महाडचे दिवस ६३: आणि मी क्लीन बोल्ड

mahadche-diwas-63-deepak-parkhi-read-marathi-kadambari-online-storytale-freeread

आज चव्हाण बोरजहून आला. आल्यावर म्हणाला, “जोशी, मला साहेबांचं कळेनासं झालंय. सगळं अर्धवट असताना बोरजमधून मला इकडं धाडायची काय गरज होती? तुलापण असंच हलवलं. तुला त्रास नाही झाला?”
मी त्याच्या समाधानासाठी ‘हो’ म्हटलं.

आम्ही दोघांनी मिळून कॅनॉल सर्व्हे सुरु केला. बेसलाईन टाकताना दर एक किलोमीटरला एक मीटर खाली उतरायचं होतं कारण टोपोशीटनुसार १:१००० हा स्लोप द्यायला साहेबांनी सांगितलं होतं. ही कन्सेप्ट मी त्याला समजावून सांगितली. क्रॉससेक्शन टाकताना ते किती लांब टाकायचे हे ठरविण्यासाठी ते बेसलाईन लेव्हलपेक्षा चढाच्या आणि उताराच्या बाजूला अंदाजे पाच मीटर लेव्हल फरकाच्या दृष्टीनं ठेवायची, हे धोरण आम्ही ठरवलं. त्याचबरोबर जर जमीन सपाट असेल तर तारतम्यानं तीस मीटर लांबी ठेवायची, असंही डोक्यात ठेवायचं ठरवलं.

आमचा सर्व्हे नांदगावच्या अलीकडं चालू होता. डावीकडची हिरव्या डोंगराची रांग छान वळसा घेऊन रस्त्याला वळत होती. परिसर भुरळ पडणारा होता. मला तीव्रतेनं कोल्हेची आठवण आली. आत्ता तो असता तर त्याला लावणी म्हणायला सांगितली असती. न राहून चव्हाणला मी तसं सांगितलं. त्यावर डोक्याला हात लावून तो म्हणाला,
“अरे, मी सांगायचं विसरलो. कोल्हेची बदली झाली. आज उद्या तो तिकडं जॉईन पण होणार आहे.”

मी माझा सर्व्हे थांबवून टाकला. कोल्हेचा विरह मला सहन होण्याजोगा नव्हता. त्याच्या मित्राच्या लग्नासाठी येवल्याला गेलेलं आठवत राहिलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वऱ्हाडाबरोबर ट्रकमधून केलेला प्रवास आणि महाबळेश्वरला केलेली धमाल डोळ्यासमोर यायला लागली. आत्ता मी महाडला गेलो तर त्याची गाठ पडणार नाही. मी चुटपुटत राहिलो. चव्हाणच्या आकलनाच्या पलीकडं होतं माझं वागणं.

दोन दिवसांनी अचानक मोकाशीसाहेब साईटवर आले. आमची फिल्डबुकं पहिली आणि विचारात पडले. म्हणाले,
“साळी, काहीतरी चुकतंय. इतक्या कमी चेनेजला ही पोरं रायगड महाड रस्त्याला कशी लागली? चला, आपण साईटवर जाऊया.”

कॅनॉल बेसलाईनवरून चालत आम्ही निघालो. ज्या भागातून सर्व्हे करताना मी निसर्ग सौंदर्य पाहून वेडावलो होतो, तिथं आलो. मी पुनः प्रत्ययाचा आनंद घेत असताना मोकाशीसाहेबांनी चुटकी वाजवली आणि म्हणाले,
“लूक साळी, इथं पोरांनी घोटाळा केलाय. तुम्ही नीट गाईड नाही केलंत यांना. यांची काहीच चूक नाही. उतरत जाणाऱ्या लेव्हलप्रमाणे यांनी बेसलाईन टाकलीये.”

चार हजार दोनशे चाळीसच्या गडग्यापाशी ते उभे राहिले. बेसलाईनपासून वरच्या अंगाला क्रॉससेक्शन लाईनचा तीस मीटर अंतरावरचा दगड शाबूत होता. ते तिथं चालत गेले. त्या दगडाशी ते थांबतील असं वाटत असताना ते आणखी पुढं जवळपास दोनशे मीटर चढत गेले. टेकाडाच्या माथ्यावर उभे राहिले. आमच्याकडं त्यांची पाठ होती. त्यांनी त्यांचे दोन्ही हात विस्फारले आणि अत्यानंदानं आम्हाला हाक मारली.
आम्ही तिथं पोचलो. माथ्यावरून विस्तीर्ण मैदान आणि शेती. त्याकडं बोट दाखवून ते म्हणाले,
“तुमची बेसलाईन तर अलीकडंच वळली. आता ही खाचरं कुठला कॅनॉल भिजवणारा?”

त्यांनी फिल्डबुकच्या मागच्या पानावर स्केच काढलं. आमची बेसलाईन आणि डोंगर काढला. बेसलाईन लेव्हलला डोंगराला भोक दाखवलं. दोनशे मीटर लांबीचं ते भोक डोंगराच्या दुसऱ्या बाजूला बाहेर पडलं. भोकाच्या दुसऱ्या टोकाकडून बेसलाईन फिरवली आणि म्हणाले,
“आता बघा ही खाचरं कशी पाणी प्यायला लागली. हे भोक म्हणजे टनेल, बोगदा.”
आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी टोपोशीटवर पुन्हा समजावून सांगितलं.
मोकाशीसाहेब आमच्याशी खेळीमेळीनं बोलून गेले पण साळीसाहेबांचा चेहरा गोरामोरा झाला होता. मोकाशीसाहेब जीपमध्ये बसल्यावर म्हणाले,
“पंधरा दिवसांनी मी पुन्हा येईन. आता बेसलाईन बदलून काम चालू देत.”

आमचा सर्व्हे पुढं येत चालला होता त्यामुळं वाड्यापासून बरंच चालायला लागत होतं. मी तसं ताईंना म्हटलं तेव्हा त्या म्हणाल्या,
“तुम्ही ‘नाते’ गावाच्या जवळ आला आहात. तुम्ही आता नात्याला मुक्काम केलात तर तुमची पायपीट कमी होईल. रोडवरती आमच्या अशोकचं दुकान आहे. त्याच्या दुकानाच्या मागं एक खोली आहे. तुम्ही म्हणत असाल तर त्याच्याशी बोलून बघतो. खोली रिकामी असलं तर तिथं राहावा. आमच्यावानीच ‘वाणी’ आहे. तुमच्यापेक्षा चार-दोन वर्षांनीच वडील आहे.”

दोन दिवसांनी ताईंच्या दुकानात अशोक आला. ताईंनी ओळख करून दिली. हसतमुख चेहऱ्याच्या अशोककडं पाहिल्यावर आणि जुजबी बोलल्यावर तोंडभरून तो ‘या’ म्हणाला. त्याच्याच बरोबर नात्याला गेलो. अपेक्षेपेक्षा छान हवेशीर जागा होती. भाडं किती विचारलं तेव्हा तो म्हणाला,
“त्याची काही गरज नाही. चांगली गप्पा मारणारी माणसं मिळतायेत, आणखी काय हवं.”

दुकानाच्या शेजारी एक चहा-फराळाचं हॉटेल होतं. मालकांशी बोललो तेव्हा भाषा माझी वाटली. फराळाचे जिन्नस खाल्ले, विशेषतः मोतीचुराचे लाडू खाल्ले तेव्हा खात्री झाली. मी त्यांना नाव विचारलं. ते म्हणाले,
“टकले, टकले बामण म्हणतात मला इथं. माझा मुलगा प्रदीप. त्याला तुमच्याबरोबर सर्व्हेला घेऊन जा. अकरावी झालाय. उगाच हॉटेलमध्ये टंगळमंगळ करत बसतो. मात्र एक करा, जो काय तुमचा रोजगार असेल तो माझ्याकडं द्यायचा. आमच्या हॉटेलात जेवण बनवणारा पवार आहे. रायगडावरून येताना कधीमधी लोकं जेवायला थांबतात आणि पवारचं कौतुक करून जातात. तुमचं स्वयंपाकपाणी तो बघेल. त्याचा जो काही पगार असेल तो त्याचा त्याला द्यायला हरकत नाही. तुम्हाला दोघांच्या पगाराचं का सांगितलं ते प्रदीप तुमच्याबरोबर राहील तेव्हाच तुम्हाला कळेल. प्रदीपचा पगार त्याच्या हातात देण्याजोगी परिस्थिती तुम्ही आणलीत तर खूप धन्यवाद देईन तुम्हाला.”

जागेचं नक्की झाल्यावर मी चव्हाणला सांगून दोन दिवसासाठी पुण्याला यायला निघालो. महाड-पुणे गाडीला थोडी गर्दी होती. खिडकीजवळची जागा मिळाली नाही पण पस्तीशीचा एक रुबाबदार गृहस्थ शेजारी म्हणून लाभला होता. गाडी बिरवाडीवरून माझेरीपर्यंत आली. शेजारी तोंड उघडायला तयार नाही. मी त्यांच्याकडं पाहिलं. त्यानं नजर झेलली नाही आणि चुकवलीही नाही. प्रवासात गप्पा मारायच्या नाहीत तर करायचं काय? मी तोंड उघडलं,
“तुम्ही पुण्याचे का?”
“हो, तुम्ही?”
“मीही पुण्याचाच. इरिगेशनमध्ये ज्युनियर इंजिनियर आहे.”
“छान! माझाही मावसभाऊ इरिगेशनमध्ये डेप्युटी इंजिनियर आहे.”

गप्पाना तोंड फुटलं होतं. आणीबाणीचा विषय काढला. त्यांनी थोडंसं बोलायला सुरुवात केली पण पुढच्या सीटवरच्या माणसांनी मागं वळून बघत कटाक्ष टाकला तेव्हा मध्यमवर्गीय माणसासारखं त्यांनी बोलणं आवरत घेतलं. मी त्यांना कुठल्या शाळा-कॉलेजात शिक्षण घेतलं म्हणून विचारलं. त्यावर ते जुजबी बोलले. आता कुठला विषय काढावा म्हणून विचार करत राहिलो. काही वेळ माझ्याकडून शांततेत गेला.
मी विचारलं,
“तुम्हाला स्पोर्ट्समध्ये किती रस आहे?”
ते म्हणाले,
“आहे थोडाफार.”
मी तो धागा पकडून क्रिकेटचा विषय काढला.
“चंदू बोर्डेना गुणवत्ता असूनही कॅप्टन्सी करायला मिळाली नाही.” मी विधान केलं त्यावर ते म्हणाले,                             
“सामान्य माणसाला यातल्या खाचाखोचा कळत नाहीत. क्रिकेटमधील खेळाडू निवडताना प्रादेशिकता बघितली जाते.”
मी लेग बिफोर विकेट हा निर्णय देताना अंपायर लोकांवर किती दडपण येतं, यावर बोललो. खरं म्हणजे असं आऊट द्यायचा नियम बदलायला हवा, यासाठी तीन ऐवजी चार स्टम्प ठेवल्या तर एलबीडब्ल्यू हा नियमच काढून टाकता येईल. माझ्या या विधानाची त्यांनी दखल घेतली नाही. मी एकटाच क्रिकेटवर बोलत राहिलो. ते बरीचशी श्रवणभक्ती करत राहिले.

भोरला गाडी थांबली. मी त्यांना चहा घेऊ म्हटलं. चहा घेताना मी विचारलं,
“महाडला कुणीकडं आला होता.” ते म्हणाले,
“महाडचे आंबेडकर कॉलेज आहे ना, त्यांचा स्पोर्ट्स डे होता. त्यांनी मला त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं.”
अस्वस्थ होत मी विचारलं,
“सर, इतका वेळ आपण बोलतोय, आपलं नाव?”
ते म्हणाले,
“मी हेमंत कानिटकर.”

माझी विकेट पडली. महाराष्ट्राच्या क्रिकेट टीमचे प्रमुख फलंदाज आणि भारतीय कसोटी संघातून खेळलेले हेमंत कानिटकर. यांना मी मूर्खासारखं विचारलं होतं की, ‘तुम्हाला स्पोर्ट्समध्ये कितपत रस आहे.’ मी क्रिकेटमधल्या माझ्या अगाध ज्ञानाचे दिवे ज्यांच्यासमोर पाजळले होते ते ‘हेमंत कानिटकर.’

भोरला पुन्हा आम्ही आपापल्या सीटवर बसलो. भोर ते स्वारगेट माझं तोंड शिवलेलं. ते केव्हा उघडलं जेव्हा स्वारगेटला मी रिक्षावाल्याला सांगितलं, “पौडफाटा.”

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :