kalasubai-milet-ranabhaji-adivasi-mahotsav-trek-shreekant-dange-dongaralalele-diwas-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-gad-kille-bhatakanti-sahyadri-maharashtra-tourism

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील कळसुबाई डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या ‘जहागीरदारवाडी-बारी’ या गावात ‘कळसुबाई मिलेट रानभाजी आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.

‘मिलेट’ या शब्दाला मराठीत ‘भरडधान्य’ हा पर्यायी शब्द वापरला जातो. गहू, तांदूळ, मका, बार्ली इत्यादी सोडून जी धान्यं आहेत ती मिलेट या नावानं ओळखली जातात. नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई ही काही भरडधान्यांची उदाहरणं. मिलेट आपल्याला अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा, शेतकऱ्यांच्या उपजीविकेची सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा पुरवतात. यामुळं पर्यावरणाचं संतुलन आणि संवर्धन जोपासलं जातं.

उमेशदादांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्यांच्या साथीनं ‘तू जिंदा है’ आणि ‘ले मशाल चल पडे है लोग मेरे गांव के’ ही गाणी गाताना वेगळाच उत्साह प्रत्येकात संचारला होता. कार्यक्रमाचे अतिथी शितोळे काका यांनी ‘पाणी पंचायत आणि सेंद्रिय शेती’ या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. गोवंश-जैविविधता विषयाचे अभ्यासक सजल कुलकर्णी यांनी यावेळेस मोलाचं मार्गदर्शन केलं. 

विविध मिलेट, रानभाज्या व नाचणीचे नूडल्स, कुकीज, इडल्या यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध होते. चिलाची भाजी (रानभाजी), बाजरी, नाचणीची भाकरी, पुरणपोळी, शेंगुळे असा जेवणाचा खास बेत गावकऱ्यांनी आमच्यासाठी आखला होता. ‘उडदावणे’ इथल्या स्थानिक महिला आणि पुरुषांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून सगळ्यांनाच आनंददायी मेजवानी दिली.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शहरी-ग्रामीण विभागातून जमलेल्या माणसांच्या रात्री ओळखी-पाळखी झाल्या. शेकोटी, गप्पा आणि गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच कळसुबाई ट्रेकला सुरवात केली. राजेश पाटील नावाचा मित्र ‘अन्न गुड्गुडे, नार गुड्गुडे… ढिशक्याव ढिशक्याव’ अशा घोषणा देत सगळ्यांचा उत्साह वाढवत होता. त्यानं गायलेल्या ‘चिऊ-काऊ-माऊ’ या गाण्यानं तर लोकांची भलतीच करमणूक केली.

‘निसर्ग संवाद’च्या नीलिमाताई आणि ‘मैत्र संवाद’चे उमेश दादा यांच्या पुढाकारानं हा सोहळा दिमाखात पार पडला. स्वत:शी, समाजाशी, निसर्गाशी, माणसांशी, स्वतःच्या भविष्याशी संवाद साधताना निसर्गाचा जैवसांस्कृतिक ठेवा समजून घेत माझी यातली भूमिका समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यासाठी, लोकांशी, निसर्गाशी खऱ्या अर्थानं एकरूप होण्यासाठी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शहरी-ग्रामीण तरुणांशी मैत्री व संवाद, सह्याद्रीवर होत असलेल्या परिणामांची एकत्रित चर्चा, स्थानिक आदिवासी संस्कृती, जलसंधारण, प्रात्यक्षिक व तज्ज्ञांचं मार्गदर्शन, कळसुबाई शिखर गिर्यारोहण अशा अनेक गोष्टींचा समावेश ‘रानगंध’तर्फे घेण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या ‘निसर्ग संवाद’ शिबिरात होतो. तसेच आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना शैक्षणिक शिबीर, पथनाट्य यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम ‘मैत्री संवाद’ करत आहे.

अशा प्रकारच्या समाजभान जपणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन सातत्यानं होत राहिलं पाहिजे. माणसांनी एकत्र येऊन, एकमेकांचं जगणं समजून घ्यावं आणि निव्वळ माणूस म्हणून जगावं एवढाच प्रांजळ हेतू असतो. या उपक्रमांत सहभागी होऊन लोकांशी भरभरून बोलायला मिळतं. त्यातून अनुभवाची जी कमाई होते, त्यासारखं शिक्षण नाहीच. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती, समोरच्याची बाजू समजून घेण्याची नजर तयार होते. माणसं, भाषा, संस्कृतीचा अनुभव, त्यांच्या वेगळ्या वाटांच्या, वेगळ्या विचारांच्या आणि अखंड झगड्यांच्या प्रसन्न गोष्टी ऐकायला मिळतात. माणसं आणि जग समजून घ्यायच्या अशा या कार्यशाळेत आपण जास्तीत जास्त चौकस विचार करायला शिकतो. स्वतंत्र विचार असावेत, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करावा, मदतीला धावून जावं, दुसऱ्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा हे आपसूक मनावर बिंबवलं जातं. इतरांच्या क्षमता, कलागुणांची जाणीव होऊन त्यांच्यातल्या वागण्या-बोलण्यामुळं, अनुभवामुळं आपल्या दृष्टिकोनात बदल होतो. विचारात येणारे अडथळे दूर होऊ लागतात. सर्व भेदापल्याड माणसाला निव्वळ माणूस म्हणून वागवलं पाहिजे, हा समज आणखीनच दृढ होत जाऊन सुखी, शांत आणि आनंदी जगण्याच्या दिशेनं प्रवास सुरु होतो.

*

वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता


+ posts

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :