“अंधाराची खंत, तु कशाला करिशी रे
गा प्रकाश गीत, गा प्रकाश गीत…”
खरोखर, या प्रेरणादायी गीतातुन प्रकाशाकडं जाण्याची प्रेरणा मिळते. अंधारात चाचपडणारा माणुस खरोखर प्रकाश शोधण्यासाठी चाचपडत राहतो. असाच एक प्रकाश पडद्यामागील अंधारात अव्याहतपणे उजेड शोधत असतो.
आई – “आरे लेकरा, उठकी. आता तुला काय येळकाळ हाय का न्हाय? बघ किती कामं पडल्यात. पाणी भरायचंय, घर-दार, गोठा झाडून काढायचाय. न्याहारी घे आणि लाग की कामाला..”
प्रकाश – “आगं आये, आणि जरासं झोपूं द्याकी..
राती लय केलाय डिपांग, डिपांग,
डिप-डिप डिपांग,
डिपालाही डिपांग..
आणि हलगी, हाण,
काण, काण, काण..
काण, काण, काण..
आणि सनई पीsss, पीsss, पीsss…
असा सारा याचाच खेळ रंगला नि मी त्यात हारवूनच गेलो बघ. घरला यायचं मला भानच राहलं न्हाय. आता काय काम सांगू नको आये!”
आई – “मग काय चांगलाच घोळ केला की, किती पैकं मिळिवलंस? हिकडं त्यातलं थोडं द्यावं मग मीठ, चटणी, पीठ संपलीया ते आणाया.”
प्रकाश – “आण हिकडं पिशव्या, सारा बाजार आणून देतो. आता कुणाच्या दुकानाला जाऊ नि कुणाच्या गिरणीला जाऊ?”
बाबा – “ये आंधळ्या, जा देसायाच्या दुकानाला. तुला लगीच माल देत्यात. पर पायाकडं बघत जा नायतर ठेचकाळशील.”
दुकानदार – “प्रकाश, काय काय पाहिजे सांग भराभरा आणि अंधार पडायच्या आत घर गाठ एकदाचं. ह्यो बाजार घे.”
प्रकाश – “माझ्या पिशवीत सारं घातलयासा नव्हं? काय राहायला नको. नायतर पुन्हा यायाला लागायचं.”
आई धान्य निवडस्तवर प्रकाशनं पाण्याच्या कावडी आणल्या. आडाच्या रहाटाला दोर अंदाजानं बांधून घागर बारड्या लावून पाणी शेंदून अंघोळ केली. स्वतःची कापडं धुतली, घरी येऊन गिरणीला दळाया गेला, दळण गिरणीत ठेवलं आणि भाजीपाला बी आणाया गेला.
भाजीच्या कट्ट्यावर हौसा काकू भाजी विकत व्हती आणि तिची सून फुला तिला मदत करीत होती. ती सुनंला म्हणाली, “प्रकाशला चांगली भाजी दे. तव्हर मी घराकडंन च्या पिऊन येते.”
प्रकाश – “फुलाबाई, फुलवंती, फुलाई.. आंधळ्याला फसवू नका. चांगली भाजी द्या.”
फुलाबाई – “ये सगळी भाजी ताजी हाय. आत्ताच रानातनं आणलीया. गप गुमान घे नी घरला जा.”
प्रकाश –
“आगं, तू फुलाई माळीण गं माळवं इकू
राजा तुला बोलावीतो गं… न्हाय मी ये तू
पुतळ्या तुला घडवीतो, गं… न्हाय मी ये तू
आगं तू फुलाई माळीण गं… माळवं इकू
नथ तूला घडवीतू गं… न्हाय मी ये तू
फुलाबाईचं गाणं गाऊन तिला प्रकाशनं खुशच केलं. मग काय तिनं भरभरून सासुच्या माघारी माळवं दिली. तितक्यात हुशेन मामो भाजी न्यायला आलेला प्रकाशला म्हणाला, “आरं ये मर्दा, एवढ्या जवळ आलास तर चलकी घरी.”
त्याला काय मग पडत्या फळाची आज्ञा, गेलाच मागनं. हूशेन मामोची बीबी प्रकाशला बघून हारकून गेली.
“प्रकाशा आलाय त्येला चहा दे”, बीबीला मामो म्हणाला.
“परकाशा आधी काहीतरी करून दाखव, मग च्या”, चाची म्हणाली.
तसा त्याला हुरूप आला आणि तो पण म्हणाला, “चाची तू बी तुझी कला दाखवाया पाहिजेस.”
“आम्हाला कुछ आता नही”, ती म्हणाली.
“मग नाव घ्या नाव”, प्रकाश म्हणाला.
चाचीनं नाव घ्यायला सुरुवात केली,
“हुशेन मेरा लई लई गुणी
गळ्यात माझ्या बांधलाय मणी…
देख मैने नाव घेतलं, आता तू तुझी कला दाखव.”
प्रकाश – लागलं सोळावं साल, खरं वाटंना
आले वयात हे काय पटना, पटना
कुणी घालतंय शिळा, तेला लागलंय खूळ
काही केल्यान खूळ हे सुरना, सुरना
ओठ आवळून प्रकाशनं हे गाणं गायलं.
मामो – “अरं परकाशा, आम्हाला बी तुझं खुळ लागलया. ही चाची तर तुझं गाण ऐकाया खुळीच हुतिया.”
“हे घे च्या, पी आणि एक नकूल करून दाव”, चाची म्हणाली.
च्याचं झूरकं मारत मारत त्येनं कोल्हा, गाढव वरडण्याची नकूल केली. “हुकी हूsss हुकीsss हूsss”
चाची – “आता एक भाकरी खा उणउणीत, कराया लागलेस. चावल सब्जी बी तयार आहे.”
मग काय, प्रकाशनं उण उण भाकरी आमटीत कुस्करून खाल्ली आणि हॉप करून ढेकर देऊन तिथंच आडवा झाला.
मामो- “आरं ये आंधळ्या, लगेच डोळा लागला तुझा. उठ…”
“ये दोस्ती आता तुटायची न्हाय, नि या प्रकाशाची तार कधी सुटायची न्हाय, बाबा सुटायची न्हाय!”, प्रकाश सुरातच म्हणाला.
प्रकाश खाडकन उठून बसला आणि चाचीला म्हणाला, “और एक च्याय दे की चाची.”
चाची – “ये आंधळ्या, तुला काय धाड भरलीया, का सारखा चहा पीतयस?”
तरीही, चाचीननं त्याला कडक च्या दिला.
“अल्ला तेरा भला करे”, प्रकाश म्हणाला.
एकदाचा भाजीपाला आन् दळण बाजार प्रकाश घरी आला. आई दारातच वाट बघत होती.
आई – “परकाशा, कुठं आडकला हुतास? म्या कवाची वाट बघतीया भाकरीच्या पीठाला. म्या तर म्हटंल, कुठं खड्ड्यात आडकून पडलास काय? तू तसा पडणार न्हाईस, खरंतर तुच दुसऱ्याला पाडशील.”
“आये, मी दोनदा चाचीचा च्याय पीलाय, आता जेवायला दे. जोराची भूक लागलीया,” असं म्हणून प्रकाश ताट व तांब्या घेवून जेवाया बसला.
“बॅsss बॅsss बॅsss“, दावणीला शेळी वरडली.
“ये, करडे काय झालं वरडाया? म्या जेवलोय. तुला बी चारा पाहिजे, तर चल हिंडवून आणतो.”
तो वाट काढत बांधाकडून कुरणात शेळी हिंडवायला गेला. सरकारी इनामातील कुरणात शेळ्या सोडायच्या आणि आंब्याच्या झाडाखाली मऊगार गवतावर लोळायचं, हा त्याचा नित्यक्रम. लोळता-लोळता मस्त गाणी, भजनं, भारूडं मोठ-मोठ्यानं म्हणायचा. शेजारच्या रानातली माणसं ऐकायला आलीच समजा. मग दुपारची भाकरी तिथंच गोल करून बसून खायची. साऱ्यांची जराशी भाजी-भाकरी मिळून त्यांची तर मेजवाणीच व्हायची. मग काय पोट भरल्यावर ताजातवाणा होऊन प्रकाश उठून बसून रंगात येणार. मग म्हणा की एखादा पोवाडा, असा आग्रह व्हायचा वकाश की प्रकाशचा पोवाडा सुरू व्हायाचा,
“तुळापूरी कैद झाला वीर
धर्म भास्कर खरा झुंजार
शिपाई भगव्या झेड्य़ांचा
संभाजी छावा शिवाजींचा
तिलक देशाच्या सौभाग्याचा रं जी जी
जीsss जीsss रsss जीsss जीsss….”
नंतर तिथंच भाकरी खाल्ल्यानं झाडाखालीच ताणून दिली. रोजच्या उन्हाच्या तिरपीनं रोजची वाट मळणाऱ्या शेळ्या कधीच घरी गोठ्यात येऊन विसावल्या.
बाबा – “आगं, शेळ्या कवाच्याच गोठ्यात आल्यात परकाशा कुठं रेंगाळला.”
आई – “हायच तसं खोडगुणी आणि काय कुणाचं तरी गाणं नायतर नकूल करीत बसला आसल.”
इकडं प्रकाशला वाटेत फुगेवाला भेटला तो म्हणाला, “आरं परकाशबापू, हिकडं कुठं? वाट चुकली की काय?”
प्रकाश – “आर न्हाय रं बाबा, शेळ्या कुरणात चरायला आलो व्हतो.”
“मग शेळ्या कुठंय त्या आणि तू कसा माग राहिलास? का वाट चूकलास?” फुगेवाला म्हणाला.
प्रकाश – “म्हणत्यात नव्हं, आंधळ्याच्या गाई देव राखी. तसंच, आंधळ्याच्या शेळ्या बी देवच राखणार.”
फुगेवाला – “चल मग, आता बाजाराला माझ्यासंग. फुगे फुगवू, आकाशात उडवू, पीपाणी वाजवू, चल चल.”
बाजाराला येऊन दोघंही बसली. बघता बघता प्रकाशनं फुग्याचं झाड बनवलं, फूलं बनवली, पिंगा बनवला आणि मोठ-मोठ्यानं ओरडून फुगे विकू लागला,
“फुगे घ्या फुगेsss
आला आला आला फुगेवाला आला
झाला बोलबाला…
गोलगोल फुगं, मोठालं फुगं, चपटं फु फुगं, लांब लांब फुगं…”
फुगेवाल्याकडं गर्दीच गर्दी जमली आणि फुगेवाल्याकडचा पैशाचा गल्लाच भरला. सुकुमार पोराला घेऊन फुगे घ्यायला आला. त्याला प्रकाश दिसताच तो म्हणाला,
“आर परकाशबाबू, आई सकाळ धरून हुडकतीया… दिसला तर घरला पाठवा, म्हणून सांगितलया. जा की घरला. तुझ्या भाकरीला भुका लागल्या नव्हं.”
“फुगेवाला आला, येरं माझ्या मुला
गोल-गोल, लांब-लांब फुगा देतो तुला”
हा आवाज ऐकून आई दारात आली. तिनं रस्त्याकडं बघितलं तर प्रकाश फुग्याचं झाड घेऊन आलेला.
आई- आरं ये कार्ट्या, आता उगीवलास न्हारं.
“ढगाकडं बघा, लांब लांब फुगा,” आसं ओरडत फुग्यांचं झाड त्यानं भिंतीला टेकवलं तसं पोरांचा कोंडाळ त्याच्याभोवती गोळा झालं.
बाबा – “आर ये कार्ट्या, आई तुला करामत्या म्हणाली, ते बराबरच हाय. किती करामत्या करशील शेळ्या राखाया गेलास आणि ध्याड भरानं फुग्यांचं झाड घिवून आलास. पोराला काय फुगं खाऊनच फुगणार आहेस काय? जा आता घरात पाव्हणा आलाय तेची यवस्था कर.”
प्रकाश – “या पाव्हणं, जेवायला. पॉटभर जेवा. जराशान फिरून येऊ या.”
दोघांनी उणउणीत जेवणावर ताव मारला आणि गावंदरीला फिरायला गेली. झुलत-झुलत, डुलत-डुलत टाकी फुल्ल करूनच माघारी फिरली. तर, एका बांधावर नांगराचा टॅक्टर आडवा लावल्येला त्येला दोघ बी धडकली आणि टॅक्टरवरच विश्रांती घ्यायला आडवी झाली. तासभरानं पाव्हणा शुद्धीवर आला,
“परकाशराव, आव परकाशराव, चला की घरला” म्हणून हलवू लागला.
प्रकाशची अजून तरी उतरली नव्हती. तो हालनाच झाला, पाव्हण्यानं त्येला तिथंच टाकलं नि घर गाठलं. ट्रॅक्टरवाला जराशानं आला नि नांगराला ट्रॅक्टर जोडून नांगराला जोडून चालू केला. आर्ध रान नांगरून झालं, तरी परकाश ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत गाढ झोपला होता. ट्रॅक्टर जमिनीखालच्या दगडाला धडकला तसा परकाशा ट्रॉलीतनं उंच उडुन पुन्हा ट्रॉलीत पडला. चांगला आंगला हिसडा बसला आणि मग ताडकन जागा झाला नि वरडला,
“आर ये, ये भडव्या मला कुठं नेतोयास.”
तसा ट्रॅक्टरवाला हाबकलाच नि घाबरून म्हणाला,
“आर आर कोण तू? आण इथं काय कशाला आलास. नांगराच्या फाळानं भराया काय.”
प्रकाश – “आरं, म्या कशाला येवू इथं? मला कुणीतरी उचलून आपाटलया… बघ मी आजून शोध घेतुया त्या हाडळीचा.”
ट्रॅक्टरवाला – “आरं, तुला कोण आपटतया तव्हा आन् कुठली हाडळ तुझ्या जवळ तर येईल का? तूच एक मोठा हाडळोबा हाईस. साऱ्यांना लागशील तू. आंधळा परकाशा हायईस न्हव, जा आता घरी.”
“न्हाय रं बाबा, मला आजून फिरवाया लागलंय. चाचपून बी पुढचं काय दिसत नाय, मग कसा जाऊ? आन् मला आई घरात बी घेणार न्हाय,” प्रकाश म्हणाला.
“मग राहा इथच बस्तीला. मी रातपाळीनं रानातलं काम करतोय, मला सोबत बी होईल. मी मालकाला सांगून तूला रानातलं काम बी देतो”, ट्रॅक्टरवाला म्हणाला.
ट्रॅक्टरवाल्यानं खरंच मालकाला बोलवून प्रकाशला रानात चाकरी ठेवलं. सकाळी उठून गोठा लोटायचा, रानातलं घर झाडायचं. ढोरं पाण्यावर घालायची, इनभर मळ्याची पाखरांची राखण करायची. पण प्रकाशला मालक म्हणाला, “आरं, तू तर आधळं भीताड हाय की, कसा राखण करणार?
प्रकाश- “आवं धनी, मला ठिवून तर बघा. चीट पाखरूबी येऊ देणार न्हाय, तुमच्या रानात.”
“आन् प्रकाश पाटलांच्यात चाकरी राहिला. खाऊन पिऊन वर्षाला एक पोशाख असा ठराव झाला. आई-बाबांना सांगायला घरी आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली,
“कुठं गेलतास? कुण्या गावाला का काय? किती हुडकायचा तुला? माझ्या बाळा, आसं नको करू.”
प्रकाश –
“गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा, नि उडतो डोळा डोळा बाई डावा
आई बाबा मी पाटलांच्यात चाकरी ऱ्हाईलोया. आता दिन-रात तिथंच. कवातरेक घरी येणार. मी माझा पावा न्यायला आलोय, नि तुम्हाला सांगाया आलोय.”
आता बासरी घुमू लागली नि रानात रस्त्यानं जुनी-नवी गाणी बासरीनं वाजू लागली. रवीशाम पावा घालून माळ्यावर चढून गोफन फिरवत प्रकाश मळ्याची राखण करू लागला. कुठं खुट्ट वाजलं की याची गोफण आवाजाच्या दिशेनं फिरलीच. “कोण हाय तिकडं? हात लावायचा न्हाय कशाला, नाहीतर गोफणीतला दगूड बसलाच म्हणून समजा”
लहर आली की प्रकाश बासरीनं गाणी वाजवत बसायचा. एकदा रस्त्यानं जाणारी कला पथकाची गाडी गाणी ऐकून तिथंच थांबली. प्रकाश बासरी वाजतच होता. त्याच्या गाण्यांची मैफील बासरीतून ऐकायला रस्त्यावरची माणसं थांबायची. त्यादिवशी कला पथकातल्या मालकानं बासरी ऐकली आणि प्रकाशला ‘चहा प्यायला चल’ असं म्हणून हॉटेलात च्या दिला आणि कला पथकाच्या खेळात नेऊन बासरी वाजवायला लावली. सारे बासरी ऐकून डोलायला लागले. पथकाच्या मालकानं त्येला एकेका खेळाला पैसे देतो, असं सांगून ठेवून घेतलं.
इकडं शेताचा मालक त्याला जेवण घेऊन आला आणि आवाज देऊ लागला, “आर ये परकाशा कुठं दडलायास, मक्याच्या फडात हुरडा खातोयास का काय? बाहेर ये मी ताजी भाजी-भाकरी आणलीया.” त्याचा आवाज येईना, तसा तो घाबरला आणि म्हणून शेत मालकानं प्रकाशच्या घरीही सांगितलं.
आई – “आता काय करायचं बाई, कुणाच्या मागना भुलून गेला का काय? त्याला काय दिसतंय का वसतंय! आता कूठं हुडकायचं या करामतीला?”
प्रत्येक कार्यक्रमात वेगवेगळी कला दाखवून, नकला करून, गाणी म्हणून तो इतका प्रसिद्ध झाला की त्याला लोक वेगवेगळ्या कार्यक्रमात बक्षीस देऊ लागली. त्याचा खिसा भरू लागला. त्याला घराकडची आठवण येऊ लागली होती पण यातना निसटायचं कसं? त्याच्याभोवती सारखं कला पथकाच्या मालकाचं कोंडाळ असायचं.
एकदा गावाजवळच्या एका गावाची यात्रा होती. त्यात या कला पथकाचा कार्यक्रम होता. प्रकाश गायला उभा राहिला. नकला केल्या, पोवाडा म्हणायला लागला, त्याला साथ द्यायला खाली बसलेल्यातला एकजण आला आणि जीsss जीsss जीsss म्हणू लागला. त्येन त्याचा आवाज ओळखला आणि म्हणाला, “सुभ्या, जाताना मला भेट.”
कार्यक्रम संपल्यावर सुभ्य प्रकाशाला हुडकायला आला. सापडल्यावर त्यानं त्याच्या हाताला धरलं आणि गर्दीतनं पुढं सरकत सरकत आणून गाडीवर बसवून त्याला गावाकडं घरला आणलं. इतक्या रात्री घरी आलेल्या प्रकाशला पाहून सगळ्यांना आनंद झाला. आईनी त्याला मिठी मारली आणि म्हणाली,
“आला गं बाई माझा करमत्या परकाशा. आता मी तुला कुठं बी सोडायची नाही. घरात आणि गावातच रहा. थांब तुला आता येसनच घालूया, म्हंजी पाव्हण्यातली पोरगी बघून लगीन करूया.”
“पोरगी कसली हाय,” तो म्हणाला?
“हाय तुला सांभाळल, आमी उद्याच ठरवून येतो.”
त्याच्या आई बाबांनी पाहिलेल्या पोरीशी त्याचं लग्न झालं. कुसुम ही त्याची बायको. आगं बाई, प्रकाश आंधळाच हाय पण लईत पराक्रमी हाय. आता एक एक गुण कळल्यावर दिसायला लागलंय. कुणासंग बोलली तर येला राग यायचा नि तिला धरून बडवायचा. कशाला गं दुसऱ्या माणसा संग बोलतीयस, अशी शंका घेऊन तिला भिंतीत चेंगरायचा. त्याचा हा छळ तिला सोसला नाही आणि ती पळूनच गेली. ‘दादला आंधळा भिताड नि घर बी पडक भिताड करू नांदायची’, असं ती सारखी म्हणायची.
प्रकाश – “आई-बाबा, हे घ्या माझ्या गाण्याचं पैसं आणि घराची पडकी भिंत बांधा, आता मी कुठं बी जाणारा नाही, तुम्हाला सोडून.”
एकदा वैरण काढाया शेतात गेला, तर कुणाच्या बांगड्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेनं पाठलाग करून त्या बाईला पकडू लागला. ती रानारानातनं पळत होती नि हा तिचा जाम पाठलाग करीत होता. ती आडाकडं गेली तर अंदाजानं हा बी गेला. शेवटी आडावरच्या माणसानी त्याला थांबवला नि ती बाई एकदाची त्याच्या तावडीतून सुटली.
“परकाशा आसं रं का केलस,” त्याला लोकांनी विचारलं. “एखादा बाईचा पाठलाग करायचा ते बी आंधळा आसून ह्याचा आर्थ काय?” लोक म्हणाले. त्या बाईच्या घरातली माणसं काठ्या घेऊन त्याला बडवायला आली आणि त्याच्या आईनं मधी पडून त्याला सोडवलं.
आई म्हणाली, “परकाशा अस का एखादीच्या पाठी लागलास?”
“आगं आई, मला वाटलं पळून गेल्याली बायको परत आली. तिला पुन्हा धरून बडवावी म्हणून मी तिचा पाठलाग केला”, प्रकाश म्हणाला.
“थांब, आता तुला दुसरी बायको करूया”, आई म्हणाली.
डोळ्याच्या वर एक बाहुल्या असलेली एक बायको पुन्हा त्यानं केली. ती तर सगळ्या घरातली भांडी, वस्तू पायानं ठेचकाळायची. दूध, ताक, आमटीची भांडी सांडवायची.
“आये, मी बी आंधळा, ती बी आंधळी. मग मला ही बायको नको, घालवून ये हिला.” प्रकाशनं असं म्हणलेलं बायकोनं ऐकलं. एकदा तिचा बाबा आला आणि त्याच्याबरोबर गेली ती गेलीच.
“आता काय करायचं?” आईनं विचारलं.
“याला बायको नांदवायची अक्कल हाय का? शेवटी बायकोला कसं पटवायचं, हे स्वतःच्या हाताताच असतं,” बाबानं प्रकाशला डोस दिला.
तसा प्रकाश म्हणाला, “आवं, म्या कितीदा सांगितलं व्हत की मला बायको नग, तर ऐकायासा का तुम्ही? आता मी एकटाच बरा. इथं माझी वाट वसराया काठी लागते नि तिचा लोडणा कुणी वडायचा? आता मी एकटाच बरा, कशी बी वाट वसरतीयाच.”
‘मुंबईचा काका आला हाय. त्यो मला मुंबईला नेईल. मी तिथं जाऊन कामधंदा करीन. जीवाची मुंबई करीन’, असा विचार सारखाच प्रकाशच्या मनात डोकवायचा. पण, दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यांपुढं त्याचे आई-बाबा यायचे. ‘त्यांनी मला आंधळा आसून जगवलं. लहानाचं मोठं केलं. मला कळू लागल्यावर या आंधळेपणाचा राग यायचा वाटायचा. कशाला ही असली अंधाराची जिंदगी जन्मभर चाचपडायची. काळोखी प्रकाश होऊन जगायचं.’
प्रकाशला या सगळ्याचा भारी तिरस्कार आला नि एकदा त्यानं आईला म्हटलं, “आई, असल्या अंध भिंतीला म्हणजे मला कशाला जगवलस?”
आईनं मोठा सुस्कारा सोडला नि म्हटलं, “आरं पोरा, तुला काय सांगू तुझा वनवास? आगदी लहान हुतास नि कसल्या तापाची साथ आली आणि चांगलं मोठालं डोळं होतं तुझं नि टकामका बघत हुतास सगळीकडं. त्या तापातच तुझं डोळं आलं नि जे खवलं ते लवकर उघडलच नाहीत. घाबरून गेलो. डॉक्टरकडं नेलं तर डॉक्टर म्हणाला, पोराचं वाटोळ केलसा. आता हेचं डोळंच गेलंया. आर देवा, म्हणून मी हांबरडा फोडला नि तुला उरासंग धरून घरी आलो. तुझ्या बाबानी तुला उराशी धरलं नि हुंदके दिले. म्हणत्यात न्हवं आंधळा उरावरचा, आई म्हणाली.
आईचं हे ‘आंधळा उरावरचा’ वाक्य त्याच्या जिव्हारी झोंबलं नि त्यानं स्वावलंबी व्हायचं ठरवलं. रातभऱ विचार केला नि गाव सोडून मुंबईला जायचं ठरवलं. मुंबईच्या रस्त्यानं काकाची आणि त्याची रेल्वे निघाली. रेल्वेच्या डब्यात किती तऱ्हेची माणसं असत्यात. स्टेशन आलं की चढत्यात आणि उतरत्यात. लहान मुलाला पाठीला बांधून हातात वाडगा घेऊन भीक मागत एक बाई त्यांच्या समोर आली नि गाणं म्हणू लागली,
“गरीबोंकी सुनो, ओ तुम्हारी सुनेगा…
तुम एक पैसा दोगे, ओ दसलाख देगा…”
काकानं तिच्या वाडग्यात पैसं टाकलं. तिनं आशीर्वाद दिला. तिच्या गाण्यानं प्रकाशला प्रेरणा मिळाली. काका वर बाकड्यावर गाढ झोपले होते. हीच संधी साधली आणि तो एका स्टेशनला हळूच खाली उतरला. स्टेशनवर कितीतरी वेळ बसून राहिला. भूक लागली, तहान लागली, चहाची हाफ लागली. एक आंधळा स्टेशनवर बसलेला बघून त्याच्या पुढ्यात लोकांनी पैसे टाकायला सुरवात केली, तसा त्याला धीर आला. त्या पैशानं त्याचं खाऊन पिऊन होई. स्टेशन मागून स्टेशन येत होती नि जात होती. ‘काका मुंबईत उतरले असतील. आपणही स्टेशनं करीत करीत मुंबईला जाऊ’, असं त्यानं ठरवलं. मध्ये खुप काही अनुभवलं. एका स्टेशनवर बाकड्यावर झोपायला म्हणून बसला, तर पोलिसांनी त्याला हाकललं. तिथून तो रोडमध्ये झोपला. सकाळी उठून बघतोय, तर त्याच्या उशाला असलेली पिशवी पळवलेली. त्यात त्याची सारी कापडं, सामान, पैसं सारं गेलं.
“विठल्लाsss आsss, तूच खरा आधार
दुनियादारी असूनी सारी फोल अशी ठरणार
विठल्लाsss तूच खरा आधारsss तूचsss”
अशी गाणी म्हणत तो एका झाडाखाली बसला. लोकांनी त्याच्या पुढे पैसे टाकले, कुणी खायला दिलं. काही वेळानं ट्रॅफीक पोलिसांनी पुन्हा त्याला तिथून हाकललं. थोडे पैसे खिशात होते, कसंतरी करून त्यानं काकाचं घर गाठलं. काकानं आसरा दिला. सकाळी गारेगारच्या कांड्यावाल्याकडं नेलं. त्यानं लाल-पिवळ्या-हिरव्या कांड्या भरून गारेगारचे डबे विकायला दिले. दिवसभर मजुरीवर हे काम करू लागला आणि काकाला मदत होऊ झाली.
काका – “परकाशा, आता रात्रीचं चौपाटीवर भेळ, भडंग विकायला जा.”
त्यानं काकाचं ऐकलं. चौपाटीवर भेळ विकली, पण मुंबईतला पैसा मुंबईतच मुरला. काकानं एका अंध-उद्योग केंद्रामध्ये त्याचं नाव घातलं. तिथं निरनिराळ्या पिशव्या विणू लागला. बरेच पैसे मिळवले. असेच दिवस गेले. आता त्याला अंधत्वाचा आणि मुंबईचा उबग आला होता. पुन्हा मोकळ्या हवेत त्याला बागडावे वाटू लागले होते. एक दिवशी तो पहाटे लवकर उठला. अंदाजानं रस्ता काढत काढत त्यानं गाव गाठलं. गावी जाऊन आई बाबाला गावात डोळे भरून शोधलं. त्याच्या डोळ्यापुढं न संपणारा अंधार असूनही हा झालेला अथक प्रवास तो कधीही विसरू शकत नव्हता. उजाडता उजाडता दारात प्रकाशला पाहून आई-बाबा धावत आले. भावंडे आली. शेजारी-पाजारी आले.
“परकाश आला, परकाश आला”, म्हणून साऱ्यांनी गलका केला. एक जण हाताला धरून म्हणाला, “परकाशबापू, चलकी कट्ट्यावर गप्पा मारूया. आता कसा कट्टा भरगच्च दिसेल बघ.”
तेव्हा न दिसणारा कट्टाही आता काळोखी प्रकाश बनून त्याच्या नजरेपुढं प्रकाशाप्रमाणं चमकला.
(असा हा पडद्यामागील डोळ्यांचा प्रकाश आणि त्यांचे हे ‘पडद्यामागचे डोळे’)
*
वाचा
भावना दुर्वेचं साहित्य
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता
भावना प्रशांतकुमार दुर्वे या साहित्यप्रेमी असून त्यांना काव्य आणि गीतरचना, साहित्यलेखन, पर्यटन, लोकजीवन, ग्रामीण जीवन,निसर्ग आणि लहान मुलांचे भावविश्व यांची विशेष ओढ आहे. त्या कोल्हापूरच्या रहिवासी असून निवृत्त शालेय शिक्षिका आहेत.