स्टँडहून गावातल्या घरी जाईपर्यंत राम-लक्ष्मणातलं अंतर गळून पडलं होतं. एकमेकांच्या सोबतीनं मेंदूतली आठवणींची दालनं भराभर खोलून दिली होती. मग विटीदांडू, खिशातल्या चिंचा-बोरांसोबतच शेतात असणाऱ्या खळ्यावर केलेली मजा, ठोक्याची पितळी अधूली, लोखंडाचा शेर या सगळ्यानं धान्य मापतांना उडालेली त्यावेळची धांदल, खळ्यापसल्या झाडावर खेळलेल्या सूरपारंब्या, विहीरीजवळच्या बाभळीचे भरलेले काटे, कल्हईवाल्याच्या मागोमाग गावभर मारलेल्या चकरा, शेतातच भाजून खाल्लेला हुरडा, बापाच्या बाराबंदीच्या खिशात सापडलेला मोठा काळा विंचू, गावातल्या कित्येक लग्नांच्या वेळी तुराट्याच्या काड्यांनी हाटलेलं बेसन, कुळवावरचा फेरफटका, जोंधळ्याच्या पेंढ्या बैलगाडीतून बाजारला नेताना बाप म्हणायचा ती बैलगाडीत बसून ऐकलेली रानवट गाणी, पांडूनानाच्या ऊसाच्या फडात शिरलेला वाघ, गावातल्या सुभान्याच्या थोट्या पोरीचा विजेच्या तारेला कित्येक दिवस लटकून राहीलेला काळाभंगार हात… हे असलं काय काय त्यांना आठवत गेलं. गावातल्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत दोघेही शाळेतले शेजारी शेजारी गोणपाट घेऊन बसणारे राम-लक्ष्मण झाले होते.
घरात गेल्यानंतर म्हातारी मशेरीमुळं काळ्या पडलेल्या दातांनी तोंडभर हसली. तिनं लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत अलाबला घेतली. क्षणभर थांबून तिनं रामकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले.
“राम्या.. हेंबुड्या.. आरं त्याची पिशी उचलता आली नाई काय तुला? एवढा जड बोजा घरपतवर घेऊन आलं प्वार, आन् तुला एवढं बी सुचू नाई?”
राम ओशाळला. जुन्या गप्पांच्या नादात तो खरंच लक्ष्मणाची पिशवी उचलायचं साफ विसरला होता. त्याला मनापासून अपराधी वाटू लागलं. तेवढ्यात लक्ष्मण पटकन बोलला.
“अगं आजी, इतकं काय चिडतेस त्याच्यावर? काहीही तुझं तर. मी उचलू शकतो की माझं सामान. मी काय म्हातारा नाही झालो अजून.”
लक्ष्मणाच्या ठाम पवित्र्यामुळं म्हातारी एकदम वरमलीच. तिनं पटकन विषय बदलला.
“मी आपलं असंच म्हनत व्हते रं. तुझी आई बरीये का? तुझे तिकडचे आजा, आजी, मामा-मामी सगळे कशेत? तुझा अभ्यास बेस चाललाय ना?”
“सगळे खुशाल आहेत आजी. आईला पण यायचं होतं, पण…”
आजी आणि लाडक्या नातवाच्या कौतुकाच्या गप्पा सुरू झाल्या. या सगळ्या संभाषणात राम कुठंच नव्हता. लक्ष्मणावरची आजीची माया पाहून त्याला लक्ष्मणाचा दुस्वास वाटत नव्हता. उलट लक्ष्मण आहेच त्या प्रेमाला लायक आणि त्याचा अधिकारच आहे तो, असंच त्याला वर्षानुवर्षांच्या दुजाभावामुळं वाटत आलं होतं.
म्हातारीची गाठ घेऊन ही दुक्कल मळ्यातल्या घराकडं वळली. गावातून मळ्याकडं जाण्याचा रस्ता विलक्षण वेगानं कापला गेला. मळ्यातल्या घराला लक्ष्मणाचे पाय लागले तेव्हा तर आपलं घर श्रीमंत झालं की लक्ष्मण गरीब, हे कोडं रामला सुटलं नाही. बायजानं त्याच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. कौतुकानं रांधलेलं त्याच्या पानात वाढलं. बायजाईच्या रांधण्याची वाहवा करीत मोठ्या आनंदानं लक्ष्मण भरपेट जेवला.
पण त्या आनंदापेक्षाही बायजा सुखावली, जेव्हा लक्ष्मणानं आल्या आल्या बाळूजवळ जाऊन त्याची जराही किळस न करता ‘काय दादा, कसा आहेस?’ विचारलं तेव्हा. बाळूविषयी कुठलाही किंतू न ठेवता निखळ प्रेमानं बोलणारा लक्ष्मण पहिली व्यक्ती होता. तिचं काळीज सुपाएवढं झालं होतं.
जेवणानंतर घरासमोरच्या सारवलेल्या ओट्यावर बसलेले असताना लक्ष्मण म्हणाला,
“राम, तू एकदा तालूक्याला ये. मॅट्रिकची परीक्षा देता नाही आली म्हणून काय झालं? फायनल पास तर आहेस ना? तुला शिक्षकाची नोकरी सहज मिळेल. तू एकदा ये फक्त. मी माझ्या शिक्षकांशी तुझी ओळख करून देतो. नोकरी करता करता शिक्षण करता येतंय का, हे ही बघुयात आपण. पगार सुरूवातीला कमी मिळेल, पण आत्ताच्या परिस्थितीपेक्षा तर बरंच आहे.”
“आता लय दिस झाले रं अभ्यासाची सवय नाई राह्यली. जमंल का मला मास्तरकी करायला?”
“अलबत! मी आहे ना, मी शिकवीन की सगळं तुला.”
लक्ष्मण सहजभावानं बोलला. राम हरखला होता. सुखाच्या दिवसांची चाहूल खुणावत होती. राम-लक्ष्मणाच्या हसऱ्या गप्पांमुळं घराची काजळी झटकली जात होती.
बायजाचे डोळे निवत होते. काळजाची काहिली कमी झाली होती. या अचानक वाढून आलेल्या सुखाचा घास तिला गिळवत नव्हता. घशात आवंढा दाटून आला होता.
दुःख तिच्या ओळखीचं होतं पण सुखासमोर तिला कसं वागायचं कळेना झालं होतं. या सुखाला कुणाची नजर न लागो, असं ती सारखं चिंतत होती. नियती तिचं कितपत ऐकणार होती कोण जाणे?
“राम, किती नशिबवान आहेस रे तू? इथल्या एवढ्या छान, प्रसन्न वातावरणात रहायला मिळतंय तुला,” लक्ष्मण म्हणत होता.
ओट्यावर सुपानं जोंधळा पाखडणारी बायजा म्हणाली,
“आरं, मग येत जायचं की गावाला. यायचं, रहायचं चार-दोन दिवस… तेवढाच तुझ्या जिवाला इसावा.”
“हो मोठ्याई! आता गावातल्या घराचं बांधकाम काढलं की, यावंच लागेल मला वरचेवर. पण तरीही तुला सांगतो मोठ्याई, गावातल्यापेक्षाही इथं मळ्यात फार आवडलं मला. किती छान मोकळी हवा, लांबलांबवर कुठं घरांची गर्दी नाही. नुसतं हिरवं शिवार आहे आणि मोठी मोठी डेरेदार झाडं… वाह!”
“चल मग आपून येऊ की जरा फेरफटका मारून मळ्यातून. बांधावरच्या चिचाच्या झाडाखाली तर लय भारी वाटतंय दुपारचं,” राम उत्साहानं म्हणाला.
“आरं, आता कुठं जाताय पोरांनो? जेवल्यावर जरासं आडवं पडा. मंग संध्याकाळच्याला जा मळ्यात. गरम झाल्यावानी व्हतंय. लांब डोंगरावर गरजतंय. आपल्याकडं बी पाऊस येईन एखांद्या टायमाला.”
“आगं आये, वारं वरल्या अंगानं हाये. आपल्याकडं नाई पडायचा पाऊस. निसताच भ्येव दाखिवतोय तो.”
“नको काळजी करू मोठ्याई. पावसाचं चिन्ह दिसलं की मी लगेच घेऊन येतो रामला घरी. तू काळजी नको करू.”
बायजा काही बोलली नाही. वयात आलेली ती दोन्ही पोरं शेळीच्या करडांसारखी इकडून तिकडं हुंदडायला उतावीळ झाली होती. दावणीला बांधलेल्या मायचा जीव मात्र कासावीस होत होता.
सारवलेल्या ओट्याच्या निघालेल्या शेणाच्या पोपड्यातून काळ्या पाठीच्या मुंग्यांची रांग बाहेर निघाली होती. त्यांना नाजूक असे बाळपंख फुटले होते.
माय म्हनायची, ‘घरात या मुंग्या निघालेलं चांगलं नसतंय.’ बायजाला कधीच्या काळची आठवण जागी झाली.
पावसाळा लागलाय त्यांना बी नको का दानापानी? असं म्हणून तिनं मनातून हा कुशंकेचा इच्चू नांगीसहीत उखडून फेकला आणि मघाशी पाखडलेला जोंधळा उफणायला घेतला. ओट्यावर भुरूभुरू वारा लागत होता. जोंधळ्यातल्या बणग्या, काडी, कचरा सगळा वाऱ्यावर उडून जात होता.
“रामा तुझं नाव
जनू गुळावानी ग्वाड गं सईबाई..
जनू गुळावानी ग्वाड
बाई ग्वाड गं ग्वाड
बाई ग्वाड
लागून गेलं माझ्या आत्म्याला याड
बाई याड गं याड
बाई याड…”
बायजाच्या गोड गळ्यातल्या गाण्यांच्या साथीनं जोंधळा निर्मळ होत होता. मळ्यातल्या विहिरीवरचा रहाट कुंई कुंई वाजत होता. रामनं पाणी शेंदून काढलं. दोघांनी मळ्यातल्या चिखलानं भरलेले आपले पाय धुतले. लक्ष्मणानं पायताणं विहीरीवरच टाकली. राम तर अनवाणीच होता. दोघंही रमतगमत रानवाटा तुडवत निघाले. ऊन-सावलीचा खेळ सुरूच होता. नुकत्यात उगवलेल्या ताज्या गवताचा, रानफुलांचा, पानांचा, आमराईतल्या आंब्यांचा आणि पावसाचा मातकट ओला गंध एकत्र होऊन एक हवाहवासा रानवट गंध निर्माण झाला होता. रामला त्याचं फार विशेष वाटत नसलं तरी लक्ष्मण मात्र ती हवा छातीत भरून श्वास घेत होता.
“अहाहा! किती प्रसन्न वाटतंय इथे. राम आपण असं करू…”
राम लक्षपूर्वक ऐकत होता.
“आपण आपलं शिक्षण, नोकरी वगैरेची तजवीज झाली की आपल्या शेतीला कसं अजून चांगल्या पद्धतीनं पिकवता येतंय का, ते बघूयात. विदेशात बैलांऐवजी यंत्रानं नांगरणी करतात. आपल्याकडंही काही ठिकाणी आलीत ती यंत्रं. आपण अशी आधुनिक पद्धतीनं शेती करू आणि उत्पन्न वाढलं की इथं मळ्यातच एखादी टुमदार बंगली बांधू. मला आवडेल इथं कायमचं रहायला. इथं भारी मौज आहे. शहरात जीव गुदमरतो रे. इथून मागं जे झालं ते झालं, पण आता आपण सगळे एकत्र राहूया. किती बहार येईल बघ.”
राम विस्फारल्या डोळ्यांनी ऐकत होता. लक्ष्मण त्याच्या डोळ्यांत अलगद एक एक स्वप्न ठेवत होता. हे सगळं खरंच शक्य आहे? अशी शंका मनात असली तरीही ती सगळी निरागस स्वप्नं पाहणं, त्यांसंबंधी ऐकत राहणंही रामला रम्य वाटत होतं. हा वेळ संपूच नये आणि घराकडं परत जाऊच नये, असं त्याला वाटत होतं.
(क्रमशः)
*
वाचा
बायजा – पहिल्यापासून
महाडचे दिवस (कादंबरी)
कथा
चित्रकथा
कविता
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!