बायजा १: कूस

bayja-marathi-kadambari-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-dr-kshama-shelar-govardhane-feministic-strivadstriwadi

ब्लड प्रेशर तपासण्याच्या यंत्रातून फक्त रक्ताचा कमी-जास्त दाबच समजतो असं नाही तर समोर पेशंट म्हणून आलेल्या व्यक्तीच्या मनातल्या अगदी आतल्या कप्प्यातली आंदोलनंही जाणवतात. एप्रनच्या आत असलेल्या डॉक्टरी मुखवट्याच्या आतल्या व्यक्तीच्या काळजापर्यंत धडका देतात. काही कहाण्या स्टेथोस्कोपमधून जास्त स्पष्ट ऐकायला येतात. अशीच एक कहाणी बायजाचीही…

तशी तिला तिची कर्मकहाणी इतरांना सांगत बसण्याचा कुठलाच सोस नव्हता आणि तशी गरजही. पेशंटची हिस्ट्री घ्यायचा महत्वाचा भाग म्हणून मग ती मला कळत गेली इतकंच. नाही तर माझ्यासारख्या सर्वस्वी वेगळ्या वातावरणातून आलेल्या एका नवख्या व्यक्तीला तिनं तिच्या काळजातल्या जखमांवरच्या खपल्या का म्हणून दाखवल्या असत्या?

बायजाबाई… जणू जन्मतःच सुरकूत्या घेऊन आलीये असं वाटावं अशी. लहानसर कुडीची, चीरम्हातारी बाई. तिच्या आयुष्याच्या पटातलं मुख्य पात्र म्हणजे ‘दुःख’… हिचा रोल हरकाम्या, साईड हिरोसारखा.

बायजाबाईला कुणी हिरो म्हणतंय हे जर तिला कळालं ना, तर इतक्या आनंदाची, समाधानाची सवय नसल्यानं तिचा प्राण तिची क्षीण कुडी त्यागून केव्हाच पसार होईल. तसंही जगण्यासाठी जी काही ठराविक उद्दिष्टं, साधनं, ध्येयं वगैरे वगैरे लागतात, त्यातलं तिच्याकडं काहीही उरलेलं नाही, एका सशक्त दुःखाशिवाय…

दुःख सशक्त आणि बायजाबाई सुकलेली हे समीकरण अनादी काळापासून असंच असावं, इतकं ते अभिन्न आहे. मी जेव्हा जेव्हा तिला बघितलं तेव्हा तेव्हा दुःख तिच्या पदराला एखाद्या शेमड्या, लोचट पोरासारखं लगटलेलं भासलं आहे. पण फक्त मला भासलं म्हणून ते अभिन्न आहे, असं काही गरजेचं नाही. 

बायजाबाई ‘बायजा’ होती तेव्हापासून तिची गोष्ट सुरू होते. तेव्हा तिच्या आयुष्यातलं हे दुःख नावाचं पात्र काळाच्या गर्भार कुशीत स्वस्थ मुठी चोखत, त्याच्या जन्मवेळेची वाट पाहत होतं.

बायजाच्या आयुष्यात दुःख जन्माला आलं ते वर्तमानाचा पट छिन्नविच्छिन्न करून…

तिच्या बापाचा रक्ताभिषिक्त चेहरा तिच्या डोळ्यासमोरून कित्येक दिवस हलत नव्हता. ज्या घटनेनं तिचं आयुष्य कायमचं बदललं त्या घटनेचं वर्णन ‘एका सालगड्याचा दारूच्या नशेत ओढ्यातल्या खडकावर डोकं आपटून मृत्यू’ अशा अवघ्या एका ओळीत मावलं. तिच्या रांडक्या मायकडं बघून अनेकांना बायजासाठी बापाच्या काळजातल्यासारखा खराखोटा उमाळा दाटून आला. अकरा वर्षाची, वाढत्या अंगाची, निमगोरी बायजा आता उजवून टाकली पाहिजे, असा घोर या सगळ्यांना लागला. एवढ्या भाऊगर्दीत बायजाची माय असून नसल्यासारखी. भाऊबंदही या वयात आलेल्या पोरीचं परस्परच उरकून जाईल तर बरं, अशा दिखाऊ विवंचनेत असलेले.

बापाचे दिवस कार्य उरकल्यावर थोड्याच दिवसांत बायजाची ‘बायजाबाई’ झाली. हीच जगरहाटी असते, असंच चालतं हेच तिला ठाऊक होतं. पर्याय या शब्दाला तिच्या आयुष्याच्या शब्दकोशात समाजानं, तिच्या रांडक्या मायनं आणि स्वतः तिनंही स्थान दिलं नाही.

सोळा वर्षांनी मोठा, बिजवर, राठ नवरा तान्ह्या दुःखाला कडेवर घेऊन तिची वाट पाहत होता.

दुःखाची मूळाक्षरं आधीपासूनच गिरवत असल्यासारखी समजूतदार बायजा पडेल ते काम करत धाडकन अंगावर पडलेला संसार नावाचा उपद्व्याप पैसाभर कुंकवाच्या आणि निळ्या-जांभळ्या व्रणांच्या बदल्यात निमूट करत होती. कधीतरी जलम आला आणि शरीरात काही तरी नवीन रूजलंही. त्या गोष्टीचा ना तिला आनंद होता, ना दुःख. नुसतंच भांबावलेपण…

दिवसरात्र होणाऱ्या उलट्यांनी, उमास्यांनी ती हैराण होऊन गेली. काम तर चुकत नव्हतं आणि ‘मला नाई का पोरंबाळं झाली? पन मला ही असली नाटकं नाई जमली बया कदी’ अशा तिखट टोमण्यांची त्यात भर.

बायजा डोळ्यातल्या न खळणाऱ्या पाण्याच्या साक्षीनं सगळं ऐके आणि उपाशीपोटी कामं रेटत राही. जेव्हा पोट दुखायला लागलं तेव्हा कुणाला सांगता सोय नव्हती. कळ आली की जरा वेळ पोट आवळून बसायचं आणि पुन्हा कामाला लागायचं अशी तिच्या बाळंतवेळेची गाथा.

सरपण फोडता फोडताच तिला अंगातली ताकद गेल्यासारखं वाटलं आणि ती मटकन खाली बसली. लुगडं ओलं झालं होतं. नाळेसहीत अर्धवट बाहेर आलेलं बाळाचं शरीर तिनं हातानं दाबून धरलं आणि कशीबशी घरात शिरली. शुद्ध हरपलेल्या तिला कुणा शेजारणीनं पाणी पाजलं आणि मोकळी केली.

मुलगी झाली होती…

”कार्टीच झाली,”

हे तिनं अर्धवट बेशुद्धीत ऐकलं तेव्हा तिचे डोळे भरून यायच्याही मनस्थितीत राहीले नाहीत. तन, मन जणू बधीर झालं होतं.

मुलगी रोगट, अशक्त होती. सटवाई जेव्हा नशीब लिहायला येते त्याच दिवशी आपल्या भोगवट्याची पाटी कोरी ठेवून ती आल्या रस्त्यानं कायमची निघून गेली.

‘सुटली बिचारी’ असं एकीकडं म्हणत, ‘नाळ वाळेपर्यंतही पोरीनं धीर धरला नाही’ असं चुकचुकत, दुखऱ्या ओटीपोटानं बायजा कामाला लागली. निसर्गनियमानुसार वाहू लागलेले छातीवरचे वत्सल झरे कुठल्या वाळवंटात रिकामे करावे तिला उमजेना.

दुःख बाळसेदार होतं चाललं होतं.

गेलेल्या मुलीच्या पाठीवर दोन वर्षे बायजाची कूस उजवली नाही. दिवसा सासूचे टोमणे आणि रात्री नवऱ्याचे मुलगा होण्यासाठीचे अघोरी प्रयोग… या दुष्टचक्राला सामोरी जाता जाताच कधीतरी ती निबर होत गेली. फाडकन मुस्काटीत खाण्याच्या बदल्यात तेवढेच जहाल शब्द व्याजासहीत परत देऊ लागली. तिला आता सतरावं वरीस लागलं होतं. उमलायच्या आधीच जून झालेली तिची बायकी कळा आता वेगवेगळ्या चाहूलींना ओळखू लागली होती. पुन्हा एकदा तिला उमासे आणि उलट्या सुरू झाल्या. पुन्हा एकदा तिची कूस उजवली होती.

बाळंतपण तिला नवखं राहीलं नव्हतं. कळा यायला सुरूवात झाल्यापासूनच तिनं सूती लुगड्याची फडकी काढून ठेवली. चुलीत लाकडं घातली. पावसाचं पाणी बुळूबुळू गळत होतं. सरपण ओलं झालं होतं. चुलीतून भकाभका धूर निघत होता फक्त… कळा दाबता दाबताच चुलीत फुंकून फुंकून तिची गालफडं दुखून आली. डोळे लाल होऊन गेले. त्यातनं पाणी गळू लागलं. करवादून तिनं फुंकणी फेकून दिली.

झोपडीच्या चांदण्यांतून ठिकठिकाणी पाणी गळत होतं. घडवंचीवर ठेवलेली धान्याची पोती भिजत होती. त्याच आणि घडवंचीवर ठेवलेलं, अर्धवट भिजलेलं गोणपाट टाकून त्यावर तिनं आपली दुखरी पाठ टेकली.

पहिल्या खेपेला देवासारखी धावून आलेली शेजारीण परगावात गेलेली. बाकी माणसं मळ्यात गेलेली. पावसामुळं  मळ्यातच अडकलेली. अर्थात ती असती तरीही त्यांना गृहीत धरण्यात अर्थ नव्हता. कितीतरी वेळ बायजा अर्धवट बेशुद्धीत, ग्लानीत पडून होती.

किती वेळानं कोण जाणे पाऊस थंडावला. वारा सुरूच होता. बायजाच्या कुडामेढीच्या संसारात गिरगिर गिरकी घेत होता. त्या वाऱ्याच्या गिरकीनंच कधी तरी ते सरपण धूपत धूपत पेटलं. त्यावर ठेवलेल्या पितळेच्या ठोक्याच्या पातेल्यातलं पाणी जीव खाऊन कढ घेऊ लागलं. इकडं बायजाही उरला सुरला जीव एकवटून कळा घेतच होती.

अंगात श्वास घ्यायचंही बळ राहीलं नव्हतं. बाहेर पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. दिशा झाकोळून गेल्या होत्या. लांब कुठंतरी थोरामोठ्यांच्या घरचे वीजेचे दिवे टिमटिमत होते. बाकी सगळीकडं अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. तिच्या वस्तीवरची घरटी निर्मनूष्य वाटत होती. आणि अशा भयकारी वातावरणात या सगळ्या भयापासून अनाभिज्ञ असा जीव जन्म घेण्यासाठी तडफडत होता. आतल्या आत गुदमरत होता.

शेवटी एकदाची ती महाकळ आली. तिचं मायांग वेडवाकडं चिरतं तो धपापणारा मांसाचा गोळा बाहेर पडला. श्रमानं बायजाच्या डोळ्यावर झापड येत होती. वार पडल्यावर तिच्या वेदना थंडावल्या. ती घडवंचीवरच्या पोत्याचा आधार घेत जरा बसती झाली. साधी उठून बसण्याची गोष्ट.. पण तिला त्यासाठी शिकस्त करावी लागत होती. तिची नखं पोत्याच्या विणीत घट्ट रूतत गेली. पोत्यानं आ वासला. त्यातून बाजरी बुळूबुळू गळू लागली. थकलेल्या बायजानं जीव एकवटून तान्ह्याला आपल्या मांडीवर घेतलं. पदराच्या ओच्यानं त्याचं अंग पुसलं. तिचा श्वास जड झाला होता. पोटात खड्डा पडल्याचं जाणवत होतं. तिनं ती गळणारी बाजरी आपल्या रक्ताळलेल्या तळव्यात घेऊन त्या सुक्या बाजरीचाच घास घेतला. भूकेमुळं तिच्या जिभेवर अमृत स्त्रवलं होतं. तिनं अधाशासारखे दोन-चार बकणे भरले. तिला हुशारी आली. तिनं प्रेमानं त्या तान्ह्याकडे पाहीलं. त्याच्या चमक नसलेल्या डोळ्यात तिला कुठल्या जन्मीची ओळख दिसली कोण जाणे… तिला पान्हा फुटला. अपार वात्सल्यानं तिनं त्याला छातीशी लावलं. तिच्याच दुधाचे काही थेंब तिनं स्वतःच्या जिभेवरही ठेवले. तिच्या स्वयंपूर्णा होण्याची ती एक पायरीच होती.

मात्र जराशी भानावर आल्यानंतर तिच्या मनात एक दुष्ट शंका चमकली. नुकत्याच निवांत झालेल्या तिच्या काळजाला कुरतडू लागली. तिचं दुध पिता पिता झोपलेलं ते पोर जन्मल्यापासून रडलंच नव्हतं…

(क्रमशः)

*

वाचा
बायजा – पहिल्यापासून

महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता


Medical Professional | + posts

डॉ. क्षमा शेलार या बी.एच्.एम्.एस्. असून ग्रामीण भागामधे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. सोबतच लिहिणं चालू असतं. 'एला' नावाचा कथासंग्रह प्रकाशित आहे. तसेच, दशोराज्ञ नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

3 Comments

  1. Tai nehmi pramane dukhacha ek vegala jabardasta prakar utsukta vadhavat rahato

  2. Vachat astanna te chitra dolyasamor ubhe rahate. Apratim likhan… 😊👌👍

  3. लेखन शैली फार आवडली.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :