GULABI TALKIES | 2008 | Drama
AWARDS: National Film Awards, IndiaDIRECTOR | Girish KasaravalliACTORS | Umashree, K.G. Krishnamurthy
गुलाबीच्या घरात टीव्ही येतो तेव्हा..
चित्रपटातली गोष्ट नव्वदीच्या दशकात घडते.
‘गुलाबी’ ही कर्नाटकाच्या समुद्रकिनाऱ्यावर राहणारी सुईण आहे. ‘सिनेमा’चं वेड असणाऱ्या गुलाबीला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचा भारी नाद. दररोज, न चुकता संध्याकाळ झाली की गुलाबी हातातलं असेल-नसेल ते काम सोडणार आणि बोटीत बसून थिएटर गाठणार. तेवढे अडीच-तीन तास हा तिचा हक्काचा वेळ. काहीही झालं तरी तो वेळ ती कुणाला देणार नाही.
गावातल्या कल्याणी नावाच्या एका श्रीमंत बाईची मुलगी गरोदर असते. तिला अचानक त्रास व्हायला लागतो तेव्हा ती गुलाबीला आणायला माणसं पाठवते. तिला शोधत माणसं थिएटरपर्यंत पोहोचतात. पण सिनेमा अर्धवट सोडून जायला तयार होणार ती गुलाबी कसली? इमर्जन्सी आहे असं सांगून तिला अक्षरशः उचलून बोटीत ठेवलं जातं.
कल्याणीचं घर येतं पण आपला सिनेमा अर्धवट राहिला यामुळे चिडलेली गुलाबी बोटीतून उतरायला तयार नाही. ‘हवी तर उद्याच्या शोची तिकिटं घे पण आता माझ्या अडलेल्या मुलीला मोकळं कर’ अशी विनंती कल्याणी करते. आजची भरपाई उद्या कशी करता येईल असा प्रश्न गुलाबी कल्याणीला विचारते. जो सिनेमा काल पाहिलाय, परवासुद्धा पाहिलाय, तोच पुन्हा आज बघण्याचा एवढा अट्टाहास का हा प्रश्न कल्याणीला पडतो. लहान मुलासारखी फुगून बसलेली गुलाबी कल्याणीकडे रागानं बघते आणि उत्तर देते, “सिनेमा तोच असतो, पण मला मात्र तो रोज नवा दिसतो.’ कल्याणी गुलाबीपुढं हात टेकते आणि तिला घरात बसून सिनेमा बघण्याची सोय करून देण्याचं आमिष देते. सिनेमा खुद्द आपल्या घरात येणार या विचारानं गुलाबी खुश होते आणि बोटीतून उतरते.
गुलाबी बाळंतपणाची तयारी करता करता कल्याणीच्या कळा देणाऱ्या मुलीला सल्ला देते, ‘एक गोष्ट लक्षात ठेव. बाळंतपण गुलाबीनं करावं असं वाटत असेल तर कळा सिनेमाच्या शोच्या दरम्यान येऊन द्यायच्या नाहीत.’
अशी ही गमतीशीर गुलाबी! मुलबाळ नसलेली, नवऱ्यानं दुसरा संसार थाटल्यामुळे एकटी राहणारी, पन्नाशीला आलेली हिंदुबहुल गावातली मुसलमान बाई!
कल्याणी आपला शब्द पाळते आणि घरातला जुना टीव्ही केबल कनेक्शनसह गुलाबीच्या घरात बसवते. सारा गाव टीव्ही पाहायला जमा होतो. नवऱ्यानं टाकून दिलेली म्हणून एरवी जिला अंतर दिलं जात होतं त्या गुलाबीबरोबर गाव अचानक गोड वागू लागतं. टीव्ही सीरिअलच्या वेळांनुसार बायका तिच्या घरी जमू लागतात. लहान मुलं कार्टून बघण्यासाठी गर्दी करू लागतात. पण गुलाबीला खरं सुख तेव्हा सापडतं जेव्हा टीव्हीच्या निमित्तानं तिचा नवरासुद्धा तिच्या घरात वेळ घालवू लागतो.
‘वैदेही’ यांच्या कथेवर आधारित असलेला गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केलेला ‘गुलाबी टॉकीज’ हा बहुआयामी सिनेमा आहे. एक साधी-सुधी गोष्ट म्हणून सुरु होणारा सिनेमा पुढं जाऊन गंभीर वळण घेतो आणि जागतिकीकरण, धार्मिक असहिष्णुता अशा वैश्विक विषयांना स्पर्श करतो. चित्रपट संपतो तेव्हा ‘गुलाबी टॉकीज’ उद्ध्वस्त झालेलं असतंच, पण गावाचं गावपणसुद्धा त्याच्याबरोबर संपलेलं असतं.
*
वाचा
चित्रपटविषय लेख
आज दिनांक
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
समाजकारण
कथा
कविता
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!