शाश्वत सचदेवचं चिरकाळ स्मरणात राहणारं पार्श्वसंगीत – उरी

uri-shashwat-sachadev-vivek-kulkarni-chitrakshare-film-review-in-marathi-background-score-a-r-rehman-r-d-berman

सिनेमातील पार्श्वसंगीताबद्दल ए. आर. रेहमान म्हणतात,
“काही सिनेमांमध्ये पार्श्वसंगीत हे वॉलपेपरसारखं असतं व इतरांमध्ये ते एक पात्र असतं.”
२०१८ मध्ये श्रीदेवी अभिनीत ‘मॉम’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारात उत्कृष्ठ पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाल्यावर ते बोलत होते.

https://www.youtube.com/watch?v=4BQ2q5jfItg
(मॉम पार्श्वसंगीत ज्युकबॉक्स)

हिंदी सिनेमाचा विचार केला तर लक्षात येईल पार्श्वसंगीताला फारसं महत्त्व दिलं जायचं नाही किंवा दिलं गेलं तरी ते गाणी, गाण्यांचं संगीत व कथानकात त्याचं अस्तित्व जाणवायचं नाही. एकुणात ते नसल्यासारखंच होतं. त्यामुळे जेव्हा रेहमान पार्श्वसंगीत हे पात्र असतं असं म्हणतात, तेव्हा ते नक्कीच आर. डी. बर्मनबद्दल बोलत असावेत असं वाटतं. पार्श्वसंगीतातला बाप असं आरडींना म्हटलं तर वावगं ठरू नये. आर. डी. नी खऱ्या अर्थानं पार्श्वसंगीत हे सिनेमाला इतर गोष्टींइतकंच महत्वाचं असतं हे त्यांच्या कामातून दाखवून दिलं. ‘शोले’ हे मोठं उदाहरण. शोलेचा टायटल ट्रक किंवा बसंतीच्या मागे दरोडेखोर लागतात तो प्रसंग असू दे. आरडीचं संगीत प्रसंगाला साजेसं.

सिनेमाला उठावदार करण्याचं काम किती महत्वाचं असतं हे शोले आणि दीवारमधील काम बघून लक्षात यावं. दीवारमध्ये विजयला शोधणारी पीटरची माणसं गोडाऊनमध्ये परत येतात. विजय तिथंच दरवाज्याजवळ बसून त्यांची वाट बघत असतो. तो ‘पीटर’ असा उच्चार करतो. कॅमेऱ्यासमोर असणारी पीटर व त्याची माणसं बाजूला होतात. दिग्दर्शक यश चोप्रा क्रॅश झूममध्ये आपल्याला विजयला दाखवतात. ‘पीटर’ नाव उच्चारायला उशीर, आरडींचं काम चालू होतं. उर्मट, मग्रूर चेहऱ्यानं बिडी डावीकडून उजवीकडे करणारा साधा गोदी कामगार विजय पीटर व साथीदारांना आव्हान देतो.        

https://www.dailymotion.com/video/x355lps
(दीवार गोडाऊन फाईट सीन)

वरील प्रसंग आपण शेकडो वेळा बघितला असेल. पण आरडींच्या पार्श्वसंगीतासाठी परत परत बघावासा वाटतो. का बघावासा वाटतो? असं काय खास आहे त्यांच्या संगीतात की आपल्याला तो प्रसंग व ते पार्श्वसंगीत आवडतं. यावर युट्युब चॅनल ‘एव्हरी फ्रेम अ पेंटिंग’चे टोनी जो ‘द मार्व्हल सिम्फोनिक युनिव्हर्स’ या व्हिडीओ निबंधात एक महत्वाचा मुद्दा मांडतात जो पार्श्वसंगीताचा प्रभावीपणा कशात आहे ते दर्शवतो. तो म्हणजे प्रेक्षकांनी द्यावयाचा भावनिक प्रतिसाद. जर भावनिक प्रतिसाद निर्माण होणार नसेल तर पार्श्वसंगीताचा उपयोग नाही. वर दीवारमधला गोडाऊन फाईट सीन दिला आहे. ते बघून नुसता विजयच पीटर व त्याच्या साथीदारांना मारणार नाही तर आपल्यातसुद्धा विजय संचारेल असं वाटतं. ते शक्य होतं ते आरडींच्या प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिसादाला चेतवणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे.

दिग्दर्शक पार्श्वसंगीताचा विचार पटकथेच्या पातळीवर करत असेल तर त्याचे परिणाम सिनेमात दिसून येतात. उदाहरणच द्यायचं तर उरी – द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमाचं देता येईल. शाश्वत सचदेवनं तयार केलेलं ‘उरी’चं पार्श्वसंगीत हे मुळातूनच ऐकण्यासारखं आहे. सिनेमा एकूण १३८ मिनिटांचा आहे. त्यात ४९:३२ मिनिटांचं पार्श्वसंगीत आहे. त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धरसाठी त्याचं महत्त्व किती असेल हे लक्षात यावं. ४९ मिनिटं वीस भागात विभागलेली आहेत. त्यांना नावं पण आहेत. जसे की ‘सेव्हन सिस्टर्स’, ‘स्पेशल फोर्सेस’, ‘गट्स’, ‘ग्लोरी’ इ. यातली ‘स्पेशल फोर्सेस’, ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’ हे भाग लक्षवेधी आहेत. ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’ सिनेमाच्या शेवटाकडे येतात तर ‘स्पेशल ‘फोर्सेस’ सुरूवातीला.

https://www.youtube.com/watch?v=xXnWzWPRY8U
(‘उरी’ पार्श्वसंगीत ज्युकबॉक्स)

शाश्वत सचदेवनं यासाठी बरीच मेहनत घेतलेली दिसून येते. त्यानं खास बर्लिनला जाऊन ऑर्केस्ट्रल पीसेस तयार केले आणि व्हिएन्नामध्ये रेकॉर्ड केले. त्यामुळे पार्श्वसंगीतात भव्यता दिसून येते ती ऑर्केस्ट्रल पीसेसमुळे. ऑर्केस्ट्रल पीसेसमुळे संगीत फक्त साऊंड डिझाईन न राहता ते स्वतंत्र संगीत होतं. त्यातनं हार्मनी, मेलडी तयार होते. तसेच पार्श्वसंगीत हे व्हिज्युअल्सला उठावदार करणारं असावं असं शाश्वत म्हणतो. तसेच त्यातनं भावनिक प्रतिसाद निर्माण होणं गरजेचं आहे. उरीचं पार्श्वसंगीत ऐकताना असाच भावनिक प्रतिसाद तयार होतो.

सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या सैनिकांचं वीरश्रीपूर्ण काम जसं पडद्यावर दिग्दर्शक आदित्य धर दाखवतात, तसंच किंवा त्याच्यापेक्षा मोठं काम शाश्वत पार्श्वसंगीतातून करतो. ‘स्पेशल फोर्सेस’ हा सुरुवातीला येणारा पीस ऐकावा. स्पेशल फोर्सेसचं स्पेशल काम किती महत्वाचं आहे ते पायानं ताल धरायला लावणाऱ्या संगीतानं तो करतो. त्यामुळे सैनिकांमध्ये असणारी राष्ट्रभावना प्रेक्षकातसुद्धा परावर्तीत होते. त्यांच्यात राष्ट्रभावना निर्माण होते. सिनेमाला मिळालेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादात शाश्वतचा मोठा हात आहे.

यासाठी त्यानं सिंथेसायझर्स व मोड्युलर सिंथेसायझरचा वापर कसा केला असं एका मुलाखतीत सांगितलं. ‘द सर्जिकल स्ट्राईक’ हा असाच एक पीस. सर्जिकल स्ट्राईक होताना वाजणारा हा पीस चार मिनिटांचा आहे. त्यात भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी प्रेक्षकात वीरश्री संचार करणारी ठरते. शेवटाकडे येणारे ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’ हे दोन छोटे पीसेस तर उरीचा कळसाध्याय आहेत. ते मुळातूनच ऐकावेत.

झी म्युझीक कंपनीनं पार्श्वसंगीताचा ज्युकबॉक्स अपलोड करून एक चांगला पायंडा पाडला आहे. या निमित्तानं रेहमान, आर. डी. बर्मन व इतर संगीतकारांच्या सिनेमांच्या पार्श्वसंगीताचे ज्युकबॉक्स अपलोड व्हावेत. सिनेप्रेमींना त्यांचा आस्वाद केव्हाही घेता येईल. उरीसाठी शाश्वतला उत्कृष्ठ पार्श्वसंगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

शाश्वतच्या कामाचं कौतुक झालं असलं तरी अजून एक संगीतकार जोडी सचिन-जिगर (शुद्ध देसी रोमान्स, राबता) म्हणतात, “पार्श्वसंगीत हे थँक्सलेस जॉब आहे.” ते म्हणतात निर्माता-दिग्दर्शकांना पार्श्वसंगीताचं महत्वंच कळत नाही. ते काय करतात की सिनेमाचं फुटेज आणून देतात म्हणतात तुम्हाला जसं वाटेल तसं संगीत तयार करा. त्यामुळे आमचं काम अवघड होतं असं ते म्हणतात. दिग्दर्शकानं पार्श्वसंगीतात काय हवं, काय नको हे सांगणं गरजेचं आहे. निव्वळ सिनेमाचं फुटेज दिल्यानं काम होत नाही. काही एक प्रमाणात हे खरं आहे. बऱ्याच कथानकांमध्ये पार्श्वसंगीताची गरज असताना तिथं ते नसतं हे जाणवतं. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भावनिक प्रतिसाद निर्माण होत नाही.

एका अर्थानं कथानक चिरकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणं अपेक्षित असेल तर पार्श्वसंगीत असणं तितकंच गरजेचं आहे. उरी पुढील काळात प्रेक्षकांच्या स्मरणातून निघून जाणार नाही इतकं काम शाश्वत सचदेवनं करून ठेवलंय.

*

वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा


Content Writer at Freelance | Website | + posts

विवेक कुलकर्णी यांचं शिक्षण एमए इंग्लिश झालेले असून ते फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करतात. त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित आहेत - लातूर पॅटर्न (२०११), अनरउबिक (२०२०) व माधवराव एकंबीकर (२०१९). विवेक चित्रपट समीक्षक म्हणून दै. मराठवाडा नेता, दै. मी मराठी लाईव्ह, अक्षरनामा, वास्तव रूपवाणी, बहुविध व चित्राक्षरे या माध्यमांसाठी नियमितपणे लेखन करतात.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :