२६ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला ६ मार्च २०२१ रोजी १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त २ मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाने सिंघू सीमेवर एक सर्वसाधारण बैठक आयोजित केली होती. या बैठकीला किसान सभेच्या वतीने सरचिटणीस हन्नन मोल्ला, कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, पंजाबचे राज्य सेक्रेटरी मेजर सिंग पुन्नेवाल आणि हरियाणाचे उपाध्यक्ष इंदरजित सिंग हजर होते. येत्या काळात पुढील आंदोलने करण्याचा निर्णय या बैठकीत झाला:
आगामी आंदोलने
दिल्लीच्या वेशीवर सुरू झालेल्या या आंदोलनाला ६ मार्चला १०० दिवस पूर्ण होतील. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिल्लीभोवती केएमपी द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी ५ तास रस्ता रोको करण्यात येणार आहे. त्या दिवशी येथील सगळे टोल नाकेदेखील टोलमुक्त करण्यात येणार आहेत. बाकी देशभरात या दिवशी आपापल्या घरांवर आणि कार्यालयांवर काळे झेंडे लावून शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि केंद्र सरकारला विरोध दर्शवण्यात येणार आहे. त्या दिवशी सर्व आंदोलकांनी देखील स्वतः काळ्या फिती लावाव्यात, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.
८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन महिला किसान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी दिल्लीच्या सर्व सीमांवर अधिकाधिक महिला उपस्थित असतील, तसेच व्यासपीठ पूर्णपणे महिलांच्याच ताब्यात असेल आणि सबंध दिवसाच्या वक्त्या देखील महिलाच असतील. ८ मार्च रोजी अधिकाधिक महिला संघटनांनी येऊन शेतकरी आंदोलनाला समर्थन द्यावे आणि देशातील शेतीत महिलांचा असलेला वाटा अधोरेखित करावा, असेही आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.
१५ मार्च रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटना ‘खाजगीकरण विरोधी दिन’ साजरा करणार आहेत. मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्राच्या खाजगीकरणाला वेग दिला असून आत्मनिर्भरतेच्या नावाखाली संपूर्ण देशच विकायला काढला आहे. त्यांच्या सोबतीने संयुक्त किसान मोर्चाने देखील देशभर ‘कॉर्पोरेट विरोधी दिन’ आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
काही राज्यांत आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या राज्यांत संयुक्त किसान मोर्चा प्रचारसभा आणि इतर कार्यक्रमांत सहभाग घेऊन शेतकरीविरोधी आणि गरीबविरोधी धोरणे राबवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धडा शिकवा, असे आवाहन करणार आहे.
देशभरात आता संयुक्त किसान मोर्चा “एमएसपी दिलाओ अभियान” सुरू करणार आहे. मोदी सरकारने स्वतःच दिलेल्या हमीभावाच्या आश्वासनाला कसा हरताळ फासला हे लोकांना पटवून देण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणच्या बाजारांत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्यक्ष भावाची माहिती त्यांना या मोहिमेत दिली जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दक्षिणेकडील राज्यांपासून केली जाईल. देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यांत लाखो शेतकऱ्यांच्या महापंचायती अविरतपणे होत आहेत. त्यांना एसकेएमच्या नेत्यांसोबत किसान सभेचे नेतेही संबोधित करीत आहेत. या महापंचायतीतून सर्व हिंदी भाषिक राज्यांत मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे धिंडवडे निघत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, रास्त हमीभाव कायदा व्हावा या मागण्यांसोबतच पेट्रोल-डिझेल-गॅसची प्रचंड दरवाढ, अख्खा देश देशीविदेशी कॉर्पोरेटसना विकून झपाट्याने होणाऱ्या खाजगीकरणाला विरोध हे ज्वलंत प्रश्नही उचलले जात आहेत.
नोदीप कौर आणि शिव कुमार यांच्यावरील धक्कादायक हल्ले
गेल्या आठवड्यात याच स्तंभात आपण दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला झालेल्या अटक आणि सुटकेबद्दल लिहिले होते. त्यानंतर २४ वर्षाच्या नोदीप कौर या दलित तरुणीला तब्बल दीड महिना तुरुंगात ठेऊन पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतर आता जामीनावर सोडण्यात आले. सुटका झाल्यानंतर लगेच मजदूर अधिकार संघटनेच्या या कार्यकर्तीने सिंघू सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलनाला पुन्हा जोरदार समर्थन दिले आणि १२ जानेवारीला म्हणजे अटक होण्यापूर्वी ती ज्या कामगारांसाठी लढत होती त्या आंदोलनात पुन्हा उतरली. शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सर्व सीमांवर जाऊन तिने आपले तुरुंगातील भयंकर अनुभव सांगितले आणि हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. केवढे धैर्य आहे हे!
तिच्याच संघटनेत काम करणाऱ्या २४ वर्षीय शिव कुमार या दलित तरुणाला देखील १६ जानेवारीला अटक करण्यात आली. अजूनही त्याची सुटका झालेली नाही. तुरुंगात पोलीस करीत असलेल्या त्याच्या छळाची बातमी २५ फेब्रुवारीला ‘इंडियन एक्सप्रेस’ने सविस्तर प्रसिद्ध केली आहे.
या बातमीची सुरुवातच अशी: “चंदिगढच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलने बुधवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, मजदूर अधिकार संघटनेच्या शिव कुमार या २४ वर्षीय तरुणाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. डावा हात आणि उजवा पाय या दोन ठिकाणी शस्त्राने मार लागल्यामुळे फ्रॅक्चर झाले आहे. या जखमा दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या आहेत.”
त्या बातमीतील पुढील माहिती तर अधिक धक्कादायक आहे, ती अशी: “या प्रकरणातील अहवाल असे सांगतो की पोलिसांनी शिव कुमारचे दोन्ही पाय बांधून त्याला जमिनीवर पाडले आणि नंतर टाचांवर मार दिला. त्याच्या उजव्या पायाचे दुसरे, तिसरे आणि शेवटचे नख पोलिसांनी अक्षरशः ओरबाडून काढले. डाव्या पायाच्या अंगठ्याचे नख काळे-निळे झाले आहे. त्याच्या पार्श्वभागावर प्रचंड लाठीमार केला आणि नंतर दोन्ही पाय सरळ ठेवून त्याला जमिनीवर आडवे पाडले, दोन्ही हात आणि पाय बांधले. दोन पोलिसांनी मिळून त्याच्या मांड्यांवर धातूचा रॉड अक्षरशः फिरवला. दोन्ही हात, तळवे आणि डोक्याच्या मागच्या बाजुला देखील त्याला खूप मार लागला आहे. तब्बल तीन दिवस त्याला झोपू दिले नाही. त्याची जबानी घेताना त्याला सहकाऱ्यांची नावे मागण्यात आली. त्याने नकार देताच खुर्चीला बांधून ठेवून त्याच्या डोक्यावर पाणी ओतण्यात आले.”
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसच्या सरकारचा हा खरा आणि भेसूर चेहरा आहे. आणि त्याच्या विरोधात लढणाऱ्या कामगार आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना ते अशी अत्यंत क्रूर वागणूक देत आहेत. दुर्दैवाने आज अनेक न्यायालयांनी सुद्धा अशा कित्येक नोदीप कौर आणि शिव कुमारांना अनेक महिने तुरुंगात पोलिसी अत्याचाराला तोंड देत खितपत पडू दिले आहे.
दुसरीकडे या भाजप-आरएसएस सरकारला नरेंद्र मोदी यांच्या हयातीतच अहमदाबादच्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात लाज वाटत नाही. क्रूरकर्मा अडॉल्फ हिटलर याने देखील जिवंत असताना अशाच प्रकारे जर्मनीतील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमला स्वतःचे नाव दिले होते, हा केवळ योगायोग नक्कीच नाही!
– डॉ. अशोक ढवळे
अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा
***
सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.
जीवनमार्ग बुलेटिन : २२३
शुक्रवार, ५ मार्च २०२१
संपादक: उदय नारकर
वाचा
डॉ. अशोक ढवळे यांचे लेख
जीवनमार्ग
आज दिनांक
कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी