बायजा १५: दु:खाचं व्यसन

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-15-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

बाळूचे दहा दिवस होईपर्यंत म्हातारी शांततेनं गुडघ्यात मान घालून बसली होती. आयुष्यभर ज्याला यडं पोर म्हणून हिणवलं त्याच्या मरणानं तिला वाईट वाटण्याचं कारण नव्हतं, पण ती आश्चर्यकारकरित्या स्तब्ध झाली होती. मानवी मनाचे पीळ कुणाला पुर्णांशानं समजलेत?

बाकीच्या सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. बायजाला दुःख, वेदना होत होत्या की नाही हे कळत नव्हतं. ती नुसतीच बावचळल्यासारखी झाली होती. आयुष्यभर दुर्दैवाच्या चरकात पिळून निघाल्यानंतर आता तिला काय करू, काय नाही सुचत नव्हतं. शीड नसलेल्या होडीसारखी तिची अवस्था झाली होती. ती सैरभैर होती. संपत व सुरखी दहा दिवस बायजाच्या घरीच थांबलेले होते. सगळी कामं त्यांनी दोघांनी सांभाळून घेतली होती. सवतीला यायला आजारपणामुळं जमलं नव्हतं, पण लक्ष्मण दोन दिवस बायकोपोराला घेऊन राहिला होता.

बायजानं त्या खोपटात एकटं रहावं, असं कुणालाच वाटत नव्हतं. संपत आणि लक्ष्मण दोघंही तिला आपापल्या घरी नेण्यास उत्सूक होते.
“बायजाई, आतापर्यंत जबाबदाऱ्यांमुळं तुला कधी गाव सोडता आला नाही. काही दिवस माझ्यासोबत शहरात चल. तुला करमेल तोवर रहा. नंतर गावी आल्यावर संपतकडं काही दिवस रहा.. पण आता अशी एकटी राहू नकोस. आता जरी मला नोकरीमुळं थांबणं शक्य नसलं, तरीही बाळूची सगळी कार्य झाली की मी तुला घ्यायला परत येतो. तिथं शहरात तुला आई सोबत आहेच. दोघी मिळून भजनी मंडळात जा. बगीचा आहे इमारतीच्या मागं, तिथं फिरायला जात जा. बरेच आजी-आजोबा तिथं येत असतात. मन रमेल तुझं सहज.”

बायजा तात्पुरतं ‘हो’ म्हणून त्याचं मन राखत होती. पण तिचं तिलाच ते मोठं अवघड वाटत होतं. खोपटापलीकडं आणि वावरापलीकडं एक मोठं जग होतं. पण ती साठ वर्षांची होईपर्यंत तिचा त्या जगाशी फारसा संपर्कच आला नव्हता. हो म्हणताना ती कुचंबत होती. तिची कुचंबणा ओळखून संपत म्हणाला,
“माये, नाईतर माझ्या घरी चाल. तिथं बी पोरात तुझा जीव रमंल. तिथून आपला मळा बी जवळ हाये. कदी बी वाटलं मळ्याकडं चक्कर मारावीशी तर चटदिशी जाता येईल.”

बायजा ‘हो’ तर म्हणत होती पण तिची नजर सारखी रिकाम्या खाटंकडं जात होती. सुरखी म्हणाली,
“आता ही खाट बी उचलून ठेवा बघू. रिकामी खाट बघवत नाई.”
बायजाच्या काळजात तटकन तुटल्यासारखं झालं. ती दहा वर्षांनी म्हातारी झाली होती. ती अस्फूट म्हणाली,
“राहु दे काही दिवस. तिथंच राहू दे.”

दहा-बारा दिवसांनी पाहुण्यांची वर्दळ कमी झाली. म्हातारी आपल्या गावातल्या घरी परतली. संपत आणि सुरखीही त्यांच्या घरी गेली. घर पूर्णपणे रिकामं झालं. आता खऱ्या अर्थानं तिला घर खायला उठलं. बाळूची खाट उचलून ठेवली असती तर बरं झालं असतं, असं तिला न राहवून वाटू लागलं.

पुढल्या ऐतवारी लक्ष्मण तिला घ्यायला येणार होता. एका वेगळ्याच हुरहुरीनं तिनं तिची लुगडी गाठोड्यात भरून ठेवली. बाहूलीसारख्या दिसणाऱ्या सकवार सुनेसाठी डाळी-साळी भरून ठेवल्या. राहिलेले काही दिवस कधी जातील असं तिला वाटू लागलं. तिच्या मनपटलावर शहरातल्या न पाहिलेल्या मोठमोठ्या रस्त्यांची, बगिचांची, लक्ष्मणाच्या चित्रासारख्या संसाराची चलतचित्रं तरळू लागत. आयुष्यानं पहिल्यांदाच इतके विसाव्याचे क्षण तिच्या ओंजळीत टाकले होते. त्या क्षणांचा विनियोग कसा करावा, हे तिला उमजेनासं होई. मग ती अशाच स्वप्नरंजनात दंग होई.

दर दिवशी संपतही येता जाता तिला बोलू लागे, “माये, शेहरात लय काय काय असतंय. मोठ्ठे मोठ्ठे रस्ते तर असत्यातच, पन देवळंसुद्धा लय मोठाली असत्यात. चार-आठ दिवस तर अश्शे निघून जातील तुझे. गमलंच मनाला तर मैनाभर राहून ये. नंतर हायेच आपलं गाव. आन् इथली काय बी काळजी करू नकं. मळ्यातलं मी सगळं पाहूनच घेईन. आन् गावातल्या घरी बी चक्कर टाकीन. म्हातारीला जेवन द्यायला शेजारच्या शालूबाईला सांगितलंय. तू बिनघोर रहा तिकडं. आतापतवर आविष्यानं तुझी लय सत्व पाह्यलं. पन कसाला लागायला बी सोनं असावं लागतंय. असं समज आता आविष्यात सुखाचे दिवस आले. आता इथला काईच इचार करू नकं. बिनघोर जा आन् रहा.”
बायजाला नकळत ओढ लागली.
“आता काय राह्यलंय इथं तरी? इथं आठवनी इंगळावानी डसात्यात.” 
तिच्या मनाचं वारू अंमळ स्थिरावल्यासारखं झालं. दुसऱ्या दिवशी लक्ष्मण तिला घ्यायला येणार होता.

बायजा आढ्याकडं पाहत बसली होती. आजवर तिनं मांजरपाटाच्या कापडानं आयुष्याची अब्रू झाकली होती. कितीतरी अडचणी आल्या, डोंगराएवढी दुःखं आली पण ती त्यांच्या डोक्यावर पाय देऊन उभी राहिली होती. दुःख ठसठशीत रूपयाएवढ्या कुंकवासारखं मिरवलं होतं. आता हे बिनाक्लेशाचं भरजरी वस्त्र नेसून आलेलं आयुष्य तिला कुठंतरी अनोळखी वाटत होतं. बेचव, अळणी वाटत होतं. नुसतंच खायचं आणि बसायचं. जेवणदेखील सुरखी पाठवून देत होती.

लक्ष्मण येईल तेव्हा अगदी कोऱ्या मनानं त्याच्याकडं रहायचं, असं तिनं परस्पर ठरवून टाकलं होतं.
‘कामाशिवाय जीव रमायचा नाही. तेवढाच सुनबाईला बी आधार व्हईल. पोराला संबाळता येईल. काम करनाऱ्या मानसाचा कोन्ला कट्टाळा नाई येत. शेतीचं बी लक्ष्मनालाच सांगू. तुला जमंल तशी करून घे संपतकडून. नाई जमेनाशी झाल्यावर त्यालाच इकून का टाकीना. संपत सोनं करील जमिनीचं. म्हतारीचा इचार घ्येवा लागंल. तिला लक्ष्मनानं सांगितलं की डोक्यात घुसंल.’

बायजानं मनातल्या मनात सगळ्या गोष्टींची निरवानिरव चालवली होती.
‘कदी वारीला जायला जमलं नाई, कदी किर्तनाला जायला जमलं नाई. आता फक्त द्येवाच्या पायाशी आविष्य गेलं म्हंजे झालं. लक्ष्मनाला म्हनून बघावं का? येकदा, फक्त येकदाच पंढरपुराला नेशील का म्हनून? सुनबाईला आवडंल का बरं? तरी पन बोलून बघावं. आता तेवढीच आशा हाये…’
ती आयुष्याचा एक एक पोत पडताळून पाहत होती. पण दुःख नसलेल्या सपक दिवसाचं काय करायचं असतं याचं परिपूर्ण उत्तर तिला सापडेना झालं होतं.

‘मायला यड लागलं. ती अशीच बेवारशी मेली. मला जायला बी भेटलं नाई तिला शेवटचं पाह्यला. ती असती, बाप असता तर आताच्या रिकामपनाचं काय करायचं असतं त्यांनी सांगितलं असतं काय?
मायबापाच्या सावलीतले धा-बारा वरसं कशे अलगद गेले. लगीन झालं तशी खडकावर आपटले. सगळा इस्कोट व्हऊन बसला. बापाचा गळा किती ग्वाड व्हता. जरी दुसऱ्याच्या शेतात सालानं व्हता, पन लय मन लावून कामं करायचा. जवारी, बाजरी काढतांना भल्लाऱ्या म्हनायचा. माय बी जात्यावर दळायची तवा ओव्या म्हनायची. या गान्यांनी आविष्याच्या खडकावरून आदळत आपटत चाललेल्या गाडीला वंगान पुरवलं जनू.
माह्येरच्या गावाला नदी व्हती. किती डुंबायची मी नदीत. पानी झुळझूळ करीत वंजळीतून वहायचं… मासोळीसारखं…
तसंच साठ वर्साचं आविष्य निघून गेलं, सुळकनी…’

विचार करता करताच तिचा डोळा लागला. स्वप्नात बापाच्या गोड आवाजातल्या भल्लाऱ्या ऐकू येत होत्या…

‘माझं शिवार हाये काळं सोनंss
त्यात लावलं बियानं
वाढू लागलं जोमानंss
कनसात लक्षूमी भरली
घरात जागा नाई उरलीss
लांबरूंद पिकलाय बिगा
याची कुठवर ठिवशील निगाss’

स्वप्नात बाप गाणी म्हणत होता. लहानखुरी बायजा कुळवावर बसली होती. तिनं फाटकं परकर-पोलकं घातलेलं होतं. पण ती आनंदी होती. वाऱ्याशी बोलत होती. शिवारासंगं डोलत होती. तिची माय लांबून कोरड्यास-भाकरीचं टोपलं घेऊन येतांना दिसत होती. आक्षी लक्षुमीवानी हसत होती. राम आणि बाळू तिच्याच वयाचे झाले होते. दोघं एकत्र खेळत होते. लक्ष्मण, संपत, दोघांच्या बायका सगळी तजेलदार खोबऱ्या आंब्याच्या खाली बसल्या होत्या. एकमेकांशी जिवाभावाचं बोलत होत्या.
तिच्या विचारांच्या खेळात भूत, भविष्य, वर्तमान सगळ्याची सरमिसळ झाली होती…
एवढ्यात सगळी गप्प झाली. पोरं खेळायची बंद झाली. बापाच्या गाण्यांचा आवाज कमी कमी होत गेला. आईचं हसू विरत गेलं. ती जख्ख म्हातारी झाली…

बायजा घामेजल्या अंगानं पटकन जागी झाली. तिला तिच्या नावानं कुणीतरी हाका मारतंय हे ऐकू आलं, पण ते स्वप्न आहे की सत्य हे तिला क्षणभर उमगेचना. ती स्वतःला सावरत उठली. लगबगीनं बाहेर गेली. शेजारणीचा नातू फटफटीवर काही निरोप घेऊन आला होता.
“बायजामावशे, लवकर दवाखान्यात चाल. रखमाआजीच्या अंगावरून वारं गेलंय. लवकर चाल.”
तिनं तंद्रावल्या अवस्थेतच दार लोटून कडी घातली आणि फटफटीवर तोल सावरत बसली.

म्हातारीच्या तोंडात अन्नग्रहणासाठी नळी टाकली आहे. लक्ष्मण, संपत हवं नको ते बघतात. चाराठ दिवसात येऊनच जातात. सवत थकली आहे. तिला वरचेवर जाणं-येणं जमत नाही, पण तिला बायजाविषयी एक वेगळीच आत्मीयता तयार झाली आहे.

म्हातारीचं हागमूत काढतांना बायजा तिच्या नवऱ्याशी झालेल्या शेवटच्या भेटीतले शब्द आठवत असते,
“बायजे, ही माझी खरी माय नव्हं. ही माझी दूधआई. खरी माय मी जलमताच मेली. पन ही माझी दूधआई असून बी तिनं खऱ्या आईसारखा जीव लावला मला. मला तुला सांगायला अवघड वाटतंय, पर तूच खऱ्या सत्वाची हाये. तू तिला मरेपर्यंत दूर लोटू नको. ती काई बी बोलली तरी पोटात घाल. येवढं करशील बायजे?”
वाघासारख्या नवऱ्याची हात जोडून केलेली विनंती आठवून बायजाच्या डोळ्यात आत्ताही पाणी येतं.

बाहेर पाऊस साकळलेला असतो. बायजा म्हातारीला म्हणत असते,
“आत्याबाई, भाईर किती पाऊस आलाय बघा. तुम्हाला भजे आवडत्यात ना? इतक्यात करीते बघा.”

म्हातारीच्या घशातून आनंदी छटा दाखवणारा हुंकार निघतो. बायजा समाधानानं भज्यांसाठी ओव्याची पानं तोडायला जाते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं, वचनपूर्तीचं हसू असतं. दुःख परत सगळ्या जामानिम्यासकट हजर झाल्यानं तिला आता शीड नसलेल्या होडीसारखं सैरभैर वाटत नाही. कदाचित तिला दुःखाचं व्यसन लागलेलं असावं.

आता खाट रिकामी राहिलेली नसते…

(समाप्त)

***

वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता


Medical Professional | + posts

डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    क्षमा, फारच सुंदर कादंबरी आहे!! अतिशय सुंदर! अनेकदा गलबलून येत होतं. तुम्ही खूपच सकस लेखन करता आहात. ओघवती व चित्रदर्शी शैली आहे . लिहित रहा, लिहित रहा हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :