आमची जीपगाडी त्या नागमोड्या वळणानं वेगानं जात होती. काळोख्या रात्री एकामागोमाग एक येणारे मोटरगाड्यांचे पिवळे दिवे जणू आमचा पाठलागच करीत होते. वाटेवरच्या झाडांचा पहारा, त्याआडून डोकावू पाहणारे दिव्यांचे ठिपके, रात्रीनं गिळंकृत केलेल्या वाटा आणि चांदण्यांनी भरपूर लगडलेलं विशाल आकाश आमच्या शहरी मनाला वेगळीच अनुभूती देत होतं.
कसाऱ्याहून निघालेली आमची जीपगाडी पहाटे गडाच्या पायथ्याशी पोहचली. आम्ही चहूबाजुंनी वेढलेल्या अजस्र डोंगर रांगांच्या फेऱ्यात येऊन पोहचलो. आकाशात तोंड खुपसलेल्या डोंगराच्या शिखराआडून वर येणाऱ्या सूर्य देवानं आपल्या लाल पिवळ्या किरणांनी ती सृष्टी उजळायला सुरवात केली. प्रवासाचा शीण आणि थंडीची झळ घालवण्यासाठी आम्ही शेकोटी भोवती बसलो. थोड्या वेळानं चहा व नाश्ता उरकून पुढं पायीच हिरवी शेत तुडवीत निसर्गाचा आनंद लुटीत जायचं ठरवलं.
मराठ्यांचा सुवर्ण इतिहास आणि पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हरिश्चंद्र हा तेजस्वी गडकोट पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील दुर्गम ठिकाणी वसलेला आहे. चांगदेव महाराजांचं वास्तव्य या गडाला लाभल्याचा उल्लेख येथील शिलालेखांवर आढळतो. दाट झाडी, निरव शांतता, चालताना पालापाचोळ्याचा आवाज येईल, इतकीच काय ती आपल्या अस्तित्वाची खूण. दगडाच्या खोबण्या करून तयार केलेल्या पायऱ्या, निसरडे दगड-धोंडे पार करीत आम्ही पुढे चालू लागलो. पावसाळा संपल्यानं फुगलेले ओढे-नाले कात टाकून शिडशिडीत झालेले असतात. पावसाळ्यात तर पाणी प्यायलेली ती गच्च वनराई, रानफुलं हिरव्या पिवळ्या नाना रंगाचे नवे नवे उन्मेष उधळीत असतात. गडावरून वाहणारा सुसाट वारा जमिनीच्या अंगप्रत्यंगाला स्पर्श करत, झाडांना रुंजी घालत अंगाला बिलगत होता.
सूर्य डोक्यावर येईपर्यंत महादेवाचं छोटेखानी मंदिर असलेल्या पठारावर आम्ही येऊन पोहचलो. तेथील एका झोपडीवजा घरात आम्ही आमचा तळ ठोकला. त्या परिसरातल्या अद्भुत पद्धतीनं बांधलेल्या महादेवाच्या मंदिरासारखा कळस सहसा कुठं आढळणार नाही. मंदिरात काही गुहा आहेत. त्यातल्या काही तलावासारख्या दिसणाऱ्या, मोठ्या हौदेत खालपर्यंत दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. इथलं आणखी एक सौंदर्य स्थळ म्हणजे केदारेश्वर गुहा! या गुहेत छातीएवढं काळंशार व स्वछ पाणी आहे. मध्यभागी चौरस ओट्यावर एक प्रचंड शिवलिंग आणि त्याभोवती दगडात कोरलेले चार खांब आहेत. अजूनही मंडपातील एक खांब शाबूत आहे. गुहेतल्या छाती एवढ्या थंडगार पाण्यातून चालत शिवलिंगाला प्रदक्षिणा घालणं, हा इथल कौतुकाचा भाग ठरतो.
रोजच्या दिनक्रमात जेवणाची वेळ झाली म्हणून आपण जेवतो पण गिरीभ्रमंतीत भूक लागली की खाणं होतं. म्हणूनच भोजनाचा खराखुरा आनंद मिळतो व तृप्तीचा खरा ढेकर येतो. आम्ही जेवण करून थोडावेळ निवांत लवंडलो. थोडा आराम करून आम्ही बालेकिल्ल्याकडं कूच केली. मजबूत झाडाझुडपांनी पाऊलवाट गिळून टाकली होती. मार्ग सापडेनासा झाला होता पण आमच्या बरोबर असलेला गावकरी वाटाड्या दादा म्हणाला, “बेधडक उतरा. जरा बी घाबरायचं नाय दादा, ताई जिकडं गरज लागलं तिकडं मी इतु.” या शब्दांनी प्रेमाची उब आणि धीर मिळत होता. आम्हीही ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको!’ या कविवचनानुसार चालत राहिलो. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर शिवरायांच्या मूर्तीचं लोभसवाणं दर्शन घडतं. तिथंच एक पाण्याचं टाक आहे. एवढा मोठा पल्ला पार करून आल्यावर अमृतासम पाणी मिळणं म्हणजे ‘अहो भाग्यम!’
डोंगराच्या पायथ्याशी नदीनं धरणाच्या रूपात धारण केलेल जलाशय चंद्राच्या रुपेरी किरणात न्हाऊन सृष्टीचं अनोखं रूप दाखवून देतो. तिथून दिसणाऱ्या विस्तृत क्षितिजाचं अनोखं दृश्य अनिमिष नेत्रांनी पाहत राहिलो. लांबवर दिसणाऱ्या शेताचं, आसपासच्या परिसराचं विहंगम दृश्य पाहून डोळे सुखावले. इथं तटबंदी, बुरुज व तोफा अशी नेहमीची किल्ल्यांची आभूषणं नाहीत पण दमछाक करणारे कडे, रौद्र भीषण दऱ्या या गडाची शोभा वाढवतात.
आता ओढ लागली होती कोकणकड्यावरून दिसणाऱ्या मनोहारी सूर्यास्ताची. वळण व चपळ वाट पार करीत आम्ही कोकणकड्याकडं मार्गक्रमण सुरु केलं. आम्हाला सनसेट चुकवायचा नव्हता. पावलं झपझप पडू लागली. रानफुलांचे दाट जंगल तुडवत एकदाचे आम्ही कोकणकड्यावर पोहचलो. अर्धगोल आकाराच्या उंच कड्यावरून खाली पाहताच छाती दडपून जाते. मावळतीचा सूर्य झपझप खाली उतरत होता. आम्ही त्याच्या अस्ताची वाट पाहत होतो. त्याच्या साक्षीनं निसर्गाचा हा भव्य दिव्य चमत्कार प्रत्येकाच्या स्मृतिमंजुषेत कायमचा साठवला गेला. निसर्गाचा हा उत्कट भव्यपणा डोळ्यात मावेनासा होतो. निसर्गाचं हे तांडव कॅमेरात पकडण्याचा मोह काही केल्या आवरत नाही. सूर्य बिंब बुडाले आणि जमा झालेली मंडळी हळूहळू पांगली.
अचानक काळे ढग आले आणि सारा आसमंत झाकोळून गेला. आकाशही चांदण्यांनी काठोकाठ भरलं होतं. रात्रीची थंडी आपलं अस्तित्व बोचरेपणानं जाणवून देऊ लागली. त्यानंतरच्या कॅम्प फायरला खूप मजा आली. गप्पांना रंग चढला होता. भुताच्या गोष्टी, उडत्या गाण्यावर नाच खरंतर धिंगाणाच म्हणायाला हवा. त्यात मीही सुरेश भटांच्या काही गझला सादर केल्या. त्याला टाळ्यांच्या स्वरूपात प्रतिसाद लाभला. याच गोष्टी एखाद्या कलाकाराला बळ देतात. खूप भारी वाटलं.
सकाळी उठून तारामती सर करण्याचा बेत आखला व त्या दिशेनं आम्ही चालू लागलो. वाटेत पिवळी-पांढरी रानफुलं, मध्येच डोकावणारी झुडपं आणि चहूबाजूला पसरलेलं पिवळ्या सोनेरी गवताचं रान मोहवून टाकत होतं. बऱ्यापैकी वाढलेल्या झाडाझुडपातून वाट काढत आम्ही माथ्यावर पोहचलो. लांबवर सुळक्यांचं साम्राज्य पसरलं होतं. तिथून दिसणारी अलंग, मदन, कुलंग, भैरवगड ही अस्मानाला गवसणी घालणारी शिखरं आपल्याला सुन्न करतात. इथूनच आनंदघन निसर्गाचा हृदयंगम पसारा पाहायला मिळतो. डोंगराळ मुलुख आणि रम्य निसर्ग यांच्या सान्निध्यातला हा प्रवास म्हणजे सुरम्य मेजवानीच ठरते. डोंगरदऱ्यांचे वैभवच न्यारे असते आणि हे वैभवधन लुटायला येणारेच लुटले जातात. इतका वेळ सर्व परिसर न्याहाळत डोळे तृप्त झाले होते. आता पोट तृप्तीच्या मार्गावर होते. गड उतरून मुक्काम असलेल्या झोपडीच्या ओसरीवर येऊन पसरलो. तिथली एक लेकुरवाळी महिला आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आमच्या जेवणाची तयारी करीत होती. जेवणाचा कार्यक्रम उरकून गड उतरायला सुरवात केली. एकमेकांची थट्टा-मस्करी करत, एकमेकांना समजावत, समजून घेत केलेला हा प्रवास एक रम्य गड चढल्याचं व निसर्ग न्याहाळल्याचं समाधान मिळवून देतो.
गड उतरून पायथ्याशी आम्ही इतर सहकाऱ्यांची वाट पाहत बसलो. तिथंच एक म्हातारबा आम्हाला गडाचा ऐकीव इतिहास सांगू लागले. आम्हीही त्यांना औत्सुक्यापोटी अजून प्रश्न विचारू लागलो. सगळे सहकारी आल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तसे ते म्हातारबा म्हणाले, “पोरांनू, आजची रात इथंच ऱ्हावा, जेवा बिवा आन् उद्या पहाटची गाडी पकडून घरला जावा.” आम्ही त्यांना म्हटलं बाबा कालची रात्र आम्ही गडावरच होतो. त्यावर ते म्हणाले “पर पोरांनू तुमच्या जीवनात आराम कुठं हाय, ऱ्हावा अजून एक रात” असं म्हणून ते निघून गेले. किती मार्मिक बोलले ते!
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, माणसांनांच माणसाची भीती वाटणाऱ्या या जगात बाबा म्हणतात तसा ‘आराम’ मिळावा म्हणून निरव शांतता अनुभवण्यासाठी, निसर्गानं रेखाटलेलं सुंदर चित्र आणि साकारलेल्या शिल्पाकृती पाहण्यासाठी तसंच निसर्गानं गायलेल्या गाण्यातील सूर ऐकण्यासाठी अशा ठिकाणी जरूर जावं. अशात कोण्या एका शायराच्या दोन ओळी ओठांवर येतात की,
‘सैर कर दुनिया की गाफ़ील ज़िंदगानी फिर कहाँ
ज़िंदगी गर कुछ रही तो ये जवानी फिर कहाँ‘
*
वाचा
श्रीकांत डांगे यांचं साहित्य
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
कविता
श्रीकांत डांगे हे अक्षर मानवचे राज्य अध्यक्ष असून सध्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड असून कविता, लेख इत्यादी लेखन ते नियमितपणे करत असतात.