सह्याद्रीची ‘राज’माची

internet-image-rajmachi-trek-dongaralalele-diwas-shreekant-dange-chitrakshare-sahyadri-trek-gad-kille-bhatakanti

धावणाऱ्या लोकलप्रमाणं मनही धावत होतं. कितीतरी वेगानं… जाणाऱ्या प्रत्येक स्थानकानुसार विचार बदलत, लोकलमधल्या मित्र-मंडळींशी गप्पा मारताना कर्जत स्टेशन कधी आलं कळलंच नाही. कर्जत स्टेशन बाहेर सगळ्यांनी जमायचं, हे ठरलं होतं. सारे जण आल्याची खात्री होताच तिथल्या कपालेश्वर मंदिराच्या दिशेनं चालू लागलो. मंदिराजवळ पोहचताच ठरल्याप्रमाणं आम्ही ६० जण ग्रुपमध्ये विभागून टमटमनं ‘कोंडीवडे’ गावाच्या दिशेने रवाना झालो.गावातील ‘कोंडू वारे’ या ग्रामस्थला आम्ही सगळ्यांसाठी चहा आणि कांदे-पोह्याची सोय करण्याबाबतची पूर्वकल्पना दिली होती. आता चहा-पोह्यांचा बेत म्हणजे तसला काही कार्यक्रम वगैरे नव्हता बरं! गावात पोहचताच त्यांच्या घराबाहेरील ओसरीवर टेकलो. गरमागरम चहा आणि कांदे-पोहे फस्त करत आम्ही साऱ्यांनीच प्रवासाचा थकवा झटकून टाकला.

नाश्ता सोपस्काररित्या उरकून रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक पॉज घेऊन ‘राजमाची ट्रेक’साठी आपापल्या ग्रुपसह आलेल्या ६० जणांची ओळख परेड सुरू झाली. अनेक अनोळखी चेहरे एकमेकांकडं कुतूहलानं पाहत होते. एकमेकांची ओळख करून घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि सोशल नेट्वर्किंग साईटवर होणाऱ्या मैत्रीपेक्षा ही आत्मीयता आणि आपुलकी कधीही जास्तच वाटत होती. या प्रवासातले प्रवासी सगळ्या प्रकरात मोडणारे होते, काही चांगलेच मुरलेले तर काही नुकत्याच उमलू पाहणाऱ्या फुलासारखे.

राजमाची गावाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. पावसाची रिमझिम सुरूच होती. शहरातल्या पावसापेक्षा हा पाऊस किती वेगळा भासतो. हिरवा शालू नेसून आपलं स्वागत करणाऱ्या चहूबाजुंनी वेढलेल्या डोंगर रांगा, त्यावरून खाली झेपावणारे मनोहारी धबधबे, कवेत घेऊ पाहणारे ढग, सर्वांना सामावून घेणाऱ्या स्थितप्रज्ञ अशा या सह्याद्रीचा सारा अनुभव फार सुंदर आणि कायमच हवाहवासा वाटणारा असतो. पाण्याचे ओहोळ पार करत, चिखल तुडवत, वाटेतील दुतर्फा झाडं आणि रानफुलांचे गालिचे न्याहाळत आम्ही पुढे चालू लागलो. इथं धरित्रीच्या उदरात लुप्त झालेल्या गवताच्या, रानफुलांच्या बिया पहिल्या पावसाचे पाणी पिऊन टरारुन फुगत असतील. कधीतरी एकदा इवलासा कोंब हळुवार त्या बीचं कवच फोडून धरतीची शिवण उसवून वर आकाशाकडं दोन्ही हात करून झेपावला असेल. उभ्या अंगावर पावसाचे थेंब नाचू लागले.  पावसानं सूर धरताच अंगात हुडहुडी भरवणारा वारा ही त्याला ताल देऊ लागला. झाडांची ती तालबद्ध सळसळ ही या रंगलेल्या मैफिलीत मान वाकवून दाद देत होती. मनात एक वेगळीच धुंदी निर्माण करणाऱ्या या वातावरणत मन ‘पाऊस’ होऊन रानारानात निनादत, पानापानातून ओघळत, फुलांचे रंग घेत, ढगांसह तरंगत, वाऱ्यासह सैरावैरा पळत राहतं आणि नकळतच ‘नभ उतरू आलं, मन चिंबाड झालं’ हे गाणं ओठावर रुंजी घालू लागतं. अशा या वातावरणात ‘सैराट’ झाल्याशिवाय ‘झिंगाट’ अनुभव मिळत नाही, हे तितकंच खरं.

इथं कसलं बंधन नाही. फक्त वातावरणातला एक निवांतपणा सोबत असतो. कुणाशी स्पर्धा नाही की कुणाला ओव्हरटेक करण्याची तगमग नाही. हवं तिथं विश्रांतीसाठी बसावं, हवं तेव्हा निघावं. वाटेत लाभणारी झाडं, दगड आहेतच टेकू द्यायला. वाटेत कातळात कोरलेल्या मोहक लेण्या व प्रवेशद्वाराजवळ कोरलेली सुंदर रचना लक्ष वेधून घेत होती. पण परतीच्या वेळेस तिथं जाण्याचं ठरल्यामुळं आम्ही मार्गक्रमणा सुरूच ठेवली. कड्यावरून कोसळणाऱ्या झऱ्यांचा आवाज कानात गुंजत होता. पक्ष्यांचं संगीत ऐकायला मिळत होतं. अशा या भटकंतीत अनेक गोड माणसं भेटतात. कधी स्वतःहून संवाद साधतात तर कधी आपल्याला संवाद साधत त्यांना आपलंस करावं लागतं. एकमेकांचे विचार, विवंचना ऐकायला मिळतात. एका विषयावर अनेकांची वेगवेगळी मत असतात. त्या सर्व मतांतून नकळत आपला बौद्धिक विकास होतो आणि आपल्याला न पटणारी मत समजून घेण्याची समजही वाढते. समजा, आपलं मत किंवा आपला पावित्रा चुकीचा असल्यास माघार घेणं देखील जमायला हवं. याची जाणीव होऊन आपल्या शब्दात मतं व्यक्त करण्याची क्षमताही वाढते. प्रवास हा ‘जादूगारासारखा’ असतो. मनाचा एक एक पदर उलगडत नेमके कुठले विचार जादूच्या पोतडीतून बाहेर निघतील, सांगता येत नाही. निघणाऱ्या वस्तू सारखंच तेही नवलाचंच!

झाडावरून बरसणारं पाणी पायऱ्यांवरून खाली येत होतं. दगडी पायऱ्यांचे चिरे निखळून प्रवाहासोबत खाली आलेले होते. चढाई सोपी असली तरी सतत बरसणाऱ्या वरुण राजामुळं दमछाक होतं होती. हिरव्या शेतातून, वळणावळणाच्या वाटेवरून चिखल तुडवत, पाण्याचे ओढे एकमेकांचे हात हातात घेऊन धडधडत्या हृदयानं ओलांडत चढायला लागलो. नवीन ट्रेकर्सची तर काही ठिकाणी घसरगुंडी होतं होती. काहींचा वेग मंदावला असला तरी उत्साह मात्र दांडगा होता. अर्धी चढण पार करायची होती. बोलू पाहणाऱ्या पायांकडं दुर्लक्ष करत एका पठारावर पोहचलो.  तिथून दिसणारी वळणावळणाची वाट पुढं झाडीत अंतर्धान पावली. कडेकपारीतून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाई, गडावरून जमिनीवर उतरलेलं नभ, सह्याद्रीचं ते रांगडं रूप अशी ही सौंदर्यालंकारानं  नटलेली सृष्टी नेहमीच भान हरपून टाकते. निसर्गानं उधळलेल्या त्या असीमित रंगानं भरलेली ती चित्राकृती माझ्या मनपटलावर आपसूकच रेखाटू लागली.

राजमाची गाव दृष्टीपथात आलं तसा चालण्याचा जोर वाढू लागला. टुमदार आखीव रेखीव अगदी प्रेमात पडावं, असं ते छोटंस गाव. आता सगळ्यांनाच भूक लागली होती. एका गावकऱ्याला  सांगितल्याप्रमाणं त्यांनी जेवणाची सोय करूनच ठेवली होती. लोभस कोलाहलातलं ते जेवण आटोपल्यावर थोडी विश्रांती घेऊन अपुऱ्या सुखसोयींसह समाधानी, मनमिळाऊ, कष्टाळू, आपल्या खोपटीवजा घरात यथोचित आदर करणाऱ्या त्या गावकऱ्याचे आभार मानत निरोप घेतला. ढगात डोकं खुपसणारे ‘श्रीवर्धन’ आणि ‘मनोरंजन’ हे सुळके, भैरव नाथाचं मंदिर खुणावत असलं तरीही वेळेअभावी तिथं जाणं शक्य नव्हतं. परत येण्याचे मनसुबे रचत, मनोमन आश्वासन देत परतीच्या प्रवासाला निघायचं, हे सर्वानुमते ठरलं. वाटेतील लेण्यामधलं कोरीव काम व बाजूला जलकुंभ रीत करणारे सह्याद्रीचे कडे अशा या विलोभस दृश्यानं मी पावलोपावली सुखावत होतो.

पाऊस थांबलेला आकाशही निवळलेलं होतं. अंधाराची शाल आकाशनं पांघराण्यापूर्वी गावात पोहचायचं होत. डोंगर–दऱ्या, एकमेकांशी स्पर्धा करत कोसळणारे धबधबे, दगड-माती, प्राणी-पक्षी, मोकाट वारा यातून खूप काही शिकलो. सह्याद्रीच्या रूपानं जणू एक गुरुकुल लाभलं आणि वसंत बापटांची ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु’ ही कविता आठवली. पश्चिम क्षितिजावरून निघालेली चंद्राची वरात नाचणाऱ्या असंख्य नक्षत्रांबरोबर ऊर्ध्व दिशेला आली होती. धूसर  चांदण्यातील कातळाची डोंगर रांग आणि खोल दरी उगाच भीती दाखवत होती तर सोबतीला रातकिड्यांचा आवाज व बेडकांचा संगीत होतंच. सगळीकडं रान माजलं होतं तसंच फुटणाऱ्या अनेक वाटांमुळं पाऊलवाट सापडणं थोडं कठीणच गेलं. अशातच आमच्यातले काहीजण उतरताना रस्ता चुकले, त्यांच्या वाट चुकण्यानं आमची मात्र ‘वाट’ लागली होती. रस्ता चुकल्यामुळं झालेली त्यांची पायपीट काही वेळानं मात्र ‘पायवाटेस’ लागली. प्रत्येक भटकंती नवीन काहीतरी देऊन जाते. निसर्गाच्या जवळ जाण्याचं वेड लागलं की माणूस पुन्हा पुन्हा ते साहस करण्यासाठी पुढं सरसावतो. त्यातून कणखर मनाची घडण होते. मग अशी माणसं दैनंदिन आयुष्यात जगताना ताणतणावांना तोंड देण्यासाठी वैचारिक व भावनिक दृष्ट्या सक्षम बनतात. प्रवासात लाभलेल्या अनमोल क्षणांना आठवणींच्या गाठोड्यात बांधून परतीच्या दिशेनं कूच केली. ट्रेनमधून जाताना गप्पांचा व अंताक्षरीचा फड रंगला होता पण माझं मन मात्र अजूनही डोंगर-दऱ्यात रेंगाळत होतं, धबधब्यासारखं कड्यावरून झेपावत होतं, ढगांसह डोंगरावरून फिरत होतं, लेण्यात विसावत होतं आणि लहान मुलासारखं रानावनात हुंदडत होतं.

*

वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता


+ posts

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :