१९५९ मधे म्हणजे ‘दौलत’ बांधल्यावर दोनच वर्षांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला. दिल्लीचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला आणि दुसरा कानपूरचा सामना भारतानं जिंकला. तिसरा सामना मुंबईला खेळला गेला; पण हा सामना मात्र अनिर्णित ठरला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा एक सत्कार पुण्यात हिराबाग मैदानावर होणार होता. त्यासाठी भारतीय क्रिकेटर पुण्याला आले. मराठी क्रिकेट कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध पावलेले बाळ ज. पंडित हे आप्पांचे भक्त होते. ते काही खेळाडूंना घेऊन आप्पांना भेटायला ‘दौलत’वर आले. तो दिवस मला स्पष्ट आठवतो आहे. संध्याकाळची वेळ होती. संघाचे उपकप्तान पंकज रॉय, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे ही काही नावं मला आठवतात. जेष्ठ क्रिकेटर आणि आप्पांचे मित्र दि. ब. देवधरही आले होते. अर्थात, बाळ पंडित होतेच. खेळाडूंना भेटून आप्पांना अत्यंत आनंद झाला. कानपूरच्या सामन्यात बापू नाडकर्णींनी बहारदार गोलंदाजी केली होती. आप्पांनी त्यांचं कौतुक केलं. आप्पा आणि देवधरांकडून जुन्या काळातल्या आठवणी ऐकण्यात नवे तरुण खेळाडू रंगून गेले. आम्ही आमच्या छोट्या वहीमध्ये सगळ्या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. घराबाहेर खेळाडूंचं एकदा तरी दर्शन व्हावं म्हणून गर्दी जमली होती.
‘दौलत’मध्ये आप्पांच्या ओळखीचे काही थोर खेळाडू नियमानं यायचे. त्यातलं एक मुख्य नाव म्हणजे विजय मर्चंट. आप्पांची आणि विजय मर्चंट यांची ओळख फार जुनी होती. कोल्हापूरला असताना ताई विजयच्या वेळी गरोदर होती आणि प्रसुतीची वेळ जवळ आली होती. त्याचवेळी विजय मर्चंट एक महत्त्वाची मॅच खेळणार होते. आप्पांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही शतक केलंत आणि मला मुलगा झाला तर त्याचं नाव मी विजय ठेवीन. मर्चंटनी शानदार शतक केलं. आप्पांनी मर्चंटना तार पाठवली.
त्यात लिहिलं होतं –
‘अभिनंदन. कमलला मुलगा झाला. त्याचं नाव विजय ठेवलं आहे!’
हाच माझा धाकटा भाऊ, आम्ही ‘दौलत’मध्ये राहायला गेलो त्यानंतर क्रिकेट खेळू लागला. एकदा संध्याकाळी खेळ संपवून अस्ताव्यस्त अवतारात घरात शिरल्यावर विजयला एक गृहस्थ आप्पांबरोबर बसून बोलताना दिसले. ते विजय मर्चंट होते. आप्पांनी विजयची ओळख करून दिल्यावर त्यांनी स्वतः उठून उभं राहून विजयला ‘हॅलो यंग क्रिकेटर’ असं म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केलं. इतके ते साधे आणि मनमिळाऊ होते.
त्यांचा जन्म १९११ मधे धनाढ्य अशा ठाकरसी कुटुंबात झाला; पण तरीही त्यांच्यात अहंकार तसूभरही नव्हता. १९२१ ते १९५१ हा काळ त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीनं गाजवला. त्यांना आप्पांविषयी फार आदर होता. आप्पांचा उल्लेख ते भारताचा ‘नेविल कार्ड’ असा करत. नेहमी सूट, टाय अशा वेशात ते अतिशय नीट नेटके आणि प्रसन्न दिसत. विजयभाई फार मोठे समाजसेवक होते. त्यांनी अंध आणि विकलांग व्यक्तींच्या मदतीसाठी खूप काम केलं. त्यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे विकलांग व्यक्तींचे विवाह करून देऊन त्यांना नव्या संसारासाठी सामान दिलं. फार दिलदार स्वभाव होता त्यांचा. त्यांची आणि आप्पांची मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली.
आप्पांचे एक अवलिया आणि अतिशय वेगळे मित्र म्हणजे अर्देशर फरदोसजी सोहराबजी अर्थात ए.एफ.एस. किंवा बॉबी तल्यारखान. त्यांची आणि आप्पांची मैत्री फार जुनी होती. १९३७ मधे मुंबईत अनेक जातीय जिमखाने होते. त्यांच्यात पंचरंगी सामने होत असत. स्टेडियमची मालकी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’कडे होती. ३७ साली स्टेडियममधील जागांच्या वाटपावरून हिंदू जिमखाना आणि क्लबमधे भांडण झालं. हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष तेरसी नावाचे एक धनिक गुजराती शेठ होते. त्यांनी क्लबवर बहिष्कार जाहीर केला. एवढंच नाही तर त्यांना खडसावून सांगितलं की तुमची मॅच होईल तेव्हाच आम्ही आमच्या जिमखान्यावर मॅच खेळू आणि तुमच्या मॅचला कुत्रंदेखील येणार नाही. आपल्या मॅचला गर्दी व्हावी म्हणून पहिल्यांदाच तल्यारखानांची धावती कॉमेंट्री ठेवायचा प्रयोग केला गेला, जो पूर्णपणे यशस्वी झाला. तल्यारखानांचं नाव घरोघरी पोचलं. त्यांची खासियत म्हणजे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत साडे सहा तास ते एकटे वृत्तनिवेदन करत. मैदानावरचा खेळ श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभा करीत. कॉमेन्ट्री रसाळ व्हावी म्हणून वेगवेगळे किस्से, विनोद आणि खेळाची माहिती यांची पेरणी करत. सहा तास सतत बोलून घोगऱ्या झालेल्या आवाजाला ते ‘beer soaked and cigarette stained voice’ असं गमतीनं म्हणत. १९४० साली आप्पानी जेव्हा ‘झंकार’ साप्ताहिक सुरू केलं तेव्हा क्रीडाविषयक लेख वाचकांना वाचायला मिळावेत, अशी त्यांची इच्छा होती. किंबहुना १९२५ मधे त्यांनी सुरू केलेल्या ‘रत्नाकर’ मासिकात पहिल्यांदाच आप्पांनी स्वतः क्रिकेट, टेनिस, कुस्ती या खेळांवर लेख लिहिले होते. ते मराठीतलं पहिलं क्रीडाविषयक लेखन होतं. कारण त्या काळी वर्तमानपत्रात खेळावरचं पान नसे. तीच परंपरा सुरू ठेवत ‘झंकार’मधे तल्यारखाननी क्रिकेटवर इंग्रजीत लेख लिहिले. आप्पांचे जिव्हाळ्याचे मित्र होते, ए.एफ.एस तल्यारखान!
आप्पांची मैत्री केवळ सुखवस्तू, पांढरपेशा व्यक्तींशी होती असं मात्र नव्हतं. त्यांच्या मैत्रीत जात, धर्म, भाषा अशा अटीही नव्हत्या. याचं ठळक उदाहरण म्हणजे बाबू टांगेवाला आणि त्यांचा स्नेह. बाबुराव शिंदे अथवा बाबू टांगेवाला मराठी चौथी पास टांगेवाला होते. पण क्रिकेटवर प्राणापलीकडे प्रेम करत होते, पुण्यात होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या मॅचला ते हजर असत. बरोबर दोन-चार फुलांचे हार असत. फलंदाजानं शतक पूर्ण केलं की बाबू ग्राउंडवर धाव घेत आणि फलंदाजाच्या गळ्यात हार घालीत. देशी-विदेशी क्रिकेटर या हाराची कदर करत असत. आप्पांनाही या प्रेमाची कदर होती. आप्पांच्या वाढदिवशी बाबू हार घेऊन येणारच आणि ताई त्याला मोतीचुराचा लाडू खायला घालणारच!
आप्पा खरे ‘आनंदयात्री’ होते आणि त्यांचे हे मित्र त्यांचे ‘आनंददाता’ होते. आप्पांची खरी ‘दौलत’ हीच होती!
*
वाचा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
कविता
कथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
गीतांजलि अविनाश जोशी या ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. त्या कवयित्री आहेत. ‘घुंगुरमाया’, ‘हळवे दहिवर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ८०० वर्षांतील स्त्री काव्याचं संकलन त्यांनी ‘शततारका’ या पुस्तकात केलंय. ना. सी. फडके यांच्या साहित्याचा मागोवा घेणारं ‘केशराचा मळा’ या पुस्तकाचं संपादन आणि ‘शारदीय मोरपिसे’ यात दीपाली दातार यांच्यासह विविध कवींच्या कवितांच्या जन्मकथा त्यांनी उलगडून सांगितल्या आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर ‘जॉर्ज धुक्यात हरवण्याआधी’ ही एकांकिकाही त्यांनी लिहिली आहे.
व्वा क्या बात है खूप सुंदर आठवणी गीतांजली ताई, तुमच्या खजिन्यात आहेत ! आम्हा त्या वाचकांना अगदी हरकून जायला होते. तुम्ही भाग्यवान आणि आम्हाला वाचायला मिळतंय , त्यामुळे आम्हीही भाग्यवान!