दादरहुन रात्री १२ वा. ४८ मिनिटांनी नेरळकडं जाणारी लोकल ट्रेन पकडली. निमित्त होतं माथेरानच्या पर्वत रांगेतला ‘पेब किल्ला’ म्हणजेच ‘विकटगड.’ गडाखालच्या ‘पेबी’ देवीच्या मंदिरावरून या गडाचं नाव ‘पेब’ अस ठेवलंय.
लोकल ट्रेनमध्ये बसायला ऐसपैस जागा मिळाली. जवळपास रेल्वेचा अख्खा डबा आमच्या ग्रुपनंच व्यापला होता. काय गंमत आहे पहा ना, याच लोकलमध्ये दिवसा बसणं सोडाच पण उभं राहण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागतो. कारण काहीही असो, त्याबाबतची रेल्वे प्रशासनाची उदासीनता का असेना. कदाचित प्राप्त परीस्थितीत माणसानं स्वत:ला कसं अॅडजस्ट करायचं, हेच या लोकल ट्रेनला सुचवायचं असेल.
नेरळला उतरून ग्रुपच्या विभागण्या करून खाजगी वाहनानं आम्ही नेरळ-माथेरान रस्त्यानं विकटगडाकडं जाणाऱ्या वाटेकडं रवाना झालो. काळोख्या रात्रीची निरव शांतता भेदत, अंगाखांद्याला बिलगणाऱ्या थंड हवेचा आस्वाद घेत आणि वळणावळणाचे नागमोडी रस्ते पार करत गाडी सुसाट धावू लागली. विकटगडाकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकजवळ आम्ही उतरलो. सभोवतालचा निद्रिस्त परिसर पाहताना रात्री आकाश दु:ख, चिंता स्वत:च्या पोटात गडप करून माणसाला निर्धास्तपणे झोपण्याचं बळच देत असावं, हा विचार मनात येउन गेला. अफाट नभांगणावर ताऱ्यांनी अनेकविध नक्षत्रांची देखणी रांगोळी काढली होती. अंधाराच्या ओंजळीत चेहरा लपवणाऱ्या चांदण्या, गुंजराव करणारा मोरांचा मधुर नाद जणू आमचं स्वागतच करत होता.
शेकोटीभोवती बसून थर्मासमधल्या वाफाळलेल्या कॉफीचे घोट घेत गप्पांचा फड रंगला. त्याची जागा पुढं अंताक्षरीनं घेतली. आमचा एक मित्र इतकी सुंदर गाणी म्हणत होता की जणू संगीत मैफिलीत बसल्याचा भास झाला. पुढं रेल्वे ट्रॅकवरून आमची २५ जणांची रेल्वे गाडी धावु लागली. पुढची अरुंद वाट आणि काळोखातून चालणं म्हणजे धोक्याचं होतं. त्यामुळं सूर्योदयापर्यंत वाट पाहणं क्रमप्राप्त होतं. काळं आकाश जाऊन निळ्या बिछान्यावरून पिसाऱ्यासारख्या ढगांच्या रजई आडून सुर्य बाहेर येत हळदुला प्रकाश फेकत होता. सूर्योदयाच्या तांबड्या सौम्य क्षितीज छटा व धुक्याची दुलई पाहणं म्हणजे विलक्षण, अगदी मनाला भुरळ घालणारं. मन कसं त्या निसर्गाशी एकरूप होतं कळतच नाही. त्या नयनरम्य दृश्याचं सुंदर चित्रण कॅमेरात कैद करत आम्ही पुढचा मार्ग अवलंबला.
गडाकडं जाणाऱ्या लोखंडी प्रवेशद्वाराजवळ घंटानाद करीत पुढची मार्गक्रमणा सुरु केली. काही अंतरावर एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजुला पाषाणभिंत असलेली ती निमुळती पायवाट मनाचा आणि शरीराचा तोल सांभाळत पार केली. दगडांच्या खोबण्या करून तयार केलेल्या पायऱ्यावरून पुढं एका शिडीजवळ येउन पोहचलो. मात्र पुढची वाट खडतर होती. निसरडा खडक.. जिथं पाय ठेवू तिथला दगड निसटून जायचा. उन्हामुळं आजूबाजुचे खडकही तापले होते. अशात पहिल्यांदाच ट्रेकचा अनुभव घेणाऱ्या काही महिला आमच्या सोबत होत्या. गड चढताना पायाऐवजी हातावर जास्त जोर देण्याकडं त्यांचा भर होता. त्यांची पुरती दमछाक झाली असली तरीही उत्साह मात्र दांडगा होता. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार आम्ही अचूक शब्दांनी त्यांना धीर देत होतो. आयुष्याच्या प्रवासातही असे अनेक चढ- उतार येतात. आलेले यश-अपयश हेच मैलाचे दगड. प्रत्येकाचा वेग एकसारखा नसला तरीही एकमेकांना साथ देत असंच पुढं जात राहायचं असतं.
पावसाळ्यात धो-धो वाहणारे धबधबे खंडकांचं अंतरंग दर्शवत होते. वाटेत काहीजण वृक्षारोपण करून सामाजिक भान जपताना दिसली. निसर्गावर स्वार्थापोटी नानाप्रकारे घाव घालणारे अनेक असतात पण निसर्गाच्या संरक्षणासाठी धाव घेणारी अशी माणसंच समाजापुढं आदर्श घालून देतात. पुढं एका पठारावर विश्रांतीसाठी थांबलो. गडफेरीसाठी आलेली काही ‘सैराट’ जोडपीही दिसली. आमचाही ग्रुप याला अपवाद नव्हता, बरं का! बहुधा त्याचं एकमेकांवर जसं प्रेम आहे तसंच निसर्गावरही असावं.
सौंदर्यलंकारानं नटलेली अन् प्रेमानं ओतप्रेत भरलेली सृष्टी नेहमीच भान हरपून टाकते. सूर्याच्या सोनेरी किरणांनी हिऱ्यासारखं भासणाऱ्या अजस्र पर्वतरांगांचं विलोभस दृश्य मनात भरून, डोळ्यात साठवून आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करून पुढं कुच केली. निस्वार्थीपणे आपल्याकडे जे आहे ते देण्याचा अखंड प्रयत्न करणाऱ्या निसर्गाचं ते साजिरं-गोजिरं रूप एकाग्रतेनं पाहत रहावं, असंच वाटतं. पुढची उंच चढण पार करत, शिडी उतरून खाली आलो. बाजूलाच एक पाण्याचं टाकं आहे. अपुऱ्या देखभालीमुळं त्यात दुर्गंधी आणि गाळ साचलेला होता. दिसणारा सुळका वाट दृष्टीपथास आल्याची ग्वाही देत होता. आमची पावलं न अडखळता त्या आनंदापायी पुढं सरसावू लागली.
गडाच्या माथ्यावर मंदिरात स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. त्यापुढं नतमस्तक होत आपला इतिहास, सांस्कृतिक वारसा याचं संवर्धन प्रत्येक मराठी मनाकडून जमेल तसं व्हावं, ही इच्छा व्यक्त केली अन् जणू ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा नादच कानाशी घुमू लागला. माथ्यावरून दिसणारे प्रबळगड, नाखिंड, भटोबा असे सुळके खुणावत होते. उंचावरून पाहताना निसर्गानं उधळलेले असीमित रंग, बेभान वाहणारा वारा, अथांग पसरलेला निळसर जलाशय, विस्तारलेलं आकाश, घनदाट झाडी, पाखरांची मंजुळ कुजबुज हे सारं काही एक सुखद अनुभूतीच होती. निसर्ग त्याची अगाध किमया अनंत करांनी आपल्यावर उधळतोय.. आपण फक्त त्याच्या स्वाधीन व्हायचं, बस्स! अशा या आल्हाददायक वातावरणात ‘झिंगाट’ नाच करत फोटो काढण्याचा मोह काही जणांना आवरला नाही. दृष्टीपथात येणारी अवास्तव वाढत चाललेली ही महानगरं या डोंगराला गिळंकृत करायला येतात की काय, अशी अनामिक भीती मनात दाटल्यावाचून राहत नाही.
खाली कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून एका गुहेजवळ आलो. शिवाजी महाराज किल्ल्यावरच्या या गुहेचा धान्य साठवणुकीसाठी वापर करायचे, असा ऐतिहासिक संदर्भ आढळतो. या गुहेत स्वामी समर्थांची चित्र रेखाटली आहेत. तसेच कोपऱ्यात एक शिवप्रतिमा ठेवलीये. त्यावर बसलेली धूळ आमच्यातील काहीजण साफ करू लागले. अशीच ऐतिहासिक स्थळं जतन करण्याबाबतची शासनाची आणि इतर सुज्ञांची अनास्था धुळीसारखी दूर करता आली असती, तर किती बरं झालं असतं! आजूबाजूला अनेक भुयार आहेत. त्यात एका वेळेस एक माणूस जाऊ शकतो. हातात टोर्च घेऊन अशा प्रकारच्या गुहेत जाणं म्हणजे एक प्रकारचं धाडसच म्हणावं लागेल. आम्ही बाजूच्याच गुहेत मध्यान्ह भोजन आटोपून एका जागी शांत पहुडलो. निसर्गाच्या उबदार मायेनं भरलेल्या कुशीत पडून त्याच्याशी खूप बोलावं, खूप शिकावं असंच वाटत होतं. खूप काही दडलं होतं त्यात. विश्रांती घेतली व ताजेतवानं होऊन गडाच्या पायथ्याशी जाणारी नवी वाट धुंडाळत मार्गक्रमणा सुरु केली. दरीतल्या झाडावर पेंगणारी माकड आमची चाहूल लागताच आळस झटकून आमच्याकडं धाव घेऊ पाहत होती.
सुर्यदेवता जणू आगच ओकत होता. पायाखालची माती, पालापाचोळा तुडवत, मोकळा दीर्घ श्वास घेत, धापा टाकत पुढं चालू लागलो. उन चढलेलं होतं. उन्हाच्या झळांमधून हलणाऱ्या झाडाझुडपांना मुळांनी जमिनीत कैद केलंय, नाहीतर एरवी त्यांनीही सावलीसाठी धाव घेतली असती. जणू उकाडा वाढला म्हणत बऱ्याचशा झाडांनी आपली वस्त्रं उतरवलेली दिसली. झाडांचे खराटे झाले होते. सौंदर्यदृष्टी नसेल तो निसर्ग कसला? आणि तो निरस होईल, असं वागणारच नाही. हिरवाई उतरली असली तरीही लाल-केशरी पताक्यासारख्या भासणाऱ्या झाडांनी मधुकुंभाचे रंगीत घट डोक्यावर धारण केले होते. शेकडो जातीचे पक्षी ही मेजवानी झोडण्यास तुटून पडत असणार. सोबत माकडंही मधाचे चषक रिते करण्याची संधी दवडत नसणार.
चालता चालता तापलेल्या उन्हात एखाद्या झाडाखाली बसलं की अलगद वाहणारी झुळूक मन तृप्त करते. हे सारं काही शब्दात बांधणं म्हणजे वाऱ्याला मुठीत पकडण्याइतकंच अवघड होतं. पाणी संपल्यामुळं जवळपास आम्ही सगळेच तहानेनं व्याकूळ झालो होतो. काट्याकुट्यातून मार्ग काढत आणि आभाळाशी बोलू पाहणाऱ्या उंच झाडाशी थांबत झपझप पावलं टाकू लागलो. आयुष्याच्या वाटेवर पावलागणिक दमछाक झाली तरी धावावं लागतं ते जित्या जिवालाच आणि संगत मिळते तीही या शर्यतीत रखडणाऱ्या तरीही न फुटता धावणाऱ्या जित्या जीवांचीच!
ठेंगण्या पिवळसर गवतात उमटलेली पायवाट तुडवत सरळ गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या विहिरीजवळ आलो. विहिरीच्या थंडगार पाण्यानं ट्रेकचा सारा क्षीण धुवून काढला. नेहमी असं भटकताना निर्मळ मनाची अनेक माणसं भेटतात. प्रेमाच्या देवाण-घेवाणीवर मिळालेला अमुल्य ठेवा हृदयात घर करून जातो. खूप समाधान वाटतं. दुखरे हातपाय उद्या परवा थांबतीलही, पण हा अनुभव दुसरीकडं कुठं मिळणार आहे का? उद्याचा परतीचा प्रवास असा नाट्यमय असणार आहे का? अजून एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधुन ‘माणसं’ आणि ‘जग’ समजून घ्यायच्या या कार्यशाळेत आपण पुन्हा पुन्हा जात रहायचं, हा निर्धार करत परतीच्या वाटेला लागलो.
– श्रीकांत डांगे
*
वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता
श्रीकांत डांगे हे अक्षर मानवचे राज्य अध्यक्ष असून सध्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड असून कविता, लेख इत्यादी लेखन ते नियमितपणे करत असतात.