“आत्याबाई, येक डाव ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तिथं आम्ही येक भाकर खातोय तर अर्धी खाऊ. तुमाला कमी पडू द्याची नाई. पन आता इथं राहू नका अशा येकट्या. त्या दिवशी येरवाळी डाक्टरकडं नेलं म्हनून आज आपलं बोलनं व्हतंय. तुमी आविष्यभर माझा राग केला, मला पान्यात पाहीलं; पन माझ्यावर इस्वास ठेवा. येक बार…”
म्हातारी बरी झाल्यावर बायजानं विषय काढला.
“साफ यायची नाई मी तुझ्या त्या खोपटात,” म्हातारी डोळे गरगरा फिरवत म्हणाली.
“मला माहीतेना, तुझा डोळा या गावातल्या घरावर हाय ते. चार दिवस सांबाळन्याचं नाटक करशील, आन् गोड बोलून समदं तुझ्या नावावर फिरवून घेशील. एखादं दिवशी भाकरीत काचा ठेचून घालशील, आन् घेशील माझा जीव. तुझा कसा काय भरवसा धरू मी?”
“आत्याबाई, तुमच्या तोंडाला मी काय हात लावनार? पन चार दिवस चला घरी. चांगलंचुंगलं करून खायला घालित्ये. जिवाला बरं वाटलं का परत या इकडं वेळ पडली तर.”
“तू आन् तुझ्या लाळगाळ्या, यड्या पोराच्या थोबाडाकडं बघावं लागलं तर माझ्या जिवाला कदीच बरं नाई वाटायचं गं केरसूने. तुमी दोगं बी अपशकूनी तोंडाचे हाईत.”
एवढं बोलून म्हातारी झटक्यानं तोंड फिरवून बसली.
बायजाचा निरूपाय झाला. ती भरल्या डोळ्यांनी उठली. म्हातारी अशी दात खाता खाता बोलली की रामला संताप आवरत नसायचा. त्याला आता मिसरूड फुटू लागलं होतं. राग डोक्यात मावत नसायचा.
“आये, चल तू आपल्या घरला बरं. नको हिच्या रावन्या करीत बसू. चल जाऊ.”
“आगं बया बया, वठ पिळले तर दूध निघल आन् बोलतोय बघ कसा चराचरा. जा, जा. जा या पनवतीला घेऊन. माझा लक्षूमन येवढा शेहरगावाला शिकतोय, पन आसं त्वांड वर करून कदी बोलला नाई मला. तू असाच राहनार अडानी बोड्याचा.”
दोघं मायलेकं गुमान घरी चालत आली. रामचे डोळे आत्यंतिक रागामुळं लालेलाल झाले होते. त्याचं दुःख, राग काळीज फोडून बाहेर येईल की काय असं झालं होतं. शेवटी तो बोललाच,
“आये, ही म्हातारी येवढी टाकून बोलती तुला.. तू कशाला तिच्या पुढं पुढं करती तरी? त्या दिवशी पार मराया टेकली व्हती. हज्जाराला पन्नास कमी येवढे पैशे घालवून तिला बरी केली आपन. येक शेळी बी इकाया लागली. तरी या म्हातारीला त्याची काय कदर हाय का? बरी झाली तर पार जशी जवानी आली तिला. आज कशी मारक्या म्हशीवानी बघत व्हती”
बायजा चुलीत लाकूड सरकवता सरकवता खालमानेनं त्याचा त्रागा ऐकत होती. भाकरी थापायचा थपथप आवाज अंमळ जोरात येत होता.
“लक्ष्मन शेहरात शिकतो याचा तिला किती अभिमान.. आन् मी येवढा रोज तंगडतोड करीत तिला काईबाई नेऊन देतोय, त्याचं तिला काईच अपरूक नाई. आन् तुझं बी सारखं दूध नेऊन दे आजीला, सरपान नेऊन दे आजीला, वशाटाचं कालवन केलं की ते बी नेऊन दे. जायला बी काई नाई, पन तिला हाये का त्याचं जराबी कवतिक? येऊन-जाऊन लक्षुमन आन् त्याची आई! महिन्याला मनीऑर्डरच्या टिकल्या येतात नं? सोत्ताच्या पैशातलं चारानं-आठानं तरी दाखवती का आपल्याला? आपन काय काईच करत नाई का? बरं तुला बोलती, मला बोलती, दादाला बी बोलती. आपन काय सावत्र हाये का? तसं पाह्यलं तं म्हातारी येका हाताची बी नाई माझ्या. पाहीन तवर पाहीन आन् एखादं दिवशी इकडचं थोबाड तिकडं करून टाकीन.”
आणि रामला काही कळायच्या आतच बायजाची पिठानं भरलेली पाच बोटं रामच्या उजव्या कानशीलावर टेकली होती.
राम अविश्वासानं बघत राहिला. त्याचे टप्पोरे डोळे भरून आले. नाकपुड्या थरथरू लागल्या. बाळूसमोरच हे घडलं होतं. त्यानं तीव्र निषेधाचा उद्गार काढला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. बायजा अजूनही संतापलेलीच होती.
“म्हातारीचा आन् माझा काय हिशेब असंल तो आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला दोघांना आजपतोर काय कमी पडलं रं? आजीच्या चारान्या-आठान्याची हाव धरीतो तू? आँ? तुला काय खायला मिळत नाई का काय? माझ्या पोटात जाळ पेटता ठिवून तुला दांडगा केलाय, तो काय तिचं थोबाड फोडन्यासाठी?
मंग आता येक काम कर. या चुलखंडात माझी हाडं घाल सरपन म्हनून. तेच्यावर माझं रगात ओत. ते बघ कसं घासलेटसारखं भरभरा जळंल. काडीसुद्धा लागायची नाई, येवढा वनवा माझ्या उरात हाय रं. आन् त्येच्यावर माझं मांसखंड शिजव आन् खा. मग लय ताकद येईल तुला. लय मस्ती येईल. मग फोड सगळ्यांची थोबाडं. तुला कुनी गुंडमवाली म्हनलं तरी काय नाई. लय इरीशिरीनं यकटी रहात व्हती. पोराला काय बनवलं, तर म्हनं मवाली. सवतीचं पोरगं शेहरगावात शिकतंय, आन् हिचं प्वॉर बघा कसं लोकाची थोबाडं फोडीत सूटलंय म्हनतील. म्हनू दे. माझ्या मागं काय बी म्हनली लोकं तरी काय बिघाडलंय?”
तिची दाही दिशा फुटत चाललेली, डागण्या देणारी बडबड पाहून राम विदीर्ण काळजानं अर्ध्या ताटावरूनच उठला आणि मळ्यातल्या विहीरीवर जाऊन बसला. रामला मारल्याच्या रागातून बाळूनंही खायला नकार दिला.
“नका खाऊ, कोनीच नका खाऊ. सगळं करडांना घालित्ये,” असं म्हणत बायजाही उपाशीपोटीच राहिली.
आढ्याच्या कौलांमध्ये तिला तिच्या नशिबाचा कुरूप चेहरा दिसत होता. रात्रभर डसत होता.
आईचा लेकरावरचा राग आणि लेकराचा आईवरचा राग सुदैवानं अल्पायुषी असतो. यथावकाश रामला आजीप्रती असणारी त्याची कर्तव्यं पुनश्च पहिल्यासारखी पार पाडावी लागत होती. बायजानं त्याच्या मर्यादा तिच्या पद्धतीनं अधोरेखित केल्यानंतर त्यानं तीच शिस्त नाईलाजानं का होईना पण स्विकारली होती.
त्यामूळंच आज तो आजीनं सांगितल्याप्रमाणं पोस्टकार्डावर लिहीत बसला होता. पत्र जाणार होतं त्याच्या सावत्र आईकडं.
घर पडाया झालं आहे. आजीची तब्येत बरी नाई, असं आजीनं लिवायला सांगितलं आहे. एकडाव लक्ष्मणाला घेऊन भेटायला येऊन जा. कळावे.
आपला नम्र,
राम
असं छान घोटीव अक्षरात लिहून रामनं ते पत्र टपालात टाकण्यासाठी निगुतीनं खिशात ठेवलं. त्यानं पत्र खिशात ठेवेपर्यंत त्या कागदावर जीव लावून ठेवत ठेवत आजी बोलत राहीली.
“बरं झालं बाबा, लक्षूमनाइतकं जरी नाई पन लिवन्या-वाचन्यापुरतं तरी शिकला. नाई तर माझा सांगावा लक्षुमनापतवर कसा पोचला असता बया? चार गोष्टी खरडायचेसुद्धा पैशे घेतात. घर तर असं झालंय का हत्तीचा पाऊस लागला तर भिंती टिकायच्याच नाई. मुंढरीवरून बदबदा पानी गळतंय. एखाद्या बारी भित गपकनी बोकांडी पडंल माझ्या. ‘हत्ती फोडंल भित्ती’ असं उगाच म्हनत्यात का जुनी लोकं? मोठ्या खर्चाचं काम हाये. तुम्ही मायलेकं असे फाटके. तुमच्याकडं दातावर माराया पैसे नाई.” दोन्ही सुनांमधला आणि नातवंडांमधला दुजाभाव अधोरेखित करत आजी वंगाळ तोंडानं म्हणाली.
काहीच दिवसांपूर्वी झालेला दवाखान्याचा खर्च, सगळी धावपळ सोयिस्करपणे विसरून आजी बोलत होती. रामनंही आवर्जून आठवण करून दिली नाही.
‘तुम्ही कायमचेच भिकारी’ असा उन्हाळ टोमणा रामनं सवयीप्रमाणे पचवला. आज त्याला तो टोमणा फारसा पोहोचलाच नाही. आज त्याच्या मनात नकळतपणे एक अस्वस्थ हूरहुर दडली होती.
लक्ष्मण! खरंतर त्याचा सावत्र भाऊ! पण बालपणीची काही अवखळ वर्षं त्यांनी सोबत काढली होती. नंतर दोघांच्या आयांच्या चुली जरी वेगळ्या झाल्या, तरीही दोघं शाळेतही एकाच जात होती. तालूक्याला शिकायला गेल्यानंतरही लक्ष्मण अध्येमध्ये गावाला येत असे. पण बाप गेल्यानंतर मात्र हे येणंजाणं विरळ झालं होतं. तो रग्गड शिक्षण घेतोय, एवढं आजीकडून कळत होतं. काही वर्षांपासून मात्र दोघांची भेट नव्हती. त्याच्या पूनर्भेटीची रामला आस लागली होती. पण तो थोडा बिचकतही होता.
लक्ष्मणाला आपली आठवण येत असेल काय? त्याच्या गावाकडच्या स्मृतींमध्ये मी असेन काय? खिसा भरभरून चिंचा, आवळे, बोरं खात होतो, शाळेच्या मधल्या सुट्टीत विटीदांडू खेळत होतो, हे त्याला आठवत असेल काय? शेरडांमागं अनवाणी पायानं डोंगर तुडवणाऱ्या शेतकरी भावाची त्याला लाज तर वाटणार नाही ना?
नुसतेच प्रश्न…
रामला पडलेल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लक्ष्मण आल्यानंतरच मिळणार होती.
(क्रमशः)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.