शहापूरचा ‘माहुली’

माहुली गडाच्या पायथ्याशी दाखल होताच एक दुचाकीस्वार आमच्याजवळ आला. रात्रीच्या काळोखात त्या गृहस्थाचा चेहराही नीट दिसत नव्हता. ओळख करून देताना म्हणाला,
“मी ठाकरे. इथंच माझं छोटंस हॉटेल आहे. जेवण, नाश्ता-पाणी काहीही लागलं तरी कधीही सांगा. व्हेज, नॉन-व्हेज, ऑम्लेट सर्व काही मिळेल.”
आता ऑम्लेट व्हेज की नॉन-व्हेज हा प्रश्न त्यालाही पडला असावा.
“अगदी रात्री वाटेत काही लागलं, कुठं चुकलात तरी कधीही हक्कानं फोन करा,” हे आपुलकीनं सांगायलाही तो विसरला नाही.
गड चढताना लागणारी वाट अगदी नम्रपणे दाखवून तो आपल्या मार्गी लागला.

किल्ले माहुलीवर पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं. गडसंवर्धनाला थोडा हातभार व गडफेरीचा आस्वाद घेण्यासाठी आम्हीही आसनगाव-शहापूर नजीकच्या या गडावर जाण्याची मोहीम ठरवली. गडस्वारीसाठी नेहमी सोबत असणाऱ्या आमच्यातल्या काही जणांनी ऎनवेळेस टांग दिली. तरीही आम्ही आमचा बेत काही बदलला नाही. गडावर पोहचायला उशीर झाल्यामुळं आम्हाला सह्याद्री प्रतिष्ठानच्या त्या सत्कार्यात प्रत्यक्षरीत्या सहभागी होता आलं नसलं तरी आमच्या परीनं आम्ही जमेल तशी स्वच्छता मोहीम राबवली.

अंधाराचं साम्राज्य चहुबाजूला पसरलं होतं. आम्ही गडाखाली असलेल्या शंकराच्या मंदिरात थोडा विसावा घेत गडस्वारीला सुरवात केली. वाटेत इतरही काही मंदिरं लागली. थोडावेळ चालल्यानंतर वाट चुकल्याचं आमच्या लक्षात आलं. सह्याद्री प्रतिष्ठानच्या काही व्यक्तींशी फोनवर संवाद साधून गडावर जाण्याची माहिती मिळवली आणि आम्ही पुन्हा त्याच वाटेनं माघारी फिरलो. पुढच्या टप्प्यावर आम्ही एका कोरड्या ओढ्यापाशी येउन पोहचलो, जो आम्हाला वाटेत सुरवातीला लागलाच नव्हता. आमच्यातले काहीजण त्याला ‘चकवा’ समजू लागले. मी मात्र त्याला ‘रात्रीस खेळ चाले’ म्हणत पुढच्या वाटेला लागलो.

इथून पुढं खऱ्याखुऱ्या गडचढाईला सुरवात झाली, असं म्हणता यॆईल. सोबतीला टपोऱ्या चांदण्यातली रात्र, वायुलहरी, आणि रातकिड्यांची अंगाई होतीच. शारीरिक तयारी नसली तरीही मानसिक बळाच्या जोरावर आमच्यातला एकजण गडफेरीसाठी आला होता. त्याला पावलागणिक लागणाऱ्या थकव्यामुळं आम्हाला अनेक ठिकाणी थांबवं लागलं. त्यामुळं आमची पुरती दमछाक झाली, हे मात्र खरं. पुढं हाच हरहुन्नरी मित्र शंकर महादेवनची ‘कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता है…’ अशी एका दमातली गाणी ऐकवताना मात्र दमला नाही (थट्टा-मस्करीचा भाग असल्यामुळं दमवणाऱ्यानं दमानं घ्यावं).

रात्रीच्या भयाण शांततेत दगड धोंड्यातून वाट काढत, मोकळा दीर्घ श्वास घेत, धापा टाकत आम्ही पुढं चालू लागलो. नभांगणातल्या चंद्रकोरीच्या शीतल छायेत न्हावून घेत पुढं एका सपाटीच्या जागेवर येवून थांबलो. पहाटेच्या दोन वाजता एका दमात गाणं गाणाऱ्या आमच्या त्या मित्राकडून अनेक सुरेल गाण्यांचा आस्वाद घेत आणि दोन घास खात पोटातली भूक शांत करू लागलो. हे सारं काही भन्नाटच होतं.

पेटपूजा करून आम्ही मार्गी लागलो. काही अंतर चालून एका विस्तृत पठारावर पोहचलो तेव्हा अंगाला बिलगणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळं थकवा कुठल्या कुठं उडून गेला कळलंच नाही. रात्रीच्या अंधाराचा पदर आता कोरा रिकामा नव्हता, तर त्यावर चमचमणाऱ्या चांदणखडीची नक्षी उमटली होती. तिथं आमच्या डोळ्यांची झापडं कधी बंद झाली, कळलंच नाही.

सकाळी जाग आली तेव्हा सुर्यदेवाचं नुकतंच आगमन झालं होतं. समोरच धुक्याची शाल पांघरलेली सुळक्यांची रांग मन खिळवत होती. कदाचित ते सौंदर्य शब्दातही मांडता येणार नाही. ते सारं कॅमेरात कैद करण्यावाचून पर्याय नव्हता. अजून अर्धी चढण पार करायची होती. मनाला आवर घालत विश्रांती घेऊन नव्या दमानं पुन्हा चढाईला सुरवात केली.

वाटेतल्या प्रचंड आकाराच्या शिळा ओलांडत, हाताचा आधार घेत पुढं पुढं पावलं टाकू लागलो. वाटेत करवंद, जांभळाची अनेक झाडं होती. प्रत्येक रानाचा स्वतःचा असा काही गंध असतो. तो गंध नाकात शिरत होता. पानगळ झाल्यामुळं पानांचाही वास दरवळत होता. पोटभर करवंद खाऊन आम्ही चालू लागलो. डोळे सुळक्यांकडं असले तरी कान पक्ष्यांच्या आवाजाचा मागोवा घेत होते. शेवटची शिडी दृष्टीपथात येताच आता गडावर पोहोचणार, या भावनेनं आनंदाचा प्रवाह अंतरंगातून ओसंडून वाहत होता.

महादरवाजाचा डौल, काळ्या भिंती, वाड्याची पडझड, शिवलिंग आणि पाण्याचं टाकं जणू आमचं स्वागतच करत होते. तिथंच वाढलेली दाढी, विसकटलेले केस आणि पांढरा टी-शर्ट घातलेले एक इसम सोबतच्या लहान मुलांसमवेत गडावर स्वच्छता मोहीम राबवत होते. ते येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला जवळ बोलावून ‘महाराजांचे हे गड-किल्ले आम्ही पवित्र स्थान मानतो. इथं ही शहरी गिधाडं येउन हैदोस घालतायेत… (आणि बरंच काही)’ हे सारं आपल्या भारदस्त आवाजात सांगत होते. गडसंवर्धनाला हातभार तसेच गडावर घडणाऱ्या विघातक कृत्याचा (फेकलेल्या दारूच्या बाटल्या, केरकचरा, नशेत धुंद व्यक्ती) बिमोड करण्याबाबत विनंतीवजा उपदेश करत होते. गेली पंचवीस वर्षं सातत्यानं गडसंवर्धन करणाऱ्या, हिंदुत्वानं झपाटलेल्या त्या ध्येयवेड्या गृहस्थाला सारे ‘दादा’ म्हणून हाक मारत होते. सोबत असणाऱ्या लहान मुलांना ते गडसंवर्धन आणि सामाजिक विषयाचे धडे देत होते. त्यांच्या मते, ‘गडफेरी करताना येणारी वेडीवाकडी वळणं, चढण, प्रतिकूल परिस्थिती, निसर्गाचे नानाविध रंग हे आयुष्यासारखेच रंजक आहेत.’

प्रतिकूल परीस्थितीत टिकून राहण्याची आणि पुढं जाण्याची क्षमता कमी झालीये. सगळं व्यवस्थित, सुनियोजित आणि बडदास्त ठेवणारं असलं पाहिजे, या प्रयत्नात आपली प्रतिकारशक्ती, सहनशक्ती कमी झालीये. माणूस अशा प्रतिकूल परीस्थितीतच सक्षम बनतो. कदाचित हेच त्या गृहस्थाला या कोवळ्या वयात मुलांच्या मनावर बिंबवायचं असेल. पुढं आम्हीही त्यांना गडावरला कचरा उचलायला मदत केली.

महादरवाजासमोरचं वाडासदृश बांधकाम काळाच्या ओघात झालेली पडझड, सारं छिन्न-विच्छिन्न आणि उध्वस्त झालं असलं तरी मराठ्यांच्या इतिहासातल्या पाऊलखुणा पाहिल्या की मनाचे घोडे चौफेर उधळू लागतात. आम्ही तिथल्या गोड पाण्याच्या टाक्याजवळ आलो. आमच्यातल्या एका संशोधक मित्रानं रिकाम्या बाटलीला छिद्र पाडून त्यात कोळसा भरून पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग सुरु केला. आम्ही मात्र त्यादरम्यान आमच्या रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या. त्याचं संशोधन पुढंही चालू राहिलं. नंतर तर तो झाडाच्या पानांची पिपाणी करून तोंडानं वाजवू लागला. तिथली लहान मुलं ‘दादा, आम्हाला पण दाखव’ म्हणत त्याच्याभोवती जमा झाली, तेव्हा त्यांना प्रात्यक्षिकं दाखवताना मात्र त्याची ‘हवा’ नक्कीच निघाली असणार.

कल्याण दरवाज्याकडं जाताना वाटेत लागणाऱ्या खिंड-दगडांना पार करत सर्वोच्च माथ्यावर पोहचलो. तिथून सभोवतालचं क्षितीज न्याहाळण्याचं फिलिंग काही औरच होतं. आकाशाशी गुजगोष्टी करणारे भटोबा, नवरा-नवरीचे सुळके हातात हात घालून उभे होते. हे सारं डोळ्यात साठवताना फोटो काढण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही.

गड उतरताना महादरवाज्याजवळ ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ आणि ‘माहुली निसर्ग न्यास’ची मंडळी भेटली. त्यांच्याशी ओळख झाली. हनुमान दरवाजा, कल्याण दरवाजा, महादरवाज्याजवळील गडसंवर्धनाबाबत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेताना लक्षात आलेली त्यांची मेहनत, जिद्द आणि प्राप्त परीस्थितीत सुरु असलेला प्रवास मनाला उभारी देणारा होता. आज ऐतिहासिक साक्ष ठरलेल्या वारसा स्थळांची जतन करण्याबाबतची उदासीनता, ते टिकवण्यात आणि पुढच्या पिढीत नेण्यात दुर्दैवानं येणारं अपयश दिसून येतं. अशा परीस्थितीतही त्यांच्यासारख्या शिवप्रेरणेनं भारलेल्या दुर्गसंवर्धक, गिर्यारोहक आणि जिज्ञासू लोकांमुळंच या गड-किल्ल्यांचं अस्तित्व आणि इतिहास आपल्याला ठाऊक होतो.

आता पोटात कावळे ओरडू लागले होते आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या काही लोकांनी जेवणाचा केलेला आग्रह आम्हाला काही नाकारता आला नाही. कदाचित त्या कावळ्यांची काव-काव या मावळ्यांनी ऐकली असावी.

वनभोजन आटोपून आता परतीच्या दिशेनं चालू लागलो. वाटेतली दाट झाडी विश्रांती घ्यायला भाग पाडत होती. काही कातळ-भिंती आणि झाडांवर प्रेमवीरांनी आपली अक्षरं कोरली होती. हीच वाट वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळे दागिने परिधान करून नटत असणार… पावसाळ्यात आकांडतांडव करणाऱ्या नद्यांचा नखरा काही पाहायला मिळाला नाही, तरीही मी मात्र पावसाच्या रूपाचं मनोचित्र मनाच्या पटलावर रेखाटू लागलो…

आता गडाच्या पायथ्याशी येउन पोहचलो. महादेवाच्या मंदिरासमोरील शिवाची ती भव्य मूर्ती पाहून थक्क व्हायला झालं. मंदिरातल्या शिवलिंगावरच्या आरशात स्वतःचं आकर्षक प्रतिबिंब पाहत होतो. बाजूला आपल्या खोपटीवजा घराच्या पटांगणात थाटलेल्या हॉटेलात येणाऱ्या-जाणाऱ्यांचं यथोचित आदरातिथ्य करणारा, चहा, जेवण, काही हवंय का म्हणणारा ‘ठाकरे’ही दिसला.

निसर्गाच्या, सह्याद्रीच्या अफाट, अथांग दऱ्या-खोऱ्यात, गड-किल्ल्यांवर हुंदडताना अनेक लोक भेटतात. त्यांच्यासमवेत एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती तसंच समोरच्याची बाजू समजून घेण्याची नजर तयार होते. तोडून, चिडून गोष्टी बदलत नाही तर समजून घेऊन, सांगून बदल घडतात हेही या अनुभवी लोकांकडून शिकायला मिळतं. नवा ध्यास, प्रेरणा, उर्जा, तेज, दिशा यांसह प्रवासात लाभलेल्या मौल्यवान क्षणांना अनुभवाच्या गाठोडीत बांधून परतीच्या वाटेला लागलो.

*

वाचा
श्रीकांत डांगे यांचं साहित्य
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
कथा
चित्रकथा
कविता


+ posts

श्रीकांत डांगे हे अक्षर मानवचे राज्य अध्यक्ष असून सध्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड असून कविता, लेख इत्यादी लेखन ते नियमितपणे करत असतात.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :