[सूचना: त्रिभंग सिनेमातील काही महत्त्वाच्या प्लॉट पॉईंट्सची सविस्तर चर्चा लेखात होणार आहे. त्यामुळे ज्यांनी सिनेमा बघितला नसेल त्यांनी लेख वाचू नये, ही नम्र विनंती.]
रेणुका शहाणे लिखीत-दिग्दर्शित त्रिभंग सिनेमा तीन स्त्रिया व पिढ्यांची कहाणी सांगतो. नयनतारा आपटे, अनुराधा आपटे व अनुराधाची मुलगी माशा या अनुक्रमे आजी, आई व मुलगी यांची कथा आहे. पैकी नयनतारा आपटे या साहित्य अकादमी विजेत्या लेखिका. अनुराधा आपटे ही ओडिसी नृत्यांगणा व बॉलीवूड अभिनेत्री, तर माशा ही सर्वसामान्य घरातील सून. तिघींची विश्वं वेगळी. त्यांच्यात म्हटला तर संवाद आहे, म्हटला तर नाही. नयनतारा ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे कोमात जातात, इथनं सिनेमाची सुरूवात होते. तत्पूर्वी अनुराधा आपटे कशी आहे, याची चुणूक तिच्या ओडिसी नृत्याच्या कार्यक्रमाआधी मेकअप रूममधील छोटेखानी प्रसंगात दिसून येते. तिला सिगरेट ओढण्याची सवय असते. ती पाकिटातून सिगरेट काढून पेटवणार असते की तिची मुलगी व तिचा बॉयफ्रेंड तिला नको ओढूस म्हणतात. ती लगेच प्रतिक्रिया देते, की तू मॉरल पोलीस होऊ नकोस. मी ओढणारच म्हणते. पुढच्याच प्रसंगात आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय म्हणून तिकडे जात असताना रस्त्यावर एकाला कचकचीत शिव्या घालते. तिची मानसिकता काय आहे याचं दर्शन होतं, जे जसजसं कथानक पुढे जातं तसतसं अजून मोठ्या प्रमाणात दिसायला लागतं.
अनुराधाचं व्यक्तिमत्व आक्रस्ताळं, तापट, सतत वाद घालणारं, रागीट आहे. तिला जगाबद्दल प्रचंड राग आहे. हा राग व्यक्तिगत अनुभवातून आला आहे. लहानपणी झालेलं लैंगिक शोषण, आईनं त्या विरोधात काहीही न करणं, वडिलांपासून तिची व भावाची तिनं केलेली कायमची ताटातूट, वडिलांनी सांभाळ करणं सहज शक्य असताना जबाबदारी टाळणं यामुळे तिच्या मनात कुटुंबाबद्दल राग दबून राहिलेला. तसेच नयनतारा आपटेंची प्रतिमा जगात मोठी लेखिका असणारी, पण ती लहानग्या अनुराधाकडे दुर्लक्ष करते. घरातील समस्या तिच्या लेखी अस्तित्वात नसतात. तिचा बॉयफ्रेंड अनुराधाचं सातत्यानं लैंगिक शोषण करतो, तरी देखील ती दुर्लक्ष करते. त्याला तसं करण्यापासून परावृत्त करत नाही. आईचं वागणं अनुराधाच्या मनात खोलवर रूतलेलं. त्यामुळेच जेव्हा ती सज्ञान होते, तेव्हा ती तापट, शीघ्रकोपी झालीय असं दिसतं.
भारतीय समाजात पालनपोषण करणं म्हणजे मुलांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं दाबून टाकणं, कसलाही सुसंवाद न साधणं असा सर्वसाधारण समज आहे. आर्थिक गट कुठलाही असला तरी पालक शक्यतो मुलांच्या भावविश्वाला महत्त्व न देता आम्ही सांगू तसंच वागायला हवं, या पुरूषप्रधान व्यवस्थेतून आलेल्या वर्चस्ववादी वृत्तीनं वागताना दिसतात. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या मनात त्यांच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो. पुढं कॉलेजवयीन झाल्यावर मुलांनी काय शिकावं याचा परस्पर निर्णय पालक घेतात. त्यांना ते शिक्षण झेपणारे की नाही, याची कसलीही शहानिशा ते करत नाहीत. मुलाचा कल कुठं आहे याकडे न लक्ष देता, सध्या ट्रेंड काय आहे याकडे लक्ष देऊन त्याची भरती त्या विशिष्ट ज्ञानशाखेत केली जाते. पाल्य कसंतरी शिक्षण पूर्ण करतो किंवा त्यात नापास होतो. दुसऱ्या ज्ञानशाखेत प्रवेश घेऊन पदवीधर होऊन नोकरीला लागतो. लग्न करतो. त्या ज्ञानशाखेनुसार आर्थिक उत्पन्न मिळायला लागतं. तर पालकांकडून त्याची तुलना त्याच्या वर्गातील मित्रांशी केली जाते. पुढं त्याच्या प्रत्येक व्यवहारात लक्ष घालणं, काही किरकोळ व्यवहारात आर्थिक नुकसान झालं असेल तर मुलाला सुनेसमोर बोलणं, मुलगा-सून काय कपडे घालतात, कुठं जातात यावर पाळत ठेवणं, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर न करणं, सतत आमच्यावेळी असं होतं तुमच्यावेळी काय होतं अशी तुलना करणं, मासिक उत्पन्नावर टीका करणं अशा असंख्य गोष्टी पालक ज्येष्ठ झाली तरी करत असतात. त्यामुळे वैतागून मुलं तारस्वरात बोलायला लागतात, छोट्या छोट्या गोष्टीत भांडायला लागतात, वाद घालायला लागतात, आक्रस्ताळे होतात, बऱ्याच वेळा पालकांशी बोलणं तोडून टाकतात, लोकलज्जा म्हणून सोबत राहतात. त्यावेळी त्यांच्यावर बायकोच्या आहारी गेलाय, सुनेनंच फितवलं असे आरोप केले जातात. हे सहन नाही झालं तर मुलगा-सून वेगळे राहायला लागतात. त्यावेळी आपला समाज फक्त मुलगा-सुनेला दोष देतो. वर्तमानपत्रातील लेख असो की फेसबुकीय चर्चा, यात वृद्धाश्रमांची संख्या कशी वाढत चाललीय, आजकालची मुलं-सून कशी वागायला चुकीची आहेत असा एकुणात सूर लावलेला दिसून येतो. पण अशावेळी मुलगा-सुनेची बाजू हिरीरीनं कुणी मांडलीय असं दिसून येत नाही. आई-वडिलांच्या वागण्यात चूक आहे, हे कुणी निर्दशनास आणून देत नाही. कारण भारतीय समाज आई-वडिलांना देवत्वाच्या रूपात बघत असल्यामुळे असं घडून येताना दिसतं. प्रचंड जजमेंटल समाजव्यवस्था आहे आपली. टाळी एका हातानं वाजत नसते, हेच आपल्या समाजाला मान्य नाही.
अनुराधा व नयनतारा आपटे ह्या वलयांकित व्यक्ती. त्या सर्वसामान्य नाहीत. त्यामुळे त्यांच्या वागण्यालासुद्धा एक ग्लॅमर प्राप्त झालेलं. मनस्वी व्यक्तिमत्वं अशीच वागतात असं म्हटलं जातं. सर्वसामान्य घरातील अनुराधाच्या वयाची मुलं-मुली यांना असमजुतदार आई-वडिलांशी सामना करावा लागतो. त्यांची मरेपर्यंत काळजी घ्यावी लागते. ते कितीही असमजुतदारपणे वागत असले, तरी मुलांनाच समजूतदारपणा दाखवावा लागतो. त्याची परिणती घरात विसंवाद राहतो. नातेसंबंधात ओलावा राहत नाही. एका छताखाली चार डोकी राहतायत म्हणजे त्यांच्यात बेबनाव नाही, असं सार्वत्रिक समज असतो. बडा घर, पोकळ वासा म्हणतात तसं वातावरण असतं.
अभिनेत्री काजोल व अनुराधाचं वय एकच असेल, असं गृहीत धरूया. आमची पिढी अनुराधानंतरची ऐंशी-नव्वदच्या दशकात जन्मलेली. वरील विवेचनात मुलांची जी अवस्था विषद केली आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची पिढी. अनुराधाची सर्व गुण-वैशिष्ट्यं वागवत जगणारी. तिच्यासारखीच व्यसनाधीन, तापट, आक्रस्ताळी, चिडखोर, सतत भांडणारी, छोट्या छोट्या गोष्टीत वाद घालणारी, आपण घरच्यांची मानसिकता बदलवू शकणार नाहीत म्हणून स्वतःवर वैतागलेली. सोबतच आर्थिक उदारीकरणामुळे आमच्या पिढीला लहान वयातच आर्थिक मिळकत आमच्या वडिलांच्या पिढीपेक्षा जास्त मिळायला लागली. याचासुद्धा त्रास बऱ्याच घरांमध्ये पालकांना होताना दिसतोय. मुलाच्या मिळकतीबरोबर स्वतःच्या मिळकतीची तुलना केली जातेय. ज्या निवृत्तीच्या वयात आमच्या वडिलांच्या पिढीनं कार घेतली, तीच कार माझ्या पिढीतल्यांनी अगदी सहज करिअरच्या सुरूवातीलाच सुलभ हप्यात विकत घेतली. त्यामुळे घरात एक प्रकारे तुलनात्मक स्पर्धा सुरू झाली. पण हीच ज्येष्ठ पिढी त्यांना मिळणाऱ्या भरघोस निवृत्ती वेतनाबद्दल एक चकार शब्द काढत नाही, पण मुलगा-सुनेला मिळणाऱ्या पगारावर तोंडसुख घ्यायला लागतात. या दुतोंडी वागण्यामुळे माझ्या पिढीतले बरेचजण चिडून बोलतात. भांडतात. हा स्वभावाचा भाग म्हणायचा की समोरच्याच्या दुटप्पी वागण्याला दिलेली प्रतिक्रिया म्हणायची!
अनुराधा आपटे ज्या पद्धतीनं वागते, ते काही एक प्रमाणात समर्थनीय आहे असं वाटतं. कारण विसाव्या शतकात पालक-पाल्य नातेसंबंध कसे असावेत, याचे आडाखे ठरलेले होते. आजही तेच आहेत. पण त्यात पैशांच्या उपलब्धतेमुळे मिळणाऱ्या सुखसुविधा आमच्या वडिलांच्या पिढीपेक्षा नक्कीच मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आमची पिढी सतत बदलणाऱ्या काळाबरोबर चटकन जुळवून घेणारी झाली आहे. तिला उर्वरित आयुष्य जगण्यासाठी बदलत्या काळाबरोबर जुळवून घेणं गरजेचं आहे. मागील पिढीचं आयुष्य संपल्यात जमा आहे. त्यांनी आहे त्या परिस्थितीत जुळवून घेऊन जगले तर घरात सुख नांदू शकेल, नाही तर त्यांना अनुराधासारख्या अडचणींना तोंड द्यावं लागेल असं वाटतं.
सिनेमात शेवटी नयनतारा त्यांच्या आत्मचरित्रात अनुराधा व तिचा भाऊ रोबिन्द्रो यांनीसुद्धा त्यांच्याबद्दल लिहावं असं सुचवतात, जेणेकरून त्यांची बाजू पण त्यात यावी. हा त्यांचा मोठेपणा व समजूतदारपणा झाला. आत्मचरित्र म्हणजे मीच माझी कहाणी माझ्याच दृष्टीकोनातून सांगणार असं व्हायला नको म्हणून. तसेच मुलांचं पालनपोषण करताना ज्या चुका झाल्या त्या सुधारता येणार नाहीत, निदान या निमित्तानं त्यावर फुंकर घालता येईल असा त्यांचा उद्देश असतो. नयनतारा लेखिका असल्यामुळे त्या त्रयस्थपणे त्यांच्या आयुष्याकडे बघू शकतात. त्यांना स्वतःचं परखड आत्मपरीक्षण करायचं आहे. त्या करू शकतात, पण आमच्या पिढीच्या पालकांचं काय? ते कधी असं स्वतःचं परखड आत्मपरीक्षण करणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहील असं वाटतंय.
*
वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
विवेक कुलकर्णी यांचं शिक्षण एमए इंग्लिश झालेले असून ते फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करतात. त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित आहेत - लातूर पॅटर्न (२०११), अनरउबिक (२०२०) व माधवराव एकंबीकर (२०१९). विवेक चित्रपट समीक्षक म्हणून दै. मराठवाडा नेता, दै. मी मराठी लाईव्ह, अक्षरनामा, वास्तव रूपवाणी, बहुविध व चित्राक्षरे या माध्यमांसाठी नियमितपणे लेखन करतात.