मन्सूर माझा वर्गमित्र. लहानपणापासूनची आमची मैत्री. का कोण जाणे, मला वर्गात मन्सूरचा स्वभाव खुप आवडे. नेहमी हसतमुख. कुणाशीही त्याची लगेच मैत्री होई. उर्दू शाळा त्याच्या घराजवळ होती. त्याचं घर गावाच्या अगदी मध्यभागी. उंबऱ्याशेजारी सगळीकडूनचे रस्ते त्यांच्याच दारावरून जातात. घर मोठेच्या मोठे, मोठी हवेलीच. दगडी चौकटी, उंबरा सारे भक्कम. त्याचे काका, भाऊ हे सारे त्या मोठ्या घरात राहत. मध्यभागी मोठा चौक. चौकात ही सारी मंडळी गोळा होऊन गप्पा चालत. जाता-येता तहान लागली की, त्याच्या अम्मीकडे पाणी मागायचे. नि अम्मी न कंटाळता आम्हाला पाणी द्यायची. कधी ईदचा, गुरूवारचा प्रसाद असेल तर हातावर ठेवलाच. त्याच्या घरातली सारी माणसेही प्रेमळ, संस्कारी. मन्सूरही तसाच. वडिलांसारखाच.
शाळा मात्र त्याचा नावडता विषय. शाळेत यायचे ते वडिलांच्या इच्छेने. नि पोरांच्यात उड्या मारायला मिळते, हुंदडायचे असते हा मात्र त्याचा आवडता छंद. गणितात तर कच्चाच. फळ्यावरील लिहिलेली गणितं सोडवताना हा कोडे सोडवत बसे. सगळ्यांची गणिते तपासायला पाट्या घेऊन बोलवण्याआधी गुरूजी विचारायचे झाले का सर्वांचे? सर्वांचा हात वर. पण याचा हात खालीच. नि मानही खाली.
गुरूजी- “मन्सूर तुझे गणित झाले का?”
मन्सूर- “अभी हुयाच न्हाय.”
गुरूजी- “मग काय करीत बसलास खाली मान घालून?”
मन्सूर- “गणितच करणे लगाय.”
शेजारची पोरं- “नाही वो गुरूजी. तो कोडे सोडवतोय.”
“गणित सोडवल्याशिवाय जेवायला जायाचं नाही.” गुरूजींनी बजावले. मग माझ्या शेजारच्याच ओळीत असल्यामुळे हळूहळू सरकत येऊन माझे बघून गणित उतरवणार.
कविता वाचन, इतिहास, भुगोल तसे चांगलेच. आमचा एक वर्ग विठ्ठल-रखुमाई मंदिरात असे. दुपारी निरव शांततेत गुरूजी कविता म्हणायला लावायचे. मग काय, मन्सूर चांगलाच सुर धरणार. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, आई! हा त्याचा सुर. खरोखर मन्सूर मनापासून नाचत म्हणायचा. इतिहासात सणावळ्या, वंशावळ्या तोंडपाठ. अकबर, बाबर, हुमायून, शेरखान सारे तोंडपाठचे पाठ. सणावळ्यात जन्म-मृत्यू, कारकीर्द यांचे इसवी सन पाठ. कुणाची पहिली पत्नी म्हणजे तो पहिली बीवी, दुसरी बीवी हे सारे अचुक सांगणार. विज्ञानात वनस्पतीचे अवयव झाडाचे शेपच शाळेत आणून प्रात्यक्षिक दाखवणार.
मी- “मन्सूर तुला लई मार्क मिळणार.”
मन्सूर- “वो कैसे? यत्ता करे वत्ताच, यत्ता करे वत्ताच.
शाळा सुटताच सायकलवरून गावातून दोन राऊंड मारून मग दर्ग्यावर खेळायला हजर. सारे खेळ अटी-तटीवर येऊन खेळून, पडून, उठून, पळून झाल्यावर चिंचेच्या झाडावर चिंचा काढायला चढलाच.
मन्सूर- “ये सुलचना तुला कितनी इमली पाहिजे?”
दोन खिसे भरून खाली उतरून चिंचा दिल्याच. आता बुंध्यावर होता तोवर शेंड्यावर चढलाच. एवढ्या डेरेदार झाडावर तो कुठे दिसतो, हे शोधायचे.
अम्मी- “मन्सूर बेटा ज्वारी पिसके लावो.”
मन्सूर- “आया मां, लावो पिसके लाताव.”
पीठाचा डबा झाडाच्या बुंध्यात ठेवून मन्सूर गाभूळ्या चिंचा काढायला वर चढला. वर वर शेंड्यापर्यंत गेला. भरपूर चिंचा काढल्या. तोपर्यंत खुप वेळा झाला म्हणून अम्मी शोधायला आली. आणखीनच वर चढत तो पानाआड लपला. अम्मीला डबा दिसताच ती घरी घेऊन गेली. अम्मी म्हणाली,
“तु घर आ. तुझे धपाटे खिलाती हूं…
मन्सूरला खेळायचे मैदान मोकळेच. शर्ट, टोपी, खाकी चड्डी कधी विजार असा पोशाख. नि कायम गळ्यात रुमाल. हातातनं रुमाल उडवत सायकल पळवणार. नि जाता-जाता घोषणा “आवरे आव पुस्तक पे शिक्का लगाव, आवरे आव सायकल पे शिक्का लगाव। मेरे सायकल के पीछे पीछे आव” निवडणूकीच्या प्रचाराची गाडीही मागून आलीच. मग तर त्याला जास्तच चेव यायचा. सायकली, गाड्या यांच्या पुढेच मन्सूरची सायकल. दर्ग्यापुढे गाड्या नमस्कार करायला थांबल्या की, हा आलाचा कापूर, साखर उद घेऊन दर्ग्यात लावायला. शब्बीर हा त्याचा मित्र. त्याचे घरही जवळच. मग तो लगेच धावतच येई.
शब्बीर- “अरे वो मन्सूरभाई, क्या करने लगे? चल तो खेतमे…”
मन्सूर- “कायकू खेतमे? मै अभी अभी आया हूं आब्बा को खाना देके.”
शब्बीर- “अरे बकरी को चराना है ना? चलना.”
मन्सूर- “ठैर जरा, दर्गा बंद करके आता हूं.”
दर्गा बंद करून मन्सूर व शब्बीर बकऱ्या चारायला नागझरीच्या कुरणात गेले. नागझरी हा खोल दरीसारखा भाग. त्याच्याभोवती झाडांची, गवताची गर्दीच गर्दी. कुणी तिकडे फिरकत नसे. पण मन्सूरचे हे आवडते ठिकाण. वगळीतले खेकडे, मासे पकडायचे हा त्याचा छंद. खेकड्याच्या बिळात हात घालून तो मासे पकडण्यात मग्न झाला. त्याला शेळ्यांचे भान नव्हते. शब्बीरही त्याला मदतच करीत होता.
शब्बीर- “मन्सूरभाई, तुम मासे पकडो मैं शेळ्या देखतू.”
शब्बीर शेळ्या शोधायला गेला. तोवर शेळ्या लांब-लांब चरत तासगावाकडे वळल्या होत्या. त्याला शेळ्या कुठेच दिसेनात. “अरे चल तो मन्सूरभाई, बकऱ्या इधर नहीच है” शब्बीर म्हणाला. मन्सूरची सायकल झाडाला टेकवलेली होतीच. तो टांग मारून सायकलवर बसला. मागे शब्बीरला बसवले, “ये चिमे, शम्मो, कमे” असे शेळ्यांना आवाज देवू लागला. वळखीच्या आवाजाने शेळ्या धावत आल्या. नि मग ती दोघे शेळ्यांचा कळप घेऊन घरी आली.
मन्सूर आता मोठा होत होता. कामधंदा शिकू लागला. शब्बीरच्या बहिणीने त्या दोघांना शहरात कामाला बोलावले. गाव सोडून जायचे त्याच्या जीवावर आले. रोज दर्ग्याच्या झाडावर चढायचं, कट्ट्यावर खेळायचं, दर्ग्यातला प्रसाद खायचा नि घराजवळचे हनुमान मंदीर, जरा पुढे असलेले महादेव मंदीर, विठ्ठल-रखुमाई मंदीर हे सारे त्याला सोडवेना. तो रोज सकाळी सायकल काढून, टोपी चढवून, गळ्यात रूमाल अडकवून घराजवळची, रस्त्यावरची सारी देव-देवळे पुजून येई. हनुमानाला हात जोडून म्हणतो कसा “हे बजरंगबली मैं तुझे रोज गंध-फुल, रूईकी माला चढाता हूं, मुझे काम दो आशीर्वाद दो.” विठ्ठल-रखुमाई पुढे हात टेकून म्हणे “मैं माथा टेककर तुझे ये मांगने आया हूं की, मेरे गांव का कल्याण कर और मेरा भी भला कर.” महादेवा पुढे म्हणे “हे महादेव तु महान है, मुझे भी महान बनाओ” इतक्यात शब्बीर आला नि म्हणाला, “मन्सूरभाई, अरे चल दर्गा खुल्ला है, नमाज का वक्त हुआ” मग मन्सूरने हात-पाय धुवून टोपी, रुमाल घालून दर्ग्याकडे धाव घेतलीच. अल्लाचा नमाजही तो मनापासून डोके टेकून पडतो नि म्हणतो, “हे अल्ला, तु सबका मालिक है, सबका कल्याण कर.”
काम शोधण्यासाठी शहरात गेल्यावर तो खूप कष्टाळू बनला. “शब्बीर चल तो न्हाट, न्हाट रेल्वे जायगा. चल जल्दी. सुबह सुबह काम पे जाना है.” अशा चपळाईत कामावर जायचे. फळांची गाडी, दुकान चालवायला घेतले. “कच्चा केला, पक्का केला, चिक्कू, पपीता ले लो. भाय ले लो” असे ओरडून किती फळे खपवायचा. एकदा असाच स्टेशनवर दिसला. पण तशी अनेक माणसे असतात म्हणून दुर्लक्ष केले नी पुढे निघालो. त्याने गर्दीतून आम्हाला ओळखले नी ‘फल ले लो, फल ले लो’ म्हणू लागला. गर्दीतून ओळखत नव्हते. पण त्याची लाल टोपी नी गळ्यातील हिरवा रुमाल जो तो नित्य नेमाने घालायचा त्यामुळे तो ओळखला नी ओळख पटली. तो मोठा व्यापारी बनला होता. तरीही टोपी नी रुमाल हीच त्याची ओळख. त्याने आम्हाला ओळख दिली.
‘सरपे टोपी लाल, हात मे रेशम का रुमाल, ओ तेरा क्या कहना…’ हे गाणे सारखेच मन्सूरच्या तोंडी असायचे. त्याला जसा त्याचा छंदच लागला होता. नि तो तसा पोशाखही करून सायलकवरून भटकत असे. सरपे टोपी लाल नि हात मे रेशमका रुमाल घालूनच! हे गाणे म्हणत गावातून सायकलवरची फेरी सुरू असे. तिरंगी निशाणातले तीन रंग आपल्या तना-मनात एकरूप झालेले हवे, ही मन्सूरची धारणा. त्याला निशाणातले रंग नि अशोकचक्र, चक्रातील आरे हे त्याचे आदर्श. माणसाने चक्रवर्ती अशोक सम्राटाप्रमाणे उदात्त, ध्येयवादी असावं नि चोवीस तासांपैकी जास्तीतजास्त वेळ कष्टात घालवायचा, हा त्याचा मानस.
फळांच्या गाडीजवळच वडापावची गाडी चालवायला घेतली. एका मित्राला मजूरी देऊन मदतीला घेतले. ‘बडा-पाव, बडा-पाव, बडा-पाव’ असे ओरडून तो वडापावचे गिऱ्हाईक करी. त्याने तयार केलेल्या पुदीना आणि हरी मिर्चीच्या झणझणीत चटणीने त्याचे सारे गिऱ्हाईक खुशच खुश व्हायचे. मन्सूरका ठेला आता फेमस झाला. जोडीला चहाची किटली होतीच. तो स्वतः खाली शेगडीवर चहा बनवून किटलीतून ओतून द्यायचा, नि कामगार गिऱ्हाईकाला चहा पुरवायचे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा साऱ्या ऋतूत चहा तयार. चांगल्या कोऱ्या दुधातला स्पेशल चहा गरमागरम मिळाल्यावर सारे गिऱ्हाईक मन्सूरच्या ठेल्याकडेच येणार. आता तो त्या परीसरातील प्रसिद्ध माणूस बनला. एवढ्या मोठ्या शहरात इतकी प्रसिद्धी मिळवणाऱ्या मन्सूरला काही घावूक व्यापाऱ्यांनी हेरले, नि घावूक, फळे, चहापूड इ. माल माफक खरेदीला लांब लांबच्या याहीपेक्षा मोठ्या बाजारपेठेत घेऊन गेले. एक, दोन, चार रेल्वे स्टेशन येऊन गेले, तरीही ते शहर येईना तेव्हा,
मन्सूर- “अबी तक नही शहर आया? कब आयेगा? चाय का माल कब मिलेगा?”
मध्येमध्ये येणाऱ्या सगळ्या ठिकाणांची चौकशी झाली, पण काही मिळाले नाही आणि मन्सूरही आला नाही. सर्व चिंतीत झाले. व्यापारी समजून तस्करांच्या जाळ्यात मन्सूर अडकला होता. काही काळ असाच गेला. मन्सूर डोळे उघडून पहात- “हे अल्ला, मैं कहां हूं? मेरा घर-परीवार किधर है? और तेरा दर्गा भी किधर है? नमाज का वक्त हुआ, मुझे ले चल मेरे प्यारे अल्ला, मुझे नमाज को ले चल…”
“ये मन्सूर, आता तुझा माल आला बघ. घे उतरून नि सांगतो तिथे पोच कर.” ते व्यापारी म्हणाले. तसे तो बरं म्हणाला नि बोटीत बसला. समुद्रात बोट मध्येमध्ये येईल तसे त्याला बेचैनी वाटत होती. त्याने सारे दृश्य हेरले होते. पाण्याचा भोवरा कमी झाल्यावर त्याने सारा माल हेरला. कोठेही फळे, चहा असे लिहिले नव्हते. नुसतीच खोली दिसत होती. काय समजायचे ते तो समजला नि डोळे मिटून बोटीतून उडी मारली. सर्व शक्ती एकटवून समुद्रात पोहू लागला. पोहत पोहत काठाला लागला नि एका झुडपात पाय अडकून किनाऱ्याच्या दगडाला हाताने घट्ट धरून तिथेच थांबला. त्याला शोधायला शब्बीरच्या बहिणीने माणसे पाठविली. त्यांनी सर्व मुंबईची स्टेशने, बसस्टॉप धुंडाळले. शब्बीरची बहिणही शोधत होतीच. अजून मन्सूर सापडला नाही, हा निरोप गावी देत होती. तिने सर्वांना धीर दिला. लाटांचा मारा खात मन्सूरने अंधारी रात्र काढली. शब्बीरची बहीण नजमा तिथे शोधपथक घेऊन आली.
नजमा- “मन्सूर, मेरे भाय तु कहां छुपा है रे? जल्दी जल्दी सामने आओ. आओ, आओ मेरे भाय.” अर्धवट शुद्धीत असलेल्या मन्सूरने नजमाचा आवाज ओळखला नि तो हळू हळू शक्ती एकवटून पुढे पुढे सरकू लागला. तसे त्याच्या डोक्यावर पाण्याने भिजून घट्ट बसलेली लाल टोपी नि गळ्याच्या शर्टाला गाठ मारलेला हिरवा रुमाल तिला दिसला. रुमाल लाटेसरशी वर वर येत होता. ते पाहून,
नजमा- “हां, हां मै इथच हूं. मन्सूर भाय, आगे बडो. आगे बडो.” किनाऱ्यावरील लोकांना तिने त्याची खुण पटवून दिली. त्यांनी होडीतून हळू हळू पुढे पुढे जाऊन त्याला शोधले.
शोधपथक- “अरे ओ लाल टोपी, हिरवा रुमाल घबरावो मत. आम्ही यायला लागलोय.”
त्यांची होडी तिथे पोचली नि लाल टोपी, हिरवा रुमाल हाताने धरून त्याला वर काढले. नजमा मोठ्याने ओरडली,
“मन्सूर, मन्सूर मेरे भाय, आओ, आओ मैं तुम्हे घर लेने आयी हूं. चलो घर चले मन्सूर.”
नजमाच्या आवाजाने त्याला धीर आला नि तो म्हणाला,
“नही, नही नजमा घर नही पहले थाने चलो.”
पोलीस ठाण्यावर जाऊन त्यांनी तक्रार नोंदवली, की या बोटीत संशयास्पद माल आहे. तो ताब्यात घ्या. पोलिसांनी लगेच कारवाई केली. त्यात तस्करीचा माल होता. चहापुडीऐवजी ब्राऊन शुगर होती. इतका माल पकडून दिल्याबद्दल पोलिसांनी मन्सूरचा सत्कार केला. बातमी पेपरला आली. गावापर्यंत ही बातमी कळताच सारे गाव गोळा झाले. मन्सूर गावात पोचताच दर्ग्याच्या कट्ट्यावर त्याचा सत्कार केला. त्यावर मन्सूर म्हणाला,
“मेरी अम्मी की घर हाव, अम्मी, अम्मी इधर आवो.” असं म्हणून त्याने अम्मीला मिठी मारली. दर्ग्याच्या पायरीवर डोके टेकून आपली लाल टोपी, हिरवा रुमाल घालून सलाम केला आणि म्हणाला, “अल्ला, तेरा शुकर है. मैं घर आया.” आणि लगेच तो हनुमान मंदीरात दिवा लावून म्हणाला, “मारूतीराया तु मला बल दिलेस म्हणून मी समुद्र पार केला.” विठ्ठल-रखुमाई आणि महादेव मंदीरात जाऊन ध्यानपुर्वक दंडवत घालून म्हणाला, “हे भगवान, तुमीच माझे रक्षण केले. देव तारी, त्याला कोण मारी.”
काही दिवसांनी त्याच्या हवेलीत मोठ्या दिवाणखान्यात स्वदेशी मालाचे, सुती कपड्यांचे दुकान भरले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वदेशी वस्तू असा नामफलक लावून उद्घाटन केले. मा. जिल्हाधिकारी यांनी या शुभ घडी साधून मन्सूरला शौर्य पुरस्काराने सन्मानीत केले. तो दिवस स्वतंत्र दिनाचा होता. मन्सूरने घोषणा दिली, “वंदे मातरम, भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो”.
आजही मन्सूरची हवेली दिमाखात उभी आहे. त्याच्या दगडी चौकटीवर चांद-सितारा कोरला आहे. गावाच्या दर्शनी असणारे त्याचे घर-अंगण सर्वश्रूत आहे.
मन्सूर- “आवो रे सभी आवो, मेरे घर आवो, चाय पाणी पिओ.”
बिरूबा यात्रेतील मिरवणूकीचे ढोल भंडारा उधळीत त्याच्या अंगणात घुमू लागतात, तेव्हा तो लक्ष्मीच्या माळावरील बिरूबा देवळापर्यंत तल्लीन होऊन नाचत जातो. त्यात समरस होऊन गर्जना करतो, “बिरूबाच्या नावानंsss चांगभलंsss” त्याच्या दारासमोरच्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती सोहळा सुरू झाली की, समजा मन्सूरची दिवाळीच. रात्रं-दिवस हनुमान सप्ताहामधली वीणा गळ्यात अडकवून भजन किर्तन करतो. “पवनसूत हनुमान की जय, बोलो सियाराम की जय” हा त्याचा जयघोष सुरूच असतो. हनुमान दर्शन झाल्यावर सर्व जण त्याचे दर्शन घेतात. त्याचे दर्शन घेताना तो मनोभावे म्हणे, “ईश्वर तुम्हारा कल्याण करो, अल्ला तुम्हे सलामत रखे” पंढरीची वारी दारावरून चालली की त्यांना पिठले-भाताचे जेवण देऊन तृप्त करणार नि “विठू माऊली, विठू माऊली” म्हणत त्यांना आलिंगनही देणार.
महाशिवरात्रीच्या उपवासाला तो व्रत म्हणत. मैंने भी व्रत रखा है म्हणून रात्रभर शिवभजनात आणि किर्तनात चावडीच्या चौकात सामील झाला की म्हणणार, “हे भोलेनाथ, हम पे दया करो.” स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहणाला न चुकता हजर. दर गुरूवारी दर्ग्याला गेलो की उरसाला, मोहरम, ईदला आमंत्रण देऊन आम्हाला मनसोक्त जेवण देणार. कोणाच्या लग्नाची वरात दारावरून चालली तर तिथे थांबलीच. मग तो नवरा-नवरीला शुभाशिर्वाद देऊन वरातीपुढे बॅंड पथकात तल्लीन होऊन नाचणार. असा हा दिलखुलास, निस्वार्थी, देशप्रेमी, सर्वधर्म समभाव, माणूसकी जपणारा मन्सूर. तो म्हणजे हरहुन्नरी, जीवनाचा गवसलेला मनाचा सुरच होता.
‘ठक, ठक, ठक’ दाराची कडी वाजली. हवेलीतील सारी माणसे जागी झाली. पहिल्याच नंबरला मन्सूरची खोली आहे. पहिल्यांदा तोच उठला नि दार उघडले. रात्रीचे दहा वाजले होते. खेडेगावातील मंडळी ऊन-पावसात, वाऱ्यात शेतात काम करून दमून भागून रात्री लवकर झोपतात. बरेच जण गाढ झोपलेले होते. रात्री कोण आले, म्हणून हवेलीत चुळबूळ सुरू झाली. “ये मन्सूर भाय, कोण भी ऐरा-गैरा होगा. दरवाजा खोलू नको.” त्याला सांगितले.
मन्सूर- “अरे होगा कोई भी, अडचणीतच होगा ना. अगर चोर-लुटारू हो तो क्या ऐसा बॅन्ड बजागे आयेगा? क्या सोचते हो भाय? मैं आगे जाके देखता और दरवाजा खोलता.”
दार उघडताच दारात दोन माणसे उभी होती. खांद्यावर लांबच, लांब झोळणा होता. आता त्याला धीर आला नि तो म्हणाला, “इतनी रात काय को आये हो भाय? क्या चाहीए?”
ते लोक- “आम्हाला वाईच खायाला काहीतरी द्या. आम्ही लई भुक्यावलो हाय.”
अम्मी- “अबे ओ, तुम्या क्या येळ, वक्त है का नही? खाने को मांगने आये? इतने रात क्या मिलेगा?
मन्सूर- “जरा रुको भाय.” तो आत गेला. त्याची पत्नी-मुले झोपली होती. त्याने जेवणाची भांडी तपासली. जे-जे शिल्लक होते ते आणले नि त्यांच्या भांड्यात ओतले.
अम्मी- “अरे ती कोण हायती बघतर.
मन्सूर- कोण तुम्ही?”
ते लोक- “आम्ही धनगर हाय जी. शेजारच्या माळरानात मेंढरं वस्तीला बशीवल्यात. आज लई लांबून आलुया. पंढरपूर-सोलापूराहून आलोय. जवणाची सामग्री संपलीया म्हणून आलुया.” त्यांची चार कुत्रीही सोबत होती. त्यांनाही उरलेले शिळे-पाके सारे अन्न मन्सूरने दिले. ती मंडळी मोठा आशिर्वाद देवून तळावर गेली नि मन्सूरने हवेलीचे दार लावून घेतले. भुकेलेल्यांना अन्न दिल्याचा केवढा आनंद झाला होता त्याला.
दुसरा दिस उजाडला. हवेलीच्या झरोक्यातून सोनेरी किरणे आत आली. सारी हवेली उजळून निघाली. दरवाजा उघडला. मन्सूरच्या पत्नीने आडातले ताजे पाणी घागरीने आणून हंडा, घागरी, पातेली भरून ठेवली. एक घागर दर्गाच्या पायरीवर घालायला ठेवली. मन्सूर अंघोळ करून आला. त्याने ताजे पाणी दर्ग्याच्या पायरीवर ओतून सभोवताली शिंपून दर्ग्याला आपली शेवा दिली. नतमस्तक होऊन दंडवत घातला. मन्सूर हवेलीकडे निघाला तर दारातच शब्बीर भेटला.
शब्बीर- “ये मेरे भाय? चल ना काम पे जाना है ना?”
मन्सूर- “चल, चल, चल मेरे साथी, चल ओ मेरे हाथी… चल पुढे होच, मी आलो.”
मन्सूर हवेलीच्या दारात आला आणि आत जाणार इतक्यात एक वृद्ध दारात आला.
वृद्ध- “दादा, ओ दादा. वाईच थांबा.”
मन्सूर- “काय व दादा? काय पायजे?”
वृद्ध- “जरा मोकळा तांब्या आणा, मोकळा तांब्या.”
मन्सूर:- “कशाला? त्यात काय रस्सा करणार हाईस?”
वृद्ध:- “आवो, आणा तरी.”
मन्सूर पत्नीला- “आगे ओ, आगे ओ, सुना क्या? सुन तो ले, जरा बाहर आ.”
पत्नी- “हां… हां… सुना. मुझे सुनना आता है. तुमच सुनो.”
मन्सूरला थोडे कमी ऐकू येत होते. तो मध्येच दोन-दोनदा एखादा शब्द म्हणायचा.
पत्नी- “क्या जी, लोटा लाऊं.”
मन्सूर- “पाटा नहीं गे, लोटा… लोटा… पाटा काय माझ्या डोक्यात घालतीस?”
पत्नी तांब्या घेऊन आली. त्या वृद्धाने आपल्या खांद्यावरचे शिंकाने काढून त्यातल्या डिमक्यातले दुध तांब्यात ओतले. “आता गरम-गरम च्या द्या” म्हणाला.
मन्सूर- “आगे ओ, तुने पहचाना का वो बाबा को? रात को खाना मांगने आया था. त्याने लगेच दुध दिले बघ. धनगर किती ईमानी असतात.”
पत्नी- “अच्छा तो वो धनगर था? हां… ईमानी लोग आहेत ते.”
सकाळी उठून न्याहारी झाली की शेताची वाट धरून कामाला लागायचे हा त्याचा नित्यक्रम. माळानं बिगीबिगी जाणाऱ्या मन्सूरला मेंढरं बसवलेल्या धनगरांनी, “मामो, आम्ही निघालो. ह्या माळावरच्या मेंढ्यांच्या लेंड्यांचं खत तुमच्या रानात इस्काटतू. तुमचं रान दाखवा.” रानात त्याच्या मागोमाग ती धनगर गेली नि खत इस्कटलं. मन्सूरने त्यांना विचारले, “आवो मग, खताचं पैसं किती द्यायचं?”
धनगर -“न्हाय ओ. कवातर आसंच आलो तर वळख ठेवा.”
जाता-जाता त्यांनी बाभळी बेनल्या. काट्याची शिरीही कुंपणासाठी त्याच्या बांधाला टाकली. मन्सूरने त्यांचा निरोप घेतला.
चव्हाणकाका- “मन्सूर भाय, आता जावा घरी. मळणीवर मी थांबतो. इथं कसलं भ्या न्हाय. आणि रामुशी हायतीच शेजारी. त्यांचा धीर हाय.”
मळणीवरची हुरड्याची कणसं व्हरपळून भाजली नि पाखडून, चोळून हुरडा घरी आणला.
सकाळ सकाळी रस्त्यानं गर्दी दिसत होती. घोळक्याने माणसे जागोजागी थांबली होती. “ही कसली गर्दी होती?” अम्मीने विचारलं. त्याची पत्नी बाहेर येऊन कानोसा घेताना कळलं की, सौंदत्तीला यल्लमा डोंगराच्या यात्रेला गेलेली जत्रा परत यात्रा करून आली होती. त्यांच्या त्यांच्या घरातील माणसे त्यांना चहा-नाष्टा घेऊन येत होती.
मन्सूर- “अम्मी, वो देख जत्रा आयी. रेणूकाली उन्हे कुछ तो दो.”
अम्मीने किटली भरून चहा करून मन्सूरकडे दिला. त्याने आनंदाने यात्रेकरूंना चहा दिला. सौंदत्तीहून आलेल्या रेणुकाच्या डोंगराच्या यात्रेकरुंनी त्याला आशीर्वाद दिला. त्यातली सखुमावशी म्हणाली, “इकडं ये लेकरा. भंडारा लावून घे.” त्याने तिला नमस्कार केला नि कपाळाला भंडारा लावून, उदे गं आई, उदेsss उदेsss च्या जयघोषात आशीर्वाद घेतला. वाजत-गाजत यात्रा पुढे-पुढे जाऊ लागली. त्याने यात्रेमध्ये मिसळून त्यांना साथ दिली.
चावडीच्या दारात रेशनसाठी लागलेली रांग खिडकीतून दिसत होती. अम्मीने लांबच लांब रांग पाहून आवाज दिला, “आगे ओ जुबेदा, राशन का माल ले आओ ना.” जुबेदा राशनला गेली. दुकानदार म्हणाला, “भाभी, गर्दी कमी झाल्यावर मन्सूरला पाठवा.” मन्सूर गेला तर ‘दुकान बंद’चा बोर्ड दिसला. पण तो परत फिरताच दुकानदाराचा आवाज आला,
“अरे ओ मन्सूर भाय, आवो तो. पिछे का दरवाजा खुल्ला है.”
मन्सूर- “पिछे से क्यों भाय? सामने से दे दो ना.”
दुकानदार- “गर्दी संपेना म्हणून पुढचा दरवाजा बंद केला. बोलो मन्सूर भाय गहू, तांदूळ, डाळ एक नंबरी माल हाय. किती किती देऊ?”
मन्सूर- “कार्डावर मिळेल उतनाच दे दो भाय.”
दुकानदार- “चांगला माल हाय तोवर न्या म्हणतोय.”
मन्सूर- “हमारा जीतना उतनाही दो. यत्ता करे वत्ता ही. रोजे का महिना है. नमाज को जाना है. देर होगा. दो ना.”
मन्सूर रेशनचे धान्य घेऊन आला. सायंकाळ होताच रोजाचा नमाज पढायला गेला. नमाजाला खुपच गर्दी होती. शतकानू-शतके चाललेले ईदचे रोजे मोठ्या श्रद्धेने सारे लोक करतात. गावातील रोजा करणारे दर्ग्याला येऊन दंडवत घालत होती. उद, धुप, कापूर, साखर देवाला दाखवून एकमेकांना वाटत होती. मन्सूर त्यांना सगळ्यांना साखर वाटून दुआ देत होता.
*
वाचा
ललित
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता