विज्ञान कथा अजूनपर्यंत कधीच वाचल्या नव्हत्या. अर्थात, वाचनाच्या बाबतीत आपला एक कल असतो आणि त्यानुसारच आपण वाचत जातो. मागील आठवड्यात ‘सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस’ हा क्षितीज देसाई लिखित कथासंग्रह वाचला आणि आपण आपल्या कलाच्या पलीकडं जाणं हेही किती आनंददायी असू शकतं, हे समजलं.
खरंतर, नवोदितांचं लिखाण वाचण्यात वेगळाच इंटरेस्ट असतो. त्यात या पुस्तकाचं नावही इंटरेस्टिंग आणि कुतूहल चाळवणारं वाटलं. कथासंग्रह मागवला आणि वाचायला सुरुवात केली, तर वाचतच गेलो. हा माझ्यासाठी एक सुखद धक्काच होता.
पहिलीच शीर्षक कथा मला भन्नाट आवडली. काही हजार वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट. एका स्वप्नाळू व धडपड्या तरुणाची. यातला निवेदक त्या काळातील एक छोटा मुलगा आहे. त्या काळातील भाषा अर्थातच वेगळी असणार. मग लेखकानं वर्तमानातल्या वाचकाला समोर ठेवून परंतु त्या काळालाही न्याय देऊन कथा ज्या शब्दात मांडली आहे, ते शब्द खास आहेत. त्यासाठीची लेखकाची मेहनत ठळकपणे दिसून येते. कथानक कमालीचं सुंदर आहे.
पुढच्या ‘बोका बोले तो’, ‘तुझो माझो पिझो’, ‘गळ्यात साखळी सोन्याची’, ‘चोराच्या मनात चेक इन’ या चार कथांमध्ये विज्ञान कथा आणि शोध कथा यांचं मिश्रण आहे. एक तरुण पोलीस आणि त्याला मदत करणारी कॉलेज तरूणी हे दोघे मिळून गावातील वेगवेगळ्या चोऱ्या करणाऱ्या चोरांना कशा प्रकारे पकडतात, असं हे कथानक आहे. ‘माझा पॅराडॉक्स’ ही कथा टाईम ट्रॅव्हल या कन्सेप्टवर आधारलेली आहे. कथेचा प्लॉट मस्त आहे. मला ही कथा वाचताना ‘डार्क’ या वेबसिरीजची आठवण आली. ‘म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे’ या कथेत थ्रिल एलिमेंट आहे. वाघांवर प्रयोग करणारा एक संशोधक आपल्या साथी संशोधकाचा सूड घेण्यासाठी कोणत्या थराला जातो आणि त्यातून कोणतं संकट उभं राहतं, हे या कथेतून कळतं. ‘काळ थांबत नाही’ कथेचं कथाबीज खूप छान आहे. भूतकाळात जाऊन एका संशोधकाच्या धारणा तो संशोधक होण्याआधीच बदलायच्या आणि त्याला त्याच्या संशोधनापासून दूर ठेवायचं, यासाठी एक तरुण आणि तरुणी प्रयत्नशील असतात. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतो का, हे कथा वाचल्यावरच समजतं. शेवटच्या ‘माय भूमी’ कथेत पृथ्वीचं भविष्य आणि त्या अनुषंगानं घडणारी स्थित्यंतरं यावर एका तरुण संशोधिकेनं तिच्या आयुष्यात घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय, असं हे कथानक आहे.
कथासंग्रहातल्या आठही कथा या लघुकथा आहेत. कथा सुटसुटीत व समजायला सोप्या आहेत. कंटाळवाण्या तर अजिबात वाटत नाहीत. प्रसंग, संवाद हे आटोपशीर आहेत. भाषा साधी व सिंपल असली, तरीही वाचकांना एंगेज ठेवणारी आहे. माझ्या मते, कथानकं जर अजून गुंतागुंतीची असली असती तर वाचायला आणखीच मजा आली असती.
मानवी आयुष्यात विज्ञानाचं असलेलं महत्त्व या कथांमधून अधोरेखित झालं आहे. पहिलीच कथा विज्ञानामुळं मानव कसा पुढे गेला, हे मांडते. इतर कथांमध्ये माणूस त्याच्या विवेकानुसार विज्ञानाचा वापर चांगल्या वाईट प्रकारे कसा करू शकतो/करतो, ते दिसतं. त्याचबरोबर निसर्ग, पर्यावरण यांच्या संवर्धनाचं भान शेवटच्या कथेत जाणवतं.
विज्ञान कथा म्हणून या कथांची गुणवत्ता काय आहे, हे मी सांगू शकत नाही. या कथा प्रामुख्यानं किशोरवयीन मुलांना समोर ठेवून लिहिल्या गेल्या आहेत. पण ब्लर्बवर म्हंटल्याप्रमाणं या कथा प्रौढांनी वाचल्या तरीही ज्ञान आणि आनंद हमखास मिळेल. माझ्याही बाबतीत हेच झालं आहे.
नक्की वाचा.
विज्ञान कथासंग्रह – सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस
लेखक – क्षितिज देसाई
प्रकाशक – अक्षर मानव प्रकाशन
*
वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
भारत निलख यांची 'प्रेमक्रांती' ही कादंबरी प्रकाशित आहे. २०१९ साली 'शब्दायण' या खास नवोदितांचं लेखन असलेल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन आणि संपादन त्यांनी केलेलं असून अक्षरधारा पुस्तक विक्री केंद्र (पुणे), स्टेप अप फाऊंडेशन (पुणे), स्वयंसेवी संस्थेत समुपदेशन, बाल न्यायालय (पुणे) येथे समुपदेशन असा त्यांचा कामाचा अनुभव आहे.