आजी गेल्यानंतर नारायणपेठेतून आम्ही पौडफाट्यावर रहायला आलो होतो. मला या कारणानं आणि आजी नसल्यानं या नव्या जागेत मोकळेपणा वाटत नव्हता. गौरी आणि केतकी मात्र चांगल्या रुळल्यासारख्या वाटत होत्या. मुख्य म्हणजे आईची देहबोली बदलली होती. ‘घरातली नवखी सून’ ही तेवीस वर्ष संसार केल्यानंतरची ओळख आता ‘घरातील कर्ती स्त्री’ अशी झाली होती. दोन दिवसात चारवेळा मी वाड्यात जाऊन आलो. पौडफाट्यावरचा पानवाला मला पचनी पडत नव्हता. बर्वेकाकुंच्या अन्नाची चव मी वाडा किंवा नातं या गावात विसरलो होतो, ती मला पुन्हा घरी मिळाली.
गौरीची नवी मैत्रीण घरी आली होती. तिला गौरी म्हणाली,
“भाग्यश्री, तुझा तो ‘जक्कल’ अनुभव विनयला सांग ना.”
मी विचारलं, “कोण जक्कल?”
भाग्यश्रीनं माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहिलं. तेव्हा गौरी म्हणाली,
“अगं, तो सर्व्हे करण्यासाठी खेडेगावात असतो ना, त्यामुळं त्याला काहीच माहिती नाही. विनय, पुण्यात जे खून होत होते ते खून करणारा पकडला गेलाय. त्याचं नाव जक्कल.”
भाग्यश्रीने जे सांगितलं ते खूप तुटक होतं. त्यातून आकाराला आलेला अनुभव असा होता,
ही मुलगी अभिनव कला महाविद्यालयात शिकत होती. फावल्या वेळात मुलामुलींचं टोळकं कट्ट्यावर गप्पा मारत बसायचं. संध्याकाळचे साडेसात वाजून गेले तेव्हा ही म्हणाली की, मला घरी जायला हवं. हे खून होतायेत त्यामुळं आई काळजी करत बसते. त्यावर तिचा मित्र म्हणाला की, तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे. तुमच्याकडं ना पैसा ना अडका. थांब थोडावेळ मी तुला सोडायला येईन. तिचा या मित्रावर पूर्ण भरोसा होता कारण वर्गातल्या कुणालाही कसलीही मदत लागली तरी तो करत होता. कधी किरकोळ पैशाची तर कधी सबमिशनची. चांदोबातला परोपकारी गोपाळ होता तो. त्यानं तिला घरी सोडलं तेव्हा तिच्या आईनं उंबऱ्यात फुलपात्र पालथं ठेवलं होतं.
काही दिवसांनी पोलिसांनी त्या खूनी टोळीचा छडा लावला. त्या टोळीचा म्होरक्या जक्कल होता. ही सगळी टोळी अभिनव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची होती. हा जक्कल म्हणजे ही मुलगी ज्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवत होती तो मुलगा होता.
तिचं सांगणं संपल्यावर गौरी म्हणाली,
“आपल्या सोसायटीमध्ये लिमये आर्टिस्ट रहातात. ज्यांच्या मुखपृष्ठांमुळं अनेक दिवाळी अंक खपतात. त्यांच्याकडं हा जक्कल गेली दोन वर्ष काम करत होता. लिमयांचा त्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता.”
भाग्यश्री घरी गेली. जाताना मला महाडला गेल्यावर सांगण्याजोगा विषय देऊन गेली. जक्कल पकडला गेल्यानं पुणं पुर्वीचं झालं होतं.
सोमवारी सकाळच्या गाडीनं मी महाडला यायला निघालो. प्रवासात शेजारच्या माणसाशी मी ठरवून काही बोललो नाही. भोरला चहा घ्यायला थांबलो. माझ्या शेजारी हेमंत कानिटकर उभे आहेत, असा मला भास होत होता. सहजच मी चार आण्याचे तोंडात टाकायला फुटाणे घेतले. हिरडोशी येईस्तोवर मला ते पुरले. फुटाणे संपल्यावर त्या कागदाची मौनी पिपाणी वाजवत बसलो. चाळा म्हणून तो कागद उलगडून वाचत असताना एका जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. पुण्याजवळ कार्यालय असलेल्या एका निमसरकारी संस्थेची ती जाहिरात होती.
‘ज्युनियर इंजिनियर्स हवेत. अर्हता- सिव्हिल इंजिनियरिंगमधील पदवी अथवा पदविका. किमान दोन वर्षाचा अनुभव आवशयक. सरकारी नोकरीत असणाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठामार्फत अर्ज सादर करावेत.’
हिरडोशी ते महाड या प्रवासात सतत मी त्या जाहिरातीचाच विचार करत राहिलो. अर्ज वरिष्ठांमार्फत सादर करायचा होता. मी हे साळीसाहेबांना सांगीन तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होईल? मी ठरवलं होतं की महाडला न थांबता सरळ नात्याला जावं पण आता विचार बदलला. साहेबांची गाठ घेऊनच जायचं, हा नवा विचार पक्का केला.
दुपारी ऑफिसला गेलो. मला पाहून साहेब आश्चर्य चकित झाले. मी का आलोय हे सांगितलं आणि त्यांना जाहिरात दाखवली. ती पाहून ते म्हणाले,
“जोशी, तुम्ही या जाहिरातीबाबत सिरीयस आहात का? असाल तर एक गोष्ट ध्यानात घ्या जर तुमची निवड झाली तर तुमची इथली नोकरी ते लोकं काऊंट करणार आहेत का, हे बघून घ्या. तिथं नोकरी करताना प्रमोशनची संधी आहे का, हे विचारून घ्या. मागं मी तुम्हाला सुचवलं होतं की तुम्ही एएमआयई (असोसिएट मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया) करावं, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन बीइच्या बरोबरचं होईल आणि आठ-एक वर्षात तुम्ही डेप्युटी इंजिनियर व्हाल. त्या सूचनेचा तुम्ही विचार केलात का?”
डिप्लोमाच मी नाखुशीने केला होता. एएमआयइ कसलं करतोय? करायचं झालं तर मी मराठी घेऊन बीए, एमए करीन.
“साहेब, मी विचार करतो आणि तुम्हाला उद्या सांगतो.” असं म्हणून मी खाली आलो.
कुरेशी माझ्याकडं बघत होता. मी त्याची खोली सोडून शहापूरकरबरोबर राहतोय, हे त्याला पसंत नव्हतं. तेव्हापासून तो बोलेनासा झाला होता. मीही त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.
साहेबांनी मला पुन्हा वर बोलावलं आणि म्हणाले,
“समजा, तुम्ही अर्ज करायचा निर्णय घेतला तरी हा अर्ज केवळ माझ्या शिफारशीनं तुम्हाला नाही पाठवता येणार. त्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून मोकाशीसाहेबांची शिफारस लागेल. पुढच्या आठवड्यात साहेब येणारच आहेत. त्यांच्याशी बोलून घेऊ आणि मग तुम्ही अर्ज करा. पण एक गोष्ट करू शकाल ती म्हणजे एक अर्ज तुम्ही ऍडव्हान्स ऍप्लिकेशन म्हणून पाठवा आणि अर्जाची दुसरी प्रत शिफारशीसह लवकरच पाठवत आहे, असं नमूद करा.”
मी पुन्हा खाली आलो. माझ्यापेक्षा साहेबच जास्त सिरीयस आहेत, असं वाटायला लागलं होतं. साहेबांच्या सूचनेप्रमाणं मी ऍडव्हान्स ऍप्लिकेशन पाठवून दिला आणि नात्याला गेलो.
चव्हाण मी आल्या आल्या म्हणाला,
“दोन दिवसात येतो म्हणून सांगून गेलास आणि आजचा चौथा दिवस. साहेब आले असते तर माझी किती पंचाईत झाली असती त्यांनी तुझ्याबद्दल विचारल्यावर?”
त्याची माझ्याबद्दलची आस्था आणि एकट्यानं सर्व्हे करायचा कंटाळा बाहेर पडू दिला. शांतपणे त्याला सांगितलं,
“मी साहेबांची गाठ घेऊन आलोय. सो रिलॅक्स.”
त्याला मी ती जाहिरात, साहेबांचं त्यावर मत आणि एएमआयइ केलं तर मिळू शकणारी प्रमोशनची संधी याबद्दल सांगितलं. मी त्याच्या प्रतिक्रियेची वाट पहात होतो. कोल्हेच्या बदली होऊन जाण्यानं मला जसा त्रास झाला होता, तसा त्रास हे ऐकून त्याला होईल असं वाटत असताना तो म्हणाला,
“जोशी, करायला हवं रे मी एएमआयइ. आठ वर्षात डेप्युटी इंजिनियर. हा लेव्हल दांडा तरी सुटेल हातातून.”
या चव्हाणच्या बोलण्यातून मला अनेक गोष्टी समजल्या. मी डिपार्टमेंट सोडल्यानं सहकार्याच्या संभाव्य विरहामुळं त्याच्यात फरक पडणार नव्हता. एएमआयइ ही सहज करण्याची गोष्ट त्याला वाटतीये. समजा, आहे त्याच क्वालिफिकेशनवर नोकरी करायची झाली तर कायम आयपीआय म्हणजे केवळ सर्व्हे करणाऱ्या सबडिव्हिजनमधेच काम करावं लागणार. रेग्युलर प्रॉजेक्टवर आपण जावं, अशी महत्वाकांक्षा त्याला नव्हती. दिसणारी क्षितिज रेषा हीच अंतिम रेषा आहे, असं तो मानत होता. क्षितिज रेषेच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर ती आणखी लांब जाते. आपल्या नजरेला त्यामुळं वेगळी सृष्टी दाखवणारा प्रदेश दिसू शकतो, असं त्याला वाटतच नव्हतं.
पुढच्या आठवड्यात येतो म्हणणारे मोकाशीसाहेब त्या पुढच्या आठवड्यात आले. महाडच्या विश्रामगृहात मुक्काम करायला जाण्यापूर्वी म्हणाले,
“साळी, पोरं कुठं राहतायेत ते तरी बघू.”
आम्ही खोलीवर आलो आणि ही जागा पाहून खुश होत म्हणाले, “साळी, तुम्हाला घरी जायचं असेल तर जा. आमची सुनबाई एकटी आहे आणि या अवस्थेत तिच्याजवळ तुम्ही असायला हवंच. मी मात्र इथंच रहाणार आहे.”
मोकाशीसाहेबांचे आभार मानत साळीसाहेब महाडला गेले ते न्यूज देऊन की, ‘साळीसाहेब बाप बनणार आहेत.’ आमच्या घरमालकाला अशोकला जेव्हा समजलं की, मोकाशीसाहेब इथं मुक्काम करणार आहेत तेव्हा त्याच्या उत्साहाला उधाण आलं. साहेबांच्याबरोबर फोटो काढताना त्यानं कॅमेऱ्याचा अख्खा सोळा फोटोचा रोल वापरला. संध्याकाळचे पाच वाजले. अशोक मला बाजूला घेऊन म्हणाला,
“रात्री साहेबांना सरप्राईझ देऊ या का?”
मी त्याला म्हटलं,
“मला नाही वाटत साहेब घेत असतील. आणि डायरेक्ट विचारणं बरोबर नाही. फारतर चिकन वगैरे खातात का विचारू?”
“जोशीबुआ, मी खाण्यापिण्याचं नाही म्हणत पण असं सरप्राईझ जे साहेबांना काय तुम्हालाही असेल. खूप आनंद देणार असेल. काय ते, मी सांगणार नाही. तुम्ही बघाच!”
थोड्यावेळात पत्र्याच्या खुर्च्या आणि पेट्रोमॅक्स येऊन पडल्या. अशोक काही वेडं वाकडं योजणार नाही, याची मला खात्री होती.
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)