स्मिता नावाचं अद्भुत रसायन

Smita-Patil-forever-beautiful-and-talented-actress-of-the-70s-happy-birthday-chitrakshare-shreekant-dange-goshta-creations-saarad-majkur-ti-mhanali

आपल्या सहज सुंदर आणि सशक्त अभिनयानं चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिता पाटील यांची आज (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६) पुण्यतिथी. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये ज्याला स्त्री सौंदर्याचा मापदंड मानला जातो, अशी सौंदर्य लक्षणं त्यांच्यामध्ये नव्हती. तरीही आपला कसदार अभिनय, जीव ओतून काम करण्याची वृत्ती, रेखीव चेहरा, पाणीदार डोळे, झपाटून टाकणारं बोलणं, खळखळून हसणं या सगळ्याच्या जोरावर त्या अल्पावधीतच रसिकांच्या हृदयात विराजमान झाल्या. त्यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळं पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या आणि स्त्री सौंदर्याची नवीन परिभाषा तयार झाली.

स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला. पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकार क्षेत्रातील अग्रणीचे नेते होते आणि त्यांच्या आई विद्याताई या समाजसेविका. त्यांनी अभिनयाचं शिक्षण ‘एफ. टी. आय. आय.’ या नामांकित संस्थेत घेतलं. दूरदर्शनची निवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री हा त्यांचा प्रवास खरंच रोमांचक होता. श्याम बेनेगल यांनी त्यांच्यातील अभिनय क्षमता ओळखून ‘चरणदास चोर’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ३१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जवळपास ७५ चित्रपटांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायमच घर केलं. वयाच्या अवघ्या २२ वर्षी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून कमी वेळात इतकी मान्यता मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय अभिनेत्री असाव्यात. चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. फ़्रान्समधील पॅरिस यथे त्यांनी अभिनय केलेल्या निवडक चित्रपटांचा महोत्सव भरविण्यात आला होता. ‘सत्यजित रे’ यांच्या नंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला.

हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित ‘भूमिका’ मधील शोषित स्त्री, गुजरात येथील दूध व्यवसायावरील ‘मंथन’ मधील दलित स्त्री, ‘अर्थ’ मधील कविता सन्याल, ‘मिर्च मसाला’ मधील सोनबाई, ‘चक्र’ मधील अम्मा, ‘जैत रे जैत’ मधील चिंधी, ‘उंबरठा’ मधील सद्सद्विवेकबुद्धी असणारी सुलभा महाजन, ‘बाजार’ मधील मुस्लिम स्त्री यांसारख्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखेतून स्त्रीच्या संवेदना त्यांनी परिणामकारकपणे पडद्यावर साकारल्या. आपल्या अभिनय सामर्थ्यानं समांतर चित्रपटांबरोबर ‘नमक हलाल’, ‘शक्ती’ यांसारख्या व्यावसायिक चित्रपटांतही त्यांना यश प्राप्त झालं. अशाच अनेक चित्रपटांतून त्यांनी वेगळ्या धाटणीच्या, नेत्रदीपक आणि अविस्मरणीय भूमिका केल्या. पडद्यावर इतकी भावनिक आंदोलन साकारून सुद्धा आपला मानसिक समतोल ढासाळू दिला नाही.

स्मिता या आनंदी आणि हसऱ्या स्वभावाच्या होत्या. इतक्या वर्षानंतर आजही त्यांच्या स्मृती मनाला वेढून टाकतात. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्मिता बऱ्याच स्त्रीविषयी काम करणाऱ्या संस्थेशी जोडल्या गेल्या होत्या. आपल्या मिळकतीतील मोठा हिस्सा त्या समाजकार्यासाठी वापरत. साधीसुधी, उत्स्फूर्त, उत्साहानं सळसळणं, भूमिकेशी समरस होणं, बोलका चेहरा, देहबोली, समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणं आवाजातला चढ-उतार, त्यांच्यातील संवेदनशील माणूस या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी अभिनयात इतकी उंची गाठली की आजही बऱ्याच कसदार अभिनेत्रीची त्यांच्याबरोबर तुलना होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व विरघळलं आहे. शबाना आझमी, दीप्ती नवल, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमोल पालेकर या ताकदीच्या समकालीन सहकार्यांसमोर तोडीस तोड काम त्यांनी केलं.

एखाद्याला भेट द्यावयाच्या भेटवस्तूला वैयक्तिक टच देण्याची त्यांना सवय होती. मग त्यांनी काढलेलं छायाचित्र असो, रेखाचित्र असो किंवा एखादं पुस्तक त्या नेहमीच त्यावर खास  काहीतरी लिहायच्या. जेणेकरून त्या क्षणांचा आनंद द्विगुणित व्हावा. त्यासाठी त्या आपलं सर्वस्व त्यात ओतायच्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. मराठीबरोबर उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडं होता. चित्रीकरणस्थळी बऱ्याच वेळेस त्या पुस्तकात गुंगून गेलेल्या असायच्या. या संवेदनशील अभिनेत्रीच्या जगण्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

वैयक्तिक आयुष्यात राज बब्बर यांच्याशी केलेल्या वादग्रस्त विवाहामुळं त्या नेहमी चर्चेत राहिल्या. आजही त्यांच्या कर्तृत्वापेक्षा माध्यमं आणि अनेक रसिक याविषयीच अधिक जाणून घेण्यात रस दाखवतात, याचं अत्यंत वाईट वाटतं. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून खासगी आयुष्याबद्दल त्यांचा वेगळा दृष्टिकोन असेल हेही माणूस म्हणून आपण समजून घ्यायला हवं. या साऱ्या प्रकरणामुळं, त्यांच्यावरील आरोपामुळं त्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या असतील, याची कल्पनाही करवत नाही. तरीही कशाचीही पर्वा न करता त्या बिंधास्त जगल्या. त्यांचं अकाली आयुष्याच्या या रंगमंचावरून एक्सिट घेणं हे काळजाला चटका लावून जाणारं होतं.

‘स्मिता पाटील’ यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातून, त्यांच्या चित्रपटातून आणि जगण्यातून प्रसंगानुरूप स्वभावातील कणखरपणा, हळवेपणा, कोणत्याही परिस्थितीत स्थिरचित्त राहण्याची क्षमता, कोण काय बोलेल याची पर्वा न करणं, विरोधाला न जुमानता खंबीरपण लढणं, अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त करणं, सामाजिक भान, संवेदनशीलता, उत्साहीपणानं जगणं, स्वतःच्या तत्वावर श्रद्धा ठेवणं अशा माणूस म्हणून जगणं समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्याबाबत मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. लव यु स्मिता!

स्मिताच्या आठवणीत रमताना म. भा. चव्हाण यांच्या खालील दोन ओळी मनात नेहमी रुंजी घालतात,
तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते,
धरावयाचे तुझे किनारे उगीच माझ्या मनात होते…

*

+ posts

2 Comments

  1. अनुया कुलकर्णी

    व्वा, खूपच सुंदर लिहिले आहे..

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :