“… Y’know they’re schemers. Schemers trying to control their little worlds. I try to show the schemers how pathetic their attempts to control things really are. So when I say that you and your girlfriend was nothing personal, you know I’m telling the truth. It’s the schemers that put you where you are. You were a schemer, you had plans, and, uh, look where that got you. I just did what I do best. I took your little plan, and I turned it on itself. Look what I did to this city with a few drums of gas and a couple of bullets, hmm? You know what I noticed? Nobody panics when things go according to plan. Even when the plan is horrifying. If tomorrow I told the press that, like, a gang-banger would get shot, or a truckload of soldiers will be blown up, nobody panics. Because it’s all part of the plan. But when I say that one little old mayor will die, well then everybody loses their minds! Introduce a little anarchy. Upset the established order and everything becomes chaos. I’m an agent of chaos. Oh, and you know the thing about chaos?… It’s fair.”
हा संवाद आहे ‘द डार्क नाईट’ मधील जोकर आणि हार्वी डेंटच्या दरम्यानचा जेव्हा जोकर त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा. सिनेमातील सर्वात महत्वाचा. जोकरची मानसिकता व त्याची गॉथम शहरातील जनजीवन विस्कळीत करण्याची मनिषा वगैरे बाबींवर हा सीन प्रकाश टाकतो. या संवादानंतर सिनेमाला मोठं वळण मिळतं. पण जोकर जसा यात दाखवलाय तो नेमका तसा कधी व का झाला, याचं उत्तर मात्र त्यात नाही. एक मनोरुग्ण खलनायक का झाला हे त्यात दाखवलं जात नाही. त्यासाठी टॉड फिलिप्स दिग्दर्शित ‘जोकर’ बघावा लागेल. दोन्ही सिनेमात जोकर व ब्रूस वेन सोडले तर साधर्म्य तसे कमीच आहे. तसेच काळसुद्धा वेगळा आहे. नोलनच्या विश्वात जोकर आणि बॅटमॅन एकाच वयाचे वाटतात; तर जोकरमध्ये ब्रूस वेन शाळकरी मुलगा आहे जो पुढे जाऊन बॅटमॅन होईल असं गृहीत धरलेलं असावं, तर जोकर किमान पस्तीशी ओलांडलेला आहे. दोन्हीत फरक असला तरी हा डार्क नाईटचाच स्पीन ऑफ वाटतो. जोकरचं आयुष्य व त्याच्या आसपासची परिस्थिती तपशिलात उभी केली आहे. त्याच्या वागण्याची कारणमीमांसा सांगितली आहे. त्याची गडद पार्श्वभूमी दाखवली आहे. एखाद्या गुन्हेगाराचं मोठं होणं हे समाजाच्या अनागोंदीकडे लक्ष वेधणारं असतं. त्याशिवाय एखादी सर्वसामान्य व्यक्ती गुन्हेगार होऊच शकत नाही. जोकर त्याचं उत्तम उदाहरण. आणि कॉमिक बुक अॅडाप्टेशनमधील ‘द डार्क नाईट’ नंतरचं सर्वोत्तम.
कॉमिक बुक किंवा सिनेमात हे वाचायला किंवा बघायला काहीच वाटत नाही, कारण आपण तटस्थ भूमिकेत असतो. पण प्रत्यक्षात एखादी मोठी गुन्हेगार व्यक्ती जेव्हा मोठ्या प्रमाणात नरसंहार करते तेव्हा आपण ते तटस्थपणे बघू शकतो का? मला याचं उत्तर ‘नाही’ असं द्यावसं वाटतं. विसाव्या शतकात जागतिक स्तरावर मुस्लिमांचा हिरो ठरलेला ओसामा बिन लादेन मला जोकरसारखाच वाटतो. ते का? तर ओसामा हा अमेरिकेनं तयार केलेल्या परिस्थितीची पैदाइश आहे. सत्तरच्या दशकापर्यंत जगात अर्थव्यवस्था कशावर चालणार आहे हे स्पष्ट झालं होतं, ते म्हणजे खनिज तेल. पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवैत सारख्या देशांमधे ते मुबलक प्रमाणात आहे तर त्यांच्यावर सत्ता ज्यांची असेल त्यांना ते मोठ्या प्रमाणात मिळेल असा संदेश परिस्थितीनं दिला होतं. याचं महत्त्व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंड व जर्मनीतील अनुक्रमे दोन्ही नेते विन्स्टन चर्चिल व अडॉल्फ हिटलर यांना कळलं होतं. पण युद्धाच्या वातावरणामुळे असेल किंवा एकूणच त्याचं भविष्यातील महत्त्व लक्षात न आल्यामुळे असेल, इंग्लंडच्या पश्चिम आशियात वसाहती असूनसुद्धा त्यांनी त्याबबीत काहीही केलं नाही. तर हिटलरला ते जमलं नाही. पण युद्धात प्रत्यक्ष भाग न घेतलेल्या अमेरिकेला मात्र त्याचं महत्त्व कळलं होतं. महायुद्ध संपल्यावर अर्थव्यवस्था बळकट होणार असेल तर खनिज तेलाशिवाय पर्याय नाही हे ओळखून अमेरिकेनं आपले हातपाय पश्चिम आशियात पसरायला सुरु केलं. त्यातच अमेरिकन तेल कंपन्यांना तिथले कंत्राट मिळण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू होते. रॉकफेलरच्या स्टॅंडर्ड ऑइल कंपनीची शकलं पडून असंख्य कंपन्या निर्माण झाल्या होत्या. अमेरिकन नेत्यांना हाताशी धरून त्यांनी पश्चिम आशियात तेलातला वाटा पिण्याच्या स्पर्धेत उड्या मारल्या होत्या.
अमेरिकेला समृद्धीच्या पातळीवर न्यावं म्हणून अमेरिकन सरकार व सीआयएसारख्या संस्था प्रत्यक्ष सरकार उलथवून टाकण्यासाठी पुढंमागं बघत नव्हत्या. त्यांना दुसरी भीती अशी होती की आपण जर या स्पर्धेत मागं राहिलो तर तिकडं रशिया, पर्यायानं कम्युनिस्ट, तेलावर ताबा मिळवून जगावर राज्य करेल. या भीतीपोटी, मिळतील त्या मुस्लीम संघटनांना प्रोत्साहन द्यायचा कार्यक्रम अमेरिकेनं आखला. शीतयुद्धाचा तो काळ असल्यामुळे अमेरिकेला कसल्याही परिस्थितीत रशियावर कुरघोडी करायची होती. त्यासाठी त्यांनी असंख्य आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवले. शेवटी सत्तरच्या दशकाच्या सुरू झालेल्या व दहा वर्षं चाललेल्या रशिया-अफगाण युद्धात खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दहशतवादाला पोषक असं वातावरण अमेरिकेनं निर्माण केलं. यात मुस्लीम दहशतवाद मोठ्या प्रमाणात तयार झाला. ओसामा बिन लादेनच्या ‘मक्ताब अल खिदमत’ संघटनेची स्थापना त्याच काळात झालेली. पुढं त्यानं ‘अल कायदा’ची निर्मिती केली. १९८९ साली रशियानं अफगाणीस्थानातून माघार घेतली. तोपर्यंत दहा वर्षं सीआयएच्या पैशांवर पोसलेल्या मुजाहिद्दीनांना एकदम पोरकं वाटू लागलं. पोकळी निर्माण झाली त्यांच्या आयुष्यात. पुढं काय करावं माहिती नव्हतं. त्यातच ओसामा बिन लादेननं अमेरिकेविरुद्ध व जिथं जिथं इस्लाम धर्म धोक्यात आहे तिथं तिथं जिहाद करण्याचे आदेश दिले. त्याचाच पहिला भाग म्हणून १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिला हल्ला झाला. पुढं आठच वर्षांनी २००१ मध्ये ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले. दहा वर्षांनी तर लादेनचा खात्मा करण्यात आला.
ओसामा बिन लादेन लहानपणापासून धर्मांध होता. त्याच्या धार्मिक महत्त्वाकांक्षांना अमेरिकेनं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खतपाणी घातलं. तशी परिस्थितीच तयार केली. त्यामुळे तो अधिकाधिक अनिर्बंधपणे फोफावत गेला. जोकरमध्ये गॉथममधील सामाजिक अनागोंदीमुळे आर्थर फ्लेक मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडं ओढला गेला. एका अर्थानं, जोकर आणि ओसामा परिस्थितीचे बळी म्हणता येतील. जोकरबद्दल सहानुभूती वाटू शकते, ते त्याच्या मनोरूग्ण असण्यामुळे. मनोरूग्णांबद्दल अनुकंपा असते समाजात, त्यामुळेच असेल. जेव्हा सिनेमात आर्थर फ्लेक एकदाचं ठरवतो की जोकर बनूनच राहायचं, तेव्हा त्यानं केलेल्या कृत्यांना प्रेक्षक उत्स्फुर्तपणे आणि भरभरून प्रतिसाद देत होते. ओसामा बिन लादेननं ट्वीन टॉवर्सवर हल्ला केल्यावर मुस्लिम जगताकडून त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. त्यामुळे, जोकर पडद्यावरील ओसामा बिन लादेनचंच एक रूप आहे असं म्हणून बघता येतं. जोकरला अनुसरणारे तोंडावर जोकरचा मास्क घालून शहरात दंगे करतात. ओसामा जरी मारला गेला असला तरी त्यानं निर्माण केलेल्या पायवाटेवर आज असंख्य छोट्या-मोठ्या संघटना मार्गक्रमण करीत आहेत. हा अमेरिकेच्याच विसाव्या शतकातल्या क्षुद्र राजकीय बुद्धीचा परिपाक आहे, जो आज समस्त जगाला भोगायला लागत आहे. त्यामुळे, अमेरिका आणि गॉथम शहर यात तत्वतः काहीच फरक नाही. योगायोग म्हणजे सिनेमातील गॉथम शहर दाखवण्यासाठी टॉड फिलिप्सनी न्यू यॉर्क शहराचीच पार्श्वभूमी वापरली आहे.
जोकर सिनेमा एकीकडं एका मनोरुग्णाची कथा सांगत असला तरी तो नजीकच्या इतिहासात घडलेल्या समकालीन वास्तवावर अचूक बोट ठेवतो. त्यासाठीच लेखाच्या सुरूवातीला दिलेला संवाद सामाजिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या लोकांचा प्रातिनिधिक जाहीरनामा आहे, असं म्हणूनही त्याकडे बघता येईल.
(पूर्वप्रसिद्धी : बहुविध.कॉम)
*
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!