एका संस्थेसारख्या वाटणाऱ्या इमारतीत प्रोटॅगनिस्ट माहिती गोळा करण्यासाठी जातो. तिथं त्याला कळतं की तिसरं महायुद्ध चालू झालंय पण वर्तमानकाळात नाही तर भविष्यातल्या लोकांमुळे. त्यासाठी काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं असतं. तिथली एक वैज्ञानिक त्याला एक प्रात्यक्षिक करायला लावते. त्याला असं का झालं याचं उत्तर मिळतं, कारण एका मिशनमध्ये त्यानं व्युत्क्रम (inversion) थोडक्यात उलट्या क्रमात गोष्टी प्रवास करतायत (इथं बंदुकीतल्या गोळ्या) हे अनुभवलेलं असतं. हा प्रसंग नायकासहित प्रेक्षकांना सिनेमात काय घडणारे याची बेसिक आयडिया सांगतो. पण त्यामुळे समोर दिसणारं कथानक पूर्णपणे उलगडलं आहे असं होत नाही. त्यासाठी संपूर्ण सिनेमा खूप लक्षपूर्वक पहावा लागतो.
युक्रेनच्या किएव्हमध्ये प्रोटॅगनिस्ट (जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) एका अंडरकव्हर ऑपरेशनमध्ये भाग घेतो. तिथं त्याला बंदुकीतल्या गोळ्या उलट्या क्रमानं जाताना पहिल्यांदा बघायला मिळतात. पण मर्सिनरीजकडून तो पकडला जातो. त्याचा छळ होतो. आपल्या सहकाऱ्यांची नावं सांगायची नाही म्हणून तो सायनाइड कॅप्सूल खातो पण वाचतो. ती कॅप्सूल खोटी असते. ते एक टेस्ट असतं ज्यात तो पास होतो. त्याला एका टेनेट नावाच्या संघटनेतर्फे काम दिलं जातं. तिथं त्याला बंदुकीतल्या गोळ्या उलट्या क्रमानं प्रवास करू शकतात हे कळतं.
वरील परिच्छेद फक्त सिनेमाच्या सुरूवातीला काय होतं याचं थोडक्यात वर्णन आहे. सिनेमा त्यानंतर वेगळ्या पातळीवर जातो. वेगळ्या पातळीवर जातो हे म्हणण्यापूर्वी ‘स्पाय थ्रिलर्स’ हा जॉनर काय आहे ते समजून घ्यावं लागेल. कारण टेनेट हा स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. स्पाय थ्रिलरमधल सर्वात परिचीत सिनेमे म्हणजे जेम्स बॉंडचे. यात एमआय ६ कडून जेम्स बॉंडला एक अवघड काम सोपवलं जातं व तो ते जीवावर उदार होऊन लीलया पूर्ण करतो. त्यासाठी तो विविध गॅजेट्स, हत्यारं वापरतो. खलनायकाचा निप्पात करतो. सुखरूप परत येतो. ख्रिस्तफर नोलन हाच पारंपारिक फॉर्म्युला घेतो व त्यात त्याला आवडणारी विज्ञानातील संकल्पना पेरतो. ही संकल्पना त्या कथेचा केंद्रबिंदू असते व तिच्या भोवती कथानक फिरतं. बरं, नुसतं केंद्रबिंदू न राहता त्या संकल्पनेचं प्रात्यक्षिक म्हणजे पडद्यावरील कथानक. उदा. वर्महोलमधून प्रवास करता येतो अशी एका शास्त्रीय धारणा आहे. इंटरस्टेलर सिनेमात कुपर व मंडळी प्रत्यक्ष त्याचे परिणाम वागवून तो प्रवास करून दाखवतात. ते प्रेक्षकांना फिजिकली पडद्यावर दिसतं. त्यांना ते अनुभवता येतं. नोलन हा पारंपारिक कथेत कागदोपत्री असणारी संकल्पना घेऊन त्याला मूर्त रूप देतो.
टेनेटमध्ये अशाच एका वैज्ञानिक संकल्पनेचा वापर आहे. ती संकल्पना म्हणजे एन्ट्रॉपी. त्यामुळे बंदुकीतल्या गोळ्यांचा व्युत्क्रम हा एन्ट्रॉपीमुळे साध्य होतो. तसेच भविष्यातील वैज्ञानिकांनी ते साध्य करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं असतं. त्यांनी त्याचा वापर करून एक प्रकारे तिसरं महायुद्ध सुरु केलेलं असतं. यासाठी नोलननं परत एकदा थिअरेटिकल फिजिसिस्ट किप थॉर्नची मदत घेतली म्हणे. इंटरस्टेलर वेळेससुद्धा त्यांनीच त्याला मदत केली होती. पण नोलन जेव्हा ही संकल्पना पडद्यावर दाखवतो तेव्हा ते पाहणं मात्र चित्तचक्षुचमत्कारिक अनुभव असतो. हा सिनेमासुद्धा असाच आहे. सिनेमाचा नायक जगात विविध ठिकाणी एका रशियन ऑल्गार्क आंद्रे सॅटॉरच्या (केनेथ ब्रॅना) शोधात असतो. त्याला शोधून काढून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची असतात.
नोलनची पटकथा स्पाय थ्रिलर जॉनरमधील जवळपास सर्व वैशिष्टयं वापरते. या सिनेमांमध्ये हाणामारी बरीच असते. बऱ्याचदा ती नायकाच्या जीवावर बेतलेली असते. इथे सुद्धा ‘प्रोटॅगनिस्ट’ सीआयएचा एजंट असल्यामुळे हाणामारीसाठी नेहमीच सज्ज असतो. सिनेमात हाणामारी व अॅक्शन सिक्वेन्सेस आहेत. त्यातील दोन महत्त्वाचे प्रसंग आहेत. एक ऑस्लो विमानतळावरील बोईंग विमानाचा वापर करून एका बिल्डींगमधून बाहेर पडणे. हा प्रसंग जॉन वूच्या फेस ऑफची मोठी आवृत्ती आहे. फेस ऑफमध्ये एका हँगरमध्ये एक चार्टर्ड प्लेन घुसतं. तर इथे फ्रीपोर्ट या बिल्डींगच्या पाठीमागच्या बाजूस सोन्याच्या विटा नेणाऱ्या बोईंग विमानाचा वापर आहे. नोलनने प्रत्यक्ष एक बोईंग ७४७ विमान त्यासाठी वापरलं म्हणतात. नोलनचा व्हीएफएक्स व मिनिएचर सेट्सचा वापर न करणं प्रेक्षकांना प्रत्यक्षतेची अनुभूती देतं. इथे सुद्धा विविध कॅमेरा अँगल्स द्वारे ते विमान बिल्डींगमध्ये शिरताना दिसतं. याचा अर्थ त्याने व्हीएफएक्स वापरलेच नाहीत असं नाही.
दुसरा प्रसंग आहे हायवे चेस सिक्वेन्स ज्यात लिनिअर मोशनमध्ये गाड्यांचा चेस दिसतो तर काही वेळाने उलट्या क्रमाने. त्याचं चित्रीकरण प्रत्यक्ष एका हायवेवर केलं म्हणे. तसेच चित्रीकरण करताना गाड्यांचे फॉरवर्ड व बॅकवर्ड मोशन दिसणं गरजेचं होतं जे विविध साधनांद्वारे व व्हीएफएक्सचा वापर करून केलं असणारे हे नक्की. कारण तो चेस प्रत्यक्ष बघताना बंदुकीतल्या गोळ्या जश्या प्रत्यक्ष उलटा प्रवास करताना दिसतात तसंच इथे कार्स उलट्या क्रमाने प्रवास करताना दिसतात.
नोलनच्या तांत्रिक बाजू नेहमीच उच्च श्रेणीतल्या असतात. त्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जातो. वरील बोईंग ७४७ चं उदाहरण पुरेसं आहे. पण निव्वळ तांत्रिक श्रेणी उत्तम असून जमत नाही ती प्रत्यक्ष पडद्यावर दिसण्यासाठी तसा सिनेमॅटोग्राफर सोबत असणं गरजेचं आहे. होयटे व्हॅन होयटेमा नोलनच्या व्हिजनला पडद्यावर आकार देतात. अगदी एका साध्या एरिअल शॉटमध्ये मुंबईचं एक आगळच दर्शन ते घडवतात. संगीतकार हान्स झिमर यावेळी नोलनसोबत नसले तरी त्यांची उणीव लुडविग गोरानसन भासू देत नाहीत. याचं पार्श्वसंगीत हे नोलनच्या इतर सिनेमांच्या पार्श्वसंगीतासारखं श्रवणीय व व्हिज्युअल्सला उठावदार करणारं.
अशा सिनेमातील अभिनयाबद्दल खरंतर बोललं जाऊ नये. कारण नोलनसारखा दिग्दर्शक एखाद्या अभिनेत्याला निवडतो म्हणजे तो चोख काम करणार हे अध्याहृत असतं. इथे पण तसंच आहे. जॉन डेव्हिड वॉशिंग्टन ते एकाच प्रसंगात दिसणारे मायकल केनपर्यंत सर्व मंडळी चोख काम करतात.
नोलन हा मोठं व्हिजन असणारा दिग्दर्शक. त्यासाठी तो एकाचवेळी दोन डगरींवर पाय ठेवताना दिसतो. व्यावसायिक सिनेमांमध्ये जॉनर फिल्म्स ह्या विशिष्ट विषय व कथानक मांडतात. तर वैज्ञानिक संकल्पना या फक्त साय-फाय सिनेमात दिसणाऱ्या. नोलन या दोन्हींचं मिश्रण करत आलाय. तसेच त्याची विषयवस्तूकडे बघण्याची नजर कथानकाला भव्यता आणून देते. विज्ञानातील किचकट वाटणाऱ्या संकल्पना व्हिज्युअल्स व कथेच्या पातळीवर आणून प्रेक्षकांना त्यात सामील करून घेतो. त्यामुळे तो एकाचवेळी व्यावसायिक व कलात्मक यातील दरी कमी करून टाकतोय असं दिसतं. टेनेट त्याच्या इतर सिनेमांसारखाच याला अपवाद नसणारा.
*
एन्ट्रॉपीबद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
https://marathivishwakosh.org/17335
*
वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
विवेक कुलकर्णी यांचं शिक्षण एमए इंग्लिश झालेले असून ते फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करतात. त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित आहेत - लातूर पॅटर्न (२०११), अनरउबिक (२०२०) व माधवराव एकंबीकर (२०१९). विवेक चित्रपट समीक्षक म्हणून दै. मराठवाडा नेता, दै. मी मराठी लाईव्ह, अक्षरनामा, वास्तव रूपवाणी, बहुविध व चित्राक्षरे या माध्यमांसाठी नियमितपणे लेखन करतात.