सौजन्य: http://crowkakaills.blogspot.com/
ही कथा आहे, नंदू अय्यंगारची. नंदू राहणार मूळचा तमिळनाडूचा. नंदूनं शिकून खूप मोठा माणूस व्हावं, ही माफक अपेक्षा त्याच्या आईची असते. आपलं आणि आपल्या इतर मुलांचं शिक्षण नाही झालं पण आपल्या नंदूनं भरपूर शिकावं, ही मनोमन इच्छा त्याची आई बाळगून असते. पण त्याच्या वडिलांचे त्याच्याबद्दल असणारे विचार वेगळे असतात. तमिळनाडूमध्ये त्यांचं एक छोटंसं उडपी हॉटेल असतं. हॉटेलचा गल्लाही तसा चांगला. नंदूला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ असतो. ते सर्व राहायला नाशिकला. ते तिघं तिथं इडलीचा व्यवसाय करतात. दोन्ही बहिणी इडली, उत्तपा बनवून देतात आणि त्यांचा मोठा भाऊ राजू ते दारोदारी जाऊन विकतो, असा त्यांचा रोजचा दिनक्रम. आपला मुलगाही नाशिकला जाऊन आपल्या इतर तीन मुलांना या कामात मदत करेल आणि व्यवसाय वाढवेल, ही वडिलांची अपेक्षा असते. तरीही, नंदूची आई त्याचं नाव शाळेत घालते आणि त्याला शाळेत पाठवते.
शाळेत पहिल्याच दिवशी नंदू रमू लागतो. आपला मुलगा घरी नाही, हे पाहून नंदूच्या वडिलांचा पारा चढतो आणि ते नंदूच्या आईला मारहाण करतात. तो शाळेत गेल्याचं समजल्यावर ते त्याच्या शाळेत जाऊन शिक्षिकेसमोर त्याचा शर्ट धरून खेचत त्याला शाळेबाहेर काढतात. हा सर्व प्रकार त्याच्या वर्गशिक्षिका मुख्याध्यापकांना सांगतात. पण त्या दोघांच्याही बोलण्याला नंदूचे वडील भीक घालत नाहीत. ते नंदूला घरापर्यंत मारत मारत आणतात. आई मधे पडते पण तिलाही ते ढकलून देतात. तत्काळ त्याला रेल्वे स्टेशनवर आणतात. दोन तिकिटं काढून नाशिकला घेऊन येतात. नंदू आता तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करेल, असं त्याच्या भाऊ-बहिणींना सांगतात आणि त्यांचा निरोप घेतात. आपण नाही शिकलो पण आपल्या लहानग्या भावानं शिकावं, ही त्यांचीही अपेक्षा असतेच, पण आपल्या वडिलांसमोर तेही हतबल असतात.
नंदू मग रोज सकाळी नाशिक परिसरात घरापासून ३ किलोमीटर अंतरावर इडली विकण्यासाठी जाऊ लागतो. त्याचं वय पाहून लोकही सहानुभूतीनं त्याच्याकडून रोज इडली घेऊ लागतात. संपूर्ण परिसरात साधारण तीन तास पायपीट करून त्याच्याकडच्या सर्व इडल्या व इतर उडपी पदार्थ खपू लागतात. दिवसाला रोजचे हजार रुपये कमावणारा नंदू मग या व्यवसायात हळूहळू रुळू लागतो. शिक्षण करायची आता काही गरज नाही, हे त्यालाही मनोमन वाटू लागतं. त्याचा रोजचा दिनक्रम असाच चालू असतो. पण एक दिवस असाच तो रोजच्या ठरलेल्या परिसरात इडली घेऊन जात असतो आणि अचानक काही टवाळखोर मुलं त्याच्या जवळ येतात. त्याला इडलीची ऑर्डर देतात. १०-१२ जणांचा हा ग्रुप सर्व खाद्य पदार्थ फस्त करतात. आपल्याकडील सर्व पदार्थ संपल्यानं नंदूदेखील जाम खुश होतो.
“साहाब, पैसे?” असं म्हंटल्यावर ती मुलं जोरजोरात हसू लागतात.
“कैसे पैसे बे? चल निकल अपना रास्ता नाप…”
त्या ग्रुपमधला म्होरक्या रवी त्याच्यावर डाफरतो.
नंदू – “साहाब, क्या मजाक करते हो गरीब का? दे दो ना पैसे?”
रवी – “गरीब और तू? मन्या, याचे खिशे चेक कर रे…”
मन्या – “भाऊ, पंटर सॉलिड मजाक करतोय. हजार रुपये आहेत, याच्या खिशात. कसला हा गरीब? येड्यात काढतोय आपल्याला…”
असं म्हणत मन्या नंदूच्या खिशातले पैसे काढून रवीच्या हातात देतो.
रवी – “चला, आज आपल्या दारूची सोय झाली.”
सर्वजण त्याच्याकडं बघून हसायला लागतात.
“चला, निघुया आता. ते फाट्यावर कुठलं नवीन हॉटेल सुरू झालंय रे? चला, आज तिकडं जायचंय आपल्याला…” पुन्हा ते त्याला डिवचून जोरजोरात हसू लागतात.
नंदू – “भिकारी हो तुम लोग. ये पैसा हजम नहीं होगा तुम्हे, देख लेना.”
रवी – “ए अण्णा, काय बोललास? याला जास्त चरबी चढलीये वाटतं, मारा रे याला…”
नंदूला त्यातले दोन-चार जण प्रचंड मारहाण करतात. त्यातला तो रवी तर नंदूला पट्ट्यानं अमानुषपणे मारहाण करतो. हा सर्व प्रकार बघून तिथला एक गॅरेज मालक मिलिंद नंदूच्या मदतीला धावून जातो, पण ती गँग त्यालाही प्रचंड मारहाण करते. लोक फक्त बघ्याची भूमिका घेत हा तमाशा पाहत असतात. त्या दोघांना प्रचंड मारहाण करून ती गँग तिथून पसार होते.
मिलिंद नंदू जवळ जातो आणि त्याची विचारपूस करतो, पण घाबरलेला नंदू काहीच बोलत नाही.
मिलिंद – “चल, मैं तुझे घर छोड देता हूं…”
नंदू मान डोलावून नकार देतो. “मैं चला जाऊंगा” म्हणत स्वत: जवळ असलेलं सगळं सामान तिथंच टाकून तिथून निघून जातो.
२-३ दिवस जातात, पण नंदू त्या परिसरात दिसत नाही. मिलिंदला त्याची काळजी वाटते. नंदू हरवल्याची तक्रार करायला, तो पोलिसांमधे जाणारच असतो. पण नंदूचा शोध घेत घेत नंदूचा भाऊ त्या परिसरात येतो. तिथं तो मिलिंदला भेटतो. मिलिंदकडून घडलेला सर्व प्रकार समजल्यावर तो नंदूबद्दल आणि त्या टवाळखोर मुलांबद्दल विचारपूस करतो, पण ती मुलं पळून गेलेली असल्यानं त्यांना ती सापडत नाहीत. भावाचा काही थांगपत्ता लागत नाही, त्यामुळं काहीसा हताश होऊन नंदूचा भाऊ घरी येतो. तोच त्याला आईचा फोन येतो आणि नंदू इकडं घरी आलाय, हे आई त्याला कळवते.
*
(फ्लॅशबॅक)
नंदू रडत रडत रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहचतो. त्याला रडताना बघून तिथले काही रेल्वे अधिकारी त्याची विचारपूस करतात. त्याची सर्व हकीकत ऐकून घेतल्यावर त्यांना नंदूची दया येते आणि स्वखर्चानं ते त्याला घरी तमिळनाडूला पोहचवतात. त्याची ही अवस्था पाहून, त्याच्या बाबतीत घडलेला हा प्रकार ऐकून त्याच्या आई-वडिलांना अश्रू अनावर होते.
वडील – “मैं गलत था? मेरे बच्चे को सिखना मांगता था. मैंने उसे घर के बाहर छोड के गलती की.”
आपल्या पतीला झालेला पश्चाताप पाहून नंदूची आईदेखील जोरजोरात रडू लागते,
“नहीं, अब मेरा बच्चा पढ-लिख के बडा आदमी बनेगा. मैं कलही उसका नाम स्कूल में दर्ज करता हूं.”
हे ऐकून नंदू तत्काळ आपल्या आईला कडकडून मिठी मारतो. आई आपल्या पदरानं त्याचे डोळे पुसते.
नंदूचा शाळेचा पहिला दिवस. नंदू आनंदानं वर्गात ‘ए बी सी डी’चे धडे गिरवत असतो. त्याचे आई आणि वडील दोघंही खिडकीतून त्याला चोरून बघत असतात.
“अब मेरा लडका बडा हो के हॉटेल मॅनेजमेंट करेगा और लंडन में जा के इडली बेचेगा” वडील गंमतीत म्हणतात.
“क्या आप भी.. इडली के सिवाय कुछ दिखता है क्या आप को?”
“चलो, घर चलो. बोहोत सारे काम पडे हैं, निकलते है..” असं म्हणत ते एकमेकांकडं पाहून हसतात आणि घराची वाट धरतात.
*
वाचा
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कविता
लेखक आशिष कोकरे हे मुक्त पत्रकार असून नाशिक येथे वास्तव्यास आहेत.