दिगंतात पोचणाऱ्या
चढणीच्या रस्त्याच्या अखेरच्या वळणावरचे
ते झाड नेहमीसारखेच दिसते.
नेहमीसारखेच फुलते.
नेहमीसारखेच झुलते.
श्रांत जिवांसाठी नेहमीसारखीच सावली धरते.
कनवाळू, मायाळू, थकले-भागले झाड.
नेहमीसारखेच तर आहे ते झाड.
पण रात्रीच्या अंधाराला साय जे धरली
की एक निश्वास टाकीत ते झाड फुलांचा संभार मातीवर सोडून देते.
आणि त्याला फांदीवरच्या घरट्यातल्या इवल्या पाखरांची आठवण येते.
आकाशात पंख पसरून दूर गेलेली, आता मोठी झालेली पाखरे.
त्यांच्या पाऊलखुणा सुरकुतल्या खोडानं उराशी धरलेल्या.
त्यांचा चिवचिवाट कळ्या होऊन फांद्यांवर बहरलेला.
उसासा टाकत झाड मन घट्ट करते.
एरवी मात्र झाड नेहमीसारखेच दिसते…
*
वाचा
कविता
४२, विजयनगर : दौलत आठवणींची (गीतांजलि जोशी)
कथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
गीतांजलि अविनाश जोशी या ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. त्या कवयित्री आहेत. ‘घुंगुरमाया’, ‘हळवे दहिवर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ८०० वर्षांतील स्त्री काव्याचं संकलन त्यांनी ‘शततारका’ या पुस्तकात केलंय. ना. सी. फडके यांच्या साहित्याचा मागोवा घेणारं ‘केशराचा मळा’ या पुस्तकाचं संपादन आणि ‘शारदीय मोरपिसे’ यात दीपाली दातार यांच्यासह विविध कवींच्या कवितांच्या जन्मकथा त्यांनी उलगडून सांगितल्या आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर ‘जॉर्ज धुक्यात हरवण्याआधी’ ही एकांकिकाही त्यांनी लिहिली आहे.
आहाहा !! अप्रतिम!!! खूप सुंदर कविता!!