डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण व्यवस्थेबाबत नवा दृष्टिकोन

nanasaheb-gavhane-chitrakshare-samajkaran-lekh-dr-babasaheb-ambedkar-shikshanavishayi-dhoran-education-policy

शिक्षणाला जीवनात मूलगामी स्थान देणारे, शिक्षणाला औषध मानणारे डॉ. आंबेडकर हे लक्षात अनन्यसाधारण असे शिक्षण महर्षी होते. शिक्षण हा त्यांच्या आयुष्याचा ध्येयवाद होता. त्यांनी जनतेला ‘शिका! संघटीत व्हा!! संघर्ष करा!!!’ असा अमूल्य मंत्र दिला. या त्रिसूत्रीत शिक्षण प्रथम क्रमांकावर आहे. माणसाच्या प्रगतीमध्ये शिक्षण हेच महत्वाची भूमिका बजावते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामधील खालच्या स्तरातील वर्ग हा शिक्षणामुळेच प्रगती करु शकेल, असे प्रतिपादन केले. माणसाच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणामुळे प्रगती शक्य आहे. म्हणूनच शिक्षणाच्या वाटा सर्वांना उपलब्ध करुन सरकारने देशाची प्रगती साधावी, असेच त्यांना सांगावयाचे होते. ज्याप्रमाणे मनुष्याला अन्नपाण्याची जरुरी असते, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. विद्या ही एक प्रकारची तलवार आहे, जी दुधारी असते. तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते. म्हणूनच विद्या हे शस्त्रांचे शस्त्र होय, असे ते मानत असत. त्यामुळेच बाबासाहेबांच्या समाजक्रांतीचा विचार शिक्षणापासून सुरु होतो. मानवतेला अपमानित करणारी आणि देशाला पांगळे करणारी अन्यायकारक समाजरचना जर उलथून टाकायची असेल तर शिक्षण हे क्रांतीचे मूल स्त्रोत ठरते. भारतात ब्रिटिश काळापर्यंत शिक्षणावर फक्त ब्राम्हणांचीच मक्तेदारी होती. डॉ. आंबेडकर हे खालच्या स्तरातील गणल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व वाटत होते. शिक्षणामुळे माणूस स्वत:ची, समाजाची व देशाची प्रगती करु शकतो; हा जगाचा अनुभव आहे. डॉ. आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण ग्रहण केले व घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन जाणून घेणे महत्वाचे ठरते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
“उच्च शिक्षण घेऊन स्वत:चे आर्थिक आणि सर्व प्रकारची प्रगती तर कराच; पण त्याबरोबरच समाजाच्या आणि सामान्यांच्या उन्नतीसाठी पण काहीतरी करा.”
आपल्या देशामध्ये समाजाला विषमतेचा जो आजार झाला आहे, तो केवळ शिक्षणामुळेच बरा होऊ शकतो. आजतगायत जगात ज्या क्रांत्या घडून आल्यात त्या केवळ शिक्षणामुळेच झाल्या. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम आहे, हे जाणले.

साऱ्याच सामाजिक समस्यांवर शिक्षण हाच इलाज आहे. त्यांच्या मते,
“हिंदू समाजाच्या अगदी खालच्या स्तरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्व मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचा मानण्यात येते. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करुन पूर्वीप्रमाणे उच्च वर्गाची सेवा करायला लावणे नव्हे; तर त्यांची प्रगती ज्यामुळे खुंटली व त्यांना गुलाम व्हावे लागले तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहिसा करणे होय. चालू समाजपध्दतीमुळे त्यांचे जीवन लुबाडण्यात आले. त्याचे त्यांच्या स्वत:च्या व राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे, याची त्यांना जाणिव करुन देणे हाच त्यांचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज दुसऱ्या कशानेही हे साध्य होणार नाही. आमच्या मते, सामाजिक दुखण्यावर हेच प्रभावी औषध आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते,
“इंग्रजी विद्या म्हणजे केवळ ‘वाघिणीचे दूध’! ते ज्यांना म्हणून प्राशन करावयास मिळाले, त्यांच्यात नवा उत्साह, नवीन तेज, नवीन स्फूर्ती उत्पन्न झाली. ज्यांना इंग्रजी विद्या संपादित करता आली त्यांच्यात स्वतंत्रतेच्या कल्पना निर्माण झाल्या. इंग्रजी शिक्षण व विद्येच्या प्रभावामुळे राजा व प्रजा यांचे हक्क त्यांना कळू लागले. हे वाघिणीचे दूध पिऊन पुष्ट झालेल्या या पिलांनी इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध आवाज उठविला.”
असे हे वाघिणीचे दूध अस्पृश्य जातींना सक्तीने, मोफत व सार्वत्रिक स्वरुपात त्वरित मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी आपल्या अग्रलेखातील शैक्षणिक विचारांत मांडली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रजेचे 4 प्रकार पाडले आहेत. मराठा व तत्सम जाती यांचा पहिला, अस्पृश्य व तत्सम जाती यांचा दुसरा, मुस्लिम वर्गाचा तिसरा आणि ब्राम्हण व तत्सम जातीचा चौथा क्रमांक लागेल. शिक्षण प्रसाराच्या बाबतीतही हा क्रम असाच असायला हवा होता. परंतु तो त्याच्या उलट आहे. मराठा व तत्सम जाती लोकसंख्येने पहिल्या क्रमांकावर परंतु प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणात या वर्गाचा तिसरा, अस्पृश्य व तत्सम जातींचा लोकसंख्येत दुसरा परंतु सर्व स्तरावरील शिक्षणात चौथा म्हणजेच शेवटचा क्रमांक आहे. मुसलमानांचा लोकसंख्येच्या बाबतीत तिसरा क्रमांक आहे आणि सर्व स्तरातील शिक्षणात दुसरा क्रमांक आणि ब्राम्हण आणि तत्सम जाती लोकसंख्येच्या मानाने चौथ्या म्हणजे शेवटच्या स्थानावर आहेत. परंतु या चिमुकल्या जातीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणांत पहिला क्रमांक पटकाविला आहे. यावरुन शैक्षणिक विषमता लक्षात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाचे शैक्षणिकदृष्ट्या चार वर्ग सांगितले. ते पुढीलप्रमाणे:
1. पुढारलेला अथवा ब्राम्हण व तत्सम जाती
2. मध्यम वर्ग अथवा मराठा व तत्सम जाती
3. कनिष्ठ वर्ग अथवा अस्पृश्य व तत्सम जाती
4. मुसलमान वर्ग

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ. स. 1926 च्या प्रसिद्ध झालेल्या मुंबई इलाख्यातील शिक्षण अहवालाप्रमाणे वर्गपरत्वे हे प्रमाण मांडले आहे. त्यात त्यांनी प्रत्येक वर्गाच्या दर हजारी लोकसंख्येशी त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण मांडले आहे. त्यातूनही शैक्षणिक विषमता स्पष्टपणे आढळली आहे. तसेच मुसलमानांचे शिक्षणात वाढते प्रमाण असून त्यांच्या वाढलेल्या शैक्षणिक प्रमाणाबद्दल मात्र आश्चर्यही व्यक्त केले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या मते मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे ब्रिटिशांनी त्यांना दिलेली सवलत हे होय. ते म्हणतात,
“दोन माणसे सारखी सुदृढ असतील तर एकाला मलिदा व दुस-याला कोंडा देणे कधीच रास्त होणार नाही. पण एक रोगी व दुसरा निरोगी असला तरी निरोग्याला कोंडा व रोग्याला मलिदा हीच व्यवस्था प्रशस्त ठरते आणि म्हणून प्रथम अस्पृश्यांना सवलती दिल्या पाहिजेत.”

जेथे मूळातच लोक असमान आहेत तेथे सर्वांना समानतेने वागविणे अन्यायाचे आहे. म्हणून सरकारने प्रथम एक कार्य केले पाहिजे. सर्व जनतेला समान स्तरावर आणले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या मते,
“सर्वात मागास व वंचित अशा घटकांना सवलती प्रथम दिल्या पाहिजेत.”
पुढे ते म्हणतात,
“विषाद वाटतो तो एवढ्यासाठी की, मागासलेल्या पैकी मुस्लिम तेवढे सरकारला मागास दिसले. मराठा वर्ग व अस्पृश्य वर्ग यांच्या अस्तित्वाची बूज सरकारला का झाली नाही?मागासलेपणामुळे जर सवलती द्यावयाच्या तर जे जास्त मागासलेले त्यांना जास्त सवलती मिळावयास पाहिजे होत्या.”
त्यांच्या मते,
“उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीन बल होऊन अल्पायुषी होतो.तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुस-याचा गुलाम बनतो.”

सरकारने शैक्षणिक कार्य मोठ्या प्रमाणात वाढवावे. तसेच सर्वाधिक मागासलेल्या वर्गांना प्रथम सवलती देऊन समान पातळीवर आणावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच सरकारने शिक्षणाचे कर्तव्य केले पाहिजे कारण मागासलेल्या वर्गामध्ये शैक्षणिक परंपरा नाही. केवळ ब्राम्हण वर्गाला शिक्षणाची परंपरा आहे. शिवाय मागासलेल्या वर्गांना शैक्षणिक खर्च झेपवत नाही. म्हणून शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, असे बाबासाहेब म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार,
“व्यक्ती स्वातंत्र्याची आवश्यकता जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या अंगी व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची शक्ती उत्पन्न होणे आवश्यक आहे व ते केवळ शिक्षणामुळे शक्य आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज परिवर्तन, अस्पृश्यांची प्रगती, हिंदू धर्मात सुधारणा आणि परिवर्तन यासाठी प्रारंभापासून शिक्षणावरच भर दिला आहे. इंग्रज सरकारने शिक्षणव्यवस्था टाळून अनेक कायदे केले पण त्यांचा उपयोग काय झाला, असा प्रश्न विचारणाऱ्या गोपाळकृष्ण गोखल्यांचेच मत ठामपणे मांडताना डॉ. आंबेडकरांनी लिहिले आहे की,
“ज्या व्यक्तींना शिक्षणाची गोडी नव्हती, त्या जाती अशिक्षितच राहिल्या व व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी मोठमोठाले कायदे ठोकठोकून केलेले असतानाही अशिक्षित जनतेला सुशिक्षित वर्गाच्या लफंग्या व लोभी कारस्थानापासून सुटका करुन घेणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे सरकारचे कायदे फोलकट आहेत.”

अशा प्रकारे त्यांनी सरकारच्या कायद्यातील फोलकटपणा दाखवून दिला आणि शिक्षणाविना कायद्याचा फायदा नाही, असे म्हटले आहे. प्राथमिक शिक्षणाबद्दल बाबासाहेब म्हणतात,
“प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न अस्पृश्य वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. कारण त्यांच्याइतकी शिक्षणाची जरुरी दुसऱ्या कोणास आहे, असे वाटत नाही. अस्पृश्य वर्गाला शैक्षणिक परंपरा व शिक्षणाचे महत्व नाही. त्यामुळे ते आपल्या मुलांना शाळेत घालत नाहीत. म्हणून त्यांना शक्य तितक्या लवकर शिक्षण मोफत व सक्तीचे देण्यात यावे. प्राथमिक शिक्षणाच्या आधारावरच मानवाने प्रगती साध्य केली आहे. म्हणून प्राथमिक शिक्षण हे राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे.”

राष्ट्रीयदृष्टया प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आंबेडकरांना महत्वाचा वाटत होता. प्राथमिक शिक्षणावर सरकारचा ताबा असावा. शिक्षण हे सक्तीचे सांगून तो अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारचीच असावी. शिक्षण हे म्युनिसीपालटीच्या व लोकल बोर्डाच्या नियंत्रणात असू नये. कारण त्यामध्ये निवडून येणारी माणसे शिक्षणावर ताबा ठेवण्यास अपात्र असतात. शिक्षणाचे ध्येय व पद्धतीची अंधूक कल्पनाही त्यांना नसते. जातिभेद व पक्षभेदांमुळे सभासदात चुरस असते. त्याचा परिणाम शाळांच्या व्यवस्थेवर होतो. शिक्षणावर प्रांतिक सरकारचाच ताबा असणे इष्ट व आवश्यक आहे, असे बाबासाहेबांचे परखड मत होते. या विचारांवरुन त्यांची शिक्षणासंबंधीची दृष्टी, त्यांची तळमळ तसेच समाजातील विषमतायुक्त परिस्थितीबद्दलची व सरकारबद्दलची मतप्रणाली किती वस्तुनिष्ठ आहे, हे स्पष्ट होते. त्यांना शिक्षणापासून व्यक्ती परिवर्तन, समाज परिवर्तन आणि राष्ट्र परिवर्तनाची किती आस होती, हे स्पष्ट होते.

शिक्षण सर्वांना मिळावे तसेच शिक्षणामध्ये एकसूत्रीपणा असावा म्हणून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करावे. तसेच लोकांना साक्षर करणे, निरक्षरता हद्दपार करणे, ही सरकारची जबाबदारी आहे असे बाबासाहेब म्हणतात. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनासुद्धा शिक्षण एकत्रच मिळायला पाहिजे, असे बजावत त्यांनी सहशिक्षणाचा पुरस्कार करुन मुला-मुलींना सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण मिळायला हवे, असेही प्रतिपादन बाबासाहेब करतात. दारुची नशा करणे ही एक सामाजिक समस्या आहे. पण सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न त्याही आधी महत्वाचा आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात,
“आधी दारूबंदी की सार्वत्रिक शिक्षण? असा सवाल आम्हाला कोणी विचारला तर आधी सार्वत्रिक शिक्षण असाच आम्ही जबाब देऊ. कारण, शिक्षण प्रसार सार्वत्रिक झाल्यास दारुबाजीला आळा घालणे सोपे जाईल.”

संत गाडगेबाबा व बाबासाहेब यांचा स्नेह होता. बाबासाहेबांना शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांना सांगत. त्यांच्या शिक्षणविषयक कामाची माहिती देत. समाजप्रबोधनाच्या कामात दोघेही परस्परांना पूरक होते. 1928 ला रयत शिक्षण संस्थेच्या बोर्डींगला भेट दिल्यानंतर बाबासाहेब अत्यंत आनंदी झाले. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कामाचे तोंड भरुन कौतुक केले. आपण सर्व जातीधर्माची मुले एकत्र ठेवून त्यांच्यातील जातिभेद शिक्षणाने नष्ट करत आहात, ही या काळातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. असे म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकाळी कर्मवीर अण्णांच्या संस्थेला वीस रुपये देणगी दिली होती.

समाजाचे सर्वांगीण परिवर्तन शोषणमुक्तीच्या पायवाट असलेल्या शिक्षणातूनच शक्य आहे, अशी त्यांची धारणा होती. पारंपरिक शिक्षणापेक्षा त्यांना आधुनिक शिक्षण महत्वाचे वाटत असे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1946 मध्ये मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजची व 1950 ला औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली. या सर्वच संस्थांचा महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेत महत्वाचा वाटा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणविषयक धोरणांची आजच्या पिढीला दिशादर्शक ठरतील अशी काही तत्वे सांगितली. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली असली पाहिजेत. उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष सोयी व सवलती यांच्या योजना असाव्यात. कामगार, कष्टकरी व मजूर लोकांसाठी रात्र शाळा उपयुक्त ठरतील. अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य विकसन व तंत्रशिक्षण यांचा अंतर्भाव असावा. चारित्र्यसंवर्धनासाठी शैक्षणिक उपक्रम अंमलात आणले पाहिजेत, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यासाठी त्यांनी घटनेमध्ये विविध तरतूदींचा अंतर्भाव केला. शिक्षणाचे महत्व सांगताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
“स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार हे शिक्षणाचे ध्येय होय. शिक्षणातून व्यक्तिमत्वाचा जन्म होतो. आत्मविश्वास, आत्म आदर आणि आपल्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा निर्माण करण्याची क्षमता शिक्षणात असते.”

आज भारतामध्ये समस्त भारतीय समाजाला शिक्षणाची समसमान संधी उपलब्ध झाली आहे. समाजातील प्रत्येक घटक आपापल्या परीने प्रगती करीत आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नव्या शैक्षणिक धोरणांचे व विचारांचेच फलित होय, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही.

*

वाचा
जीवनमार्ग
आज दिनांक

कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’
– कादंबरी


नानासाहेब गव्हाणे हे वालचंद महविद्यालय, सोलापूर येथे मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांना संशोधन, संपादन व लेखन कार्यात विशेष रुची असून सुलेखन (Calligraphy) आणि पर्यटनाची विशेष आवड त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या कथा, कविता, लेख व निबंध विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :