द किलर : विसाव्या शतकातील ऍक्शन क्लासिक आणि जॉन वू

गेल्या मार्चमध्ये ‘द किलर’ला प्रदर्शित होऊन एकतीस वर्ष झाले. जॉन वू दिग्दर्शित या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला. या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाला ब्रूस लीच्या व विनोदी सिनेमाच्या प्रभावाखालून काढलं आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचवलं. पण निव्वळ याच सिनेमाने नव्हे तर याआधी आलेल्या जॉन वूच्याच ‘अ बेटर टुमारो’ (१९८६) व ‘अ बेटर टुमारो २’ (१९८७) या दोन सिनेमांनी हॉंगकॉंग सिनेउद्योगाला एक नवा अभिनेता व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकणारा पॉलिश्ड दिग्दर्शक दिला. जॉन वूचे सिनेमेच नव्हे तर ऐंशीच्या दशकातल्या हॉंगकॉंग सिनेमाने एकुणातच कात टाकायला सुरूवात केली होती. सॉय हक (Tsui Hark), जॅकी चॅन, सॅमो हंग, युआन बियू व रिंगो लॅम यांनी पारंपारिक हॉंगकॉंग सिनेमात अमुलाग्र बदल करण्यावर भर दिला. या सर्व कलावंतातील सामाईक गोष्ट म्हणजे यांनी हॉंगकॉंग ऍक्शन सिनेमा या जॉनरला आधुनिक करून तो प्रस्थापित केला.

यापूर्वी ऍक्शन जॉनर अस्तित्वात नव्हता असं नव्हे, तर तो पोशाखी मार्शल आर्टसच्या स्वरूपात होता. त्यातल्या त्यात तलवारबाजी असणाऱ्या वुशा (Wuxia) जॉनर हॉंगकॉंगमध्ये सिनेमाच्या सुरूवातीपासून अस्तित्वात होता. भारतीयांना त्याचं परिचीत रूप म्हणजे अँग ली दिग्दर्शित ‘क्राऊचिंग टायगर, हिडन ड्रॅगन’ (२०००) हा ऑस्कर विजेता चित्रपट. ६०-७० च्या दशकात ‘शॉ ब्रदर्स’ या जगातल्या त्यावेळच्या सर्वात मोठ्या स्टुडीओने हा जॉनर भरभक्कम केला. याच काळात जॉन वूने अभिनेता होण्यासाठी शॉ ब्रदर्स स्टुडीओचा रस्ता धरला. पण अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण झालं नाही. चँग चे (Chang Cheh) हॉंगकॉंग सिनेमाचे गॉडफादर असणाऱ्या दिग्दर्शकाने जॉनला तू कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून दिग्दर्शनाचं काम कर म्हणून सल्ला दिला जो त्यांनी शिरोधार्ह मानला. पण ऐंशीच्या दशकापर्यंत फक्त फार्सिकल विनोदी किंवा मार्शल आर्टस सिनेमेच जॉन वू बनवू शकले, कारण स्टुडीओ सिस्टीममध्ये काम करताना येणाऱ्या मर्यादांमुळे.

त्यातून बाहेर पडून आपल्या मनातील संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी ते धडपडत होते. त्यातच त्यांची ओळख सॉय हकशी झाली. स्वतः अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक असणारे सॉय हकसुद्धा स्टुडीओच्या मर्यादित संधींना वैतागले होते. त्यामुळे त्यांनासुद्धा यातनं बाहेर पडायचं होतं. जॉन वूनी त्यांना अ बेटर टुमारोचं कथानक सांगितलं. आणि इतिहास घडला. अ बेटर टुमारोने तोपर्यंतचे बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स तोडले. तसेच चाऊ यूं फॅट हा मास अपील असणारा अभिनेता दिला. या सिनेमाने ‘हिरॉईक ब्लडशेड’ या प्रकाराला पुनर्जीवित केलं. हिरॉईक ब्लडशेड चँग चेचं योगदान. यात गुन्हेगारी समाजातील निष्ठा, बंधुता, मित्रत्व, सन्मान अशा गोष्टींचा अंतर्भाव असतो. सोबतच कथानके हिंसेनी भरलेली असतात. गन प्ले आणि स्टायलाईझ्ड ऍक्शन सिक्वेन्सेस असतात. चँग चेनी जरी सत्तरच्या दशकात याची मुहूर्तमेढ रोवली असली तरी जॉन वूनी त्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनाने भक्कम करून टाकलं. अ बेटर टुमारो नंतरचे त्यांचे जवळपास सर्व सिनेमे या प्रकारात मोडतात. अ बेटर टुमारो बनवण्यापूर्वी त्यांनी त्यांची वैशिष्टे असणारा जॉन वू सिनेमा ‘लास्ट हुर्रा फॉर शिवल्री’ (१९७९) बनवला होता. पण तो पोशाखी होता.

द किलरचं कथानक तीन सिनेमांच्या प्रभावातून जॉननी लिहिलं. ते सिनेमे म्हणजे जाँ पिएरे मेल्व्हीलचा ‘ला सामुराई’ (१९६७), मार्टिन स्कोर्सेसीचा ‘मीन स्ट्रीट्स’ (१९७३) आणि तेरूओ इशीचा ‘नराझूमोनो’ (१९६४). आह जोंग (चाऊ यूं फॅट) हा हिटमन एका क्लबमध्ये जॉबवर असताना तिथल्या नाईटक्लब सिंगरला जेनीला (सॅली याह) अपघाताने इजा पोचवतो. तिच्या डोळ्यांना इजा होते ज्यामुळे तिची दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागते. तिच्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट करून तिची दृष्टी परत आणावी ज्यातून तिला मदत होईल, असा विचार करून तो शेवटचा जॉब घेतो. पण यात त्याला डबल क्रॉस केलं जातं. पैसे मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू होते, तर जेनीची दृष्टी मात्र झपाट्याने कमी व्हायला लागते.

जॉन वूचं वैशिष्ट्य जरी हिरॉईक ब्लडशेड असलं तरी त्यांचं संपूर्ण लक्ष मानवी नात्यांवर आहे. ही नाती गुन्हेगारी पार्श्भूमीची असली तरी. अ बेटर टुमारो व त्याच्या सिक्वेलमध्ये मैत्री व बंधुप्रेम यावर भर होता. यात एक इंस्पेक्टर व एक हिटमन आणि हिटमन व नाईटक्लब सिंगर अशी दोन नाती आहेत. एकीकडे कायद्याच्या दोन टोकांवर असणाऱ्यांमध्ये सुरूवातीला दुष्मनीचं असणारं नातं शेवटाकडे गाढ मैत्रीत रूपांतरित होतं. तर दुसरीकडे आपल्यामुळे एका निष्पाप जीवाला आयुष्याचा धोका निर्माण झालाय तो कमी करता यावा यातून निर्माण झालेलं प्रेमाचं नातं आहे. सिनेमात जॉन वू जेनी व आह जोंगमध्ये प्रेम आहे हे स्पष्ट करत नाहीत. तो तिला संरक्षण देणे व दृष्टी परत आणणे या कबुलीवर सांभाळायचं वचन देतो. तिचं मात्र प्रेम आहे. ती ते कधीच लपवत नाही.

या पार्श्वभूमीवर जॉन वू ऍक्शन सिक्वेन्सेसचा मोठा पसारा मांडतात. सिनेमाच्या सुरूवातीलाच येणारा नाईट क्लबमधील छोट्याश्या खोलीत घडणारा प्रसंग पुढील कथानकाची नांदी ठरतो. हा प्रसंग मुळातूनच बघायला हवा. आह जोंग हिटमन म्हणून कसा आहे हे तर दिसून येतंच तसेच तो अत्यंत व्यावसायिक आहे. नाईटक्लबमध्ये इतर माणसे असताना फक्त ज्याच्या नावाची सुपारी घेतली आहे त्याला व त्याच्या साथीदारांना कंठस्नान तो घालतो. जॉन वू याचं चित्रीकरण करताना हिंसा, स्लो-मोशन, एडिटिंग, वातावरण, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत याचा अपूर्व मिलाप घडवून आणतात. कदाचित काही जणांना हे हिंसेचं उदात्तीकरण केल्यासारखं वाटेल पण जॉनच्या जडणघडणीत शाळेत व कॉलेजावयीन असताना जे अनुभव आले त्याचा तो परिपाक आहे.

जॉनचं लहानपण खडतर गेलं. गरिबीत दिवस काढावे लागत असले तरी चर्च व थिएटर हे दोन त्यांचे श्रद्धास्थान होते. जॉन ख्रिश्चन असल्यामुळे मोठं झाल्यावर एक तर चर्चमध्ये काम करावं किंवा सिनेमात जावं असं त्यांनी ठरवलं होतं. कारण दोन्हीत त्यांना मन:शांती लाभायची. तसेच रस्त्यावरील टोळीयुद्धामुळे वैतागलेल्या त्यांना थिएटरमध्ये दाखवले जाणारे हॉलीवूड म्युझिकल्स खूप आवडायचे. त्या रखरखीत वास्तवावर ते म्युझिकल्स हव्याहव्याश्या वाटणाऱ्या मृगजळाकडे घेऊन जाणारे होते. त्यामुळेच असेल जॉन वूच्या कोणत्याही सिनेमात श्रवणीय पार्श्वसंगीत असतं आणि ऍक्शन सिक्वेन्सेसमध्ये पात्रांची खासकरून नायकाची लयबद्ध हालचाल असते. तसेच चँग चेच्या हाताखाली काम करत असताना मार्शल आर्टस सिनेमातील बंधुता, मित्रत्व इ. संकल्पना व मार्शल आर्टसचं कौशल्य त्यांनी उचललं आणि मीन स्ट्रीट्स, ला सामुराईसारख्या सिनेमातून लहानपणी बघितलेल्या टोळीयुद्धाला न्यायाची चाड असणाऱ्या नायकाला तयार केलं. पूर्व-पश्चिम सिनेमातील ऐवज हॉंगकॉंगच्या समकालीन वास्तवावर कलम केला. त्यातून द किलरसारखी अजोड कलाकृती निर्माण केली.

अजोड म्हणताना एक गोष्ट विसरायला नाही हवी की ऍक्शन दृश्ये म्हणजे हिंसेनेच भारलेले असतात, त्यांना काही अर्थ नसतो असा सर्वसामन्य समज असतो. हिंसा जरी पडद्यावर मोठ्या प्रमाणात दिसत असली तरी तिला दिग्दर्शकाच्या मुल्यदृष्टीची जोड आहे. जॉन वू हे त्यांची स्टाईल कॉपी करणाऱ्या दिग्दर्शकांसारखे नव्हेत. त्यांच्या सिनेमातील नायकाला न्यायाची बाजू स्पष्ट कळते. त्यामुळेच नायक जेनीला मदत करायची ठरवतो तसेच एका बीचवर त्याच्यावरील हल्ल्यात जखमी झालेल्या छोट्या मुलीचा जीव तो वाचवतो. तो कोल्ड ब्लडेड हिटमन नाही. त्याच्यात चांगुलपणा वसलाय. हा चांगुलपणा जॉन वूनी लहानपणी चर्चमध्ये अनुभवला. तोच नायकामध्ये उतरलाय. त्यामुळे हिंसा जरी अंगावर येणारी वाटत असली तरी तिच्या मागचा विचार हा निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून आलेला नसून अनुभवातून आलेला आहे.

दिग्दर्शक सॅम रेमी जॉन वूला ऍक्शन सिनेमाचा आल्फ्रेड हिचकॉक म्हणतो ते ऍक्शन प्रसंगात सस्पेन्सचा वापर करतात म्हणून. क्वेंटीन टॅरंटिनो, रॉबर्ट रॉड्रीगेझसारख्या मोठ्या हॉलिवूड दिग्दर्शकांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे विसाव्या शतकातील ऍक्शन क्लासिक असणारा हा सिनेमा सिनेप्रेमींनी चुकवू नये.

*

वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :