ती भेटली
स्वप्नातल्या एका आडमुठ्या वळणावर
झाडाला टेकून उभी होती
शून्यात नजर लावून
शून्याकडेच पाहत होती
समोर मावळतीचा सूर्य होता
लालभडक रंगही त्या क्षितीजाला लाजवत होते
मध्येच एखादा काळा ढग
तुझ्या उडणाऱ्या ओढणीत
उगीचच अडकत होता
आकाशातली एखादी चूकार चांदणी
तुला अलगद स्पर्श करत होती
आणि त्या स्पर्शाचे भावतरंग
चेहऱ्यावर दिसत होते
आणि तू…
विस्कटलेल्या त्या क्षणांना आवरत होतीस
आणि मी…
क्षणभर ओशाळलो
गंधाळलो
दरवळलोदेखील
भरल्या डोळ्यांनी ते क्षण
ओंजळीत भरून घेत होतो
भानावर आलो..
तेव्हा रिकामी ओंजळ होती
सूर्य मावळला होता
आणि क्षितीजही अंधारात हरवलं होतं
आणि मी चक्क ‘मी’ झालो होतो
*
वाचा
शरद कवठेकर यांच्या कविता
कविता
कथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव