बायजा ४: पानगळ

marathi-kadambari-bayja-4-pangal-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

राम सात-आठ वर्षांचा झाला. त्याला जात्याच भरपूर समज होती. टक्केटोमणे, बोललेल्या शब्दांचे ध्वन्यर्थ कळू लागले होते. आता मात्र कुणी त्याच्या लाडक्या बाळूदादाविषयी बोलायला गेलं की, तो सरळ त्या व्यक्तीला हुसकून लावायला बघे.
“आये, या बाया असं कामून बोलत्यात दादाविषयी? तो काय आपल्याला जड झालाय का? तू थकली तरी आता मी हाये ना? मी करीन की दादाचं सगळं काम. तू रंजीस नको होऊ. मी हाये. मी सांबाळीन तुम्हाला दोघांना बी. आता मला निंदता येतंय, खुरपता येतंय, पाळी घालता येतीये, शाळंत पन मला सगळे मास्तर हुशार म्हनत्यात. मी लय मोठा होईन आन् लय मोठं घर बांधीन. तू काळजी करू नको.”
बायजाचं हुरदं भरून येई.
‘एवढूशा नखाएवढ्या पोराला सगळं समजतंय, आन् तुम्ही उगाच माझी काळजी करताय,’ असं बायांना भरल्या डोळ्यांनी म्हणे.
इतकं सगळं सुखाचं बोलल्यावर बी आई रडायची का थांबत नाही, याचं कोडं लहानग्या रामला सुटायचं नाही. बाळूला मात्र सगळं कळलेलं असे. त्याच्या एका डोळ्यातून पाणी वाहू लागे. ते पाहून बाळू आज ना उद्या नक्की शहाणा होईल, असा बायजाचा आशावाद वाढीला लागे.

बायजाचा नवरा दारू, बिडी, तंबाखू या व्यसनांमुळं थकल्यासारखा वाटायचा. तब्येतही खंगल्यासारखी झाली होती. बिडीचा झुरका घेतल्याबरोबर त्याला ढास लागे, पण बिडी ओढल्याशिवाय त्याला जमत नव्हतं. कामही फार होत नसायचं. जवळ बसलेल्या माणसाला त्याच्या छातीतून येणारा घरघर आवाज स्पष्टपणे ऐकायला येई. सवतीला कामाची सवय नव्हती. धसाकसाची कामं करण्याशिवाय बायजाच्या नवऱ्याला आणि सासूला पर्याय नव्हता. सवतीनं हट्टानं तिच्या पोराला, लक्ष्मणाला भारीतल्या भारी शाळेत, तालुक्याच्या गावी टाकलं होतं. तिच्या माहेरापासून तालुक्याचं गाव जवळ असल्यानं तिचा मुक्काम पोराच्या निमित्तानं माहेरीच जास्त असायचा. आता नवऱ्याला, सासूला बायजाची किंमत कळू लागली होती. पण आता वेळ निघून गेली होती कदाचित…

बायजाचा नवरा मळ्यात चक्कर मारायच्या निमित्तानं बायजाच्या खोपटात येई. दुपारच्या पहारी रामला मांडीवर घेऊन राम-लक्ष्मणाच्या, सीतेच्या गोष्टी सांगे. राम नकळत विचारे,
“आबा, शीतामाई येवढी चांगली होती, तरी बी रामरायानं तिला असं का वागिवलं बरं? मग त्याला देव तरी का म्हनायचं?”
बायजाच्या नवऱ्याकडं त्याला देण्याजोगं उत्तर नसायचं. त्याला मंथरेच्या रूपात आपल्या आईचा चेहरा दिसे. तो शुन्यात बघत राही. कधी बायजाकडं, तिच्या लवलवणाऱ्या हालचालींकडं खुळ्यासारखा पाहत राही. तिच्या हातचं चवदार कोरड्यास-भाकरी खाता खाता ती एखादा शब्द बोलेल, अशी आस लावून राही. तिच्या डोळ्यात त्याच्याविषयीची तक्रार, त्रागा शोधत राही, पण त्याच्या हाती काही लागत नसे.
“अजून चतकोर भाकरी खावा चुरूनमुरून. तब्बेतीला चांगली असती.” असं ती त्याच्याकडे न बघता म्हणे, तेव्हा त्याला तो घास घशाखाली उतरत नसे. आवंढा दाटून येई.

एक दिवस असाच तो आला असतांना कुणास ठाऊक कुठल्या प्रेरणेनं त्यानं अंथरुणावर पडून असलेल्या बाळूच्या तोंडावरून, डोक्यावरून हात फिरवला. आज त्याच्या बारीक झालेल्या डोळ्यातल्या रंगहीन बुब्बूळाची त्याला किळस आली नाही. इतक्या वर्षांत त्या दिवशी बायजानं नवऱ्याकडं प्रेमानं नजरेला नजर भिडवली. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. तिच्या नवऱ्याला खूप गोष्टी बोलायच्या होत्या खरंतर, पण तो नाही बोलू शकला.

त्या दिवशी बायजाला घराला घरपण आल्यासारखं वाटलं. पहिल्यांदाच तिच्या संसाराला पुर्णत्व आल्यासारखं वाटलं. तिनं मोठ्या उत्साहानं पुरी-गुळवणीचं जेवण केलं. नवऱ्याला अबोल प्रेमानं वाढलं. राम, बाळू, तिचा नवरा आज एका पंक्तीत जेवत होते. तिचं बारीकसं खोपटं समाधानानं हसत होतं. आज खऱ्या अर्थानं तिच्या खोपटाचं ‘घर’ झालं होतं. त्या घरात समाधानाचं चांदणं पसरलं होतं.

एवढ्याशा सुखाचा तो चतकोर तुकडा तिला आयुष्यभर पुरवून पुरवून वापरावा लागणार आहे, हे तिला त्यावेळी कळालं नाही. दुसऱ्याच दिवशी बायजाचा नवरा छातीत कळ आल्याचं निमित्त होऊन गेला. तिच्या नशिबानं तिला कायमचं असं मांजरानं उंदराला खेळवावं, तसं खेळवलं होतं. जर असं व्हायचंच होतं तर तिच्या संसाराच्या या बोडक्या-रांडक्या, वठलेल्या झाडाला शेवटी शेवटी तरी मायेचं हिरवं पान का फुटावं, याचं तिला वैषम्य वाटत राहीलं. तरीही या प्रश्नांचा उच्चार तिनं प्रत्यक्ष देवापाशीही केला असावा की नाही, शंका आहे.

दाही दिवस कोरड्याठक्क असणाऱ्या तिच्या डोळ्यांत ओल आली, तीही अकाली आलेल्या वैधव्यापेक्षा सवतीनं टाकलेल्या विषारी फुत्कारांच्या विषामुळं.
एका हळव्या क्षणी हमसाहमशी रडणाऱ्या सवतीच्या पाठीवर ती हात फिरवू गेली, तशी ती सवत उसळून कडकावडकी भांडू लागली.
“तूच! तूच ती रांड. माझं सूख तुला पाहवलं नाई. त्या दिवशी तूच त्याला काहीतरी खायला घातलं आसन. तालूक्यावरून मी आले तवर तं तो गेला बी. येका शब्दाचं बोलनंसुदीक झालं नाई आमच्यात. त्याला पानीसुदीक मागू दिलं नाई, अशी करनी केली त्वा छिनाले! आता झालं तुझ्या मनासारखं? लय जळत व्हती तू माझ्या सुखाच्या संसारावर. त्यो मला जीव लावीत व्हता, ह्ये तुझ्याच्यानं बघवलं गेलं नाई गं गावजाने… घास घेतला गं तू माझ्या सोन्यासारख्या दादल्याचा…”

बायजानं अविश्वासानं तिच्याकडं पाहीलं. ती छाती पिटत पिटत रडत होती, बायजाला शिव्या देत होती. बायजानं एक पाऊल मागं घेत सासूकडं पाहीलं. सासूनं मानेला विषभरला झटका देत तिसरीकडंच पाहून घेतलं. कधीच मत्सरानं न पाहिलेल्या सवतीच्या मनात एवढं विष कधी, कसं भरलं गेलं, हे तिला कळलंच नाही. ती नकळत मागं मागं चालत गेली. तिथं जमलेल्या आयाबायांच्या नजरेत तिला सहानुभूती दिसत होती. पण तीदेखील तिला भिकाऱ्यापुढं टाकलेल्या शिळ्या भाकरीच्या बुरसटलेल्या तुकड्याप्रमाणे वाटली. तिला या सगळ्याची नक्को आली. ज्या घरात तिनं माप ओलांडलं त्या घराला तिनं शेवटचा नमस्कार केला आणि मळ्यातल्या खोपटात परतली. बाळूजवळ थांबलेला राम आई लवकर घरी आलेली पाहून चमकला. तिच्या लालसर झालेल्या डोळ्यांकडे बघत मौन राहीला.
बायजाची समज तिच्या पुढच्या पिढीत संक्रमित झाली होती…

(क्रमशः)

*

वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता


Medical Professional | + posts

डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :