होते. गडी आणि त्याची बायको ह्यांचा नवा नवा साजरा संसार, त्यांचा येता-जाता होणारा सुखाचा संवाद बाळूच्या सहज कानावर पडे. त्याची अवस्था अशी असल्यानं कुणी तिसरं माणूस आजूबाजूला आहे, याचं भान ती दोघं ठेवतही नव्हती. पण तो विकलांग जरी होता तरीही ते श्वास घेणारं जिवंत शरीर होतं. त्याच्या नैसर्गिक प्रेरणा वयानुसार जाग्या झाल्या होत्या.

बायजा आई होती शेवटी. तिच्या लक्षात त्याच्यातले हे बदल येत नव्हते असं नाही, पण हा तिढा कसा सोडवावा तिला कळत नव्हतं. आहे ती परिस्थिती पुढं रेटण्यावाचून तिच्या आयुष्यानं तिच्यासमोर पर्यायच ठेवलेला नव्हता. एक एक दिवस वेगवेगळ्या आव्हानांना घेऊन येत होता.

काळ वेगानं पुढे सरकत होता. बायजानं स्वतःला कामात बुडवून घेतलं होतं. रिकामं बसण्याची तिला जणू भीतीच वाटे. सगळीकडून आठवणी हल्ला करतील आणि जीव घेतील की काय, असं वाटे. काम हीच तिची गरज, अपरीहार्यता आणि छंदसुद्धा बनून चुकलं होतं. कितीही काम असो, ती डरत नव्हती. कामच तिला बघून थरथर कापत असायचं.

सतत चिखलापाण्यातलं काम करून भेगाळलेले तिचे हात बाळूची सुश्रूषा करतांना सावरीच्या कापसावानी होऊन जात. तिच्या हातातून वात्सल्याचं झाड उगवून येई. ती मायेनं त्याचं सगळं सगळं करत होती. 

रोज त्याच्या अंथरूणाची जागा बदलली जाई. आधीची जागा स्वच्छ करून ताज्या शेणानं सारवून काढी. तिथं धुतलेलं अंथरूण घालून बाळूला त्यावर ठेवत होती. क्वचित गड्याची मदतही घेत होती. एव्हाना बाळू गड्याला चांगल्यापैकी ओळखू लागला होता. त्याची भीड चेपली होती. गड्याच्या मदतीला तो हल्ली अव्हेरत नसायचा, पण गडी इतर कामात गुंतलेला असला की तिला एकटीलाच ही उचलसाचल करावी लागायची. आता बाळू तब्येतीनं हडकला होता. त्याच्या पोटाच्या विकारांमुळे कधीकधी दिवसातून दोन-तीनदा त्याची स्वच्छता करावी लागायची. पण त्याचं सगळं नीटनेटकं झाल्याशिवाय बायजाला घास गोड लागत नव्हता.

(क्रमशः)

*

वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता


Medical Professional | + posts

डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :