थ्री इडियट्स या हिंदी सिनेमातील हे एक दृश्य सिनेमाच्या भाषेचे खूप सुंदर उदाहरण आहे. दिग्दर्शक राजू हिरानी यांचा भारतीय शिक्षण व्यवस्थेतील घोकंपट्टी, अनावश्यक स्पर्धा आणि विद्यार्थ्यांवरील पालकांचा व एकंदरीतच सामाजिक दबाव याचे व्यंगात्मक चित्रण करणारा, आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पडणारा असा हा विनोदी सिनेमा आहे. भरपूर मालमसाला असलेला पण तितकाच सकस असलेला हा माझा अत्यंत आवडता सिनेमा असून, हा मी नियमितपणे पाहत असतो. यातून मला जगण्याची ऊर्जा मिळत राहते!

वरील चित्रचौकटीतील प्रसंगाची पार्श्वभूमी अशी आहे की चित्रपटाचा नायक रँचो (अमीर खान) व दोन सहनायक राजू रस्तोगी (शर्मन जोशी) आणि फरहान कुरेशी (आर. माधवन) या तीन तरुणांना भारतातील प्रथम क्रमांकाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. टेक. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रथम वर्षाला प्रवेश मिळालेला आहे. हे पहिलेच लेक्चर कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये भरलेले आहे. या वर्गात नायक, दोन्ही सहनायक आणि इतर विद्यार्थी हजर आहेत. प्राध्यापक ‘मशीनची व्याख्या काय?’ या प्रश्नाने पहिल्या पाठाची सुरवात करतात! पण तत्पूर्वी ही कहाणी सांगणारा फरहान कुरेशी या सहनायकाचा आवाज (व्हाईस ओव्हर) रँचो या नायकाचे कौतुक करत, श्रोत्यांना (प्रेक्षकांना) त्याची ओळख करून देत म्हणतो की, ‘आम्ही सगळे प्राध्यापकांच्या हातातील रिमोट कंट्रोलच्या इशाऱ्यावर चालणारे रोबोज् होतो. कदाचित तो एकमेव असा होता जो मशीन नव्हता !’

सहानायक फरहान कुरेशी, सिनेमाचा नायक रँचो याची जी वरील ओळख करून देतो तीच गोष्ट या दृश्यातील इतर घटक ठळक करतात आणि अजून शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतात ! कसे करतात हे समजून घ्यायचे असेल तर वरील या फ्रेममधील प्रत्येक गोष्टीला आपण ‘का?’ प्रश्न विचारला तर आपल्याला सिनेमाची भाषा उलगडता येईल !

हे दृश्य वर्कशॉपमध्येच का चित्रित केले आहे? लेक्चर हॉलमध्ये का नाही? वर्कशॉप असेच का आहे? त्याचे शटर लावलेलेच का आहे? खिडक्या काचबंद का आहेत?  त्याच्या भिंतींचा रंग असाच का आहे? विद्यार्थ्यांना मशीन्सच्या मध्ये का बसवले आहे? विदयार्थ्यांना बसवलेलेच का आहे? फोर ग्राऊंडला निळे मशीन का आहे? बॅकग्राऊंडला उंच पिवळे मशीन का आहे? फळ्यावर मशीन का लिहिलेले आहे? विद्यार्थी ज्या क्रमाने बसवलेले आहेत त्यांना त्या क्रमाने का बसवलेले आहे? त्यांच्या अंगात गणवेश न दाखवता रंगीत कपडे का आहेत? रँचो व इतर विद्यार्थ्यांना त्या त्या रंगाचेच कपडे का आहेत? प्राध्यापक पुरुषच का आहे? वयस्करच का आहे? यातील प्रकाश फिकट (डल) का आहे? याची रंगसंगती अशीच का आहे? हा शॉट या अँगलनेच का घेतलं आहे? यातील संवाद असेच का आहेत? असे प्रश्न विचारत गेलो तर काहींची बरोबर उत्तरे सापडतील, काहींची चुकीची तर काही अनुत्तरित राहतील! पण या प्रक्रियेत आपण समृध्द होऊ एवढे मात्र नक्की!

आपल्या शिक्षण व्यवस्थेचे यांत्रिकीकरण झालेले असून महाविद्यालये हे कारखाने बनले आहेत. या कारखान्यांमधून प्रॉडक्ट्स बाहेर पडतात. विद्यार्थी, माणसे न राहता कॉलेजमधील प्राध्यापकांच्या इशाऱ्यावर नाचणारे रोबोट्स म्हणजेच मशीन बनले आहेत. शिक्षणव्यवस्था जुनी झाली असून पुस्तकांचे रूपातर पोथ्यांमध्ये झालेले आहे. या झापडबंद व्यवस्थेत खरे ज्ञान मिळत नसून अर्थहीन घोकंपट्टीला ज्ञान समजले जात आहे. किती समजले आहे यापेक्षा पाठांतर किती केले आहे, यावरून गुणवत्ता ठरवली जात आहे. हसत-खेळत सौदार्हपूर्ण वातावरणात सोप्या भाषेत शिकवणे कमीपणाचे मानले जात असून रटाळ कंटाळवाण्या पध्दतीने क्लिष्ट भाषा वापरत विद्यार्थ्यांचे काहीही ऐकून न घेता एकतर्फी माहितीचा मारा करत आहेत. विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणारी ‘गप्प बसा’ संस्कृती तयार करून शिक्षक ही वर्चस्ववादी सत्ता बनली आहे. असे साधारणतः वरील प्रसंगात मांडले आहे.

पहिलाच पाठ वर्कशॉपमध्ये दाखवला आहे – शिक्षणव्यवस्था एक कारखाना झाला आहे. वर्कशॉपचे वातावरण, प्रकाशव्यवस्था, रंगसंगती फिकट दाखवून ही व्यवस्था कंटाळवाणी, निरस अशी आहे असे दाखवलेले आहे. दार व खिडक्या बंद आहेत म्हणजे झापडबंद शिक्षणव्यवस्था, त्यात बाहेरील नवीन गोष्टींना प्रवेश नाही. विद्यार्थ्यांना मशीन्सच्या मध्ये बसवले आहे, शिक्षणसत्तेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थी व मशीनमध्ये काहीही फरक नाही. विद्यार्थ्यांना भावनाहीन समजले पण जाते आणि भावनाहीन वागणूकही दिली जाते. शिक्षकांची पोझिशन उंच आणि विद्यार्थ्यांची खाली, म्हणजे शिक्षणातील वर्चस्ववादी व्यवस्था! चित्रपटाची तरल, सूक्ष्म भाषा न समजणाऱ्या प्रेक्षकांसाठी, मशीनप्रमाणे समजले जाणारे विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचे यांत्रिकीकरण हे अधिक ठळक करण्यासाठी समोर फळ्यावर ‘मशीन’ हा शब्द पण लिहिलेला आहे. म्हातारे पुरुष शिक्षक म्हणजे जुनी झालेली पुरुषप्रधान शिक्षणव्यवस्था!

विद्यार्थ्यांना गणवेश न देता रंगीत कपडे दिलेले आहेत. याचे मी दोन अर्थ काढले. विद्यार्थ्यांना रंगीत कपडे घालायची मुभा दिली. ‘बघा आम्ही कसे खुल्या विचारांचे आहोत’, असे दाखवायचे दात आहेत! आणि दुसरे म्हणजे वेगवेगळे रंग विद्यार्थ्यांचे गुणधर्म, व्यक्तिरेखा स्पष्ट करतात!

आमिर खानला पिवळ्या रंगाचा टी शर्ट दिला आहे, कारण पिवळा रंग हा सूर्याचा रंग आहे. प्रकाश, चैतन्य, आनंद, प्रसन्नता, आशावाद, सर्जनशीलता, कल्पकता, नवीन विचार याचे प्रतीक आहे. शेजारी निळ्या रंगाचे मोठे मशीन आहे. याचा मोठा आकार म्हणजे या दृश्यातील वर्चस्ववादी (डॉमिनंट) गोष्ट – मशीन! आणि त्याचा निळा रंग निरस, कंटाळा, निराशजनक असा तर आहेच, पण पिवळ्याशेजारी निळा हे परस्परविरोधी असल्याने पिवळा रंग अधिक उठून दिसतो. आमिर खान अधिक ठसठशीत दिसतो! या पिवळ्या रंगाला बॅलन्स करण्यासाठी अजून एक विद्यार्थिनीचा शर्ट पिवळा आहे आणि शिक्षकाच्या मागे एक पिवळ्या रंगाचे मशीन दाखवले आहे! यातून त्रिकोणी रचना साधली आहे! या चित्रचौकटीच्या संदर्भात निळा रंग निरस, कंटाळा, निराशजनक म्हणून वापरला आहे. यातील नकारात्मक पात्र सायलेन्सर (ओमी वैद्य) याला पण त्यामुळे निळ्या रंगाचा शर्ट दिला आहे. कथित हुशार विद्यार्थी पुढे बसतात, म्हणून सायलेन्सरला सर्वात पुढे बसवलेले आहे. तीन मित्रांपैकी ज्यावर शिक्षण पूर्ण करण्याचा खूप जास्त दवाब आहे, त्याला सर्वात पुढे बसलेले दाखवलेले आहे. मनाविरुद्ध शिक्षण घेत असलेला मध्यभागी, तर कुठेही आनंदाने शिक्षण घेता येते असे मानणारा त्या तिघांमध्ये सर्वात शेवटी बसवलेला आहे. त्यांची परिस्थिती आणि मानसिकता त्यातून दाखवलेली आहे. नैराश्यग्रस्त राजू रस्तोगीचा शर्ट ग्रे-राखाडी दाखवलेला आहे!

या दृश्याचा अँगल असा आहे की जणू काही आपण रँचोच्या बाजूने आहोत आणि त्याच्या खांद्यावरून, त्याच्या दृष्टीकोनातून या प्रसंगाकडे पाहत आहोत.

यातील संवादातून कळते की विद्यार्थ्यांनी आनंद घेत, मजा घेत शिक्षण घेणे व्यवस्थेला मान्य नाही. शिक्षण प्रक्रिया निरस असली पाहिजे असा दंडक आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा उल्लेख अस्पृश्याप्रमाणे येथे केला असून अभ्यासक्रमाप्रमाणे पण वर्गभेद, जातीयवाद केला जातो. शालेय पुस्तकांचे रूपांतर पोथीत झाले असून ही व्यवस्था पोथीनिष्ठ, संकुचित, झापडबंद झालेली आहे. वेगळा विचार करणाऱ्याला त्यांच्या प्रचलित व्यवस्थेत बसू दिले जात नाही, त्याला इडियट ठरवून व्यवस्थेबाहेर काढले जाते. त्याला हास्यास्पद ठरवले जाते !

आता हे सगळे अगदी असेच्या असे दिग्दर्शकाला अपेक्षित असेल का? तर नक्कीच नाही! येथे ८५-१५ चा नियम लागू पडतो. आपल्याला जे समजले, आपण जो अर्थ काढला त्यातील ८५ टक्के दिग्दर्शकाला अपेक्षित असणार, त्यादृष्टीनेच त्याने तशी रचना केलेली आहे आणि १५ टक्के गोष्टी त्याला अपेक्षित नसताना आपण त्याचा चित्रपटपूरक अर्थ काढला असेल. पण त्याला यातील काहीही अपेक्षित नसताना १००% अर्थ आपण यावर लादला आहे असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक तर आहेच; पण आपल्या चित्रपट निरक्षरतेचे द्योतक आहे. कारण चित्रपटाच्या प्रसंगांची रचना करताना ही मंडळी खूप काही पेरत असतात आणि आपल्या डोक्यातील सुपिकतेनुसार अर्थ उगवत असतात.

सुपीकता वाढवत राहुयात, समृध्दी वाढत जाईल. आपले जीवन अधिक आनंददायी होईल.

एक चित्र हजार शब्दांचे काम करते असे म्हणतात, या चित्राच्या बाबतीत शब्दशः तसे घडले आहे!

– मितेश ताके

***

वाचा
चित्रपटविषयक लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :