महाडचे दिवस ६५: रिंगण

संध्याकाळ दाटत आलेली. मोकाशीसाहेब ते जेइ होते तेव्हाच्या आठवणी सांगत होते. ते म्हणाले,
“आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेतो ते पूर्णपणे अकॅडमीक असतं. नोकरी अगर व्यवसायात पडतो तेव्हा व्यवहारात कसं वागावं, हे शिक्षण मिळतच नाही. वरिष्ठांशी कसे संबंध ठेवावेत, आपली कर्तव्य काय आणि हक्क काय आहेत, याची जाणीव करून देण्याचं काम हे शिक्षण करतच नाही. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर लोक आपल्याला प्रलोभनं दाखवतात तेव्हा आपलं स्वत्व कसं जपावं, हे आपलं आपल्यालाच ठरवावं लागतं. सहवासात येणारी माणसं ही बेसिकली माणसंच असतात. आपली काळजी, मोह आणि असं करू का तसं करू, हे गोंधळ त्यांचेही असतात. आपल्या इंजिनियर्सबाबत मी एक विनोद ऐकला होता,
स्वर्गामध्ये देव असतात तर नरकात राक्षस. पुराणात वर्णन केल्याप्रमाणं त्यांच्यात सारखं वैर नसावं, अशी भावना त्यांच्यात निर्माण झालेली असते. स्वर्ग आणि नरक यामध्ये दळणवळण राहावं म्हणून दोन्हीच्या दरम्यान पूल बांधायचं ठरतं. यासाठी तांत्रिक कुशलता असणारे इंजिनियर लागणार म्हणून देवामधला एकजण म्हणतो की, आपण असं करूया स्वर्ग आणि नरकातले काही इंजिनियर या कामावर नेमू. सगळ्यांना कल्पना पसंत पडते. जेव्हा ते यादी करायला सुरवात करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की स्वर्गात इंजिनियरच नाहीत, आहेत ते सगळे नरकात.”
या विनोदावर चव्हाण, मी किंवा साहेबही हसले नाहीत मात्र अशोक बराचवेळ हसत होता. त्याच्याकडं बोट दाखवून साहेब म्हणाले,
“बघा, सामान्य माणसात इंजिनीयरची काय प्रतिमा आहे. ही प्रतिमा आपणच आपल्या वागण्यातून निर्माण केलीये. हे बदलायचं असेल तर आपलं वर्तन आपण सन्माननीय राखायला हवं. काही अपवाद सोडले तर मेडिकल प्रोफेशनमधील डॉक्टरांबाबत लोकं सहसा असा विचार करत नाहीत. लोकांच्या मनात डॉक्टरांबद्दल आदर असतो. आपलं तसं का होत नाही? आपण स्वतःवर प्रेम करतो पण देशावर नाही. हे देशप्रेम कॉलेजात शिकवत नाहीत. देशप्रेम ही शिकवून येणारी गोष्टच नाही. ते कळत्या वयात तयार व्हायला हवं आणि जाणीवपूर्वक वाढवायला हवं.
मघाशी तुम्हाला हक्काविषयी बोललो. माझी नोकरी सात-आठ वर्ष झाली असेल. एका साईटवर मी पायी निघालो होतो. साईट चार-साडेचार मैल लांब होती आणि घाटरस्ता होता. माझ्या शेजारून आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीयरची सरकारी कार गेली. काच खाली असल्यानं साहेबांनी मला बघितलं होतं तरीही ते तसेच आमच्या साईटवर माझी दखल न घेता गेले. तासाभरानं मी साईटवर पोहचलो आणि कार्बन घातलेला तीन प्रतीतला अर्ज त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी विचारलं, ‘काय आहे हे?’ मी शांतपणे सांगितलं, आता तुम्ही मला बघून न बघितल्यासारखं करत मला न घेता गेलात त्याची तक्रार सर्कल ऑफिसला करणारं पत्र आहे. यात मी मागणी केलीये की साहेबांच्या लॉगबुकची तपासणी व्हावी कारण यातल्या नोंदी खोट्या आहेत, असं मला वाटतं. मी याचा पाठपुरावा केला आणि दिलगिरीचं पत्र त्यांच्याकडून घेतलं. त्यांनी ते देताच मी ते त्यांच्यासमोरच फाडून टाकलं. पुढे आमचे संबंध सामान्य झाले. झालं-गेलं आम्ही दोघंही विसरून गेलो.”
साहेब थोडं थांबले तेव्हा मी त्यांना जाहिरात दाखवली. ते म्हणाले,
“अर्ज करा, इंटरव्ह्यूला जा आणि सिलेक्शन झालं तर माझ्याकडं पेणला या. आपण ठरवू पुढं काय करायचं आणि त्या आधीदेखील तुम्हाला पेणला यावं लागेल. शिफारस पत्र मला टाईप करून घ्यावं लागेल आणि त्यावर आऊटवर्ड नंबरसुद्धा घ्यावा लागेल.”

दोन कातकरी केरसुणी घेऊन आले. त्यांनी अंगण लख्ख केलं. पेट्रोमॅक्स पेटवली. मी अशोकडं पाहिलं तर तो हसत होता. कातकरी खोलीत गेले. बाहेर आले तेव्हा एरवी लंगोटीमध्ये असणारे ते धोतर आणि बंडी घालून उभे होते. एकजण म्हणाला,
“साहेबानू, जेवण करून घे. आमची मंडळी याला लागलीत.”

आमचं जेवण होत आलं असताना काही वेळातच अंगणात गलका वाढला. सहा-सात कातकरी आणि तितक्याच त्यांच्यातल्या बायका सणासुदीला घालतात तसे कपडे घालून आमची वाट बघत उभ्या होत्या. साहेब येताच ओळीनं सगळे त्यांच्या पाया पडले. कुठल्यातरी देवाचा मुखवटा आणि बत्ती मध्ये ठेवून त्याभोवती गोल करून उभे राहिले. एक ताशा आणि डालडाचे डबे हातानं आणि काठीनं घुमायला लागले. रिंगण लय पकडत फिरायला लागलं. पुरुषांच्या गळ्यात फुलांचे हार आणि त्याच फुलांच्या वेण्या आणि पानं बायकांच्या केसात माळलेली. पुरुषांच्या हातात कडं तर बायकांच्या हातात हिरव्या, निळ्या बांगड्या. बत्तीच्या उजेडात त्यांच्या चेहऱ्यावर तुकतुकीत काळा रंग उजळून दिसत होता.

एकजण सूत्रधाराच्या भूमिकेत तर दुसरा कोरिओग्राफरच्या. सूत्रधार चार ओळीचं निवेदन करायचा आणि दुसरा त्या त्या गाण्यावर कुठल्या स्टेप घ्यायच्या, ते मिनिटभरात समजून सांगायचा. तालवाद्य आणि तुतारीसारखं वाद्य वाजायला लागलं. पुरुष आणि बायका रिंगणात एक आड एक उभं राहून लयीला उठाव देत नाचायला लागले आणि समूहानं गायला लागले.

सूत्रधार: “सायबानू, पहिलं आपून बाप्पाला नमन करू आन् त्याचं आशीरवाद घेऊ.
शिरी पासूनी गन नमेला रे, शिरी पासून गन नमेला रे |
उंदरावर बसूनी गणपती आला रे, उंदरावर बसूनी गणपती आला रे ||”

अशोकनं धूप जाळून वातावरण निर्मिती केली.

सूत्रधार: “गणपती नमन झालं. नवरीचा बाप जावयाला मानाचा हंडा द्यायला म्हनून आत्ताशी पैसे कमवाय कामाला गेलाय तर पोरगी हुरळली.
वटान्याचा गोल दाना ,पोरी उरू नको टना टना |
नवरीचा बापूस गेला कामाला, तिकरून आनला हंडा मानाला ||

बारा वर्षाच्या पोरीला जवळ घेत तिची आई समजावत होती.

सूत्रधार: “लगीन दारी नवरा मुलगा आला आन् गावातली समदी त्याला बघाया गोळा झाली.
पार्वतीचे देवलान बाला रं जानोशा येशी |
हे गावाचं पोरे बालाला पाह्याला येती ||
पाह्याला येती बालाचं मेव्हन होती |
हे गावाच्या पोरी बालाला पाह्याला येती |
पाह्याला येती बालाच्या मेव्हन्या होती ||

पोरं आणि पोरी खिडकीतून डोकवायचा अभिनय करत होती.

सूत्रधार: “नवरा मांडवात आला. त्याचा स्वागत कसा झाला?
नवरदेव आला पाव्हन्या, काय काय बस्तर केला |
पाना फुला भरला थाला, आग्र मान केला |
सुवरनाची गादी आथरली, वर आथरला शेला |
” 

भाताच्या तुसाच्या पिवळ्या बसकरावर एकजण ऐटीत बसला.
त्यानंतर सासू-सून, नणंद-भावजया यांची भांडण, त्यावरून टोमणे आणि त्याचवेळी सुनेची सासऱ्यानं आणि वहिनीची दिरानं केलेली पाठराखण असलेल्या गाण्यांनी धमाल उडवून दिली.

तासाभराचा कार्यक्रम संपला. साहेबांनी प्रत्येकाला रुपया रुपया देऊन त्यांचा सन्मान केला. साहेब रहातो म्हणाले होते पण रात्री उशिरा ते महाडला गेले.

शनिवार मंडळातील गाण्यांनी आणि आजच्या रांगड्या गाण्यांनी जे समाधान दिलं होतं, त्याची तुलना कशाशीच नव्हती. आता अजिबात महाडला न जाता इथल्या कामाला जोर लावायचा, असं मी ठरवलं होतं पण…

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :