‘दौलत’च्या हवेमध्ये नाट्यप्रयोगाच्या तिसर्या घंटेचे स्वरही मिसळले असावेत. तशी कारणंही होतीच. आप्पा आणि रंगभूमी यांची तोंडओळख आप्पा पाच-सहा वर्षांचे असताना झाली. त्यांच्या वडलांची बदली पुण्याला झाली होती आणि फडके कुटुंब पुण्याच्या शनिवार पेठेत राहू लागले होते. एकदा घरासमोरच्या रस्त्यावर गडबड ऐकली म्हणून त्यांनी पाहिलं, तर एक माणूस ‘संगीत शारदा’ नाटकाच्या जाहिराती वाटत होता. या जाहिरातीचं फार मजेदार वर्णन आप्पांनी केलं आहे. नाटकाचं पिठातलं म्हणजे सर्वात स्वस्त तिकीट चार आण्यांचं होतं. पुढं काही विशेष सूचना छापल्या होत्या. ‘स्त्रियांसाठी माडीवरची गॅलरी ठेवली आहे. आणि वेश्यांसाठी गॅलरीचा एक कोपरा राखून ठेवला आहे…’
छोटे आप्पा त्या प्रयोगाला गेले. आर्यभूषण थिएटरमध्ये हा प्रयोग होता. या नाटकाचा प्रयोग पाहूनच आप्पांचा आणि रंगभूमीचा जन्माचा संबंध जुळला. पुढं आप्पांनी सात नाटकं लिहिली, परंतु नाटककार म्हणून आप्पा सपशेल अयशस्वी ठरले. तरीही एक अभ्यासक आणि विचारवंत रसिक म्हणून आप्पांचं स्थान निर्माण झालं ते आपोआपच.
पुण्यात त्यावेळी नाटकासाठी कमी नाट्यगृहं होती. भरत नाट्यमंदिराचं बांधीव सभागृह नव्हतं. मागची गॅलरी तर चक्क लाकडी फळ्यांची होती. महाराष्ट्र मंडळ हे किल्ला वाटावा असं मोठं सभागृह होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत भावे स्कूलच्या प्रांगणात नाटकं व्हायची. तरीही पुण्याच्या रसिकांची दाद मिळवायला कलाकार धडपडत असत. पुण्यात प्रयोग असला की आप्पांना निमंत्रण द्यायला हे कलाकार ‘दौलत’वर यायचेच. विशेषतः संगीत नाटकांचे कलाकार आप्पांचे लाडकेच. छोटा गंधर्व, जयमाला आणि जयराम शिलेदार तर घरचेच वाटावे इतके जवळचे. सुहासिनी मुळगावकरांचा ‘संगीत सौभद्र’चा एकपात्री प्रयोग, सोलापूरच्या माया मल्लापूरचा एकपात्री प्रयोग किंवा तीन शिलेदार म्हणजे जयमालाबाईंच्या तीन मुलांचा ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग या सर्व नाटकांचं आप्पांनी हजर राहून कौतुक केलं.
बरेच नाटककारही आप्पांच्या भेटीला यायचे, पण नाटककाराबद्दल लिहायचं म्हटलं तर सर्वात आधी आठवतात ते वसंत शांताराम देसाई! आप्पांच्या कोल्हापूरच्या नाट्य क्षेत्रातल्या मित्रांपैकी ते एक होते. त्यांचं मोठेपण मला खूप उशिरा कळलं. वसंतराव पद्यरचनाकार होते. राम गणेश गडकर्यांच्या ‘प्रेम संन्यास’ या नाटकाची पदं त्यांनी रचली होती. गडकरी स्वतः कवी असूनही त्यांच्या या पहिल्या नाटकाची पदं वसंतरावांनी का रचली असतील? कदाचित गडकर्यांना नाट्यपदं रचण्याचा आत्मविश्वास वाटला नसावा. त्यानंतरही वसंतरावांनी खूप पुस्तकं लिहिली. बालगंधर्वांना मनात ठेवून त्यांनी ‘विधी लिखित’ आणि ‘अमृतसिद्धी’ ही दोन नाटकं लिहिली, जी फार लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘बालगंधर्व: व्यक्ती आणि कला’, ‘गडकर्यांची नाटयसृष्टी’, ‘खाडीलकरांची नाटयसृष्टी’, ‘मखमलीचा पडदा’ अशी पुस्तकं आणि ‘अशी एकाची गोष्ट’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. त्यांच्या एका पुस्तकाचं नाव त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं चित्र दाखवत – ‘कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी’. या पुस्तकानं आता जग किती बदललं आहे हे लक्षात येतं. वसंतराव १९६० साली नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ते दिसायला फार रुबाबदार होते. गोरेपान, उंचनिंच होते. धोतर, रेशमी सदरा, काळा कोट आणि डोक्यावर तिरकस ठेवलेली काळी मखमली टोपी असा त्यांचा वेश असे. हातात चांदीचा छोटासा पानाचा डबा असे. फारच लोभस व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं.
जे इतर काही नाटककार आप्पांच्या भेटीला यायचे, त्यातले एक म्हणजे वसंत कानेटकर! ते नाशिकहून पुण्याला आले की आप्पांना भेटल्याशिवाय जात नसत. त्यांचे वडील कवी गिरीश हे आप्पांचे घनिष्ठ मित्र होते. त्यामुळे, आप्पांनी वसंतरावांना लहानपणापासून पाहिलं होतं. आप्पांना त्यांची सर्व नाटकं फार आवडली होती. सौम्य, नीटनेटके वसंतराव बुश शर्ट-पॅंटमध्ये असत. ते आले की बहुतेक गप्पा साहित्यविषयक असत. मधुसूदन कालेलकरांनी आप्पांच्या ‘अखेरचे बंड’ या कादंबरीवर आधारित ‘हे फूल चंदनाचे’ हे नाटक लिहिलं होतं. तेव्हा ते एक-दोनदा आल्याचं आठवतं. जयवंत दळवी हे आप्पा-ताई या दोघांचे फार आवडते. ते आले की ताई गरम-गरम बटाटेवडे करणार, हे नक्की. त्यांनाही आप्पांबद्दल फार आदर होता.
अजून एक अवलिया व्यक्ती आप्पांना नेहमी भेटायला यायची. बाळ कोल्हटकर! नेहमी घाईत असल्यासारखं भरभर बोलायचे. थोडेसे बुटके, गव्हाळ वर्ण, मोठे घारे डोळे आणि अव्यवस्थित केस, पांढरा शुभ्र कुडता-पायजमा असं त्यांचं रूप असे. बाळ कोल्हटकरांचं स्वतःचं आयुष्य एखाद्या नाटकाहून कमी नाटकीय नव्हतं. त्यांचा जन्म सातारा इथला. ते अवघे सातवीपर्यंत शिकले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘जोहार’ नावाचं नाटक लिहिलं. ते त्यांचं पहिलं नाटक. त्यानंतर ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ ही त्यांची गाजलेली नाटकं. त्यांच्या बाबतीत एक मजेशीर किस्सा आठवतो. कोल्हापूरचे महाराज शहाजीराजे हे राजाराम कॉलेजात आप्पांचे विद्यार्थी होते. त्यांनी एकदा आप्पांना त्यांनी शिकार केलेल्या वाघाचं संपूर्ण कातडं, अगदी भल्या मोठ्या तोंडासकट भेट म्हणून पाठवलं. काही दिवस तो वाघ आमच्या हॉलची शोभा वाढवत होता. त्याचवेळी, बाळ कोल्हटकर घरी आले होते. आप्पांनी आमचा वाघ त्यांना देऊन टाकला. त्यांच्या एका नाटकात तो सेटवर दिसतही असे. आप्पा म्हणायचे, ‘आमचा वाघ नाटकात गेला!’
या व्यतिरिक्त, बाबुराव गोखले, बबन प्रभू हे व्यावसायिक रंगभूमीवरचे नाटककारही आप्पांच्या भेटीला नियमानं यायचे. का येत असतील हे मोठमोठे कलाकार आप्पांना भेटायला? एक तर, आप्पा आपलं लेखन सोडून कुठंच जात नसत. दुसरी गोष्ट म्हणजे, आप्पांना दुसर्या कलाकाराच्या उत्तम कलाविष्काराला मनापासून दाद देण्यात अतिशय आनंद मिळत असे. आप्पांच्या रंगभूमीसंबंधित ज्ञानानं त्यांना मार्गदर्शन मिळत असावं. जे काही कारण असेल ते असो. या मित्रांनी आप्पांना फार मोठा आनंद दिला, हे मात्र खरं. आप्पा-ताईंच्या रंगभूमीवरील प्रेमाचे हे काही स्नेही जिवंत साक्षीदार होते. ते दिवस नक्कीच फार ‘नाट्यमय’ होते!
*
गीतांजलि अविनाश जोशी या ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. त्या कवयित्री आहेत. ‘घुंगुरमाया’, ‘हळवे दहिवर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ८०० वर्षांतील स्त्री काव्याचं संकलन त्यांनी ‘शततारका’ या पुस्तकात केलंय. ना. सी. फडके यांच्या साहित्याचा मागोवा घेणारं ‘केशराचा मळा’ या पुस्तकाचं संपादन आणि ‘शारदीय मोरपिसे’ यात दीपाली दातार यांच्यासह विविध कवींच्या कवितांच्या जन्मकथा त्यांनी उलगडून सांगितल्या आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर ‘जॉर्ज धुक्यात हरवण्याआधी’ ही एकांकिकाही त्यांनी लिहिली आहे.
तुमची आठवणींच’ दौलत ‘ अनमोल आहे.
खूपच सुंदर ओघवते लेखन !! काळाचा एक पटच डोळ्यासमोर उलगडला.. गीतांजली ताई, हा तुमच्या आठवणींचा खजिना आम्हा वाचकांना मुक्तहस्ते देत आहात , त्यासाठी तुमचे खूप खूप आभार!